कथा- कॉफी आणि नकारगर्दी... खूप गर्दी.... सतत भडीमार... अनेक विचार... विचारांवर विचार.... हा विचार का? यावर विचार... अनेक तत्त्व... अनेक तत्वज्ञान पाजळणारे महान आत्मे.. अनेक समाजसेवक... अनेक वस्तू .. उपयोगी, निरुपयोगी..... “स्वप्नातलं घर आत्ताच घ्या” “राडो चे खरे घड्याळ फक्त २००० रुपयात,आत्ताच बुक करा.”, “३ लिपस्टिक वर २ फ्री फक्त ५००० रुपयात.”... पैसे काय दरोडे टाकून भरू. “नाव नोंदवा आणि खात्रीशीर लग्न जमवा”... नाही जमल तर पैसे परत देणार का?, “पांढरे केस काळे करा केवळ ३ दिवसात”... आणि ३ वर्षातही नाहीच झाले तर काय ?, “७० वर्षांच्या आजीने केले २२ वर्षीय मुलाशी लग्न”.. केलं तर केलं त्यात तुमच काय गेलं, “आमच्या प्रायोगिक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला नक्की यायचं हा.”... का? दुसरा प्रयोग होणार नाही का? “चुकीच्या वेळी लग्न करणे या ५ अभिनेत्रींना पडले महाग , नक्की वाचा”....लग्न कधी स्वस्त पडते का?, “माझ्या शोनूचा पहिला वाढदिवस”, “माझ्या बाबूचा पहिला डान्स”, “माझ्या चिन्नुचा पहिला स्वेटर”... तुमच्या शोनू, बाबू, चिन्नु जो कोणी आहे त्याचा पहिला बाबा कोण...?


मनापासून अजिबात इच्छा नसतानाही माझी रोजची सकाळ या मूर्ख गर्दीनेच होते. सवय, वाईट सवय, दुसरे काही नाही. कितीही ठरवलं व्यायाम करायचा नाही तरी दर २ मिनिटांनी मोबाईल हातात घेऊन अंगठ्याला व्यायाम देतेच मी. इतरांना नावं ठेवते पण मी स्वतः हि तेच करते. १ वर्षापूर्वी याच दिवशी याच वेळी मी काय मूर्खपणा केला होता याची आठवण मला वारंवार करून दिली जाते. कदाचित यामुळेच आज काल मला याचा वैताग आलाय आणि आज या सगळ्या चा खूप राग आलाय...का? काय? का? आज मुलगा बघायला सीसीडी ला जायचं ते पण ९ वाजता, अरे इतक्या सकाळी आज काल पक्षी पण उठत नाहीत, आणि हा कॉफ्फी प्यायला बोलावतोय. असो, आता अंगठ्याचा व्यायम बंद करायलाच हवा. नाहीतर फुकटची कॉफी पाजणारा निघून जाईल.


साधारण २ तास आवरून म्हणजे त्यातला दीड तास मोबाईल वर व्यतीत करून मी एकदाची तयार झालीये. लाल रंग खूप भडक वाटतो, पिवळा बालिश आहे, गुलाबी खूपच बायल्या, नीळा ठीक ठीक, काळा नकोसा, हिरवा खूपच उठून दिसतो, सगळ्यात कायमचा बेष्ट एकच शुभ्र पांढरा. “रंगांचे वैशिष्टय” या पोस्ट मध्ये दिलेल्या रंगांच्या गुणधर्मांना लक्षात ठेऊनच मी शुभ्र पांढर्या रंगाची निवड केलीये.


स्वतःवर खूपच खुश आहे मी. तसहि मोबाईल मधील रंगीत गर्दी सोडली तर माझ्या आयुष्यात काहीच रंगीत नाहीये, अगदी पंढरी चप्पल, पांढरा पंजाबी ड्रेस, पांढरे घड्याळ इतकेच कशाला माझे केसही पांढरे आहेत. म्हणूनच, लग्नासाठी आलेल्या कोणत्याही मुलाकडून फुकटची कॉफी पिल्याशिवाय मी नकार ऐकूनच घेत नाही, त्या सगळ्यांना माझा पांढरा रंग खूप बोचतो. सबंध बसच्या प्रवासात मी स्वतःला पुन्हा पुन्हा हेच विचारतीये कि दुसरा एखादा रंग आज वापरून बघयला हवा होता. असो पण पांढरा सगळ्यात बेष्ट आहे.


सीसीडी माझ्या साठी नवीन नाही, कित्येक नकार मी इथेच पचवलेत. या शहरातील एकही सीसीडी सोडलेले नाही. त्या मुलांनी मला लक्षात ठेवलाय कि नाही माहित नाही पण सगळ्या सीसीडी वाल्यांनी मला निट लक्षात ठेवलाय. आत मध्ये प्रवेश करताच एक मऊ सोफा बघून मी पटकन बसले. आणि पुन्हा अंगठ्याला व्यायम म्हणून मोबाईल हातात घेतला. आणि हे काय??? त्याचे ४ मेसेजेस...


“हे, १० मिनिटात पोहोचतोय.”

“हे, मी सीसीडी मध्ये बसलोय.”

“हे, मी फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट घातलाय.”

“हे, कुठे आहेस तू ?”

एखाद्या भुकेल्या उंदराप्रमाणे माझी नजर सैर वैर पळू लागली. लाल, हिरवा, निळा, पिवळा सगळे शर्ट दिसतायत पण गुलाबी काही दिसत नाहि. आजवर मी इतकी मुल पहिली इतके सीसीडी पाहिले पण इतका वेळ कधीच लागला नाही. मी लगेच त्याला मेसेज केला...

“हे, कुठे आहेस तू?”

“मी पण सीसीडी मधेच आहे.”

“तू दिसत नाहीयेस..”

त्याचा लगेच मेसेज आला.

“हे, सॉरी, मी गुलाबी नाही ऑफ व्हाईट शर्ट घातलाय...”


मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. म्हणजे हा माझ्यातलाच दिसतोय. ऑफ व्हाईट म्हणजे पांढराच. अरे वा, म्हणजे यावेळी आईचे भोग संपणार, आई ख