top of page

मी माझे करिअर कसे घडवले




केल्याने होत आहे रे,

आधी केलेची पाहिजे

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,

हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे

अंतःकरणात जिद्द आहे

भावनांना फुलांचे गंध आहेत

डोळ्यासमोर खुले आकाश आहे

तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे...!

बी पॉझिटिव्ह.


मी 12 ला होते. त्याच वेळेस माझ्या वडिलांनी माझे लग्न जमवले , त्या वेळी मी वडिलांना कांहीं बोलू शकत नव्हते. माझे वडील मिल्ट्रीमन, एकदम कडक स्वभावाचे, नंतर बँकेत नोकरी करीत होते. मी फक्त एवढेच म्हणाले, आप्पा मला पुढे शिकायचे आहे. वडिलांनी सांगितले लग्न झाल्यावर शिक , मी त्यांना तसे सांगतो. आपण क्षत्रिय आहोत, आपल्या मध्ये मुलीचे लग्न योग्य वयातच होते, मला नातेवाईक नावे ठेवतील. मी कांहीच बोलले नाही. वयाच्या 18 व्या वर्षी12 वीची परीक्षा पास झाल्या बरोबर माझे लग्न झाले. मी पैठण मध्ये एकटीच 12 वीला पास झाले होते

म्हणून शाळेने , संस्थेच्या हस्ते माझा खुप मोठा सत्कार केला होता.मिस्टर आपेगाव या ठिकाणी हायस्कूल टीचर होते. ,(B.Sc.B.Ed.)



योगा योगाने माझे वडील पैठण येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद , या बँकेत नोकरी करीत होते.

मी आपेगवला राहायची,B.A.F.Y. ला वडिलांनी अॅडमिशन घेऊन दिले होते. परंतु मिस्टरांची पुढे शिकवण्याची बिलकुल इच्छा नव्हती. ते मला सारखे म्हणायचे, आपल्यात मुली नोकरी करीत नाहीत, मी तुला नोकरी करू देणार नाही. घरात कोणालाच तु पुढे शिकलेली आवडणार नाही. तु एक्झाम देऊ नकोस. नवीन लग्न झालेलं, मी कांहीच बोलू शकले नाही.



त्यात आजूबाजूचे लोक पण मला म्हणायचे मिस्टर नोकरीला आहेत. त्यांना चांगला पगार आहे. हायस्कूल ला शिक्षक आहेत. तुला आणखी काय पाहिजे. तुला शिकून काय करायचे,लग्न झाल्यानंतर कॉलेजला जाणे चांगले नाही.घर आणि समाज दोन्ही ठिकाणी मला तोंड द्यावे लागले. कारण नवीन लग्न झाले त्या वेळी आम्ही आपेगावला रहात होतो,ग्रामीन समाज असल्यामुळे शेजारी पाजारी मलाच मुर्खात काढायचे, मलाच समजाऊन सांगायचे. लग्न झालेल्या मुलीने वारंवार पैठणला जाणे चांगले नाही. नवरा चांगला कमावता आहे , हायस्कूल टीचर आहे , आणखी काय पाहिजे. तुला शिकून काय करायचे. असे नाही असंख्य वाक्य माझ्यासाठीच असायचे. मी गप्प राहायची. सर्वांच्या मताना रिस्पेक्ट करायची. परंतू मनात मात्र विचारांचे वादळ असायचे.



शेवटी वडिलांना सांगितले.

मला कोणत्याही परिस्थितीत शिकायचेच आहे. मला माझे शिक्षण पुर्ण करायचे आहे. तुम्ही कांहीं तरी करा. वडिलांनी मिस्टरांची समजूत काढली .पुढे शिकू द्या असे सांगितले .

रडत पडत मी B.A,हायर सेकंड क्लास मध्ये पास झाले. तोपर्यन्त मला मुलगा आणि मुलगी ,दोन अपत्ये झाले.



मी B. Ed. करीत होते. तेव्हा मी पैठण औरंगाबाद अप डाऊन करून B.Ed. पूर्ण केले. मराठवाडा बी. एड. कॉलेज मध्ये माझे B.Ed. पुर्ण झाले.



माझी मुले त्या वेळेस खूपच लहान होती.. मुलगी तीन वर्षाची आणि मुलगा पाच वर्षाचा. मी त्यांना माहेरी आई वडील यांच्या कडे ठेवले होते. मी दर पंधरा दिवसांनी शनिवार रविवार मुलांना भेटण्यास जात असे. ते दर पंधरा दिवसांनी बस स्टँड वर माझ्या भावाला घेऊन येत असत आणि मी येऊ पर्यंत माझी वाट पाहत असत.



कधी कधी माझे पाठ वगैरे असतील तर आणि मला तयारी करायची असल्यास माझे जाणे होत नसे. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. ते माझी वाट पाहून रडत रडत घरी जात असत. माझ्या सोन्या सारख्या लेकरांचे हाल पाहून मला खुप खुप वाईट वाटत असे. कधी एकदाचे B.Ed. संपते असे वाटत असे. औरंगाबाद मराठवाडा B. Ed. College,

या ठिकाणी मी B.Ed. पूर्ण केले. खुप कडक आणि शिस्तबद्ध B. Ed. कॉलेज आहे.चुकीला, अनियमितता याला माफी नाही. परीक्षा दिल्याबरोबर मी माझ्या मुलांना पैठणला घेऊन आले.



पुढे मी M. A. History, केले. तो पर्यंत घरातली परिस्तिथी बदलली होती.6 वर्षात घरची वैचारिक पातळी बदलली होती. माझा B.A. विषय इंग्लिश असल्यामुळे घरबसल्या संस्थेच्या शिक्षकाच्या ऑफर येत होत्या. मी पैठणला ज्या शाळेत शिकले त्या विवेकानंद शिक्षण संस्था, औरंगाबाद, येथे मी इंटरव्ह्यू दिला. ज्यावेळी माझा इंटरव्ह्यू होता. मिस्टर सोबत आले नव्हते. त्यांना शाळेत काम होते मी मुलांना घेऊन गेले. माझी एक जिवाभावाची मैत्रिण, मधुबाला तेथे रहात होती. तिच्या आई कडे मुलांना सोडले. ती पण जॉब करीत होती ती ऑफिसला गेली आणि मी इंटरव्ह्यू साठी.



त्या दिवशी औरंगाबाद येथे कुठल्या तरी समाजाचा मोर्चा निघाला होता. मैत्रिणीचे घर नेमके रोड वर होते. माझी मुले आणि शेजारचा एक लहान मुलगा

मोर्चा पाहत पाहत त्या मोर्चा मागेच गेले .क्रांती चौक पोलिस स्टेशन येथून माझे मुले हरवले. तेंव्हा मोबाईल नव्हते मला कोणी कांहींच सांगितले नाही माझ्या मैत्रिणीला कोणीतरी गाडीवर जाऊन आणले दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत शोधा शोध सुरू होती मला घरी येऊ पर्यंत कांहींच माहीत नाही मी घरी आले आणि बातमी एकूण हात पायच गळाले, घसा कोरडा पडला. कांहींच सुचेना. मिस्टरांचा पण खुप राग आला माझ्यासाठी थोडा वेळ देऊ शकले नाही, एक दिवस रजा काढली असती तर,, स्वतःला दोष देत बसले..............,




शेवटी शांत डोक्याने सर्व परिस्तिथी समजून घेतली. हे सर्व लोक चार तासापासून शोधत आहेत कांहींच उपयोग नाही. मी ताबडतोब क्रांती चौक पोलिस स्टेशन येथे गेले रिपोर्ट लिहिला. पोलिसांनी खुप खुप मदत केली. तेथील स्थानिक पातळीवर त्यांनी भराभर प्रयत्न चालू ठेवले. एक सात आठ पोलिसांना गाडी देऊन लहान मुले कोठे रस्त्याच्या कडेला दिसतात का हे शोध घेण्यासाठी पाठवले. तेथून त्यांनी मोर्चा कोठे कोठे गेला होता . कोणत्या मार्गे गेला होता याचा शोध घेतला. सर्व पोलिस स्टेशनला वायरलेस फोन करून चौकशी केली, तेव्हा शहागंज पोलिस स्टेशन मध्ये माझी मुले सुरक्षित आहेत हे समजले.



पोलिसांनी ताबडतोब दुसरी जीप काढली त्यामध्ये कांहीं पोलिस मी माझी मैत्रीण आणि शेजारील व्यक्ती ज्यांचा मुलगा पण माझ्या मुलांसोबत हरवला होता. शहागंज पोलिस स्टेशन मध्ये माझी मुले एकदम सुखरूप पाहून माझा जीवात जीव आला. तो पर्यंत सर्व देवांना नवस बोलून झाले होते. त्या दिवशी गणेश चतुर्थी चा उपवास पण होता.



कोणत्याही स्त्रीला तिच्या एकटीच्या हिमतीवर करियर घडवणे सोपे नाही, याची मात्र त्या वेळेस प्रचिती आली. तो दिवस माझ्यासाठी खुप कठीण दिवस होता. त्या दिवशी मी पूर्णपणे तुटून पडले होते. माझी आता पुढे कांहीं करण्याची इच्छा राहिली नव्हती. मी अगदी खचून गेले होते. मला त्या क्षणाला माझ्या दोन लेकरान व्यतिरिक्त कांहींच नको होत. मुले 12 पासून हरवली होती.7 वाजले तरी सापडली नव्हती.परिसरातील लोक म्हणायचे मुलगी सुंदर असेल तर रेल्वेत घालून कधीच तिला पळवून नेले असेल.मला तर आत्महत्येचा विचार मनात यायचा.परंतु पोलिसांची खुप मदत झाली.माझी मुले सुखरूप सापडली.



परंतु तोच दिवस गणेश चतुर्थी चा माझ्यासाठी भाग्याचा देखील ठरला. कारण, माझा इंटरव्ह्यू खुप चांगला झाला. माझे सिलेक्शन झाले. मला नौकरीची ऑर्डर मिळाली.आणि मी ज्या शाळेची विद्यार्थिनी होते, तेथेच शिक्षिका म्हणून रुजू झाले, पुढे पर्यवेक्षिका, आणि शेवटी 2011 पासुन 2019 पर्यंत Vice Principal ..,..........................

...................

*"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..*



*म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."*



प्रतेक स्त्री आता उत्क्रांत,

नाना क्षेत्रे पादाक्रांत,

पावला सोबत पाऊल,

उज्वल उद्याची चाहूल.


आश्या प्रकारे मी माझे करिअर घडवले.



@ सौ. निर्मला शिंदे पाटील

X Vice principal,

Shri Nath High school

And Ju. College,Paithan,

Aurangabad.

Email.: nirmalakshinde@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

37 views1 comment
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page