डिशेंशी आणि श्रीमंतीरात्री साडे अकराची वेळ... पाऊस पडत होता. पाचच मिनिटांपूर्वी लाईट गेले होते. फोन वाजला. Unknown number होता. मी फोन उचलला. "सर... मी काका बोलतुय" पुण्यात शिकण्यासाठी रहाणाऱ्या चिमण्या पाखरांना... आणि पिल्लं उडून गेल्यावर, घरट्यात मागे राहिलेल्या चिमणा - चिमणीला जेवणाचे डबे देण्याऱ्या... काकांच्याच शब्दात सांगायचं तर ' डिशेंशी किंवा श्रीमंती ' नसलेला बिझनेस असणाऱ्या काकांचा फोन होता... फक्त मीच नव्हे, माझ्या आणि त्यांच्या परिचयातील सर्व लोक त्यांना 'काका ' म्हणूनच हाक मारतात. अगदी त्यांची पत्नी, मुलं, सुना आणि नातवंडं सुध्दा... "जरा भेटायचं हुतं तुम्हाला" काका. "आत्ता???" "काही प्रॉब्लेम आहे का???" मी. "नाई व्हो सर, देवाच्या दयेनं काई बी प्राब्लेम नाई बगा" काका उत्तरले. "मग आत्ता यावेळी काय काम काढलंत?" "पैसं द्यायचं हुतं.. तुमच्या क्लासच्या खोल्या बंद हाईत.. आत्ता काई घरी यायची वेळ नाई... जरा खाली या... वेळ लावू नका, माजं जेवन व्हायचंय आजुन" "आमचा किशोर (म्हणजे काकांचा नातू) क्लासला येतोय ना एप्रिल पासनं तुमच्याकडं... तुमि काई आजून पैसं मागितलं न्हाई... मी म्हनलं आपनच द्यावं... ठावं हाये मला, की इतक्या पैशानं काय होनार... पन काडी काडीनंच तर गंजी हुतीय की..." "काका, अहो असं काही नाही... कितीही का असेनात पैसे आहेत ना ते... म्हणजे लक्ष्मी ती..." "आणि ना मी कुठं पळून जातोय ना तुम्ही... मग आत्ता आणि यावेळी पैसे द्यायची इतकी घाई कसली?" मी खाली जाण्याची तयारी करत करतच म्हणालो. "ठावूक हाई मला... घाई न्हाई तुमाला. पन मला सर्वीकडचे डबे गोळा करून घरी जायला हीच वेळ हुते रोज... दोन महिनं झालं, आनखी तरी किती टांगायचं समोरच्याला?" "आनी आजून येक, तुमचा बी बिझनेस हाये आणि माझा बी बिझनेसच हाये... सद्याच्या परस्थितीत येका बिझनेसवाल्याला दुसरा बिझनेसवालाच बेश्ट समजून घेतोय बगा..." काकांशी बोलत बोलत मी खाली पोहोचलो होतो. समारोपाच्या वाक्यानं मात्र, मला काकांची 'डिशेंशी' आणि त्यांच्या चेहऱ्यावरील विचारांची ' श्रीमंती ' रात्रीच्या काळोखात आणि त्यांच्या चेहऱ्यावरील मास्कच्या आत सुद्धा स्पष्ट दिसत होती...


आशिष आगाशे

ईमेल - ashishagashe23@gmail.com

97 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad