गेल्या मार्चपासून जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची दहशत ह्या घडीलाही थांबलेली नाही आहे. आताही दुसरी लाट सुरू होऊन कोरोना रूग्ण वाढीचे प्रमाण वाढत असून सरकारच्या चिंतेत आणखीनच भर पाडत आहे. वाईटात चांगली एक बाब म्हणता येईल ती म्हणजे "कोरोना प्रतिबंधक लस" शोधून काढून बर्याच देशांनी आपल्या जनतेला लस देण्यास सुरूवातही केली आहे व त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात आपल्याला दिसून येतील अशी आशा करूया.
भारतात "कोव्हिशिल्ड" व "कोविन" ह्या दोन लसीद्वारा 60 वर्षाच्या वर किंवा 45 वर्षाच्या वर ज्या व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा आजार आहे, अशांना डाॅक्टरांच्या सल्ल्याने लस देण्याचे काम सुरू झाले आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. जनतेच्या मनातील भिती थोडी कमी होऊन
निश्चिंतता आली आहे.
आमच्याकडे नाशिकला शताब्दी हाॅस्पिटलमध्ये सिरम इन्स्टिटय़ूटची "कोव्हिशिल्ड" हि लस दिली जात आहे. आमच्या "रोटरी नाशिक वेस्ट"चे माजी अध्यक्ष व पुढील वर्षांत होऊ घातलेले रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल रोटरीयन रमेश मेहेर ह्यांनी पुढाकार घेऊन रोटरी सदस्य आणि त्यांच्या परिवारासाठी लसीकरणाचा फार मोठा उपक्रम हाती घेऊन, जनतेच्या सेवेचे काम करत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली बर्याच रोटरी क्लबच्या सदस्यांनी तसेच त्यांच्या परिवारांनी शताब्दी हाॅस्पिटलमध्ये जाऊन लसीकरणाचा पहिला डोस घेतला.
सुरवातीला मी व माझ्या यजमनांच्या मनात बर्याच शंका- कुशंका होत्या, त्यामुळे काही दिवस आम्ही Wait & Watch ह्या अवस्थेमध्ये होतो. ज्या लोकांचे लसीकरण झाले होते अशा ओळखीच्या व्यक्तींकडून after effects काय होतात हे जाणून घेतले. परंतु बहुतेक सगळ्यांकडून सकारात्मकच प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. फार फार तर लस घेतल्यानंतर दोन-तीन दिवस त्याचा effect जाणवतो. काहींना ताप येतो तर काहींना गरगरते तर काहींचा दंड सुजून येऊन अशक्तपणा जाणवतो अशा किरकोळ गोष्टी सोडल्या तर दोन-तीन दिवस पूर्ण विश्रांती घेतल्यानंतर ती व्यक्ती आपल्या रूटीन कामाला सुरवात करू शकते हे समजले, तेव्हा आम्हीही दोघांनी लसीकरण करावयाचा निर्णय पक्का केला.
सगळ्या formalities पूर्ण केल्यानंतर 16 March ह्या तारखेला आमचा नंबर शताब्दी हाॅस्पिटलमध्ये लागला. आम्हाला सकाळी 9.30 ची वेळ देण्यात आली. त्यादिवशी भरपेट नाश्ता करून सोबत पाण्याची बाटली घेऊन आम्ही बरोबर 9.15 ला हाॅस्पिटलमध्ये दाखल झालो. हाॅस्पिटलमध्ये शिरताच तेथील स्वच्छता, भरपूर उजेड व सगळ्यांत मुख्य म्हणजे करोनाच्या काळात पाळावयाचे सगळे नियम तिथे अगदी व्यवस्थितरित्या पाळले जात होते हे पाहूनच खूप बरे वाटले. स्वागतकक्षामध्ये जाऊन आमची नावनोंदणी झाल्यावर आम्हाला बसायला सांगितले, तोपर्यंत आमचे रो. रमेश मेहेर सर मदतीसाठी आलेच होते. आणखीही काही रोटरी परिवारातील सदस्य तेथे लसीकरणासाठी आले होते. मधल्याकाळात मेहेर सरांची खूपच मोलाची मदत झाली. त्यांनी "आरोग्य सेतू अॅप" द्वारा Online registration करायला सांगितल्यामुळे फार सुलभ झाले.
लसीकरणाला सुरवात करण्यास बराच उशीर झाला. तोपर्यंत आमच्यासारखे 9.30 वाजेपासून आलेले रूग्ण प्रतिक्षाकक्षात बसून वाट पहात होते. शेवटी पावणेअकराला लसीकरणाला सुरवात झाली. आमचा नंबर चौथा व पाचवा असल्यामुळे दहा मिनिटांतच सर्व सोपस्कार पार पडले. फक्त लस दिल्यानंतर काही reaction वगैरे येते कां किंवा पेशंटला इतर काही त्रास होतो कां, यासाठी observation खाली अर्धा तास सगळ्यांना लस दिल्यानंतर बसवून ठेवत होते. त्यानुसार अर्धा तास थांबून झाल्यानंतर काहीच त्रास न जाणवल्यामुळे जवळ जवळ पावणेबारा वाजता बाहेरच दुपारचे जेवण करून आम्ही घरी आलो. एकंदरीत रोटरीयन रमेश मेहेर ह्यांच्या मदतीमुळे व शताब्दी हाॅस्पिटलच्या स्टाफच्या सहकार्यामुळे आमचा कोव्हिशिल्डचा पहिला डोस सुरळीत पार पडला.
लसीकरणानंतर प्रत्येक व्यक्तीचे अनुभव हे वेगवेगळे असू शकतात. काहींना काहीच त्रास होत नाही. काही व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात होतो व दोन-तीन दिवसात normal होतात. माझा स्वतःचा अनुभव वेगळा आहे आणि तो मुद्दाम शेअर करावासा वाटतो, कारण दुसर्याच्या अनुभवातून सुध्दा व्यक्ती बरेच काही सकारात्मक घेऊ शकते. आपल्याला कितीही त्रास सहन करायला लागला भले त्याचा काळ इतरांपेक्षा जास्त असला तरी सगळ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे हे अत्यंत आवश्यक आहे.
लस घेऊन आल्यानंतर त्यादिवशी आम्ही दुपारी आराम केला. रात्री जेवेपर्यंत आम्हा दोघांनाही कसलाच त्रास जाणवला नाही. रात्री जेवल्यानंतर paracetamol ही गोळी नर्सने लिहून दिली होती ती घेतली. नंतर दिड तासाने जवळ-जवळ साडेनऊला नेहमी प्रमाणे आम्ही झोपायला गेलो. उन्हाळा कडक होता त्यामुळे डोक्यावर नेहमीसारखा पंखा चालू होता. हळूहळू मला थंडी वाजू लागली म्हणून पंखा कमी केला. तरीही थंडी जाईना म्हणून मी पंखा बंद केला व स्वेटर घातला. तसेच चादर व ब्लॅकेट घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला परंतु कडकडून थंडी वाजून मला जवळ जवळ दोनच्या वर ताप चढला होता. त्यातच डोकं दुखायला लागले. उलटीमुळे भरपूरच अशक्तपणा जाणवू लागला. घसा सतत कोरडा पडू लागला, त्यामुळे सारखे पाणी प्यावे लागत होते. जेवणावरची इच्छाच नाहीशी झाली. दुसर्या दिवशी दंडही प्रचंड लाल होऊन सुजून आला. अशी एकंदरीत सगळ्या लक्षणांची मी प्रत्यक्ष अनुभूती तीन-चार दिवस घेतली. उद्या मंगळवारी लस घेऊन आठ दिवस मला होतील पण अजूनही बराच थकवा जाणवत असल्यामुळेच, सजगपणाने मी माझ्या अॅक्टिव्हीटी कमी करून शक्यतो आराम करण्याचा प्रयत्न करत आहे. एक-दोन दिवसांत पूर्ण नाॅर्मल होऊन जाईन अशी खात्रीच नाहीतर विश्वास आहे. ह्याउलट माझ्या यजमानांना किरकोळ अशक्तपणा जाणवण्यापलीकडे इतर कसलाच त्रास जाणवला नाही.
प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगळी असल्यामुळे, कुठल्या औषधाला कोणाचे शरीर कसे रिअॅक्ट करेल हे काहीच सांगता येत नाही. परंतु ह्या क्षणाला मात्र कुठलाही विचार न करता, टंगळ-मंगळ न करता, ज्यावेळी लसीकरण दिले जाईल तेव्हा त्वरीत जाऊन ते घेणे हे भविष्यात आपल्याच नाही तर आपल्या परिवारांसाठी, समाजासाठी आणि देशासाठीही हिताचे आहे हे ध्यानात ठेवावे.
"मी सुरक्षित तर माझा परिवार सुरक्षित". कोणत्याही कडू औषधाचा परिणाम हा दूरगामी पाहीला तर तो आरोग्यासाठी हितकारकच असतो. जरी लस घेतल्यानंतर तात्पुरते त्याचे परिणाम शरीराला त्रासदायक वाटत असले तरी आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याची मदतच होते. तेव्हा माझी सगळ्यांनाच आवाहन आहे की प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे व त्यानंतरही आरोग्ययंत्रणेने सांगितलेल्या नियमांचे खास करून पालन करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी कोणी सांगण्याची वाट बघू नये. विशेषतः सुरक्षित अंतर, साबणाने वारंवार हात धुणे व मास्क वापरणे ही काळाची गरज आहे. आपला अनमोल जीव, त्याचबरोबर आपल्या परिवारांतील सदस्यांचा जीव वाचविण्याची जबाबदारी आपले कर्तव्य समजून शंभर टक्के इमानेइतबारे पार पाडू या आणि कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी सरकारला हातभार लावूया.
पुष्पा सामंत.
नाशिक 22-3-2021.
Email.: Samant1951@hotmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
コメント