top of page

गैरसमजातून घडलेला विनोद



आयुष्य किती मजेशीर आणि सुंदर आहे. फक्त आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र कायम सकारात्मक असावा. त्यासाठी जीवन जगण्याची कला आत्मसात करणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आयुष्यात क्षणाक्षणाला आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो, त्यात काही सुखद-दुःखद तर काही गमतीशीर अनुभवही प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी तरी घडत असतात. काही घडलेल्या घटना काळानुसार आपल्या विस्मरणातही जातात. परंतु काही घटना ह्या कायमच्या आपल्या मनपटलावर कोरल्या जातात. कधी कधी त्या आठवणी ताज्या होतात व जसे घटनेचे स्वरूप असेल, त्यानुसार आपण उदास तरी होतो किंवा आनंदीत तरी होतो. पण माझ्या स्वतःच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेली घटना मी जेव्हा तुमच्या बरोबर शेअर करीन, तेव्हा त्याक्षणाला बऱ्याच वाचकांच्या मिस्र भावना असू शकतील. आणि अर्धवट मेसेज किंवा घाईघाईत वाचलेल्या मेसेजच्या गैरसमजातून किती छान विनोद निर्माण होऊ शकतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि बर्‍याच वेळेला आपण सुघ्दा असे गैरसमजूतीने चुकीचे मेसेज दुसर्‍या व्यक्तीला पाठवत असतो. आणि त्यामधून भलताच अर्थ निघू शकतो आणि कधी कधी आपल्याला शरमल्यासारखे वाटते आणि आपण मनापासून त्या व्यक्तीची माफी मागतो. परंतु सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक घडणाऱ्या घटनेकडे आपण पहात गेलो तर गंभीर गोष्टीतून सुध्दा आपण कसा विनोद घडवून आणू शकतो हे मी व माझ्या यजमानांनी प्रत्यक्षात आचरणात आणून दाखविले आहे.




त्याचे झाले असे..... मध्यंतरी आमचा फार जुना घरोबा असलेल्या आमच्या एका मित्राच्या पत्नीला म्हणजेच माझ्या जवळच्या मैत्रीणीला काही गंभीर आजारामुळे हाॅस्पिटलमध्ये भरती केले होते. आम्ही दोघेही तिला भेटूनही आलो होतो. एकदा माझे यजमान सगळ्या परिवारासाठी नाश्त्याचा डबाही तिच्या घरी घेऊन गेले होते. माझी अगदी जवळची आणि खूप चांगली मैत्रीण होती ती. तिचे नावही पुष्पाच होते. अर्थात माझ्यापेक्षा ती वयाने मोठी असल्यामुळे मित्रपरिवारात आम्हाला सिनियर व ज्युनियर पुष्पा म्हणूनच सगळे संबोधित असत.




एक महिना जवळजवळ पुष्पा दवाखान्यात उपचार घेत होती. परंतु म्हणावा तसा गुण काही तिच्या प्रकृतीत दिसत नव्हता. एक दिवस सहज माझ्या मिस्टरांनी आपल्या मित्राला म्हणजेच पुष्पाच्या यजमानांकडे तिची चौकशी करण्यासाठी फोन केला, तेव्हा तिला घरी सोडण्यात आले असे कळले. बातमी ऐकल्यावर थोडसं हायसे वाटले. परंतु दोनच दिवसांचा अवधी आणि तिच्या यजमनांचा माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर मेसेज आला की "Pushpa is no more". नेमकी ज्यादिवशी ती गेली त्याच्या दुसर्‍याच दिवशी तिचा वाढदिवस होता आणि तिच्या यजमानांना आमची नेहमीची सवय माहिती होती की कोणाचाही वाढदिवस असला की सकाळी पहिला आमचा फोन किंवा मेसेज त्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी जाणार. म्हणूनच पुष्पाच्या यजमानांनी ह्यांना पहाटेच मेसेज केला. सकाळी उठल्यावर जेव्हा ह्यांनी तो मेसेज वाचला तेव्हा आम्ही दोघेही स्तब्धच झालो. स्वतःला सावरून मग यजमानांनी आपल्या मित्राला सांत्वनासाठी फोन केला, आणि पुढील सोपस्कर पार पाडण्यासाठी ते आपल्या मित्राच्या घरी जाण्यासाठी निघाले. जाण्याआधी आपल्या जवळच्या मित्रपरिवारांमध्ये माझ्या यजमनांनी त्यांना आलेला आपल्या मित्राचा मेसेज "Pushpa is no more" फॉरवर्ड केला आणि वर सगळ्यांना समजावे म्हणून मुद्दाम लिहीले की हा मेसेज जयंतकडून आला आहे. आणि माझे यजमान जयंत सरांना भेटून, आपल्या कामासाठी आॅफीसमध्ये येऊन बसले.




काही वेळाने माझ्या यजमानांनी आपला मोबाईल ऑन करून आलेले मेसेजेस वाचण्यासाठी घेतला, आणि एक मेसेज चक्क माझाच स्वर्गवास झाल्याचे समजून, माझ्या यजमानांनाच दुखवटा व्यक्त करणारा मेसेज आला. क्षणभर मिस्टरांना हसू आवरेना. त्यांनी त्या मित्राला आपण चुकीचा मेसेज वाचला आहे असे म्हणून, ती गोष्ट स्पष्ट केली. परंतु आपण संपूर्ण मेसेज नीट न वाचल्यामुळे आपल्या हातून केवढी मोठी चूक झाली आहे हे लक्षात येऊन त्यांनी माफीही मागितली, परंतु ह्या एका गंभीर घटनेतून किती मोठा विनोद घडू शकतो हे जाणून आम्ही त्यादिवशी हसून हसून पूर्ण दिवस मजेत घालविला. व आमच्या मित्रपरिवारांतील सदस्य व नातेवाईकांतही ही घटना शेअर करून, त्यांनाही त्यादिवशी खूप हसविले. काहींच्या तर लगेच "तुझे आता आयुष्य आणखी वाढले" म्हणून गोड प्रतिक्रियाही आल्या परंतु आम्हाला मात्र करमणूक झाली.




आॅफिसमधून घरी आल्यावर माझ्या यजमानांनी त्यावर आणखी विनोद केला. मला म्हणाले.. "मी दारावरची बेल वाजविताना मला आता काय बघायला लागणार ह्याचाच मी विचार करत होतो" असे म्हटल्यावर आम्ही दोघेही जे हसायला लागलो की डोळ्यासमोर परत परत तो प्रसंग येऊन, आमचे हसूच आवरेना. शेवटी मला राहवेना आणी मी माझ्या मैत्रिण दिप्तीला हा घडलेला विनोद सांगण्यासाठी फोन केला आणि त्यानंतर आम्ही दोघीही गाल दुखेपर्यंत हसतच सुटलो. आमचे हसू आवरता आवरेना. कारण सकाळी नेहमीप्रमाणे मी आणि माझे यजमान फिरायला जात असतो. नंतर माझ्या मैत्रिणी दिसल्यावर ताबडतोब माझ्या खांद्यावरची बॅग मी माझ्या यजमानांच्या खांद्यावर अडकवली आणि मैत्रिणींबरोबर फिरायला जाण्यासाठी निघणार, इतक्यात माझ्या मैत्रिणीला हे हसत हसत म्हणाले, "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे". नेमकी ही घटना ताजीच होती आणि माझ्या स्वर्गवासाचा दुखवठा व्यक्त करणारे वाक्य हे दोन्ही आठवून आठवून माझी मैत्रिण व मी कितीतरी वेळ हसत बसलो होतो. संध्याकाळीसुध्दा हा विनोद इतर मैत्रिणींना कथन करण्यासाठी दिप्तीने मला खाली येण्यासाठी गळ घातली आणि तिच्या विनंतीनुसार मी संध्याकाळी खाली गेल्यानंतर इतरही माझ्या ग्रुपमधील मैत्रिणी मध्ये हा माझ्याबाबतीत गंभीर घटनेतून घडलेला विनोदी किस्सा शेअर केला तेव्हा त्यांचीही हसून हसून पुरती वाट लागली. सगळ्यांच्याच आयुष्यात असे मजेशीर किस्से कधी ना कधीतरी घडलेले असतीलच.




म्हणूनच मी म्हणते आयुष्यात आनंद लुटायचा असेल तर तो कुठल्याही घटनेमधून, क्षणाक्षणाला आपण घेऊ शकतो. फक्त आपण प्रत्येक घटनेकडे नकारात्मक दृष्टीने न पहाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवनाचा आनंद क्षणाक्षणाला जगता येतो, ह्या सत्य घटनेतून मला सगळ्यांना हाच महत्वाचा संदेश द्यायचा आहे. जन्माला आपण आलो आहोत तेव्हा मृत्यु अटळ आहे. तेव्हा गेलेला भूतकाळ न आठवता तसेच येणाऱ्या भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगा आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. जीवन फार सुंदर आहे.




पुष्पा सामंत.

नाशिक 27-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

300 views1 comment

1 comentário


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
05 de abr. de 2021

लेखिकेने अगदी सहज सुंदर भाषेत आणि ओघवत्या शैलीत आपला अनुभव व्यक्त केला आहे. असे अनुभव प्रत्येकाला येत असतील. परंतु एवढे छान वर्णन सगळे करु शकणार नाहीत. लेखिकेने असेच लिखाण चालू ठेवावे यासाठी शुभेच्छा.

Curtir
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page