एक आटपाट नगर होते. या नगरातील प्रजा गुण्या गोविंदाने नांदत होती. प्रजेमध्ये प्रामुख्याने अनेक कष्टकऱ्यांचा समावेश होता. काही कष्टकरी विड्या वळून स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचे तर काही या नगरातल्या सुती कापडाच्या गिरण्यांमध्ये काम करून. या गिरण्यांमधून तयार होणाऱ्या मालाला देशातच नव्हे तर परदेशातही मागणी होती. या नगरातल्या आणि नगराच्या आजूबाजूच्या नगरातील देवस्थाने प्रसिद्ध होती. त्यामुळे या नगरीत नेहमीच पर्यटकांची गर्दी असायची.या नगराची आणखी एक ख्याती होती ती म्हणजे या नगरातले वैद्य . या नगरातील वैद्य विद्वान तर होतेच परंतु अनुभवी असूनही अतिशय कमी दरात ते आपल्या सेवा रुग्णांना देत असत. याच कारणामुळे शेजारपाजारच्या नगरातील आणि अगदी शेजारच्या राज्यातील रुग्णही आटपाट नगरातील या वैद्यकीय सेवेचा लाभ घेत असत. बरे होऊन परत जात असताना ते वैद्यांना आशीर्वाद तर द्यायचेच परंतु वैद्यांच्या आणि नगरीच्या आर्थिक वाढीत भरही टाकीत असायचे. नगरातल्या या वैद्यांची रुग्णालयेही सुसज्ज होती. विविध आजारांवर उपचार करून रुग्णांना बरे करण्यात त्यांचा हातखंडा होता. सगळे तसे बरे चालले होते. या नगराचा राजा आणि प्रधान हेही खूश होते. गेल्या काही वर्षांत या राजा आणि प्रधानांनी मात्र कधीही वैद्यांच्या अडचणी किंवा त्यांना त्यांच्या रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवस्थापनाबद्दलच्या अडचणी याबद्दल साधी चौकशी सुद्धा केलेली नव्हती , मदत करणे तर फारच दूर. उलट रुग्णालयांनी मात्र सर्व नियम व अटी पाळाव्यात अशी अपेक्षा ते करीत असायचे. त्याचबरोबर या रुग्णालयांकडून मिळणारा कर व इतर उत्पन्नाकडे मात्र जातीने त्यांचे लक्ष असायचे. एकंदरीत सगळे तसे बरे चालले होते.
पण या सुखाला कुठेतरी गालबोट लागले. या नगरीच्या राज्यात आणि देशात एका साथीच्या आजाराने डोके वर काढले. देशभरात सुरू झालेला हा साथीचा रोग या नगरातही झपाट्याने पसरायला लागला. या साथीच्या आजाराने अनेक व्यक्ती आजारी पडू लागल्या. सुरुवातीस या साथीच्या आजारांकडे राजा आणि प्रधानांनी फारसे लक्ष दिले नाही. या नगरीतील वैद्य मात्र आपापल्या परीने, आपापल्या कुवतीने या आजाराशी सामना करीत होते परंतु ही साथ काही आटोक्यात येण्याची लक्षणे दिसेनात. जस जशी रुग्णांची संख्या वाढायला लागली तसे राजा आणि प्रधान ही जागे झाले. त्यांनी आपल्या सैन्याला कामाला लावले. नगरातील सैन्याने काम सुरू करूनही रुग्णांची संख्या वाढत चालली. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढायला लागले. आपले सैन्य पराभूत होत असताना पाहून मात्र राजा आणि प्रधान बिथरले.खासगी रुग्णालयांसाठी त्यांनी विविध नवे नियम बनविले. वारंवार ते बदलले आणि त्यामुळे आणखीच गोंधळाची परिस्थिती उत्पन्न झाली . पुढे जाऊन तर त्यांनी या वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येला आणि होणाऱ्या मृत्यूंना चक्क नगरातल्या वैद्यांना जबाबदार धरले. वेळी अवेळी त्यांनी वैद्यांच्या रुग्णालयांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली जणू काही वैद्य म्हणजे कर चोरी करून प्रचंड नफा कमवणारे व्यापारीच असावेत. नगरातल्या सगळ्या वैद्यांना त्यांनी पूर्वीपेक्षाही अधिक क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी छोटयाशा चुकीसाठी सुद्धा या वैद्यांवर कायदेशीर कारवाईही करायला सुरुवात केली.
आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी काहीशी परिस्थिती उत्पन्न झाली. वैद्यही हतबल होते. अनेक रुग्णालयातल्या काम करणाऱ्या कामगारांनी आजाराच्या भीतीपोटी केव्हाच पळ काढलेला होता. त्यामुळे रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा आणि स्वच्छतेचेही बारा वाजले होते. खरे तर हे सगळे कामगार म्हणजे त्या नगरातली सर्वसामान्य माणसेच होती परंतु राजा आणि प्रधानाने त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली नाही. वैद्यांना जणु त्यांनी धारेवरच धरले होते. नगरातल्या रुग्णांवर उपचार करता करता काही वैद्य आजारी पडले. या साथीच्या आजाराने बाधित झालेल्या वैद्यांना स्वतःलाही उपचाराची गरज भासायला लागली. काही वैद्य तर गंभीररित्या आजारी पडले आणि काहींना शेजारच्या नगरात जाऊन उपचार घ्यावे लागले. शेजारच्या अनेक नगरांमध्ये तर अनेक वैद्यांचे मृत्यूही झाले . काही वैद्यांचे वय झाले होते तर काही वैद्य स्वतःच पूर्वीच्या काही आजाराने पीडित होते. खरे तर अशा वेळी त्यांना या सेवेतून मुक्त करायला हवे होते पण या बाबींकडे राजा आणि प्रधानाला लक्ष द्यायला वेळ होता कुठे? माणुसकी बाजूला ठेवून त्यांनी फक्त वैद्यांना कायदेशीर बडगा दाखविला होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसिद्धी माध्यमानी सुद्धा दुर्दैवाने या नगरातल्या वैद्यांच्या विरोधातच उभे राहणे पसंत केले. अनेक खमंग आणि उलट सुलट बातम्या प्रसारित करण्यात धन्यता मानली. वैद्य करीत असलेल्या चांगल्या कामाचे मातेरे झाले आणि राजा व प्रधान करीत असलेल्या कारवाईला अमाप प्रसिद्धी मिळाली. या गोष्टींचा परिपाक म्हणून रुग्ण, नातेवाईक आणि सर्वसामान्य नागरिकही गैरसमजापोटी या वैद्यांच्या विरोधात उभे राहिले. सर्वसामान्य जनतेलाही राजा, प्रधान आणि प्रसिद्धी माध्यमे म्हणतात तेच खरे असावे असे वाटायला लागले. वैद्य बिचारे एकाकी पडले. वैद्यकीय उपचारांचा मोबदला रुग्णालयाला किती मिळायला हवा यावरही राजा आणि प्रधानाने नियंत्रण ठेवले. रुग्णालयाचा नक्की किती खर्च रुग्णांवर होतो, त्यांच्या अडचणी काय? याकडे लक्ष न देता रुग्णालयाच्या कमाईवर मर्यादा आणण्यासाठी काही अधिकारीही नेमण्यात आले. हे अधिकारी म्हणतील ती पूर्व दिशा असा कारभार चालू झाला. वैद्यांच्या संघटनेनेही याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला परंतु राजा आणि प्रधानाने त्यांना भीक घातली नाही. यात आणखी भर म्हणून राजा आणि प्रधानांनी वैद्यकीय उपचारांमध्ये लुडबुड करायला सुरुवात केली. अगदी रुग्णाला प्राणवायू किती द्यायला हवा, औषधे कोणती द्यायला हवित हेही अधिकारी ठरवायला लागले. एकुणच सगळी परिस्थिती हाताबाहेर जायला लागली .
सरते शेवटी वैद्यांचा नाईलाज झाला. त्यांनी शस्त्रे खाली ठेवली. काम बंद केले . राजा आणि प्रधानांच्या कार्यालयासमोर धरणे धरले . वैद्यांची एकी, त्यांनी व्यक्त केलेला संताप आणि रुग्णांचे होणारे हाल अशा अडचणीत राजा आणि प्रधान सापडले. सगळ्या वैद्यांचे एकच म्हणणे होते, आमचीही बाजू समजावून घ्या . दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चालली होती. आता राजा आणि प्रधानाची पाचावर धारण बसली. त्यांनी थोडीशी नमती भूमिका घेतली. नगरातील काही ज्येष्ठ वैद्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी परिस्थितीची चर्चा केली. काय करता येईल यावर उहापोह केला. वैद्यांच्या अडचणी समजावून घेतल्या, त्यांना काय हवे नको ते विचारले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मग उपचारांचे नियोजन सुरू झाले . हव्या असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हायला लागला. इतकेच नव्हे तर शहरातील सर्वसामान्य नागरिकही या रुग्णालयांमध्ये वैद्यांच्या मदतीकरता स्वयंसेवक म्हणून काम करायला लागले. कुंपणावर बसून गप्पा मारणाऱ्या लोकांना कामाला लावले गेले. प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या उलटसुलट बातम्यांना चाप लावला गेला. वैद्य आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱयांकडे संशयित नजरेने न बघता आदराने पाहिले जाऊ लागले. खरे तर हे फार पूर्वीच व्हायला हवे होते. पण झाले गेले विसरून वैद्य व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचारी पुन्हा एकदा हिरिरीने कामाला लागले. त्यांच्या मदतीला अनेक स्वयंसेवक आल्याने उपचारा व्यतिरिक्त इतर रुग्णसेवांचा भार त्यांनी उचलला. रुग्णांचे होणारे हाल बंद झाले. आता रुग्णालयातील कामे फटाफट होऊ लागली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढायला लागले आणि मृत्यूदर पटकन कमी झाला. हळूहळू काही दिवसांतच या साथीवर नियंत्रण मिळवण्यात सगळ्यांना यश आले. पुन्हा एकदा सारी प्रजा, राजा, प्रधान आणि नगरातील वैद्य व कर्मचारी सुखाने नांदु लागले. अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण .
टीप - सदर मजकुराचा एखाद्या नगराशी वा सत्य परिस्थितीशी संबंध वाटला तर तो निव्वळ योगायोग समजावा.
डॉ.सचिन जम्मा
लॅपरोस्कोपिक व जनरल सर्जन
जम्मा हॉस्पिटल व लॅपरोस्कोपिक सर्जरी सेंटर कुंभार वेस, भवानी पेठ,
सोलापूर - ४१३००२
फोन: ०२१७ २७३२४७५
भ्रमणध्वनी : ९८५०८४७१७५ E MAIL ID : drsachinjamma@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
コメント