(विनोदी लेख)
प्रिय सॕटू..
ते तातू वगैरे आता जुनं झालं .किती वर्षे तीच ती जुनी नाव वापरायची ? ओल्ड फॕशन्ड नाही का वाटत ! आता बघ आपल्या पिढीची नाव शिल्लक तरी आहेत का? ( आता तुझं नाव सटवा पण मी त्याचा सॕट्यु केला!) अलीकडचे नाव तर पहा. ती माणसाची असल्यागत वाटतच नाहीत मात्र आपणाला त्याच नावानं बोलावं लागतं ना लेकरांना! परवा एकानं आपल्या लेकराचं नाव ठेवलं टॉमी. आता बोला. पूर्वी आजोबा-पणजोबाचं नाव वाढवायची. (आता हे वाढवायचं म्हणजे पुढच्या पिढीला तेच नाव ठेवायचं हे तुला माहीत आहेच) पण आता पूर्वजांची नावं ठेवण्याची फॅशन ओल्ड झाली असं बोल्ड मायबाप सांगू लागले. मग आता अशी नाव ठेवतात लेकरांची. आता त्या टॉमीला पण हाक मारायची काय म्हणायचं हेच मला कळत नाही. आपण त्या लेकराला टाॕमी म्हणून हाक मारतोय आणि ते निष्पाप बालक आपल्यासमोर शेपटी हलवत येतय असे चित्र माझ्या डोळ्यापुढे तरळतंय.
असो तुला हे पत्र म्हणजे लेटर लिहिण्याचे कारण जरा वेगळं आहे. पत्र पाहून तुला आश्चर्य वगैरे वाटेल. वाटू दे जरा. कारण हल्ली आपल्याला कशाचंच आश्चर्य वाटेल असं काही राहिलं नाही. व्हाट्सअप आणि तत्सम विद्यापीठांनी एवढे शोध लावलेत की आता आपल्याला कशाचंच नवल वाटत नाही. शिवाय तुम्ही आज कोणतीही नवीन गोष्ट करा ते आपल्याकडे फार वर्षांपूर्वी होतं असं दाखवणारी काही स्वायत्त विद्यापीठं समाज माध्यमांवर तयारच असतात. त्यामुळे नवी नवलाई कशाचीच राहिली नाही. जत्रेत वर्षाला एकदा मिळणारी शेव पापडी कोपऱ्यावरच्या स्वीट मार्ट मध्ये जाता-येता काचेतून डोळा मारत असेल तर त्या जत्रेतल्या शेवचं कुणाला अप्रुप वाटेल तुझ्याकडे असं कोणाचं पत्र आले नसेल. डाकीया वगैरे नावाचा प्रकार असतो हे तुझ्या नातवांना तर माहीतही नसेल. डाकिया म्हणजे डाकू का? असा प्रश्न नातवाने जर विचारला तर आश्चर्य वाटून घेऊ नको. गंमत सांगू का? हल्लीची पिढी कशाचा अर्थ काय काढेल हे सांगता येत नाही. डॉक्युमेंट या शब्दाचा अर्थ डाकूकडे असलेली कागदपत्रे असा एका बालकाने लावला. त्या बालकाच्या बुद्धीचे कौतुक करण्याऐवजी आपल्या मंद बुद्धीची कीव मला प्रथमच आली. (अशी कीव सर्वप्रथम बायकोला, नंतर साहेबांना , त्यानंतर लेकरांना अन शेजाऱ्या पाजा-यांना पण आली.) समोरच्या फ्लॕटमध्ये राहणाऱ्या वहिनींना मात्र असं कधी वाटलंच नाही. वरच्या कंसा मधल्या माझी कीव करणाऱ्याची त्यांना कीव येते .त्यांच्या मते एवढा नाकासमोर चालणारा माणूस जगात शोधूनही सापडायचा नाही. आणि म्हणून त्या मला अधून मधून बोलावून (फक्त चहा पाजून) धीर देतात. नाकासमोर चालणारा असं त्यांनी म्हटलं की पुन्हा पुन्हा नाकाला हात लावून नाक जागेवर असल्याची खात्री मी करून घेतो. त्यांचा चावट नवरा मात्र "वहिनींच्या हाताची चवच वेगळी" असं म्हणत प्रत्येक पूर्ण अपार्टमेंटमध्ये हुंदडत असतो. जाऊ दे आपल्याला काय करायचे त्याचं!
तर मूळ मुद्दयाला येतो. आता हे "मुद्दा "आणि "मुद्दल" म्हटलं की मला खळखळून हसू येते .कारण मराठीतला 'मुद्दा 'आणि गणितातलं' मुद्दल 'यातला फरक तुला कधी कळलाच नाही. तरीपण दहावीच्या परीक्षेत तुझ्या बापाने (आय मीन प.पू.पिताश्रींनी) परीक्षेत पूर्ण सेटिंग लावून तुला मेरीटमध्ये आणून बारावीच्या परीक्षेतही तोच कित्ता गिरवीत तुझ्या उच्चशिक्षणाचा महामार्ग करून दिला आणि आम्ही मात्र सात्विक बापाची लेकरं खर्डेघाशी करीत बसलो एक तारखेची वाट पहात!
पण आता मात्र मला माझा बापच ग्रेट वाटतोय! कारण या कोरोनानं तुला आणि मला एकाच पातळीवर आणलय. पतसंस्था, जीपीएफ, खाजगी बँका, मित्रपरिवार अशा सर्व ठिकाणी तोंड वेंगाडून बांधलेलं माझं छोटेसे घर आणि तुझा पंचतारांकित फ्लॅट या दोघांनाही एकाच लेवलवर आणलं या विषाणूनं! आता त्या फ्लॅटचे द्वार सुद्धा तू सोडू शकत नाहीस आम्ही घराच्या किमान बाहेर तरी उभारू शकतो. सरकार नामक मायबापाने लाॕकडाऊन बंद केलं तरी आपली इच्छाशक्ती एवढी 'डाऊन' झाली की बस्स! तू राहत असलेल्या 33 व्या मजल्याच्या उंचीएवढंच जमिनीत डाऊन गेलो तरी ही इच्छाशक्ती सापडेल का नाही अशी शंका आहे. मात्र अशाही काळात सातत्याने चांगल्या 'रेसिपी 'ची फर्माईश करणारे नवरे आणि त्या पुरवणाऱ्या बायका पाहिल्यावर "वेटलॉस" चा बिझनेस करणाऱ्यांना पुढच्या काळात चांगले दिवस येणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही किंतु नाही. ते दिवे विझवायचं आणि लावायचं हे तर आपल्याला काही कळलं नाही बुवा! "तुम्ही यापूर्वीच एवढे 'दिवे' लावलेत कि आता नका लावू ,मी पाहून घेते"असं काहीतरी बायको पुटपुटल्यासारखं वाटलं. ("तुम्हाला वयाच्या मानाने होत नाही असं म्हणायचं असावं" अशी मी समजूत करून घेतली.) तुझ्या घरी कोण कोण दिवे लावले? या दिवे लावण्यावरून झालेल्या व्हाट्सअप फेसबुक वर एवढा उच्छाद मांडलाय की या दोन्हींची 'दिवे'लागण होते की काय अशी शंका माझ्या मनाला चाटून जात आहे. समस्त बायका किचनमध्ये गुंतले असल्यामुळे पुरुषांना अधिक खाऊन 'अधिक' मास असल्याचा अनुभव येतो आहे म्हणे !या अधिक खाण्यातूनच या समाज माध्यमीय विद्यापीठातील वाद-विवाद अधिकच वाढले असावेत असा माझा तरी तर्क आहे. (अर्थात माझ्या तर्काला विचारतो कोण? हे आपल्या दोघातच राहू दे!) ज्यांच्या नवऱ्यांनी किचन ताब्यात घेतला त्या बायकांनी सुद्धा या चर्चेत चांगलेच हात धुऊन घेतले. (वारंवार हात धुण्यापेक्षा इथं हात धुऊन घेणं चांगलं असं समोरच्या फ्लॕटमधील (मला नाकासमोर म्हणणा-या) वहिनी आमच्या सौ.ला डिवचण्यासाठी म्हणाल्या.ही सटवी नेहमीच मध्ये येते म्हणत बायकोने त्याच वेळी भिंतीवरील पालीला झटकले तेव्हा घाबरून गेलेल्या त्या दोन पायाच्या सटवीने पुन्हा आमच्या घरात पाऊल टाकला नाही.तर हे दिवे लावून कोणाचं काय होणार यापेक्षा वादावादीचे काय होणार? हा प्रश्न मला आता पडला आहे .
"आता घराबाहेर पडायचं नाही "असं बायकोनं बजावून सांगितल्यावर" बाहेर जाऊन येऊ का थोडं ?"असं म्हणण्यात जी मजा असते ती संन्याशी ( पक्षी : कुंवारे लोग:मी कुणाचं नाव घेतलं नाही )लोकांना काय कळणार? त्याचा अनुभव मी घेत आहे. म्हणजे मी बाहेर वगैरे जात नाही .फक्त "थोडं पाय मोकळे करून येऊ का ?"एवढंच बायकोला म्हणायचं. मग घरात सुरू होतं रामायण आणि महाभारत एकाच वेळी! "एरव्ही थोडं घराबाहेर पडा" म्हणून भांडणारी ती हीच का बायको? असा प्रश्न सतावतो आहे.आता हे 'रामायण' आणि 'महाभारत' चालू करून मोठी पंचाईत झाली आहे. त्यावेळी रामायण महाभारत पाहताना आपली लेकरं शांत बसायची. हाताची घडी तोंडावर बोट ठेवून अत्यंत भाविकपणे पहायची. आता ही नातवंडांची पिढी काय प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. म्हणून मग मी हे रामायण महाभारत सुरू झाले की पुस्तकात तोंड घालून बसतो अगदी डाव्या विचारवंतासारखा !आमच्या शेजारच्या काकू म्हणाल्या, "अरे बाबा कोन चालू केले रामायण-महाभारत त्याचं कल्याण होओ".मी म्हणालो त्याचं "कल्याण होईल, पण आमच्या बुद्धीचा "रतनखत्री "होईल त्याचं काय ?
आता तुला खरं सांगतो. एक महिन्यापासून कोरोनाशिवाय काहीच नाही. ती एक जाहिरात होती बघ ! आपल्या तरुणपणी! ड्रिंक करोना, ईट करोना, स्लीप करोना! असं सगळं झालंय. टीव्ही लावला तर तेच. बातम्यांमध्ये तर स्कोर बोर्ड असतो जणू काही क्रिकेटची मॅच चालू आहे! कुणाला फोन केला तर बोलण्याआधीच कोरोनाचा मारा!तरी आता बरं ते फोनवरचं खोकलणं बरं झालय.त्या खोकलण्यामुळं आमच्या म्हातारीनं (पक्षी:बायकोनं) मला दवाखान्यात ओढूनच नेलं.कधीपण फोन लावला की तुम्ही खोकलताय हा तिचा आरोप तिच्यासह दवाखान्यात जाऊन आल्यावरच बंद झाला. (फोनवरचं सरकारी खोकलणं तोवर थांबलं होतं!कुणाला फोन केला तर तेच. म्हटलं त्यापेक्षा पत्र लिहु या ख्यालीखुशाली विचारू या. या पत्रात कोरोनाबद्दलचं अक्षर ही येऊ नये असा माझा प्रयत्न होता. पण पहा अर्ध पत्र त्यानंच भरलय.जणू काही आपण' कोरोनाग्रस्त' झालोय असंच सध्या आपलं जीवन झालंय. विषाणु कुठे असेल तो असेल पण आपण मात्र कोरोनाग्रस्त झालोय एवढं मात्र खरं! "अय्या, कोणाचं पत्र आलंय ? "म्हणून तोंडाचा चंबू करून सगळे मिळून एकदाच वाचू नका! सोशल डिस्टन्स पाळा! नाहीतर विषाणूचा प्रसार म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल व्हायचा. पत्राचे उत्तर देऊच नको !त्यातून एखादा व्हायरस यायचा तुझाच!
धनंजय गुडसूरकर
मो: ९४२०२१६३९८
ईमेल: gudsoorkardhanu.1973@gmail.com
Comments