वेलकम टू फिनलँड' वेलकम टू फिनलँड ' या पुस्तकाच्या लेखिका मंगल गोगटे यांचा थोडक्यात परिचय देऊन मी त्यांच्या पुस्तकावर माझ्या अल्पबुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते.एका लेखिकेच्या साहित्यावर लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.माझ्याकडून त्यांना योग्य न्याय मिळावा याचा मी प्रयत्न करेन

           लेखिका मंगल गोगटे या मूळच्या अलिबागच्या. बी. ए. पर्यंत इथे शिक्षण घेऊन पुण्याहून एम. ए. केलं आहे.एमफिल केलं आहे.रशियन भाषेवर यांचे प्रभुत्व आहे. रोड सेफ्टी एडवायजरी कमिटीवर २५ वर्षे काम केलं आहे. भारताबाहेर अनेक कॉन्फरन्स अटेंड केल्यात. सोमैया कॉलेजात ३० वर्षां लेक्चरर शिप  केली. मंगल गोगटे लग्नानंतर मुंबईला आल्यात आणि त्यांच्या प्रगतीला जणू पंख फुटले. 'लोकमत , आज दिनांक , व सामना ' यात बरीच वर्षे लिखाण केलंय. लेखन कलेशिवाय चित्रकलेत रुची आहे ; यांच्या पेंटींग्ज चे प्रदर्शन भरतात. अशा या बहुगुणी , प्रतिभाशाली ,निगर्वी ,सुसंस्कृत विदुषीच्या पुस्तकावर आज मी लिहीत आहे

          ' वेलकम टू फिनलँड ' हे पुस्तक वाचत असतांना आपण पुस्तक वाचत आहोत असं वाटत नाही ; तर मंगल गोगटे या सु - मनाच्या स्त्री बरोवर फिनलँडची सफर करीत आहोत असे वाटते.पुस्तकातील प्रत्येक पान आपलं वेलकम करतं व पुढील पानावर काय आहे याची उत्सुकता शेवटच्या पानापर्यंत टिकून राहते. यात फक्त प्रवास वर्णन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन नसून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचं सुंदर चित्रण आहे ; आणि या स्वभाव चित्रणातूनच आपल्याला फिनलँडच्या संस्कृतीची अगदी जवळून ओळख होते . 

          आपल्या जीवनसाथी बरोबर प्रवासाची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशनची फेलोशिप त्यांना मिळाली. तिथे बऱ्याच कॉन्फरन्स त्यांनी अटेंड केल्यात. फिनलँडला  इवा ,तेलो , युहा , हिल्का , मीरा ,पेत्री ,तारया , मार्कू , लॉट्टा , अनु , या सारख्या मित्रमैत्रिणी  भेटल्या . यातील काही मित्र तर मैत्रीच्या ही वरच्या पातळीवरील म्हणजे देवदूत वाटाव्या अशा भेटल्या .

          फिनलँडची राजधानी ' हेलसिंकीच्या '  ' वान्ता ' विमानतळावर रात्री पावणेबारा वाजता  'वेलकम टू फिनलँड ' ची पाटी घेऊन वेलकम करणारा थॉमस जसा देवदूता सारखा भासला  तसाच हेलसिंकिहून ट्रेन नी सेनायोकीला जातांना भेटलेला सहप्रवासी भासला. सेनायोकीला ट्रेन बदलून लेखिकेस ' वासा ' ला जायचे होते ती ट्रेन या देवदूतामुळे कशी मिळाली याचे वर्णन उत्सुकता व थरार याने परिपूर्ण असे आहे. 

          ' इवा ' हिच्यामुळे लेखिका मंगल या फिनलँड ला गेल्या. हिने लेखिकेसाठी काही व्याख्याने तसेच काही संस्थाना विशेष भेटी असा कार्यक्रम आखून आग्रहाचे आमंत्रण दिले ही 'इवा' रात्री अडीच वाजता चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन वेलकम करायला विमानतळावर आली. 

       इथले कडक ट्राफिक नियम ते पाळणारे लोकं , समर मधे २० ते २४ तास असणारा दिवस आणि फुलापानांनी बहरलेला हा देश लेखिकेला आकर्षित करतो.

          ' इवा ' व तिचा नवरा या दोघांनी केलेली संसारिक  कामाची वाटणी कोणत्याही स्त्री ला हेवा वाटेल अशी विदित केलीये. इवा बरोबरचा सौनाबाथ चा अनुभव , त्याबद्दल असणाऱ्या काही गैरसमजुती , सौनाची गरज , सौनामुळे होणारी सौंदर्य वृद्धी हे सहज संभाषणातून  कुठेही अश्लीलता न येता पारदर्शकतेने लिहिले आहे.

          मोठ्या पदावर असलेली ' तेलो ' आणि तिची सेक्रेटरी या दोन स्त्रियां एकत्र आल्यावर एकदुसरीच्या ड्रेस चे कौतुक करीत होत्या. यातून स्त्रीसुलभ भावना सर्वदूर सारख्याच असतात हे लेखिकेने सहजपणे विदित केलं आहे.

          निसर्गरम्य फिस्कर्स गावाची सफर होत असतांना संभाषणातून 'तेलो' व 'युहा' चे स्वभावदर्शन होते.

         ' हिल्का '  या स्वीडिश  मुलीने लेखिकेला सकाळी उठवण्याची विनंती केल्यावर त्या प्रसंगात लेखिकेला आपल्या स्वतः च्या मुलीची आठवण होते . बिनकपड्याच्या हिल्का ला  सहज वावरतांना पाहून लेखिकेला वाटणारी लाज ; या प्रसंगात कुठेही अश्लीलतेचा गंधही नाही. हा दोन संस्कृतीतील फरक इथे जाणवतो.

          भारतीय नाव असलेली भारतीय संस्कृती व भारताचं आकर्षण असलेली गोरी निळ्या डोळ्यांची फिनिश स्त्री मीरा बॅनर्जी हिच्यामुळे  'हेलसिंकी' बद्दल बरीच नवीन माहिती मिळते.या माहितीतून भारतीय सभ्यतेशी असलेले साम्य समोर येते. तसेच तिथल्या बांधकामाच्या वेळी माणसांची घेतलेली काळजी पाहून लेखिकेला आपल्या देशातील बांबूवर उभं राहण्याची कसरत करत काम करणारी माणसं आठवतात. इथे फिनलँड  व भारताशी सहज तुलना दिसते.

          'लॉट्टा ' व 'अनु' या मनमोकळ्या मैत्रिणींबरोबर फिनलँडची निसर्गसौंदर्याची सफर करतांना तेथील भौगोलिक माहिती तसेच फिनिश संस्कृतीशी ओळख , लग्न व डिवोर्स  या विषयावरील नकळत होणारी देवाण-घेवाण मनाला भावते.

          'हिले 'च्या व्यक्तित्वाद्वारे तिला असणारे इंडिया व इंडियन फिलॉसॉफी चे आकर्षण प्रगट होते. 

          ' तारया' आणि 'मार्कू'  सोबत टू हंड्रेड थाउजंड तळ्यांचा देश म्हणवला जाणाऱ्या फिनलँड च निसर्ग सौंदर्य दर्शन जितकं छान रंगवलं आहे तितकंच ' तारया' चं हळवं मन अलगद उलगडून दाखवलंय .

          चीज वाईन पार्टीच्या सुंदर हुबेहूब वर्णनात लाजऱ्या बुजऱ्या वाटणाऱ्या फिनिश लोकांची लाईटर बाजू सुरेख मांडली आहे.

          ' पेत्री कॉफी आणि कोन्यक ' यात डॉक्टरेट करत असणाऱ्या लाजऱ्या बुजऱ्या पेत्रीची  भेट सुरेख रंगवली आहे. 'कॉफी आणि कोन्यक' वाचून त्याची चव , सुगन्ध व गर्मी आपल्या पर्यंत पोचते.

          प्रत्येक वेळेस वाचकाला आपल्या बरोबर फिनलँड पर्यन्त नेऊन तिथल्या संस्कृतीची तसेच फिनिश व्यक्तीच्या स्वभावाची ओळख त्यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पांच्या ओघात करून देणं लेखिका मंगल गोगटे यांना छान जमलंय. लेखिकेच्या मनमिळाऊ स्वभावामुळे परदेशीही त्यांच्या जिवश्च कंठश्च मित्रमैत्रिणी झाल्यात. यामुळे ' वेलकम टू फिनलंड ' हे फक्त प्रवासवर्णनपर पुस्तक न राहता  भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिचित्रण व स्वभावदर्शन याद्वारे तिथल्या संस्कृतीची आणि जपलेल्या नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून देणारा एक स्वछ बिलोरी आरसा वाटतो. असे हे मला आवडलेले वाचनीय व संग्रहणीय, स्पृहणीय पुस्तक आपणास ही आवडेल.लेखिका: सुधा गोखले (मुंबई)

मो: 9870401154

ईमेल: sudhagokhale20@yahoo.com