top of page

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घडलेले आहेत.

जन्मत:च प्रत्येक व्यक्तीला सहा लेबलं मिळतात.

पहिलं लेबल म्हणजे व्यक्तीनाव. आअीवडील आणि वडीलधार्‍या नातेवाअीकांचीच ही निवड असते आणि हे लेबल तुम्ही जन्मभर कपाळावर लावून समाजाच्या बाजारात मिरवीत असता.

दुसरं लेबल असतं ते तुमच्या कुटुंबाच्या आडनावाचं. आडनावाच्या वारसाचं लेबल कसंही असलं तरी ते कुटुंबातील सर्वच व्यक्ती आपल्या पूर्ण नावात चिकटवीत असतात.

तिसरं लेबल असतं ते तुमच्या मातृभाषेचं. आअीवडील भिन्नभाषिक असतील तर मुलांना दोन लेबलं मिळतात. भारताच्या दृष्टीनं विचार केला तर, मातृभाषेमुळे तुमचा जन्मप्रांतही कळतो. मराठी … महाराष्ट्र

चवथं लेबल असतं धर्माचं. येथेही भिन्नधर्मीय दाम्पत्याच्या मुलांचा गोंधळच असतो.

पाचवं लेबल असतं तुमच्या नागरिकत्वाचं. ज्या देशात तुमचा कायदेशीररित्या जन्म झालेला असतो त्या देशाचं नागरिकत्व तुम्हाला जन्मजातच मिळतं.

सहावं आणि सर्वात महत्वाचं लेबल असतं तुमच्या वांशिकतेचं. काळा, गोरा, तपकिरी की पिवळा. पाचवं आणि सहावं ही दोन लेबलं, आंतरराष्ट्रीय बाजारात महत्वाची ठरतात.

प्रत्येक व्यक्तीचं आनुवंशिक तत्व म्हणजे जनुकीय नकाशा, म्हणजे डीअेनअे मॅप, वेगवेगळा असतो. हीच तुमची, न लपविता येणारी, खरी ओळख असते. हेच तुमचं खरं 'जात' असतं

पूर्वी व्यवसाय पिढीजात चालत असे. सुताराचा मुलगा सुतारकीच करीत असे. सुतारकी ही त्याची 'जात' असे. पण सुतार हीच त्याची जात ठरविली गेली. व्यवसायाच्याच जाती झाल्या आणि जात नाही ती जात हा वाक्प्रचार रूढ झाला.

वडिलांचा अेक शुक्राणू आणि आअीची बीजांड पेशी यांचा संयोग झाला म्हणजे मानवाचा गर्भपिंड तयार होतो. त्यात वडिलांकडून आलेली २३ गुणसूत्रं आणि आअीकडून आलेली २३ गुणसूत्रं असतात. या ४६ गुणसूत्रांचा संच म्हणजे, त्या व्यक्तीची नैसर्गिक जन्मपत्रिका असते. ही त्या व्यक्तीची खरी जन्मपत्रिका असते. हा संचच तुमचे सर्व गुणावगुण ठरवितो. हा संच म्हणजेच तुमचं 'जात' असतं.

तुमच्या आअीवडिलांकडे ही गुणसूत्रं त्यांच्या आअीवडिलांच्या अनेक पूर्वजांकडून आलेली असतात.

मूळ गर्भपेशीपासून दोन पेशी, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं पेशींची वाढ होते. सुमारे ३८ आठवड्यात हे द्विगुणन ४७ वेळा होतं आणि मानवाचा गर्भ, जन्म घेण्यास समर्थ होतो. त्याचे सर्व अवयव पूर्णतया निर्माण झालेले असतात. नवजात मानवी बालकात, १ या आकड्यावर १४ शून्यं मांडून होणाऱ्या संख्येअितक्या पेशी असतात. प्रत्येक गुणसूत्रावर हजारो जनुकं असतात. या जनुकावरच तुमचं व्यक्तीमत्व, बुध्दीमत्व, रूपमत्व आणि आरोग्य अवलंबून असतं. स्त्री किंवा पुरुष, पूर्ण वाढ झाल्यावर, त्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण कशी असेल याचा परिपूर्ण आराखडा या जनुकांमुळे तयार झालेला असतो. प्रत्येकाला हा सांकेतिक जनुकीय आराखडा, सर्व गुणदोषांसह स्वीकारावाच लागतो. त्यात कोणताही बदल होत नाही.

थोडक्यात म्हणजे तुमच्यात आलेलं आनुवंशिक तत्व, (गुणसूत्रं आणि जनुकांसह) तुम्हाला जन्मतःच मिळतं आणि ते तुमच्या मरणापर्यंत टिकतं. जन्मतःच तुम्हाला मिळतं तेच तुमचं 'जात'. सख्या भावंडांची 'जात' देखील अलग अलग असते. प्रत्येक व्यक्तीची 'जात' वेगवेगळी असते. आअी-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी, या सर्वांचं 'जात' थोडंबहुत सारखं असलं तरी वेगवेगळं असतं. म्हणूनच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक व्यक्तीमत्वात बराच फरक असू शकतो.

तुम्हाला मिळालेलं 'जात' तुमच्या वंशवेलीवरच अवलंबून असतं, तुमचा पूर्वजन्म आणि त्याची कर्मे यावर अवलंबून नसतं. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिद्धांतानुसार तुम्हाला पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म नसतो. पृथ्वीवरील तुमचा हा जन्म पहिलाच आणि शेवटचाही असतो कारण तुमच्या वडिलांचा तो जिंकलेला शुक्राणू आणि आअीचं ते फलित झालेलं बीजांड अस्तित्वात नसतं. तुमच्या आअीवडिलांचा जन्म हा, त्यांच्या आनुवंशिक तत्वाचा पूर्वजन्म तर तुमच्या अपत्यांचा जन्म हा तुमच्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म असतो.

सुमारे ३.८ अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर सजीव निर्माण झाले. तेव्हापासून त्यांच्यातील आनुवंशिक तत्वच जन्म घेत घेत अुत्क्रांती झाली आणि लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानव अवतरला. ८४ लाख योनीतून आत्मा गेला की मानव जन्म प्राप्त होतो या विधानाचा हाच अर्थ आहे. येथे योनी म्हणजे प्रजाती आणि आत्मा म्हणजे आनुवंशिक तत्व हा अर्थ घ्यावयाचा आहे. पृथ्वीवर सजीव जगण्याची परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आनुवंशिक तत्व जन्म घेतच राहणार आहे. आणि प्रत्येक सजीवाला 'जात' मिळतच राहणार आहे.


गजानन वामनाचार्य,

D3/002 गगन न्यू लाअीफ, कुसगाव मार्ग,

कामशेत, जिल्हा पुणे, ४१०४०५.

फोन :: ९८१९३ ४१८४१

1,429 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page