आज माझं लक्ष अजिबात कामात लागत नव्हतं. मनाला कितीही वेठीला धरुन मी जागेवर आणायचा प्रयत्न केला तरी ते ऐकायला नव्हतं. कारण ही आज तसंच घडलं होतं. आज माझा नवरा न सांगता - सवरता, निरोप न घेता, कामावर चिडून रागावून निघून गेला होता. खरं तर कारण अगदी शुल्लक घडलं होतं. त्यावरून तो एवढा चिडेल असं मला वाटलं नव्हतं. नव्हे, त्याचा तसा स्वभावही नाही. मी नुसते म्हंटले , "आजही तुझा ओला टॉवेल कॉटच्या गादीवर तसाच पडला आहे. तो तू वेळीच धुवायला किंवा वाळत का नाही टाकत?" झालं, तेवढ्यावरून शब्दाने शब्द वाढत गेला आणि भांडण विकोपास गेले. खरं तर बाहेर जाताना कोणीही रागावून बाहेर पडलेले मला आवडत नाही. म्हणून मी तो ऑफिसला जायला निघेल तेव्हा सॉरी म्हणून टाकणार होते. पण आज तसे घडलेच नाही. तो केव्हा गेला ते मला कळलेच नाही. त्यामुळे आज मला काही करून त्याच्या आधी घरी पोहोचायचे होते. आलं घालून मस्त कडक चहा करायचा. आल्या आल्या आल्याच्या चहाने त्याचे स्वागत केले की त्याचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. असा विचार करत मी ऑफिसमध्ये कामे भराभर आटपत होते. तरीही थोडा उशीर झालाच. पण त्याच्या आधी पोहोचले. चहा झाला आणि घडलेही अगदी तसेच. चहा प्यायल्यावर त्याचा माझ्याशी अबोला होता हेच तो मुळी विसरला होता . असा हा महाप्रतापी चहा.
खरंतर मला चहा अगदी लहानपणापासूनच खूपच आवडायचा. पण मला आजीने एकदा सांगितले होते की, चहा प्यायला की, आपण काळे होतो. त्यामुळे मला खूप भीती वाटायची. चहाची तहान मी दुधावर भागवत असे. कधी आईच्या बशीतला एक घोट प्यायला, तरी मी सारखी बघायची, आपण काळे तर दिसत नाही ना? माझ्या डोळ्यासमोर मी अगदी कोळशा सारखी काळी, त्यात माझे पांढरे डोळे व पांढरे दात चमकत आहेत, असं दृश्य यायचं. त्यामुळे चहाला शिवण्याचे धार्ष्ट्य व्हायचं नाही. पण थोडं मोठं झाल्यावर प्रश्न पडायचा, ' मग ही मोठी माणसं काळी कशी होत नाहीत? पण त्याकाळी असे प्रश्न विचारायचे धाडस होत नसे. पण मधून मधून एक घोट चहा पिण्यासाठी माझा हट्ट असायचाच. पण त्यात कॉम्प्रमाईज व्हायचे. मी मोठा ग्लास भरून दूध प्यायले की एक घोट चहाचा मला मिळू शकत असे. त्यावरच मी अगदी खूष असे. नववी दहावी पासून मात्र मी घरच्यांशी असहकार पुकारला दुधाऐवजी मी नुसता चहाच सकाळी पिऊ लागले. अशी मी चहा प्रेमी हळूहळू बनू लागले. दहावीत क्लासला गेले की आम्ही तीन-चार मैत्रिणी मिळून लपून-छपून आड जागी जाऊन अमृततुल्य चहा पीत असू. फुर्रूक फुर्रूक आवाज करत प्यायलेल्या चहाचे सुख वेगळेच. आम्हाला अगदी मोठं झाल्यासारखं वाटायचं. चहाचे प्रेम पुढे गरज कसे बनले ते मात्र कळलंच नाही उठल्या उठल्या चहा प्यायला शिवाय माझा दिवसच सुरू होऊ शकत नसे.
मी कॉलेजमध्ये असताना पहाटे अभ्यासाला उठायची , रात्री उशिरापर्यंत जागत बसायची , तेव्हा आई येऊन वाफाळलेल्या चहा देऊन जायची. मला असा काही आनंद व्हायचा की मी आणखी दुप्पट उत्साहाने अभ्यासाला लागायची. आता मात्र चहा माझ्यासाठी एक पेय न राहता आठवणींच्या रस्त्यावर चालतानाचा एक सोबती बनतो. कॉलेजमध्ये दंगा करत मैत्रिणींबरोबर घेतलेला चहा. नाटकांच्या तालमी करताना मध्यंतरात कॅन्टीन वाल्याने करून आणलेला चहा आठवतो. एखाद्या क्षुल्लक विषयावर ही तावातावाने केलेल्या चर्चे बरोबर मोठा मोठा घोट घेत प्यायलेला चहा आठवतो. लोणावळ्याला ट्रीप ला गेल्यावर लोणावळा ते खंडाळा पायपीट करत असताना, पोटात कावळे कोकलत असताना, टपरीवर प्यायलेला चहाचा तो घोट. अहाहा! वर्णनातीत !सिमल्याला कुडकुडत दात वाजत असताना प्यायलेला उकळता चहा. किती उलगडू आठवणींचे पदर!
चहा करण्याचे प्रत्येकाचे रसायन वेगळे असते. चहात दूध घालणे आणि दुधात चहा गाळणे या दोन्हीला चव वेगळी, असे चहापान तज्ञ म्हणतात. चहा उकळताना साखर घालणे आणि चहा तयार झाल्यावर साखर घालणे ह्या चवीत जमीन-अस्मानाचा फरक, इति चहा मेकर तज्ञ म्हणतात. चहा किती मिनिटे, किती सेकंद उकळतो त्यावर त्याचा कडवटपणा, गोडवा किंवा कडकपणा अवलंबून असतो. ही प्रत्येकाची हातोटी वेगळी इति चहा प्राशन कर्ता म्हणतो. त्यात घातला जाणारा मसाला किती व कुठला त्यावर प्रत्येक दुकानाचा ब्रँड ठरतो हे पुणेकर जाणतातच. त्यामुळे प्रत्येक घराची, प्रत्येक दुकानाची चहाची लज्जत वेगळी आणि न्यारीच! चहात गीतेतल्या स्थितमप्रज्ञा ची सगळी लक्षणे दिसतात. आनंदात किंवा दुःखात चहा आपले काम योग्य च करतो. गरीब असो की श्रीमंत असो चहा दोघांना सारखाच आनंद देतो. माणूस थकलेला असो किंवा उत्साहात असो चहा ची किमया ती च .त्याला शीत - उष्ण हवेशी काही देणेघेणे नसते. कारण थंडीत उन्हाळ्यात चहाला पर्याय नाही. मित्रा बरोबर किंवा शत्रू बरोबर आपण चहा पितो. शत्रू मधील कटुता कमी करण्याचे काम चहा करतो.
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच .सकाळी उठल्या उठल्या आणि तीन-चार दुपारची जी वेळ ठरली असेल तेव्हा चहा लागतोच की नाही? नाही तर लगेच डोकं बोलू लागतेच. चहाला आपण मानापमानाच्या संकल्पनेशी जोडलेले आहे. त्या दिवशी मी माझी सगळी कामे बाजूला सारून मैत्रिणीचा विसरलेला फोन द्यायला घाईघाईने गेले. तिला ऑफिसला उशीर नको व्हायला म्हणून थंडीत कुडकुडत वेळेत तिच्याकडे पोहोचले. तिच्या आईच्या हातात दारातच फोन दिला, अन् म्हंटले ,"बरं निघते मी " त्यांनीही लगेच अच्छा करून मला निरोप दिला. मला एवढा राग आला ना, काही वागण्याची रीत भात आहे का नाही? साधा एक कप चहा सुद्धा विचारला नाही. एरवी एवढ्या गप्पा मारत असतात. मी घरी जाऊन गरम चहा पिऊन डोके थंड केले. ताजेतवाने वाटण्यासाठी चहा. कंटाळा आला म्हणून चहा. फार उत्साही मंडळींबरोबर चहा. खूप थंडी आहे म्हणून चहा खूप उकाडा आहे म्हणून चहा. ( म्हणजे म्हणे कशाला कोरड पडत नाही. तहान-तहान होत नाही .)दुःखाचा चहा सुखाचा चहा. कधी झोप यावी म्हणून चहा. कधी झोप येऊ नये म्हणून चहा. कठीण समय येता चहा कामास येतो म्हटले तरी वावगे ठरू नये. या चहाची चवही प्रसंगानुरूप बदलते बघा आईशी गप्पा मारताना तिने आणून दिलेल्या वाफाळलेल्या चहात मायेचा गोडवा.
निवांत क्षणी संध्याकाळी गझल ऐकत शांतपणे पीत बसलेल्या चहाची आनंदी पण गंभीर. मैत्रिणींबरोबर हसत-खेळत मस्करी ला आला असताना प्यायलेला चहाची खमंग चव. ऑफिसच्या मिटिंग मध्ये असताना बॉस बरोबर घेतलेला चहा थोडा गार झाल्यामुळे शिळी चव. मैत्रिणीचा किंवा मित्राचा गोड रुसवा काढताना चहात असलेल्या प्रीतीची चव. ट्रेनमध्ये किंवा एसटी शेजारी बसलेल्या माणसाला चहाचा कप हाती देऊन गप्पा उकरून काढून टाईमपास केलेल्या चहाची वेगळीच गंमत. असे नवे मित्र जोडण्याचा जोडण्याची ही चहाची करामत. खरंतर मैत्री टिकवण्याचं काम हा चहा करतो . शहाण्याने चहा ला कधी नाही म्हणू नये. कमी पैशात कुठेही उपलब्ध होणारे हे पेय. अहो कुणाच्या झोपडीत गेल्यावर त्याने दिलेला चहाचा घोट आपण घेतला की समोरच्या माणसाच्या चेहर्यावर आनंद फुलतो तो अवर्णनीय. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ट्रेमधून छान छान वेगवेगळ्या लहान-मोठ्या नाजूक नक्षीच्या किटली मधून चहाचे सर्व साहित्य तुमच्यासमोर आणून ठेवले जाते. तो एकत्र करून प्यायलेला चहा म्हणजे नुसती फुळकवणीच. अगदी सपक चहा. टपरीवरचा उक उक उकळलेला दाट कडक चहा म्हणजे खरा चहा. त्यातही मसाल्याच्या पुरचुंडी चे कापड जेवढे कळकट तेवढी चहाला चव जास्त. मला वाटते पुण्याला अशी वेगळी चहा संस्कृती आहे. अमृततुल्य पासून ते इराणी चहा ते फाइव स्टार चहा पर्यंत अनेक संस्कृती इथे गुण्यागोविंदाने नांदतात. पुण्यातला चहा हे एक वेगळेच प्रकरण आहे. पुण्यात अगदी अपरात्री कितीही वाजता चहा मिळण्याची ठिकाणे लोकांना माहित असतात. आता तर राजकारणात हा चहा फारच मुरलेला दिसत आहे. कारण आता 'चाय पे चर्चा' असा वेगळाच प्रघात आहे. त्यात अगदी मोठ मोठ्या मुख्य मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. असा हा चहा पेयात उच्च पदावर जाऊन पोहोचला आहे.
गावाकडच्या चहाची चव मात्र अगदी वेगळी. तो खूप उकळलेला असला तरी तेथील ताज्या निरशा दुधामुळे आलेली चवही खूप वेगळी असते. छान असते. त्याची तलफ ही वेगळीच. आपल्या होणाऱ्या अर्धांगिनीला पहायला गेल्यावर चहा पोहे मधल्या चहाची चव तर बहारदार असते. त्याच्याबरोबर कितीतरी नजरेच्या गप्पा, कितीतरी मुद्दाम मारलेल्या गप्पा, ती अधून मधून येणारी शांतता. अशा कितीतरी आठवणी जोडलेल्या असतात. चहा एक केवळ निमित्त. कुठल्याही लहान-मोठ्या सेलिब्रेशनसाठी चहा शिवाय दुसरा योग्य पर्यायच नाही. चहा आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. आमच्या विलायती साहेबांच्या मॅनर्सना सोडून भारतीय संस्कृतीत तो एकरूप झाला आहे. आमचा उर्जास्त्रोत बनला आहे. अशा गुणवान रंगतदार चहाची कहाणी सुफळ संपूर्ण. शुभदा दीक्षित पुणे मोबाईल नं. 9881062115
Email.: shubhada09@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments