top of page

बस क्रमांक २८५७

लेखिका: डॉ. सौ. स्वाती अमोल गाडगीळकिशोरीताईंचा ' अवघा रंग एक झाला , रंगि रंगला श्रीरंग ' हा अभंग ऐकला आणि मी मात्र एका शुभ्र स्वच्छ आकाशात झेपावते आहे असं वाटू लागलं . मुक्त वाटलं , पवित्र वाटलं , सत्य हाती लागल्याचा आनंद झाला . याच सत्यासाठी जगाच्या इतिहासात किती लोकांना लढा द्यावा लागला याचीही आठवण झाली . आणि प्रकर्षाने आठवण झाली ती एका नाजुक बांध्याच्या , मृदु स्वभावाच्या , अमेरिकेतच नाही तर जगभर तिच्या कार्याची छाप सोडलेल्या , सुशिक्षित आणि धीट आफ्रिकन अमेरिकन बाईची ! तिचं नाव होतं रोझा लुई मॕकॉले पार्क्स . ४ फेब्रुवारी १९१३ ला टस्कगी अलाबामा येथे जन्म झाला . आई शिक्षिका तर बाबा सुतार . " मोंटगोमेरी बस बॉयकॉट " आणि बस क्रमांक २८५७ ही तिची आयुष्यभरासाठी ओळख झाली .


१ डिसेंबर १९५५ हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरला . फक्त तिच्याच नाही तर नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक आफ्रिकन अमेरिकनच्या आयुष्यातील हा यादगार दिवस ठरला . अनेक वर्षांपासून वर्णभेदा विरूद्ध पेटलेल्या लढ्याला या दिवशी अजून गती मिळाली . एक ठिणगी अजून पडली ज्याचा वणवा झाला . सन १९१३ मध्ये जन्मलेल्या या अफाट व्यक्तिमत्त्वाचा अंत झालाच नाही असं मी म्हणेन कारण अगदी अलिकडचं सांगावं तर सन २०१९ मध्ये , म्हणजे गेल्याच वर्षी मट्टेल कंपनीने त्यांच्या " इन्स्पायरिंग विमेन " या मालिकेत रोझा पार्क्सच्या स्मरणार्थ एक बार्बी डॉल रिलीज केली . २०१८ मध्ये युनायटेड किंग्डम च्या लहान मुलांसाठी असलेल्या " हॉरिबल हिस्टरिज " या मालिकेतील रोझा पार्क्स वर आधारित "रोझा पार्क्स - आय सॕट अॉन अ बस " या भागाचा शेवट करण्यासाठी एक खास गाणं तयार केलं . ती कृष्णवर्णीय होती . १ डिसेंबर १९५५ - गुरूवार , संध्याकाळी ६ ची वेळ . रोझा कामावरून घरी जायला निघाली होती . मोंटगोमेरी मध्ये डेक्स्टर अव्हेन्यू येथून २८५७ नंबरची बस घेतली . त्या काळात कृष्णवर्णीयांनी बसावयाच्या जागा आधीच निश्चित केलेल्या असायच्या . त्यापैकीच एकावर रोझा जाऊन बसली . तेव्हा बस चा कंडक्टर ठरवत असे कोणी कुठे बसायचं ते . जरी आरक्षित आसनांवर कृष्णवर्णीय बसले असले तरी गोऱ्या लोकांसाठी कधीकधी कंडक्टर त्यांना जागेवरून उठवत असे . तसंच त्या दिवशी रोझा आणि तिच्या बाजूच्या चार जणांना उठायला सांगितलं तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला . असा अपमान पहिल्यांदाच होत होता असं नाही. आधी सुद्धा याच कंडक्टर ने एकदा, तिकिट काढले असूनही तिला भर पावसात रस्त्यावर सोडले होते . तिची सहनशक्ति आता संपली होती . तशी मध्यम वर्गीय नोकरदार वर्गातली असून तिच्या अंगी कुठून बळ आलं कुणास ठाऊक . ती अटक व्हायला तयार झाली , तिला अटक झाली आणि नंतर घडला तो इतिहास ! तेव्हा ती बेचाळीस वर्षांची होती. लहान असतानाच तिला याचे चटके सोसावे लागले होते . आई आणि आजी बरोबर मोंटगोमेरीच्या वेशीवर पाईन लेव्हल येथे राहात असतानाच शाळेतील गोऱ्या मुलांसाठी बस आणि यांनी मात्र पायी जायचं हे तिला पटत नव्हतं . तिला खूप मानसिक त्रास व्हायचा. 'बस' ने तिला लहानपणीच काळ्या आणि पांढऱ्या जगाची जाणीव करून दिली होती. २८५७ नंबरची ती बस आज हेन्री फोर्ड संग्रहालयात , डिअरबॉर्न मिशिगन येथे ठेवलेली आहे . या घटनेनंतर "नॕशनल असोसिएशन फॉर अॕडव्हान्समेंट अॉफ कलर्ड पीपल " आणि तत्सम संघटनांनी एकत्र येऊन बहिष्कार स्वरूपात आंदोलन छेडले. ३५००० पत्रकं रातोरात तयार केली आणि सगळ्या आफ्रिकन अमेरिकन अर्थात नीग्रो लोकांना आवाहन करण्यात आले की कोणीही बसने प्रवास करायचा नाही . खाजगी वाहनांनी जावे अन्यथा पायी चालत जावे. कृष्णवर्णीय टॕक्सीचालकांनी बसच्या भाड्याएवढेच पैसे आकारून त्यांच्या बांधवांना सोडले. हे आंदोलन ४ डिसेंबर १९५५ ला मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली पेटले. त्यापूर्वी १९४२ बेयार्ड रस्टिन, १९४६ आयरीन मॉर्गन,१९५१ लिली ब्रॕडफोर्ड, १९५२ सारा कीज आणि 'ब्राउडर' विरूद्ध 'गेल' या १९५६ च्या खटल्यातील विजेते हे सगळे मोंटगोमेरीतील बस मधील आरक्षण रद्द होण्याचे मानकरी ठरले . आता कृष्ण धवलचा भेदभाव बहुतांशी रद्द झाला आहे . कागदोपत्री तरी नक्कीच . मानसिकता पूर्णपणे बदलायला वेळ लागतो . आता सगळे रंग मनसोक्त उधळत आपलं आयुष्य आपल्या रंगसंगतीप्रमाणे खुलवण्याचं स्वातंत्र्य आणि भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं आहे . ह्याचं मोल समजायला , फार नाही फक्त शंभर वर्ष मागे गेलो की लक्षात येतं की हे सुख एवढ्या सहज मिळालेलं नाही . अनेकांना या मूलभूत हक्कासाठी कठोर लढा द्यावा लागला . त्यांची जिद्द पणाला लागली आणि त्या आधी त्यांचा स्वाभिमान जागावा लागला . रोझा पार्क्सचं नाव पॕरिसमधल्या एका रेल्वे स्थानकाला दिलं आहे . तिच्या भावाचं घर जिथे ती अनेक वेळा राहायची ते चक्क डिस्मँटल करून २०१६ ला बर्लिन येथे मेंडोझाज् गार्डन मध्ये लोकांना बघण्यासाठी पुन्हा जोडून ठेवण्यात आलं होतं . कालांतराने २०१८ मध्ये पुन्हा अमेरिकेत वॉटर फायर आर्टस् सेंटर येथे लोकांसाठी खुलं केलं . 


४ फेब्रुवारी २०१३ ला तिची शंभरावी जयंती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अख्ख्या अमेरिकेत जोरात साजरी करण्याचे आवाहन केले होते . तिच्या खाजगी आयुष्यात फार सुख तिला लाभलं नाही . १९३२ मध्ये तिने रेमण्ड पार्क्स नावाच्या एका न्हाव्याशी लग्न केलं . तो देखील वर्णभेदाविरूद्धच्या लढ्यामध्ये सक्रिय होता . त्यांना मूलबाळ झाले नाही . दोघांनी आपले आयुष्य एकाच ध्येयापाठी खर्च केले . १९७० च्या नंतरची काही वर्ष खूप वाईट गेली . तिचा नवरा कॕन्सर ने गेला . आजी आणि  आई देखील गेल्या . ती एकटी झाली , थोडी खचली पण पुन्हा उभी राहीली . ठिकठिकाणी भाषणं , त्यातून आलेल्या पैशातून शैक्षणिक संस्था , मुलांसाठी स्कॕलरशीप असे उपक्रम मरेपर्यंत राबविले . स्वतः मात्र अक्षरशः पैशाविना हाल सोसले , चर्च ने दिलेल्या दानधर्मावर जगत राहीली . कोणाचा विश्वास बसेल की ही व्यक्ती अमेरिकेतील अनेक पुरस्कारांची मानकरी ठरली होती आणि मृत्यू पश्चात पण अगदी २०१९ मध्ये मोंटगोमेरी येथे तिचा पुतळा उभारण्यात आला . १९६३ ते २०१९ , एकूण ५५ वेळा तिला सन्मानित करण्यात आलं . २४ ऑक्टोबर २००५ ला तिला देवाज्ञा झाली आणि तोही प्रवास लक्षात राहण्यासारखा .ठिकठिकाणी तिचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली . दोन दिवस इथे तर दोन दिवस तिथे असे तिचे कॕस्केट ठेवण्यात येत होते आणि वॉशिंग्टन डि सी - कॕपिटॉल येथे ठेवल्या जाण्याचा मान मिळणारी दुसरी आफ्रिकन अमेरिकन ठरली . तिथे जवळजवळ ५०,००० लोक दर्शनासाठी आले होते . ३१ अॉक्टोबरला टि व्ही वर दिवसभर त्याचं प्रक्षेपण होत होतं . शेवटी २ नोव्हेंबरला डेट्रॉईट येथे ग्रेट ग्रेस टेंपल चर्च येथे सात तास फ्युनरल सर्विस झाल्यावर शासकीय ईतमामात तिला डेट्रॉईट वुडलँड सिमेट्री मध्ये तिचा नवरा आणि आईच्या मधे तिनेच निश्चित केलेल्या स्थळी अनंतात विलीन होण्यासाठी ठेवण्यात आलं.


डॉ. सौ. स्वाती अमोल गाडगीळ

मो: 9820100541

ईमेल: swats7767@gmail.com

409 views2 comments

Recent Posts

See All

2 Comments


Belinda Cruz
Belinda Cruz
Aug 20, 2021

Loove this

Like

रोझा पार्क्सने वर्णभेदाच्या निषेधार्थ अटक करवून घेतली त्या आधी जवळपास नऊ महिन्यांपूर्वी म्हणजे २ मार्च १९५५ रोजी Claudette Colvin या पंधरा वर्षाच्या मुलीने अशाच प्रकारे निषेध व्यक्त केला होता. पण त्याचा गवगवा झाला नाही.

याबाबत अधिक माहिती खालील लिंक वर मिळेल..

https://www.bbc.com/news/stories-43171799

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page