
खटकणारी आडनावं आपला सामाजिक कलंक आहे असं मी मानतो. आणि तो आपण पुसला पाहिजे.
नागपुरे, नागपुरकर अशी निवासदर्शक आडनाव, जोशी, कुळकर्णी, पाटील, देशपांडे, देशमुख , नाअीक अशी पददर्शक आडनावं रूढ झाली हे आपण समजू शकतो. पण प्राण्यांची, भाज्याची, घरगुती पदार्थांची, वाअीट सवयींची, अश्लील, अशी आडनावं कशी आणि कधीपासून रूढ झाली हा खरोखर संशोधनाचा विषय आहे आणि तो विद्यापीठांनी जागरुकतेनं घ्यावा असं मला वाटतं.
आडनावांच्या नवलकथा :: खटकणारी आडनावं :: संशोधनास भरपूर संधी.
कुटुंबाला आणि पर्यायानं व्यक्तीला, आडनाव ... म्हणजे कुलनाम, फॅमिली नेम, सरनेम, लास्ट नेम .. असतंच असतं. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचं साधर्म्य दाखविण्यासाठी, कुटुंबाच्या आडनावाची प्रथा मुळात सुरू झाली असावी. नंतर त्या प्रथेनं विचित्र सामाजिक वळण घेतलं असावं.
विक्षिप्त, लाजिरवाणी, भयानक, निंदाजनक, किळसवाणी, हास्यास्पद, अश्लील ... अशी आडनावं रूढ झालीत हे वास्तव आहे, तितकंच गूढही आहे. कारण कुटुंबाचं आडनाव रूढ होण्यासाठी, ते आडनाव, प्रथम त्या कुटुंबानं स्वीकारलं पाहिजे. असली खटकणारी आडनावं, कुणीही सहजासहजी आपसुक स्वीकारणार नाही. त्यामुळंच म्हणावसं वाटतं की ही आडनावं, समाजानं, त्या त्या कुटुंबावर लादली असावीत आणि नाअिलाजानं ती स्वीकारली गेली असावीत. अशी आडनावं धारण करून, लेकीसुना, मुलंमुली, विद्यार्थी वगैरे समाजात वावरतांना किती मनस्ताप सहन करीत असतील याची कल्पनाच करवत नाही. या बाबतीत संशोधनास भरपूर वाव आहे असं म्हणावसं वाटतं.
गाढवे, गधे, गधडे, डुकरे, गेंडे, झुरळे, ढेकणे. अुंदरे, कुत्रे, कुत्ते, डास, चिलटे, मुंगी, गांडोळे, विंचू, अिंगळे, किडे, रेडे, बोके, बोकड, बकरे, मेंढे, माकडे, नाकतोडे, कावळे, चिमणे, कबुतरे, कपोले, कोंबडे, खेकडे, गीध, घुबडे ...
पिसाट, बहिरट, आंधळे, आळशी, चिकटे, कानतुटे, चकणे, अेकशिंगे, अेकबोटे, अक्करबोटे, बोबडे, तोतरे, कोडगे, घोडमुखे ...
डोअीफोडे, कानपिळे, पोटफाडे, घरलुटे, घरबुडवे, घमंडे, चणेचोर, पगारचोर, चोरमुले, चोर, चोरे, चोरघडे, किरकिरे, कुरकुरे, रडके, रडे ...
शौचे, हगवणे, हगरे, हागे, पातळहागे, शेबडे, मेकडे, लाळे, अुकिडवे ... ढोरमारे, माणूसमारे, बापमारे, गोतमारे, रगतचाटे, प्राणजाळे, हडळ, भूत, भूते, राक्षस, ब्रम्हराक्षस, रावण, कुंभकर्ण ... आणखी कितीतरी ....
ही आडनावं धारण केलेली कुटुंबं आहेत. म्हणूनच ती आडनावं लिहीली आहेत. त्या आडनावांची टवाळी करण्याचा मुळीच अुद्देश नाही हे कृपया लक्षात घ्यावं.
गजानन वामनाचार्य
Email.: gee.waman@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
コメント