top of page

अंधारातून प्रकाशाकडे(आज ती परत आली होती जिथे तीचं लहानपण गेलं होतं. ती येणार म्हणून आश्रमात जणू दिवाळीचं वातावरण होतं आज !!. हेडबाई म्हणजेच तिची वीणाई अतिशय उत्साहात होती. तिचं येण्याचं कारणही तसंच होतं!! अतिशय अभिमानास्पद गोष्ट होती ती!

ती राज्य सेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात तिसरी आली होती!! लवकरच ती तहसीलदार पद भूषवणार होती.

तिचीच कहाणी वीणाई कौतुक भरल्या साश्रु नयनांनी आश्रमतल्या मुलींना आदल्या दिवशी सांगत होत्या ) :

मुलगी जन्माला आली म्हणून रंजु आणि पांडु थोडे नाराजच झाले होते. जशी जशी मोठी होत होती , दोन महिने ,तीन महिने, तेव्हा रंजुला जाणवलं काहीतरी गडबड आहे. हि मुलगी रंगी बेरंबी खेळणी बघून , आईला बाबाला बघून काहीच प्रतिक्रिया देत नाही.स्पर्श ओळखते आवाजला प्रतिक्रिया देते पण तीला रंग आकार कळत नाहीत वाटतं? अडाणी असून तीला हि गोष्ट लक्षात आली.


रंजुला शंकाच आली की हीला बहुतेक दिसत नाही!! जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात तीला ती घेऊन गेली. डाॅ. नी सगळ्या तपासण्या केल्या तेव्हा कळलं की मुलगी जन्मतःच दृष्टीहिन आहे. तिला दृष्टी येणंही अवघड आहे. आईला ती बातमी ऐकून अजूनच धक्का बसला. एकतर मुलगी झाली त्यात ही अशी . जन्मभर ओझं होऊन रहाणार . जड अंतःकरणाने रंजु तीला घेऊन घरी परतली. पोरीच्या वडिलांना पांडुला ती गोष्ट सांगितली. पांडुही खुप हताश झाला. असेच दुःख बरोबर घेऊन दिवस घालवू लागले. मुलीचे पुढचे आयुष्य काय होणार या विचाराने जीव तुटत होता दोघांचा. अशातच रंजुला परत दिवस राहिले. दिवस भरले.मुलगा जन्माला आला. तसाच गोड बाळसेदार डाॅ. कडून तपासण्या झाल्या. अगदी निरोगी कुठलाही दोष नसलेला. दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होत होतं. हिच्याकडे दुर्लक्षच व्हायला लागलं. जणू काही ही नकोशीच झाली होती.

आणि एक दिवस पांडु तीला बरोबर घेऊन बाहेर पडला. दोन वर्षाचं लेकरू वडिलांच्या कडेवर आनंदात होतं आज आपल्याला प्रेमाने जवळ घेतलंय. तीला जाणवत होतं!! कुठेतरी बाहेर चाललोय. आजुबाजुचे आवाज , वाऱ्याची झुळुक सगळं अनुभवत होती ती रस्त्याने. बराच वेळ लांब लांब चाललोय हे देखिल तीला कळत होतं. गावापासून बऱ्याच लांब अंतरावर आल्यावर पांडूला एक मंदिर रस्त्यात दिसलं, दोघं मंदिरात आले. पांडुनी तीला कडेवरून खाली उतरवलं. मंदिराच्या आवारात तीलासोडून भरभर पावलं टाकत त्याने तिथून धूम ठोकली. हि एकटीच मंदिराच्या आवारात मध्यभागी उभी होती कितीतरी वेळ. बराच वेळ झाला. आबा चा आवाज नाही काही हलचाल ही जाणवेना. जीव तहानेने भुकेने व्याकुळ झाला. मग मात्र हिने भोकाड पसरले.. आवाज ऐकून रस्त्यावरून जाणारे लोक मंदिरात डोकावू लागले. मुलीला एकटी बघून आजुबाजुला चौकशी करू लागले. कोणाची मुलगी?? कोणाबरोबर आली? पण कोणालाच ओळख पटेना. शेवटी गावातल्या काही लोकांनी तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. गावातल्या कोणाची मुलगी नाही, हरवल्याची तक्रार नाही शेवटी पोलिसांनी तीला आश्रमात पाठवायचा निर्णय घेतला. मुलीचं रडं काही थांबत नव्हतं आबा आबा एकसारखा जप चालला होता. आश्रमातल्या आयांनी तीला शांत केले. खाऊ पिऊ घातले. मायेचा स्पर्श, प्रेमळ आवाज या सगळ्याने हळुहळु शांत झाली.


थोड्यात कालावधित तीच्या अंधत्वाबद्दल आश्रमातील बाईंना कळलं आणि त्या समजून गेल्या हिला कोणीतरी मुद्दाम सोडून गेलंय. कोणीही हिचा शोध घेत येणार नाही. तरी त्यांनी काही दिवसात मुलीच्या आई वडिलाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश मिळालं !! पण मुलीला परत आई वडीलांच्या स्वाधिन करायला त्या धजल्या नाहीत. पुन्हा दुसरीकडे कुठे सोडून आले किंवा ही नकोशीच आहे तर काही बरे वाईट केले तर.. नकोच असा विचार करून हिला आयुष्यात सक्षम बनवायचे हा निश्चय केला. आश्रमात इतर मुलींबरोबर वाढू लागली. शाळेत जायला लागली. तीची हुशारी तिथेच पारखली होती. कालांतराने आश्रमातल्या हेड बेईंनी तीला शहरातल्या अंध मुलींच्या संस्थेत दाखल केले. तीच्यासारख्याच बऱ्याच मुली तीथे शिकत होत्या. ब्रेल लिपी पटकन आत्मसात केली तीने.


अतिशय तल्लख बुद्धिमत्ता! आवाजातील गोडवा!! या तीच्या गुणांमुळे ती अभ्यासात आणि गायनात अव्वल येत होती. लेखनीकांच्या मदतीने दहावी बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. पुढे तसेच ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षणात खुप अडचणी येत होत्या तीच्या. तीच्याच नाही तर तीच्यासारख्या कितीतरी अनेक विद्यार्थ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागत होते. काॅलेजच्या अभ्यासक्रमाची पुस्तके ब्रेल मधे उपलब्ध करणे अवघड होते. मग शिक्षक शिकवताना एकाग्र चित्ताने जेवढे ऐकून घेता येईल जे कानावर पडेल ते आत्मसात करायचे.


कोणी सामान्य विद्यार्थ्यांनी स्वतःहून मदत केलीच ,पुस्तके वाचून दाखवली तर आणखी सोपे होई! बऱ्याचदा तशी मदत मिळायची देखिल नाही. परिक्षेच्या वेळी पेपर लिहायला लेखनिकही उपलब्ध नसायचे. आधी येतो म्हणून ठरवलेले ऐनवेळेस यायचे नाहीत, उशिरा यायचे अशा एक ना अनेक समस्या. सगळ्या अडचणींवर मात करून खरं तर हिने शिक्षण पुर्ण केले. आता ती स्वप्न बघू लागली सरकारी अधिकारी होण्याचे. ती राज्य सेवा आयोगाच्या एम पी एस सी परिक्षेची तयारी करू लागली. ओळखीच्या ,काॅलेजच्या व इतर मैत्रीणींची मदत घेऊन, त्यांच्याकडून पुस्तके , नोटस् रेकाॅर्ड करू घेऊ लागली. पण अभ्यासक्रम तर खुप मोठा!! पुस्तकं तर ठोकळेच एकेक!! एवढं कोण रेकाॅर्ड करून देणार ? मग सोशल मिडियावर तीने आवाहन केले. एक दोन जणं आले तीच्या मदतीला धाऊन.


बरीचशी पुस्तके नोटस् तीला त्यांच्या आवाजात रेकाॅर्ड करून दिली. तीने त्या ऑडिओज वरून अभ्यास पुर्ण केला. परिक्षा दिली. तीच्या वसतिगृहातील बाईंचे तिथल्या मैत्रीणींचे देखिल खुप सहकार्य होतेच. परिक्षेचा निकाल लागला. दिवस रात्र झटणारे अभ्यासात गढून गेलेल्या सामान्य विद्यार्थ्यांनाही जे यश मिळत नाही ते तीच्या नशिबात होते. तीच्या खडतर प्रवासाचे तीच्या कठोर परिश्रमाचे आज चीज झाले. ती एम पी एस सी परिक्षेत राज्यात तीसरी आली.तीचे स्वप्न पुर्ण झाले. खुप आनंदून गेली. सर्वप्रथम तिने फोन करून तिच्या विणाई ला ही बातमी कळवली. विणाई तुझ्यामुळं हे शक्य झालं गं!! तू शहरात पाठवलंस चांगलं शिक्षण घेता आलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचले .


तीला सहकार्य केलेल्या प्रत्येकाची ती आयुष्यभर ऋणीच आहे असे ती म्हणते. आता ती मोठी सरकारी अधिकारी होणार आहे. कोणत्याही आई वडिलांना अभिमान वाटावा अशी ती लेक आहे. तिकडे पांडु आणि रंजुला याची कल्पना देखिल नसेल. लेकीचे पुढे काय झाले त्यांनी माहिती तरी मिळवली असेल का? कोणाकडे चौकशी तरी केली असेल का? हे प्रश्न मात्र तसेच निरूत्तर आहेत.

©अपर्णा..... अपर्णा पाटोळे पुणे Email.: ppneeta@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा

246 views2 comments

Recent Posts

See All

2 Comments


Jyoti Patil
Jyoti Patil
Apr 14, 2021

अंधारातून प्रकाशाकडे खूप छान कथा आहे.हृदय हेलावून टाकणारी

Like

Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Apr 07, 2021

चांगली कथा आहे .

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page