top of page

अश्रू ....मनातले..

आई आज खूप खुश दिसते.तीचा मोठा मुलगा दिनू घरी आला आहे ना,मग काय स्वारी खुशीतच असणार. खूप वर्षानंतर दिनू आईला स्वतःच्या घरी घेऊन जाण्यास आला होता. आई,तू माझ्या घरी येतेस का ? निदान दोन महिने तरी राहा माझ्या घरी.तुलाही तेवढाच हवाबदल होईल. आईचे डोळे आनंदाश्रूनी भरले. ती लगबगीने आतमध्ये जाते.कपड्यांची बॅग भरून ती तयार होते. दिनू, बरं झालं रे बाबा तू आलास.आता केतन ला, केतकी आणि मुलांना घेऊन बाहेरगावी फिरायला जाता येईल.माझ्या आजारपणामुळे त्यांना मला एकटीला घरात ठेऊन कुठे जाता येत नाही. आई केतन जवळ जाते.हळुवार त्याच्या पाठीवर हात ठेवत बोलते, केतन,तुम्हीही कुठेतरी बाहेर फिरून या. मजा करा.मुलांनाही बरं वाटेल. येते मी म्हणत आई निघते. दिन्याची गाडी दिसेनाशी होई पर्यंत सगळे खिडकीतून आईला हात दाखवत असतात.सगळे घरात येतात. केतकी,घर कसं रिकामी झाल्यासारखं वाटतं नाl! हो ना,पण आई खूप खुश होत्या.पाच वर्षापूर्वी बाबा गेले. त्यानंतर त्या खूपच खचल्या. आजारी पडल्या. तेव्हापासून आपणही त्यांना कुठे घेऊन जाऊ शकलो नाही.बरं झालं दिनू भावजी आईंना घरी घेऊन गेले.तेव्हढाच जागा बदल होईल.असो.तुम्हाला उद्या ऑफीसला जायचंय ना.डब्याची तयारी करते म्हणत किचन मधे जाते. गाडी दिनूच्या घराकडे थांबते.

आईsss आजी आली म्हणत दिया आणि दिपेश तीच्या स्वागतासाठी दरवाजात उभे रहातात. दोघं आजीचा हात धरून, तीची बॅग घेऊन तीला आतल्या रूम मध्ये घेऊन जातात. सून दीपा आईला पाणी देत म्हणते,आई तुम्ही हात पाय धुवून थोडी विश्रांती घ्या. जेवण तयारच आहे .थोड्यावेळाने सर्वांना जेवायला वाढते. जेवणं झाल्यावर सगळ्यांच्या गप्पागोष्टी रंगतात.आजी नातवंडा बरोबर चांगलीच रमते. बघता बघता चार दिवस कसे निघून जातात कळतच नाही. आज दिनू ऑफीसमधून आल्यापासून थोडा अस्वस्थ दिसतो.आईच्या ते लक्षात येतं. दिनू,काय झालं रे? असा उदास का दिसतोस? आई, दिनू रडवेल्या आवाजात बोलतो,तुला मी एवढ्या हौशेने घरी आणलं आणि नेमकं मला ऑफिसच्या कामानिमित्त दोन महिन्यांसाठी बाहेरगावी जावं लागतय.उद्या सकाळीच निघाव लागेल. आई दिनुच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते,तू जा बाळा.वाईट वाटून घेऊ नकोस.दिपा आणि मुलं आहेत ना माझ्या सोबत. हो ना दीपा ? हो आई . अहो,तुम्ही जा, काळजी करू नका .मी आहे ना घरात.असं म्हणत दीपा आत जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनू निघून जातो. दुपारचं जेवण झाल्यावर, आई थोडी वामकुशी घेण्यासाठी पहुडते.थोड्याच वेळात दीपा आईसाठी चहा घेऊन येते. आई, उठता का? चहा घ्या.आई घड्याळाकडे बघते. अगं अजून तीनच वाजलेत.आज चहा लवकर केलास का? मुलं आली का घरी? आई उठून बसते. चहा हातात देत दीपा म्हणते,आई आपल्याला निघायला उशीर होतोय. दीपा,आपण सर्व कुठे बाहेर चाललोय का? आपण सर्व नाही,तुम्ही आणि मी.तुमचे कपडे बॅगेत भरले आहेत.काही राहिलं आहे का ते बघा .तो पर्यंत मी माझी तयारी करते. अगं ! पण आपण कुठे जातोय?

तुमच्या घरी.एवढं बोलून दीपा जाते. आई क्षणभर स्तब्ध होते.डोळे पाणावतात.पदराने अश्रू टिपत लपवत आवंढा गिळते. स्वतःला सावरत,सर्व आवरून तयार होते.चेहऱ्यावर खोटं अवसान आणून दीपाला हाक मारत बाहेर येते. दीपा ,चल निघुया, मी तयार झाले. आईच्या मनात विचारांचं काहूर माजत. दीपा ला, मी इथे आलेलं आवडलं नाही का? माझा तीला त्रास होतोय का? दिनूला काय वाटेल? घरी गेल्यावर केतानला काय सांगू? मुलं भेटली असती तर बरं झालं असतं.एकदा त्यांना डोळे भरून बघितलं असतं.असो,एक दिर्ध श्वास टाकत उठते. दीपा तयार होऊन बाहेर येते. आई चला निघू म्हणत गाडीची चावी घेऊन बाहेर पडते.दीपा,आईला तीच्या घराजवळ सोडून निघून जाते.आई तीच्या घराची बेल वाजते. केतकी दरवाजा उघडते. आई! तुम्ही? आवाज ऐकून केतन बाहेर येतो. अगं आई तू एकटीच आलीस? दीपा ने मला तीच्या गाडीने आणलं. तीला दिवाळीचं शॉपिंग करायचं होतं. उशीर होत होता म्हणून ती गेली. आई तू दोन महिने रहाणार होतीस ना दिनुकडे? हो रे केतन,पण मला तिथे करमत नव्हतं. ह्या घराची आणि तुमची सवय झालीय ना.तुमच्या शिवाय नाही रहावलं,आले परत. असं म्हणत आई डोळ्यातलं पाणी लपवत बॅग घेऊन लगबगीने आत जाते.कपाटात कपडे ठेवताना दरवाजाच्या आड जाऊन पदराने आसवं पुसते. ईशा आणि ईशान,आजी तू आलीस म्हणत तीला बिलगतात. आम्हाला तुझी खूप आठवण येत होती.तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. आजीच्या अश्रूंना बांध फुटतो. नाही रे बाळांनो, मी आता ह्या घरातून कुठेही जाणार नाही अगदी मरेपर्यंत. असं म्हणत ती नातवंडांना घट्ट मिठीत घेते.

हे सगळं बघत केतकी गाजराच सुप घेऊन दरवाजात उभी असते. डोळ्याच्या पापण्या ओलावतात. पदराने डोळे पुसून ,सुप घेऊन आत जाते. आई, गरम गरम गाजर बीटच सुप पिऊन घ्या.नंतर तुमच्या आवडीची मऊ खिचडी देते.गोड शिराही केलाय.आपण सर्वजण एकत्र बसून मस्त जेवू. असं म्हणत मागे वळते.केतन दरवाजात उभा असतो. त्याच्याही डोळ्यात पाणी असतं.केतकी त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत येते. अहो,तुमच्या मनाची घालमेल मला समजतेय.लोणावळ्याला जायचं रद्द करावे लागेल म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना !

मला काय वाटेल? मुलांना काय सांगायचं? ह्याचा विचार करताय ना! पण तिकडे बघा.आईच्या खोलीकडे हात दाखवत केतकी म्हणते, मुलं आईंबरोबर किती आनंदात दिसतायेत. हे बघून मला समाधान वाटतं. आपली मुलं समजूतदार आहेत. हट्ट करणार नाहीत. केतकी,हे ऐकून माझ्या मनावरचं ओझं उतरलं. पण,आई अशी अचानक निघून का आली असेल?ती तिकडे दुखावली गेली असेल का? तीला कोणी काही मनाला लागेल असं बोललं असेल का? काहीच समजत नाही.आपल्याला ती तसं दाखवणार नाही आणि काही बोलणार ही नाही.आई आहे ना ती. केतकी ऐक,कारण काहीही असू देत. आपणही तीला काही विचारायचं नाही.आपण मात्र दोघं मिळून तीचा शेवटपर्यंत सांभाळ करू. हो हो नक्की करू.केतकी आश्वासन देत म्हणते, मी आहे तुमच्या सोबत. आई वडिलांची सेवा करण्यासाठी देवाने आपली निवड केली आहे असं मी समजते. माता पित्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करणं ही देवाने मुलांना दिलेली सुवर्णसंधी असते.त्यांची मनोभावे केलेली सेवाच देवाच्या चरणी रुजू होते. देव अशा मुलांना कधीही काहीही कमी पडू देत नाही.त्यांचा आशीर्वाद मुलांना जन्मभर पुरून उरतो.मुलांनी आपल्या आई वडिलांचा प्रेमाने आणि निःस्वार्थीपणे सांभाळ करून त्यांना आनंदात ठेवावं आणि जन्माच सार्थक करून घ्यावं. ज्योती सुनील पाटील मुंबई

मोबाईल नं.9820963832

pjyotiveera@gmail.com ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

457 views1 comment

Recent Posts

See All

1 comentário


Megha Parekh
Megha Parekh
27 de mar. de 2021

Khup chaan ahe he lekhan.

Curtir
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page