top of page

शरपंजरी भीष्म "बाबा"बघता बघता वर्ष सरले ही!


आज आपोआपच गतपटलावरची स्मृतिचित्रे फेर धरून सुंदर नृत्य करत आहेत..एकेक आठवणी ताज्या होत आहेत...हा ही खूप सुखद अनुभव आहे…


बाबांची एकेक गोड आठवण आठवतेय..


अगदी माझ्या शाळेत नाव घालण्याचा प्रसंग ही लख्ख आठवतोय..जसं कळत वय सुरू झालं, तो प्रसंग...मी अंजली पण शाळेत नाव घालताना बाबांनी परत एकदा बारसं केलं, आणि नरेंद्र म्हणजे मोठा भाऊ माझा, त्याची भगिनी म्हणून अस्मादिकांचे निवेदिता हे नामकरण पार पडलं…..आज बाहेरच्या जगात मला याच नावाने ओळखतं होते....


दयानंद कॉलेजचे माजी प्राध्यापक


कै.डॉ .प्रा.प्रभाकर पांडुरंग पाठक हे माझे वडील. आई ही त्याच कॉलेजची माजी प्राध्यापक होती.आम्ही तीन भावंडे. मोठा नरेंद्र,मधला रवींद्र आणि धाकटी मी अंजली. आम्हीं वडिलांना बाबा म्हणत असू.


बाबांना सर्व गोष्टींची आवड होती. संगीत ऐकणे,नाटक-सिनेमा बघणे, फिरणे, व्यायाम, सायकलिंग या सर्व गोष्टींची आवड होती… बहुदा संपूर्ण भारत ,नेपाळ,कुवेत ही बघून झाले त्यांचे.कधी आई बरोबर,तर कधी PHD निमित्त…! वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी ट्रीप मध्ये असताना गंगा नदी पोहून पार केली...बरोबरचे सहप्रवासी आणि आई नावेत होते तर हे नदी पोहुन पार करत होते…. तब्येतीने या वयात ही एकदम फिट होते. वयाच्या अंतापर्यंत डायबेटीस,बी पी बिल्कुल आसपास ही फिरकले नाही त्यांच्या. वयाच्या 70 पर्यंत तरी औषधे कधी ही घेतली नाहीत त्यांनी. बाबांना संगीताची गोडी होती ,म्हणून शास्त्रीय संगीतांच्या असंख्य कॅसेट,आणि व्हिडीओ कॅसेट त्यांच्याकडे होत्या...आज आमच्या कडे दिल्यात पण जमाना बदललाय... त्यांना फोटो काढण्याचे विलक्षण वेड होते.त्याकाळी कॅमेरा घेऊन आमचे आणि सर्व पाठक कुटुंबियांचे फोटो काढून,विविध अल्बम तयार केले होते ...आज त्याच आठवणी त्यांच्यामुळेच सर्वांकडे आहेत. असे रसिक बाबा मला मिळाले म्हणून मी प्राउड फील करते.बाबांनी त्याकाळी लव्हमॅरेज करून 60 वर्षे सुखाने संसार केला. जीवनाचे अनेक चढउतार अनुभवले , अनेक समस्यांना तोंड दिले….मी तर म्हणते समस्या हेच त्यांचे जीवन बनले होते...संसाराच्या ऐन तारुण्यात आईचा मोठा अपघात होऊन आई दिव्यांग झाली होती...बाबांनी अशा कठीण प्रसंगात आईच्या आणि नातेवाईकांच्या आधारे आपला संसार पुढे आणला...आमची तिघांची उच्च शिक्षणे केली...आणि आम्हां तिघांना मार्गस्थ केले...रिटायरमेंट झाल्यावर पुढची आईसोबत भारत भ्रमण स्वप्ने ते पूर्ण करत होते हळूहळू. पण .... नियतीला ते मान्य नव्हते...अचानक एके दिवशी प्रचंड कंबर दुखीने खाली कोसळले...आणि दोन दिवसात जानेवारी 2003ला त्यांचे मणक्याचे ऑपरेशन झाले आणि ऑपरेशन फेल जाऊन बाबांचे दोन्ही पाय कायमचे लुळे पडले…...खूप मोठा धक्का होता तो सर्वांनाच…..


बाबा तर पार कोलमडले ….इतके वर्ष आईचा एक पाय आणि ते.. असे तीन पायांची गाडी ते चालवत होते...पण आता?......खूप मोठा यक्ष प्रश्न होता….


आईने खूप वेगवेगळे उपाय,मालिश करून बघितले... अनेक वर्षे…..पण सर्व प्रयत्न निरर्थक ठरले…आणि सत्य मान्य केले..


कसे बसे कुबडी वर तर कधी वॉकर वर आपली मार्गक्रमणा करू लागले….


बाहेर पडायचे सर्व मार्ग एकाकी बंद झाल्याने त्यांनी वाचनाकडे मन वळवले….आणि वाचता वाचता लेखनाची ही गोडी लागली.


आणि त्यांनी गोंदवलेकर महारांजांच्या आशीर्वादाने त्यांचे चरित्र लिहून पूर्ण केले...त्याला प्रसिद्धी मिळाली,पुरस्कार ही मिळाला…..आणि हाच महाराजांचा आशीर्वाद आणि संकेत समजून त्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली. 50 च्यावर त्यांनी पुस्तके लिहिली आणि अनेक पुस्तकांना मोठमोठे पुरस्कार प्राप्त झालेत..
आईची खंबीर साथ आणि प्रथम परीक्षक व प्रथम वाचक म्हणून तिची खूप साथ मिळाली..2003 ते 2019 पर्यंत ते पूर्ण बेडवरच होते आणि ही लेखन साधना करत ते आपली जीवन मार्गक्रमणा करत होते…2006 ला आई बाबांनी सोलापूर सोडले ते कायमचेच...परत एकदा तरी सोलापूरला जाऊन यायचे होते त्या दोघांना पण परतीचे मार्ग बंद झाल्याने, त्यांचे ते स्वप्नच ठरले...असो!दयानंद कॉलेज हे त्यांचे कार्यक्षेत्र होते…. तिथे त्यांनी आपले एक स्थाननिर्माण केले होते… सर्वांचे लाडके प्रोफेसर होते. कॉलेज लायब्ररीत तर ते खूप रमायचे… पुस्तकांवर मुलांसारखे प्रेम करायचे. पुस्तकांची काळजी ही तितकीच प्रेमाने घ्यायचे… घरात एक लायब्ररी ही होती त्यांची.. असंख्य पुस्तके होती आमच्या घराच्या लायब्ररीत.. त्यात मोठमोठ्या व्यक्तींची चरित्र,लेख संग्रह, आध्यात्मिक, राजकीय, अशी हिंदी आणि मराठी पुस्तके होती . पुस्तकाला खाकी कव्हर घालून व्यवस्थित त्यावर सुवाच्च अक्षरात त्याचे नाव लिहिलेले असायचे... आज ही त्यातील काही पुस्तके माझ्या कडे आहेत त्यांच्या हस्ताक्षरात. सोलापूर सोडताना आणि आयुष्याचा शेवट जवळ आलाय हे कळल्यावर या दोन्ही वेळी त्यांनी आपली पुस्तके आपल्या विद्यार्थ्यांना ,काही लायब्ररींना आणि काही गरजूंना, स्नेह्यांना त्यांनी प्रेमाने पुस्तके भेट दिली आहेत.. बाबा आणि पुस्तके हे एक समीकरणच होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही..ते कुणाशीही कोणत्या ही पुस्तका बद्दल भरभरून बोलत...त्यांचे लेखक आणि त्यांची पुस्तके आणि त्या पुस्तकातील संदर्भ हे सगळे मुखोद्गत होते….भरभरून बोलायचे ते… मला तर वेळोवेळी हे पुस्तक वाच..ते पुस्तक वाच… कादंबऱ्या वाच,चरित्रे वाच म्हणून सतत लेखकांची नावे सुचवीत...बरीचशी आणून ही देत किंवा पाठवत होते...वाढदिवसाला हमखास एखादे पुस्तक असायचेच...वाचन लिखाणाची गोडी त्यांनीच मला लावली..त्यात आईचा ही मोठा हात होता, हे ही स्मरणकुपीत आहे बरं!
बाबांना मी "शरपंजरी भीष्म" असे म्हणायला एक कारण आहे. महाभारतात अर्जुनाच्या बाणांनी विद्ध झालेले पितामह भीष्म जवळ जवळ ५८ दिवस शरपंजरी पडले होते! महाभारताचे युद्ध तर केवळ १८ दिवसच लांबले आणि भीष्मांना मात्र ५८ दिवस असं खितपत पडावं लागलं. परंतु अंती शरपंजरी पडल्यावर त्यांना कळेना की त्यांच्या हातून असे कोणते पातक कोणत्या जन्मात घडले, ज्यामुळे आता त्यांना हे क्लेश सहन करावे लागत होते. याविषयी श्रीकृष्णाने त्यांना मदत केली जेणेकरून त्यांना नीट आठवण व्हावी .आणि त्यांनी सर्पाचे उदाहरण दिले.एकदा वाटेत एक सर्प निपचित पडलाय असे समजून त्यांनी बाणाच्या टोकावर धरून बाजूच्या झाडीत भिरकावला आणि नेमका तो काटेरी वनस्पतीवर पडला,दुर्देवाने तो जिवंत होता.आणि हालचाल करून अधिक जखमी होत मृत पावला.त्याचीच ही पूर्वजन्माच्या कर्माची शिक्षा म्हणून शेवटी बाणांच्या शय्येवर शेवट आला असे त्यांनी समजून घेतले….ही गोष्ट बाबांना लागू होते असे मला वाटले.बाबा शेवट पर्यंत मलाच असे का व्हावे, आज पर्यंत कुणाचे वाईट केले नाही,मी एवढा फिरणारा,सायकलिंग करणारा, व्यायाम करणारा असताना अचानक दोन्ही पाय गमावून अंथरुणाला खिळून कसा बसलो? एक नव्हे... दोन नव्हे….. तब्बल 16 वर्षे?.... किती मनाची तडफड झाली असेल! किती यातना! बर , आधीची वर्षे आईचे पायाचे दुखणे काही कमी नव्हते...खुब्याचे हाड मोडल्याने आणि 8 ऑपरेशन्स करून ही कायमचे अधुत्व तिने स्वीकारले होतेच न! मग?....पण नियतीला हे मान्य नव्हते, अजून तुझे दुःख भोगायचे बाकी आहे म्हणून की काय….! पण हारतील तर ते माझे बाबा कसे असतील?.... अशा दिव्यांग अवस्थेत इतकी वर्षे पडून ही साधना करत राहिले.. म्हणून "शरपंजरी भीष्म 'बाबा'.."म्हणते मी.


फिनिक्स पक्षाप्रमाणे मनाची उभारी घेत ,आहे त्या प्रसंगाला तोंड देत, इतक्या वर्षांची प्राध्यापकी,वाचन आवड पुढे लिखाणात अक्षरशः ओतली...आणि एकापेक्षा एक सुंदर पुस्तकांनी त्यांच्या हाती जन्म घेतला….अनेक मान सन्मान मिळाले,कौतुक ही खूप झाले…..एकता” प्रकाशन पुणे तर्फ़े स्व.आनंदीबाई करमरकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वैचारिक लेखनाबद्दलचा पुरस्कार त्यांना मिळाला..“चेतना चिंतामणी: श्री बसवेश्वर” या ग्रंथ लेखनामुळे “बसवसेंटर” सोलापूर तर्फ़े “बसवरत्न” ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली..
माझे बाबा अभाविप चे कार्यकर्ते होते.सोलापुरात त्यांनी अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. संघाचे संस्कार होते त्यांच्यावर.म्हणून ही असेल त्यांच्या पुस्तकांवर त्याचे राष्ट्रप्रेम दिसून येते.


आज त्यांची ग्रंथ संपदेची यादी खूप मोठी आहे. ती मी देत नाही पण पुरस्कार प्राप्त दहा ते बारा ग्रंथांची निवडक नावे तेवढी सांगणे आवश्यक वाटते.

*राष्ट्र धर्माचे प्रणेते हा बृहद ग्रंथ*,


*राष्ट्रधर्मी विचारवंत..स्वामी दयानंद*,


*राष्ट्रधर्माचे प्रणेते स्वामी विवेकानंद*,


*श्री रामदास स्वामींचा राष्ट्र धर्म*,


*राष्ट्र्धर्माचे आद्य प्रणेते सुदर्शन श्री कृष्ण *,


*संघ युगाचा शालीवाहन डॉ.हेडगेवार. *,


*राष्ट्र धर्माचा दीपस्तंभ श्री गोळवलकर गुरुजी.* *हिंदुत्वाची दोन रुपे.*


* राष्ट्रधर्माचे शक्तिपीठ.*


* राष्ट्रभक्तीची दोन परिमाणे.*


* राष्ट्रधर्म योगी पं. दीनदयाळ उपाध्याय.* *राष्ट्रधर्माचा किर्तीस्तंभ ..मा. अटलबिहारी वाजपेयी.*


*सावरकरांचा राष्ट्रधर्म.*


*डॉ.राममनोहर लोहिया: चरित्र , विचार,कार्य आणि आकांक्षा.*


* राष्ट्रधर्माचा शक्तिस्तंभ श्री लालकृष्ण अडवाणी.*


* राष्ट्रधर्माचा कल्पवृक्ष मा. दत्तोपंत ठेंगडी.*


*श्री.छ्त्रपती शिवाजी महाराज*


*डॉ.बाबासाहेब आंबेडकर*


इ.... अनेक ग्रंथ लेखन पुरस्कार प्राप्त आहे..मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मा.नितीन गडकरी, यांच्या वरील पुस्तके ही प्रकाशित झाली, व त्यांच्या पर्यंत पोहचली ही.तर अध्यात्मावरील ग्रंथ संपदा ही प्रचंड आहे…
*गोंदवलीचे चैतन्य*(पुरस्कार प्राप्त),


दासबोधसार,


सद्गुरुंचे सद्गुरु श्री तुकाराम चैतन्य,


राघवेंद्र स्वामी,


वाल्मिकी रामायण,


ब्रह्मानंद महाराज,अशी अनेक पुस्तके तर…..संतांची अमृतवाणी


आणि


संतवाणीची अमृतसरिता


आणि


श्रीमद भगवद्गीता: वाड:मयी श्रीमूर्ती प्रभूची……हे अध्यात्मावरील तीन बृहद ग्रंथ बाबांनी लिहीले आहेत...अशी अजुन अनेक नावे सांगता येतील...त्यांनी आकाशवाणीवर अनेक प्रवचने दिली आहेत. वृत्तपत्रिका, मासिकांतुन, दिवाळीअंकातुन ही अनेक लेखन केले आहे.


एका अविरत ज्ञान साधनेचा अंक संपला. त्यांच्या शारीरिक हालचालींना मर्यादा आल्यानंतरही त्यांनी जी अखंड ज्ञानसाधना केली, त्याला तोड नाही. त्यांचे निरंतर वाचन, चिंतन, लिखाण, अनेकांशी चर्चा, हे सर्व केवळ ज्ञान केंद्रित होते. त्यांच्या स्थानबद्धतेने त्यांच्या प्रसन्नतेवर कधीच यत्किंचितही परिणाम झाला नाही. स्थितप्रज्ञता यापेक्षा वेगळी काय असते?


त्यांनी जे प्रचंड लिखाण केले, विशेषतः तत्वज्ञान, धर्मसूत्र,अध्यात्मविद्या, संत साहित्य, निती शास्त्र वगैरे विषयांवर, ते अक्षरशः स्तिमित करणारे आहे.
आपल्याकडे सहानुभूतीने किंवा कीव करावी हे त्यांना अजिबात मान्य नव्हते.....


अशा दिव्यांग अवस्थेत त्यांच्या हातुन इतकी साहित्याची सेवा झाली हेच विशेष आहे...ते म्हणतात, “कदाचित माझ्या हातुन अशा प्रकारचे लेखन घडावे हीच परमेश्वराची इच्छा होती...अन्यथा मी सतत भ्रमणच करत राहिलो असतो..जे होते ते भल्यासाठीच !”


प्रकृतीची साथ नसताना ग्रंथ लेखनाचे महान कार्य त्यांनी केले. सध्याच्या काळात आपण जी विचित्र जीवनशैली स्वीकारली आहे, त्या नुसत्या जगण्याच्या संघर्षात त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या ग्रंथसंपदेचे नुसते रसग्रहण करण्याची तरी आपली क्षमता आहे का? हा प्रश्न मनात आला, की अपराधीपणाची खोलवर जाणीव होते.


त्यांच्या अत्यंत शुद्ध कर्मयोगाने त्यांना अति उत्तम गती मिळेलच, यात संदेहच नाही.


महाजनो येन गत:स पंथ:।


या न्यायाने आपण त्यांचे अनुसरण करू शकतो का?असे क्षणभर वाटून जाते.एक खंत मात्र मनापासून वाटते,ती म्हणजे एक दोन पुस्तके लिहून प्रसिद्ध झालेले लेखक मी बघितले आहेत….पण अशा प्रसिद्धीसाठी काय करायचे असते...ते आम्हां कुणालाच कळले नाही. बाबांना आज म्हणावी तशी प्रसिद्धी नाही मिळाली...ज्यांची मोठमोठ्या साहित्यिकांनी दखल घेतली,पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या ,पण माहीत नाही, म्हणावी तशी दखल साहित्यदरबारी नाही झाली असे वाटते ती निदान त्यांच्या मृत्यु पश्चात तरी दखल घेतली जावी ही इच्छा आहेअशा या उत्तुंग विचारशैली प्राप्त विद्यावाचस्पती कै. डॉ.प्रभाकर पांडुरंग पाठक यांचे आज वैकुंठगमनाचे वर्षश्राद्ध!


त्यांना माझी ही भावपूर्ण शब्दांजुली वाहते..


बाबा तुम्ही सतत माझ्या सोबत आहात तुमच्या पुस्तकांच्या रूपाने


Love you Baba…


Miss you Baba…
तुमचीच,


अंजली/निवेदितापल्लवी उमेश

मोबा.न.9921975158

जयसिंगपूर ,जिल्हा कोल्हापूर

इमेल आयडी...pallavikularni@gmail.com614 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page