व्यासपीठावर भाषणासाठी तुम्ही उभी राहीले आहात .वक्तृत्व कला तुम्हाला सादर करावयाची आहे, श्रोते तुमच्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत. प्रचंड मानसिक दडपण आलेले आहे. हात थरथर कापत आहेत, तोंडातून शब्द बाहेर पडत नाही अशी अवस्था बर्याच जणांची कधी ना कधी होत असते. प्राध्यापक संजय थोरात यांनी लिहलेले 'वक्तृत्व' हे पुस्तक प्रभावी भाषणासाठी उपयुक्त असे आहे.
'स्नेहांकित प्रकाशन' इस्लामपूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. २५ व्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीच्या प्रकाशनाने पुस्तकाची लोकप्रियता दिसून येते. सदर पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत प्रत्येक प्रकरणागणिक वक्तृत्वाचा पाया अधिक भक्कम होण्यास निश्चितच मदत होते. 'प्रभावी भाषण' या प्रकरणा अंतर्गत लेखकांनी अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्याचप्रमाणे चांगल्या नेतृत्वासाठी वाचन हा महत्त्वाचा घटक आहे.भाषण प्रभावी करण्यासाठी सुविचार, सुभाषिते' म्हणी 'छोट्या गोष्टी 'कथा यांचे वाचन करावे. सुत्रसंचलकाकडे आवश्यक असणाऱ्या गुणांबाबत वर्णन करताना 'व्यासपीठ संस्कृती' या प्रकरणात सूत्रसंचालक हा वक्त्याप्रमाणे बहुश्रुत, हजरजबाबी व प्रसंगावधानी असला पाहिजे हे लेखक ठळकपणे मांडतात. सावकाश भाषण हे वक्तृत्वाच्या उत्कृष्ट पणाची खुबी मानली आहे. त्याचप्रमाणे बोलत असताना विराम म्हणजे थांबण्याचा प्रभावी वापर देखील करता येतो.
व्यासपीठावर वावरताना वक्त्याने सहजपणे वावरले पाहिजे व्यासपीठावरील वस्तूंशी अनावश्यक चाळा टाळावा. ध्वनिवर्धकापासून साधारणपणे एक फूट अंतरावर उभे राहून बोलावे,अशा लहान -लहान पण उपयुक्त टीप लेखकांनी मांडलेल्या आहेत.वक्तृत्वाच्या सादरीकरणासाठी आवश्यक गुणांचा परिश्रमपूर्वक विकास करता येणे शक्य आहे हे 'वक्तृत्व सादरीकरण' या प्रकरणात प्राध्यापक थोरात यांनी सोप्या भाषेत मांडले आहे. सभाधीटपणा हा भाषणासाठी महत्त्वाचा गुण आहे. तसेच वक्त्याचा आवाज ही सार्वजनिक सभेतील महत्त्वाची बाब आहे. आवाज काही प्रमाणात नैसर्गिक बाब असली तरी प्रयत्नाने सुधारणा घडवून आणता येते. दीर्घश्वसन, योगासने यामुळे आवाज निरोगी बनविता येतो. आवाजा सोबतच देहबोली देखील महत्त्वाची आहे. तणावरहित अवस्थेत देहबोली सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वक्त्याचा ड्रेसकोड देखील महत्त्वाचा आहे. आपण उष्णकटिबंधात राहतो त्यामुळे आपले कपडे उन्हाचा त्रास होणार नाही असे साधे व स्वच्छ असावेत अश्या सहज व साध्या भाषाशैलीत लेखकांनी वक्तृत्वाचे तंत्र मांडले आहे. 'वक्तृत्व' हे पुस्तक सूत्रसंचालक,प्रास्ताविक करणारे, समारंभाचे अध्यक्ष , सार्वजनिक सभेत बोलणारे, भाषण देणारे, व्याख्यानकर्ते, आभार मानणारे अशा सर्व प्रकारच्या वक्त्यांना मार्गदर्शक ठरणारे लोकप्रिय पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे.
नाव-सौ.सारिका मनिष वर्तक.
पालघर
मोबाईल न /व्हाट्सअप्प क्रमांक-9823082740
विषय:-मला आवडलेले पुस्तक
वक्तृत्व-संजय थोरात
Email.: vartaksarika1984@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments