एड्स या सामाजिक समस्येचा वेध घेणारी कादंबरी
"भिन्न" ही कविता महाजन यांची २oo७ साली प्रकाशित झालेली कादंबरी असून या कादंबरीत लेखिकेने एड्सग्रस्त स्त्रियांचे विविध प्रश्न हाताळले आहेत.रूढ अर्थाने जे कादंबरीत अपेक्षित असते त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने " भिन्न " कादंबरींची रचना केली आहे.एखाद्या प्रश्नाला भिडणे,त्यातील बारकावे समजून घेणे,त्या प्रश्नाला बळी पडलेल्या व्यक्तींच्या मनाचा ठाव घेणे,त्यांच्या आयुष्यातील चढउतार भावदर्शीपणे चितारणे,एड्स सारख्या गंभीर आजाराचे स्त्री जीवनावर आणि एकंदरीत समाज जीवनावर होणारे अत्यंत विघातक परिणाम स्पष्ट करणे हे या कादंबरीचे उद्दिष्ट आहे.एड्सग्रस्त व्यक्तींना भावनिक,व्यावहारिक या दोन्ही पातळ्यांवर करावा लागणारा टोकाचा संघर्ष हा " भिन्न " कादंबरीचा गाभा आहे. या कादंबरीतून समाजातील वास्तवाचा लेखिका कविता महाजन यांनी तळमळीने वेध घेतला आहे.
" भीन्न" म्हणजे इतरांपेक्षा वेगळे असलेले रचिता शिर्के,प्रतिक्षा कमल ,आणि लेनिना या आधुनिक स्त्रियांचे आत्मकथन असे या कांदबरीचे स्वरूप आहे.रचिता ही एड्सग्रस्त असून प्रतिक्षा व लेनिना या दोघी एड्सग्रस्तांसाठी काम करणाऱ्या "सोबत"या संस्थेत काम करतात.बदलत्या परिस्थितीत स्रियांपुढे उभी असलेली आव्हाने आणि त्यामुळे स्त्रियांचे बदलते भावविश्व यांचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण कादंबरीत आहे.
प्रथमपरूषी निवेदनाने सुरू झालेल्या कादंबरीच्या पहिल्या भागात मध्यमवयीन नायिका रचिता शिर्के जगाच्या दृष्टीने सुखी दिसते.वरवर तीही सुखी असल्याचं भासवत असली तरी नवऱ्याच्या बाहेरख्याली वर्तनाने अंतर्गत ती खूप दुःखी आहे.शिकत असलेली दोन मुलं,नवराबायको नोकरीत.. मात्र सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये या भितीने ती कुठे मन मोकळं करत नाही.रोज ठरल्यावेळी एड्सविषयक काम करणाऱ्या "सोबत"संस्थेत कोऑर्डीनेटर असलेली लेनिना भेटते,वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक मैत्रिणी प्रवासात आपलं मन वरवर मोकळं करतात.आतल्या जखमा मात्र तशाच ठसठसत राहतात.जगणं सुरू असतं नेहमीप्रमाणे.रचिता जीवनातील प्रचंड संघर्षाला आजवर सामोरी जात आली आहे.पावलोपावली झिडकारणाऱ्या नवऱ्याबरोबर ती संसार करते.तिला मूल हवे असते म्हणून तिला आपल्याच नवऱ्याची विनवणी करावी लागते.आजवर वडील आणि नवरा या दोन्ही पुरूषांकडून रचिताला अत्यंत वेदनादायी अनुभवच आले आहेत.आता मात्र फारच विपरीत घडतं.सततचं आजारपण...पण खोलात शिरून शोध घ्यावाच अशी वेगळीच लक्षणे दिसू लागतात.सामान्य उपचाराला प्रकृती साथ देत नाही तेव्हा रचिता एच.आय.व्ही.टेस्ट करून घेण्याचा लेनिनाचा सल्ला मान्य करते.
एच.आय.व्ही.टेस्ट समजा पॉझिटिव्ह निघाली तर ?...नायिकेच्या मनातील वादळं लेखिकेने अतिशय प्रभाविपणे रेखाटली आहेत.सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुण्याही स्त्रिला या लाजिरवाण्या आजाराचा बळी ठरल्यावर काय वाटेल ? तिरस्कारानं भरलेल्या नजरा,लांछनं,अवमान कशाकशाला तोंड द्यावं लागतं!नायिकेच्या मनातील प्रचंड उलथापालथ,विचारभावांचं तांडव संवेदनक्षम वाचकांच्या मनाला हादरवून सोडते.
कोणत्या गुन्ह्यासाठी ही जबरदस्त शिक्षा ? ती कोण निश्चित करतं ? रचिताचं या पुढचं जीवन बदलून जातं,जगणं निरस वाटू लागतं.नवऱ्याचं तर कायम संसाराकडे दुर्लक्ष.एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह असल्याचं खरं सांगितल्याने नोकरी जाते.पण आपल्या दोन मुलांसाठी ती स्वतःला सावरते.तिच्यातली आई सारा अवमान, वेदना,संयम व तिरस्काराच्या नजरा छेदत एड्स विषयक कार्य करणाऱ्या "सोबत"संस्थेशी जोडली जाते.आपल्या नजरेसमोर मुलांचं भलं व्हावं अशा तीव्र इच्छेने ती जगण्यासाठी धडपडते.दरम्यान एड्सचं निदान झाल्यानं आयुष्यभर ताठ्यात जगलेला नवरा विठ्ठल आत्महत्या करून जगाचा निरोप घेतो.त्याचा पुरूषी अहंकार त्याला कमजोर पाडून आत्महत्येस प्रवृत्त करतो तर हाताशी असलेलं जगणं अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी रचिताची धडपड सुरू असते.
"मरणाचं स्मरण असलं की,कसं जगावं हे कळायला लागते" , "जगणं आणि मरणं यातील निरर्थकता जेव्हा कळते तेव्हा तळहातावरचा क्षण कसाही असो...रसरशीत फळासारखा,वाळून तडकलेल्या शेंगेतल्या बी सारखा किंवा नुसतंच उमलून कोमेजून जाणाऱ्या इवल्या रानफुलासारखा...तो मोकळेपणाने अनुभवासा वाटतो."असं ठिकठिकाणी कादंबरीत आलेलं जन्म,मृत्यू ,जीवन या विषयीचं चिंतन कादंबरीला अतिशय उंचीवर नेऊन पोहोचवतं.
एकदा हातात आलेली कांदबरी संवेदनशील,सुहृद वाचक ठेऊ शकत नाही.ज्वलंत,सामाजिक विषय,भाषेतील प्रवाहिपण-सौंदर्य-समृध्दता,तेवढीच वैशिष्टयपूर्ण मांडणी अशा ओनक वैशिष्टयांमुळे पुस्तक पानापानावर खिळवून ठेवतं.
मानवी जीवनातील एक मूलभूत गरज म्हणजे सेक्स.याची स्री व पुरूष दोघांनाही तेवढीच गरज असते.एड्समुळे पुरूषांपेक्षा स्त्रीजीवनच अधिक विघातक टोकाला जाऊन पोहोचते.यात कोणत्याही स्त्रीला मग ती उच्चभ्रू असो की तळागाळातील वेदना सारख्याच असतात.या दाहक अनुभवाचे असंख्य पदर लेखिकेने उलगडून दाखविले आहेत.
लेनिना आणि प्रतिक्षा या कादंबरीतील सहनायिका सेवाभावी संस्थेत काम करत असून महानगरातील स्त्रियांचे आर्थिक,व्यावहारिक व सामाजिक असे सगळे प्रश्न लक्षात आणून देतात.या संस्थेतील चर्चेच्या निमित्ताने एक व्यापक सामाजिकपट लेखिकेने कादंबरीत उलगडून दाखविला आहे.नेपाळी वेश्येपासून महाविद्यालयातील मुलींपर्यत अनेक स्त्रिया आर्थिक विवंचनेमुळे वेश्या व्यवसायाकडे वळतात.या स्त्रियांचे प्रचंड मानसिक खच्चीकरण झालेले असते.दलाल त्यांची अत्यंत पिळवणूक करतात.वेश्या,हिजडे आणि समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती यांचे वास्तव प्रश्न या कादंबरीत कविता महाजन यांनी चर्चिले आहेत.पंढरपुरची वारी,पुण्याचा गणेशोत्सव या वेळीही वेश्या व्यवसाय तेजीत असते हे छुपे वास्तव लेखिकेने उघडकीस आणून दिले आहे.
गरीबी, शिक्षणाचा अभाव, व्यसनाधिनता,कौटुंबिक विसंवाद,सामाजिक मागासलेपणा आणि भावनिक असंतुलन यांची अदृष्य साखळी माणसाच्या लैंगिक वर्तनाला आणि पर्यायानं एड्सच्या प्रादुर्भावाला जबाबदार असते.एड्स विषाणुंमुळे होतो हे अर्धसत्य आहे.एड्स असंतुलीत जीवनमानामुळे होतो.जोपर्यंत या संपुर्ण साखळीच्या सर्व कड्या सोडवण्यात आपण यशस्वी होणार नाही तो पर्यंत एड्स चा प्रसार रोखणं सर्वथा अशक्यच आहे,समाजसेवेचे क्षेत्रदेखिल गलिच्छ राजकारणाचा बळी ठरत आहे अशा अनेक वस्तुस्थिती लेखिकेने दाखवून दिल्या आहेत.
प्रत्येकानेच ही कादंबरी नक्की वाचावी,कारण ती उपेक्षित,वंचित,एड्सग्रस्त,पिडीत,शोषित,नाऊमेद झालेल्या,असाध्य व्याधिने ग्रस्त होत मरण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या स्त्रियांसाठी दीपस्तंभच ठरते.कोणासही बिकट परिस्थितीतून वाट दावणारी,तडजोडीतून जगणं शिकवणारी,अंतःस्फुर्तीचा सुप्त झरा झुळझुळत ठेवण्याचा संदेश देणारी,आपल्यातली प्रकाशफुलं उमलायलला भाग पाडणारी,हजार संकटांवर मात करीत स्वाभिमानानं जगणं शिकवणाऱ्या अनुभवांची ती एक गाथा आहे.
माणसं जात-धर्म-रंगभेद,आर्थिक भेद,स्त्री-पुरूष भेद,निरोगी आणि विशिष्ट रोगांनी पिडीत असणाऱ्यातले भेद अशा विविध तऱ्हांनी माणसांना वेगळं टाकतात.एका क्षणी हे वेगळेपणंच शक्ती,उर्जा,चेतना बनून मरणंही निरर्थक आहे हे पटवून देतं.जगण्याच्या प्रत्येक क्षणाला अर्थ येऊन नुसतं जगावं नव्हे तर चांगलं जगावं असं वाटतं...अशी सकारात्मता या कादंबरी वाचनाने मनामनात निर्माण होते.
सामाजिक प्रश्नांची अचूक जाण असणाऱ्या लेखिका म्हणून कविता महाजनांचे स्थान मराठी साहित्यात भक्कम होते.त्यांच्या अवेळी जाण्याने साहित्य प्रांताची मोठीच हानी झालेली आहे.आधुनिक स्त्रियांच्या वास्तव जीवनातील व्यावहारिक अडचणी,विकृत समाजामुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना व मानसिक घुसमट यांचे अत्यंत विदारक व वेदनामयी चित्रण " भिन्न" कादंबरीत आले आहे यापुर्वी "ब्र"कादंबरीतूनही या लेखिकेने आदिवासी स्त्रियांचे प्रश्न समर्थपणे मांडले होते.
एड्स सारख्या गंभीर प्रश्नांचे पडसाद कादंबरीसारख्या ललित साहित्य प्रकारातून मांडण्यास लेखिका यशस्वी ठरली आहे.कविता महाजन यांना मराठी साहित्यातील नव्या कांदबरी प्रवाहाच्या उद्गात्या म्हटले जाते,कारण त्यांनी मराठी कादंबरीचा रचनाबंध (फॉर्म)बदलवण्यास सुरूवात केली.
"भिन्न" ही कादंबरी ऑनलाइन घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा
कादंबरी- भिन्न
लेखिका- कविता महाजन
प्रकाशक- दिलीप माजगावकर, सदाशिव पेठ,पुणे .
पुस्तक परिचय : प्रा. मीनल येवले, नागपूर
ईमेल: minalyeole01@gmail.com
Hozzászólások