top of page

भक्त व भगताची भोंदुगिरीपुण्याच्या आय. टी. पार्क जवळील घोटावडे खिंडीतील रम्यपरिसरात बापूजी बुवा हे एक जागृत देवस्थान आहे. आमच्या परिसरातल्या लोकांचे तर ते श्रध्दा स्थानच आहे.जमिनीतून ७-८ फूट वर निघालेल्या व शेंदूर फासलेला खडकातला हा सुळक्या भोवती बांधलेल हे बापूजी बुवाच मंदीर खिंडीतून जाणाऱ्या लक्ष वेधून घेते. मंदिरातच बापूजी बुवाच्या गाभाऱ्या समोर काळूबाईच ठाण आहे. त्याला गोडा नैवेद्य चालतो. बापूजी बुवाच्या मागील बाजूस एक म्हसोबाच ठाण आहे. त्याला जत्रेच्या वेळी बळी दिलेल्या बकऱ्याचा नैवेद्य दाखवतात. हल्ली गेल्या १०-१५ वर्षांपासून या जत्रेच्या प्रथेला पंचक्रोशितील लोकांनी कायदेशीर बंदी घातली आहे.

“ बा ऽऽ पूजी बुवा! अलाण्या फलाण्याच गाऱ्हान हाय. दाण्याला दाणा लागत नाय, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आमच देखवत नाय. घरात-दारात सारखीच कचकच चाललीय.”

बापुजी बुवाच्या भगताची ही हळी आमच्या या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरुंना परिचयाची असते. तुम्ही मंदीरात सहज डोकावला तर, एक मळकट धोतर व कोपरी घातलेला भगत आमच्या या देवापाशी बसलेला तुम्हाला दिसेल. देवाच्या पायापाशी सुपारी लावण्यासाठी दोन डोळे वजा खोमण्या तुम्हाला आढळतील. देवापुढ हात जोडून बसलेले चार-दोन श्रध्दाळू भक्त तेथे नेहमी बसलेले दिसतात. तो भगत भक्ताच गाऱ्हाण एेकतो व आपल्या जवळील दोन शाळीग्रामाच्या गोट्या पाण्यान धुऊन मग देवाला सुपाऱ्या लावतो. डावी-उजवी अशी दोन तीन आवातन झाल्यावर एकदाची उजवी सुपारी पडते व बसलेल्या भक्ताचा चेहरा खुलतो. मग त्याला पाच रविवार नाहीतर गुरुवारी खेट्या घालण्याची आज्ञा होते. नंतर कोंबड-बकऱ्याची जत्रा करुन नडीच्या पोटी भगताला पोशाख केला जातो. अशा प्रकारची अनेक स्थळे तुम्हाला महाराष्ट्रच्या काना कोपऱ्यात आढळतील. श्रध्देच्या या बाजारात भक्त हा देवाच गिऱ्हाईक व व्यवहार जुळवणारा भगत एक व्यावसाईक दलाल असतो.


भक्त व भगत ही एकाच आईची दोन जुळी लेकर असतात. सर्व साधारण जुळ्या मुलांचे वाण व गुण सारखेच असतात. पण श्रध्देच्या बाजारातल्या या जुळ्या भावंडाचे वाण व गुण मात्र परस्पर विरोधी असतात. भक्त आपल्या ईश्वरी माऊलीची अंधश्रध्देने श्रावण बाळा सारखी सेवा करतो. त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करतो. हे करतांना त्याला वेळ-काळाच भान नसत. याउलट भगताची वृत्ती ही व्यावसाईक असते. तिथ व्यवहाराला किंमत असते, भावनेला किंमत नसते. भगताने बाकी या ईश्वरी श्रध्देला आपल गिऱ्हाईक केलेल असत. हा नराधम आपल्या या आंधळ्या आईला कधी गाण गायला लावतो, तर कधी देवापुढ भीक मागायला बसवतो. अशा रितीन भिकाऱ्यांच्या दलाला सारखे या भगताचे वर्तन असते. असे अनेक प्रकारचे धष्टपुष्ट भगत आयुष्याच्या बाजारात सर्व सामान्य भक्तांचे शोषण करतांना आढळतात. हा बहुरुपी भगत आणि व्यवहारी जगातील एजंट,सावकार,नाहीतर गुंड यांची वृत्ती सारखीच असते. आपणही गरजे पोटी या सर्वांना पोसत असतो.


अशी भगतगिरी करणारे कित्येक लोक तुम्हाला गावोगावी भेटतील. लोक गरजेपोटी त्यांना महाराज किंवा रावसाहेबाच्या पदवीन भुषवितात. वामपंथी शैव व शाक्त कुळीतील या भगतांचे एके काळी मोठे प्रस्त होते. साधारणत: १९७५ सालाच्या दरम्यान काळूबाईच्या भगतांच अस मोठ पीक सगळीकड पसरल होत. गावोगावी व शहरात गल्लो गल्ली काळूबाईची ठाणी उदयाला आली होती.त्यावेळी या काळुबाईच्या शेअर्सला मार्केट मध्ये चांगला भाव होता. पुशी पुनवची ही मांढरदेवीच्या काळूबाईची जत्रा चांगली महिनाभर चालते. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून श्रध्दाळू भक्तांचा या काळूबाईच्या भगतांबरोबर पूर लोटलेला असायचा. डोंगरावर पाय ठेवायला जागा नसायची. प्रत्येक भगताची करवंदाची जाळी ठरलेली असायची. तिथ या भगतांचा आपल्या गोतावळ्यासह मुक्काम असायचा. रात्रंदिवस या भगतांचे देव्हारे ढोल-ताशे नाहीतर हलगीच्या तालावर घुमत असायचे. अगणित कोंबड्या बकऱ्याचे बळी दिले जायचे. काळूबाईच्या आखाड्यात रक्ताचा चिखल झालेला असायचा. बळी देणाऱ्या खाटीकांचा अवतार तर एखाद्या दैत्या सारखा भेसूर असायचा. काळूबाईच्या देवळा मागील करनीच्या झाडांना असंख्य खिळे ठोकले जायचे. अशा या वृक्षांना होणाऱ्या प्राणांतिक वेदनांची जाणीव रक्त पिपासू माणसांच्या खिजगणतीसही नसायची. आजही तेथे या करणीच्या खिळ्यांनी उभी वठलेली कित्येक झाड त्याची साक्ष देतात. डोंगरावर सगळीकड कोंबड्या व बकऱ्यांच्या चघळलेल्या हाडकांचा खच पडलेला असायचा. माणसांच मलमूत्र व या हाडकांच्या उग्र वासान डोंगराचा परिसर भरुन जायचा. याचा फायदा आसपासच्या गावातील पायथ्याच्या शेतांना मात्र व्हायचा. उन्हाळ्यातल्या वळवाच्या पावसान आजूबाजूंच्या परिसरात हे मलमूत्र वाहून जायच व बिगर खत-पाण्यान इथ जोमदार पिक यायची.


गावोगावी भावकीत नेहमीच भांडण-तंटा चालूच असतो. एकमेकांची डोकी फोडली जातात. पोलीस केस,कोर्ट कचेऱ्या होतात. मग सूडान पेटलेली सर्वसामान्य जनता नेमकी या भगतांच्या शिकारीला बळी पडते. अंधश्रद्धे पोटी माणस या मांत्रिकांच्या आहारी जातात. भगताकड गेल कि हमखास देवादीकाची नड व भाऊबंदांची करनी निघते. मग अवस-पुनवच्या वाऱ्या सुरु होतात. माणस काम-धंदा सोडून अंगारे-धुपाऱ्याच्या नादी लागतात. मग लिंब-नारळाचे उतारे सुरु होतात. त्यामुळ गावकी व भावकीतल वातावरण चांगलच तापत किंवा तापवल जात. आपल्याकड गावोगावी लग्नात वांजत्र्याचा ताफा लावतात. अगदी तशाच प्रकारे या भगतांचा देव्हारा वाजत-गाजत थाटाने काळूबाईची जत्रा उरकून मुक्कामी पोहोचतो.


योगा योगान असे काही काळूबाईचे भगत माझ्या परिचयाचे होते. त्यातले पावनेआठ वृत्तीचे दोघे-तिघे जण खडकीच्या दारु-गोळा फॅक्टरीत कामाला होते. दारुगोळ्यातील बहुतेक स्फोटक ही हळदी सारखीच पिवळी असतात. शीघ्र ज्वालाग्रही या स्फोटकांच जुजबी ज्ञान त्यांना अनुभवान माहित होत. करनी काढण्यासाठी हे भोंदू भगत अंधश्रद्धाळू भक्तांचे घरी येऊन होम-हवनाच नाटक करीत. होमात वापरल्या जाणाऱ्या हळदी-कुंकवात ही स्फोटकाची पावडर मिसळत. सहाजिकच अशा हळदी-कुंकवाने होमात अग्नीच्या ज्वाळा भडकत व लोकांचा करनीवर विश्वास बसे. मग नेहेमीच्या सिरस्त्यान अवस-पुनवच्या वाऱ्या व लिंब-नारळाचे उतारे सुरु होत. करनी काढण्याचा फार्स थाटात साजरा होई, त्यासाठी एकधारी, तीनधारी लिंब चढ्या भावान विकली जात. येवढ सगळ झाल कि भोळ्या भक्ताच्या मनातल करनीच संशयी भूत पळून जाई. मग जत्रेचा कार्यक्रम काळूबाईच्या डोंगरावर नाही तर भक्ताच्या घरी केला जाई. अर्थातच भगताची बिदागी समारंभ पूर्वक दिली जाई.


असाच एक वल्ली भगत आमच्या प्रयोग शाळेत कामाला होता. बरेच दिवस काम केल्यान त्याला स्फोटकांची तोंड ओळख होती. सर्व साधारण पणे स्फोटक ही आम्लधर्मी असतात. त्यांची अल्कली बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन क्षार तयार होतात. एक दिवस तो दुपारच्या सुट्टीत शेंडीपाशी ड्रीलिंन मशीनने नारळास भोक पाडत होता. माझ्या मित्रान हटकल्यावर त्याच भगतगिरीच भांड फुटल. नारळातील पाणी हे अल्कली युक्त क्षार असते. स्फोटकाशी नारळ पाण्याची प्रक्रिया होऊन रक्ता सारख गडद लाल पाणी होते, हे त्याला अनुभवान माहित होत. त्यामुळ तो भक्तांची दिशाभूल करण्यासाठी नारळात त्या छिद्रा द्वारे त्या स्फोटकाची पावडर टाकून नारळाची शेंडी डिंकान पुर्ववत चिटकवायचा. अवस-पुनवला येणाऱ्या भक्तांना तो नारळ पुजेसाठी दिला जायचा. सव्वा महिन्यानंतर तो नारळ देवीच्या समोर फोडल्यावर त्यातून रक्त आल्याचा भास भक्तांना व्हायचा. देवीच वार अंगात आल्यावर तो करणीची बतावणी करुन भोळ्या भक्तांची दिशाभूल करायचा. मग घाबरलेले भक्त तो सांगेल तो विधी व खर्च करीत. थोड्या फार फरकान ही भगत मंडळी अस लोकांना आजही फसवतांना आढळतात.

इथ प्रामाणिक पणे एक गोष्ट मुद्दाम सांगाविशी वाटते. या सृष्टीतील विश्वाचे पूर्ण ज्ञान कुणालाच असण शक्य नाही. पण थोड चिकित्सक नजरेने पाहिल कि काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होते. प्रत्येक ठिकाणाचे व वनस्पतीचे विशिष्ट गुणधर्म असतात हे एक वेळ ग्राह्य धरल, तरी मग त्यासाठी भगताची गरज काय? आपली अरिष्ट ईश्वर कृपेने जर या लिंबु-नारळाने नष्ट होणार असतील, तर भक्ताने स्वत:च देवापुढ असे लिंबु-नारळ श्रध्देने ठेवली तरी फरक पडायलाच पाहिजे. एक वेळ फायदा झाला नाही, तरी तोटा तर निश्चित होणार नाही. हल्लीच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तर कुणाचही पितळ लगेच उघड पडत. आता काळ बदलत चाललाय व लोक सज्ञान झाल्यान ही भगतगिरी हल्ली शेवटची घटका मोजतांना आढळते. यामुळ हे काळूबाईचे देव्हारे नामशेष होत चाललेत. यातील कित्येक भगतांची भगतगिरी बंद पडलीय. हल्ली त्यांच्याकडचे देव्हारे कुठतरी अडगळीला धूळ खात पडलेले आढळतात.नांव- पुंडलिक सहादू देंडगे

मोबाईल/व्हाॅट्स ॲप- 8605585146

लिंग- पुरुष

. शहर-पुणे

Email.: dpundalik@gmail.comविश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

321 views2 comments

2 Comments


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Apr 10, 2021

अनुभव आश्चर्य कारक आहे. विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यात हे प्रकार चालतात ते खरोखर नवल आहे.

Like

Sudhakar Dhanawade
Sudhakar Dhanawade
Apr 09, 2021

खुप छान विचार .

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page