top of page

"प्रेम"


"प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे" आपल्या सगळ्यांचे मूळ हे प्रेमस्वरूपच आहे. प्रेम हे नैसर्गिक असावे लागते. जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा ते निस्वार्थ असते. वरवरच्या प्रेमाला, स्वार्थाचा कुबट वास असतो. आणि ते प्रेम शाश्वत टिकणारे नसते. परमेश्वरावर निस्वार्थ जडलेले प्रेम हे शाश्वत असते. तेथे काहीच मागणे न रहाता उलट आपण त्याच्यापायी आपले तन, मन, धन अर्पण करतो. त्यातून मिळणारे प्रेम हे निखळ आनंदस्वरूप असते. तो बंध एकदा घट्ट जोडला की, अतूट असतो.



संसार हा नश्वर आहे हे सगळे जाणतात. संसारात, परमेश्वर सोडून ज्या ज्या सजीव- निर्जीव सृष्टीच्या आपण प्रेमात पडतो ते सगळं मिथ्या आहे हे जाणून जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा ते मिळविण्याचे किंवा गमावण्याचे सुख-दुःख त्या व्यक्तीला नसते. अंतर्मनाने ती स्वतः व समोरच्याही व्यक्ती- वस्तूमध्ये चैतन्य आहे हे जाणून, प्रेमभावात शाश्वत असते. त्यासाठी प्रेमाचे नाटक करायला लागत नाही.



संसारात आपल्याला खरा चेहरा लपवून मुखवटा चढवून, समोर जशी व्यक्ती येईल तशी भूमिका करावी लागते. अशी भूमिका करतांना, संसार करण्यामध्ये जेवढी ज्यांची हातोटी असते, तेवढे ते संसारात मुखवटे चढवून शंभर टक्के यशस्वीही होतात. परंतु संसारातील व्यक्तीकडून मिळालेले प्रेम हे आपल्याला कायम अखंड आनंद देऊ शकत नाही. हे पाण्यावर ओढलेल्या रेषेएवढेच सत्य आहे. म्हणून प्रत्येक वेळेला आपण समोरच्या व्यक्तीची खरी पारख करूच शकत नाही. माझी मी पुढच्या क्षणात कशी वागेन ह्याची खात्री देता येत नाही. तर बाकी फारच दूर राहीले. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. मन जोपर्यंत आपल्या ताब्यात आणू शकत नाही तोपर्यंत मी माझ्या देह,मनाचा मालक होऊ शकत नाही. मन ताब्यात आणण्यासाठीच आपल्याला, अध्यात्मिक साधनेद्वारा हळूहळू बाबापुता करून त्याला काबूत ठेवावे लागते. एकदा का आपण मनावर आरूढ झालो की माझ्या विवेक-बुध्दीने, संसारात पाहीजे तसा त्याचा वापर करू शकते. म्हणजेच आपल्यासाठी चांगले- वाईट निवडण्याची क्षीर-नीर बुध्दीद्वारा, माझ्या स्वरूपात राहून साक्षीभावात संसारातील कर्म करते. प्रेमस्वरूप हा आपला स्वभाव असल्यामुळे मग प्रेमाचे नाटक करायला न लागता, तुम्ही जसे आहात तसे सहजस्वभावात लोकांसमोर येतात. त्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागत नाही.




प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की ते कोणावरही आणि केव्हाही घडून येऊ शकत. एखाद्याच्या गोर्‍या रंगाच्या प्रेमात कोणी पडत. कोणी लांबसडक केसांवर, कोणी निखळ हास्याच्या प्रेमात पडत तर कोणी एखाद्याच्या संपूर्ण व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडतं. काही जण मुक्या प्राण्यांच्या तर काही झाडांवर प्रेम करतात. प्रेम म्हणजे प्रियकराने प्रेयसीवर केलेले नुसते प्रेम नसून प्रेमाची भावना आपण आपल्या आई-वडिल, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिण,गुरू अशा सगळ्यांविषयी वेगवेगळ्याप्रकारे तसेच वेगवेगळ्या कारणाने व्यक्त करत असतो. पण हे करताना आपल्याला अंतर्मनातून पक्की जाणीव असली पाहीजे, मी प्रेम करणारा आणि ज्याच्याविषयी आपण प्रेमाची भावना व्यक्त करीत आहोत हे दोघेही मिथ्या आहे. हे कायम टिकणारे नाही. कुठलीही बाहेरची वस्तू, व्यक्ती शाश्वत काहीच देऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याला जर शाश्वत, न आटणार प्रेम मिळवायचे असेल तर त्यासाठी आपल्या आतमध्ये जो शाश्वत प्रेमाचा झरा अखंड वाहत आहे, ते प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही.




पुष्पा सामंत.

नाशिक 15-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.com


ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा

93 views1 comment
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page