top of page

"छंद"



प्रत्येक व्यक्तीला जीवनात कसला ना कसला तरी छंद असतोच आणि तो असला तरच आपले जीवन एकाकी न रहाता, आपण जोपासलेल्या छंदाद्वारा आपले जीवन तर आनंदी करतोच शिवाय आपल्या छंदाद्वारा आपण समोरच्या व्यक्तीचेही मनोरंजन करून, त्यालाही आनंद देण्याचे काम करू शकतो.

काही माणसं पुस्तक वाचनात एवढी दंग होऊन जातात की, एकदा एखादे पुस्तक वाचायला घेतले की ते संपल्याशिवाय खाली ठेवतच नाहीत. अशा व्यक्तीला आपण "पुस्तकातला किडा" ही पदवी बहाल करून मोकळे होतो. एखाद्या मुलाला, बालपणीच चांगल्या प्रकारच्या वाचनाचे संस्कार मिळाले तर पुस्तकासारखा दुसरा मित्र असूच शकत नाही. आपण जेव्हा वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचत जातो, तेव्हा एका विशिष्ट काळानंतर, एखादा लेखक व त्याची लिहीण्याची पद्धत रूचायला लागते. काही वाचकांना ललित लेख वाचायला आवडतात तर काहींना प्रवासवर्णन, काहींना ऐतिहासिक कादंबरी, काहींना गूढकथा तर काही वाचकांना सत्य घटनेवर आधारित कथा-कादंबरी आवडतात. प्रत्येकाची आवड-निवड वेगवेगळी असते, त्यातून प्रत्येक वाचकाचे आवडते लेखक व त्यांची पुस्तके वाचायला मिळणे ही त्यांच्यासाठी पर्वणीच असते.



भरपूर आणि सततच्या वाचनामुळे, वाचकाचा सभोवतालचा दृष्टीकोन विशाल आणि सूक्ष्म होत जातो. वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनातून आपल्या ज्ञानात भर पडत जाते व त्यातून नवनवीन अनुभवांची शिदोरी मिळत जाते. त्याचा एक फायदा असा होतो की, व्यक्ती एककल्ली न रहाता ती सारासार विचार करण्याची क्षमता प्राप्त करून तिच्या ज्ञानाची व्याप्ती वाढत जाते. आणि त्यातून स्वतःचे मत मांडण्याचे सामर्थ्यही त्या व्यक्तीमध्ये आपसूकच येताना दिसते. तिचा आत्मविश्वास बळावतो. पुस्तक वाचनाचा छंद हा माणसाला अधिक प्रगल्भ बनवित असतो, आणि त्यामधून मिळणारा आनंद हा अबाधित असतो.



आजकाल बर्‍याच ठिकाणी "पुस्तकांची भिशी" हा प्रकार आपल्याला पहायला मिळतो. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.एखाद्या वाचक मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप तयार होतो आणि आठवड्यातून एका ठरवलेल्या दिवशी कोणाच्या तरी घरी जमून, एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करून आपापले मत मांडण्याचा प्रयत्न त्या बैठकीतून चाललेला असतो, ह्यातून उत्तम विचारांची देवाण-घेवाण होते तसेच आपले मत स्पष्टपणे मांडण्याचे धाडस हळुहळू ह्या उपक्रमाद्वारा मिळत जाते, ह्याचा खूप मोठा फायदा वाचकाला कळत-नकळत होत असतो. ह्यातूनच प्रेरणा घेऊन कधीतरी नवलेखकाची निर्मिती होऊ शकते.




प्रतिभावान कवींच्या किंवा कवियत्रींच्या कविसंमेलनात हजेरी लावून, त्यांच्या कविता ऐकून ऐकून, एखादी व्यक्ती स्वतः कविता लिहीण्याचे धाडस करते, अशारितीने कोणाच्या तरी प्रेरणेतून नवकवी जन्माला येतो. व त्याचा तो छंद कायमचा जोपासला जातो. कधीतरी मग जुन्या कवींच्या बरोबरीने नवकवींनाही आपली कविता काव्यमंचावरून सादर करण्याची संधी मिळते. कोणाची कला कशी व कधी प्रगट होईल ह्याची कोणीच भविष्यवाणी करू शकत नाही. कधी कधी सुप्तावस्थेत असलेले गुण, अचानकपणे बाहेर प्रगट होतात आणि तो आनंद अभूतपूर्व असतो. "आले देवाजीच्या मना" हेच सत्य आहे.



"छंद" ह्या गोष्टीचा नक्की असा काळवेळ नसतो. काहींना लहानपणीच एखाद्या गोष्टीचा छंद जडलेला असतो. त्याबाबतीत सचिन तेंडुलकरचे उत्तम उदाहरण देता येईल. लहानपणापासून त्याला क्रिकेट ह्या खेळाविषयी आकर्षण होते. आणि नंतर त्याला त्या खेळाचा एकप्रकारे छंदच जडला. म्हणूनच कदाचित "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" ही म्हण प्रचलित झाली असावी. काही मुलांना शाळेत जाण्याआधीच पुस्तके हाताळण्याचा छंद जडलेला असतो. केव्हाही त्यांना पुस्तके हातात दिली की ती आवडीने तास न तास चाळत बसतील. अशी मुलं बहुदा अभ्यासात बुध्दीमान असतात आणि त्यांना मोठेपणीही वाचनाचे वेडच असते जणू. काहींना कुकिंगची आवड असते तर काहींना कलेची आवड असते. त्यामध्ये गायन, नृत्य, संगीत असे कितीतरी आपल्या आवडीचे छंद आपण जोपासू शकतो आणि शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात एखादा तरी असा छंद जोपासावा, जो आपल्या अंतिम क्षणालाही आपल्याला आनंद देऊन जाईल व दुसर्‍यांच्याही जीवनात आनंद लुटत राहील.




पुष्पा सामंत.

नाशिक 1-4-2021.

Email.: Samant1951@hotmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

250 views1 comment
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page