(लेखक: सचिन बेंडभर)
काही कामानिमित्त मी आणि सरपंच आबा पाटील त्यांच्या स्कॉर्पिओमधून मुंबईला निघालो होतो. गाडी देहूफाट्याचा टोलनाका पास करून निघाली, तेवढ्यात आबांचा फोन वाजला.
"हॅलो ,हा बोला काय अॅक्सिडेंट ? कधी ? कुठं ? "
आबा बोलत होते . फोन बाजूला घेत ते म्हणाले,
"संत्या गाडी फिरव,सरळ चाकण चौकात चल."
मी गाडी जाग्यावर फिरवली. पण आम्ही पुन्हा मागे निघालो. सरपंच आबा पाटील म्हणजे राजकारणात राहून गरिबांची सेवा करणारा धुरंधर. अनेकांना त्यांनी सरकारी योजना मिळवून दिल्या. तुटलेली घरे जोडली. कोणावर संकट आलं की,पहिला फोन आबालाच, कारण अॅम्ब्युलन्सच्या आधी येणारं इमर्जन्सी वाहन म्हणजे आबांची स्कॉर्पिओ. अनेकांनी तर आबांचा नंबर स्पीड डायल करून ठेवला होता. आबांचं पूर्वायुष्य फार वेगळं होतं. यश मिळवण्यासाठी ते हाडाची काडं, रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करायचे. मला अजूनही आठवतो ज्या दिवसाने आबांचे आयुष्य एकदम बदलून गेले. पुण्यातलं बँकेचं काम उरकून आबा आणि मी शिरूरला निघालो.त्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल होता. शिक्रापूर चौकात आम्हाला गर्दी दिसली. तेथील परिस्थितीवरून अॅक्सिडेंट झाल्याचे आमच्या लक्षात आलं. मी गाडीचा वेग कमी केला.
"आरं आरं , कशाला थांबतोस?"
" कुणाचा अॅक्सिडेंट झालाय, ते तरी बघू."
"आरं हायेत की मस ल्वाकं. आपुन काय ठेका घेतलाय व्हय? तिकडं आमदारकीच्या निकालाला सुरवात झालेय."
"आबा अजून अॅम्ब्युलन्सही नाय आली."
"तू पण लईच हळवा हाये बघ." आपल्यासारख्यांनी एवढं भावनिक होऊन नाय जमत, चल लवकर."
मोठ्या माणसांपुढे बोलण्याची आपली संस्कृती नसल्याने मी गप्प राहिलो.गाडी रांजणगाव गणपतीपर्यंत ली, तोच आबांचा मोबाईल वाजला. तसं त्यांचे हातपाय लटलट कापू लागले.
"साहेब पडले का काय?" मी विचारलं.
आबांना काय बोलावं सुचेना.
"आरं संत्या गाडी फिरव अजयचा अॅक्सिडेंट झालाय."
"काय ?"
मला धक्काच बसला.
" व्हय आपण पाहिलेला अॅक्सिडेंट अजयचा होता.
अजय ! आबांचा धाकटा चिरंजीव. कॉलेजमध्ये शिकणारा एकवीस वर्षांचा तरुण. मी वेगात गाडी चालवूा लागलो. तिथे जाऊन पाहिले, तर अजय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. आम्ही धावतच त्याच्या जवळ गेलो.
"अजय बाळा तुला काही होणार नाही, मी आलोय ना", आबा बोलले.
आबांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित आले. जणू त्याची शेवटची इच्छा आबांच्या दर्शनाचीच होती.
"आबा अजयला लवकर हॉस्पिटलला नेऊ," मी बोललो.
तेवढ्यात अजयने माझा हात हलकासा दाबला अन् नकारार्थी मान हलवली. जणू त्यातून तो सांगत होता,
नाही आता फार उशीर झालाय.'
"आबा मला तुमच्या कुशीत घ्या," थरथरत्या ओठांनी अजय बोलला. आबांनी त्याला मिठीत घेत म्हटलं,
"नाय राजा तुला काही होणार नाय." अजयने आबांना गच्च मिठी मारली. हाताच्या मुठा आवळल्या. ओठ आत घेऊन दाबले. अजयने डोळे मिटले अन् ओठातून शेवटचे शब्द आले,
"आबा..."
अजय! अजय !! ,आबांनी आवाज देत अजयला समोर धरलं अन् करुण किंकाळी घुमली,
अजय ..
आबांचा जीव पश्चात्तापाच्या सागरात बुडाला. त्याचं प्रायश्चित्त घेण्याचं त्यांनी ठरवलं. तेव्हापासून त्यांनी पूर्ण आयुष्य गरिबांच्या सेवेत अर्पण केलं. कितीही अर्जंट काम असले अन् कुणाचा अॅक्सिडेंट झाला तर गाडी थांबवायला सांगत. मग आम्ही दोघे त्याला दवाखान्यात नेत.त्याला बरं वाटत नाही, तोपर्यंत तिथंच बसून राहात. आबांना या समाजसेवेबद्दल विचारलं तेव्हा ते बोलले,
"कुठंही अपघात झाला, तर माझा अजयच मला आवाज देतोय, असंच वाटतं. जखमी माणसात मला तोच दिसतो. मग कोणता बाप आपल्या पोराला तसा सोडून जाईल ?"
"आबा पुढे म्हणाले,
"त्या दिवशी तुझं ऐकलं असतं, तर आज अजय आपल्यात असता. मला किती मोठी किंमत मोजावी लागली त्या एवढ्याशा चुकीची.'
आम्ही चाकण चौकात पोचलो . आबांनी खाली उतरून हात लावल्यावर जखमीला उचलण्यासाठी लोकं पुढं आले.आबांचा अजय गेला,पण त्यानंतर आबांनी कितीतरी अजयला जीवदान दिले.
सचिन बेंडभर (पुणे)
मो: 9822999306
ईमेल: sachinbendbhar3@gmail.com
खुप सुंदर 👌👌
मोजक्या शब्दात फार छान वर्णन केले आहे.