top of page

भय इथले संपत नाही .....


ट्वेन्टी ट्वेन्टी म्हणून आपण मोठ्या उत्साहाने स्वागत केलेले वर्ष २०२० बघता बघता संपले आणि आपण २१ व्या शतकात पदार्पण केले.फेब्रुवारी २०२० पासून कोरोनारुपी राक्षसाने जगातील अनेक देशांसह महासत्ताची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या भारताला वेठीस धरले.आलेले संकट आले तसे लवकर निघून जाईल हा आपला अतिआत्मविश्वास कोरोनाने फोल ठरवला आणि अख्खे वर्ष गिलंकृत केले.आज नववर्षाच्या तिमाहीनंतर सुद्धा आपण सामना करतोय त्या कोरोनरुपी लाटांचा.कधी संपेल हे ग्रहण ????


गेल्या वर्षीच्या प्रारंभी आलेल्या कोरोनाच्या संकटावर सुरुवातीला एकवीस दिवसांचा कडक असा लॉकडाऊन नंतर प्रशासनाने नेमून दिलेली नियमावली,सर्वसामान्यांच्या येजा करणाऱ्या एसटी च्या चाकांना लागलेले ब्रेक अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच अंशी कोरोनाची वाढत जाणारी साखळी तुटत जाऊन त्याचा प्रभाव ओसरला असे मानून हळूहळू त्या महाभयंकर अशा विषाणूला आपण विसरत आपले नित्यनेमाने जगणे सुरू केले.वर्षभरापासून ओस पडलेले महाविद्यालये,विद्यालये,शाळा आणि त्यातील शिक्षण यावर ऑनलाईन शिक्षणाचा नवा पर्याय समोर आला.आधी मुलांपासून मोबाईल लांब ठेवा असे म्हणणारे आम्ही शिक्षकच मग शासनाच्या निर्णयाला कटिबद्ध राहून मुलांच्या हाती मोबाईल द्या, त्यावर त्याचा अभ्यास येईल म्हणून सांगू लागलो. खेडोपाडी जिथे पालकांची जेमतेम आर्थिक परिस्थिती, हातून गेलेला रोजगार यांना ते तोंड देतांना आपल्या पाल्यासाठी दहा-पंधरा हजाराचा मोबाईल कसा घेणार ? तरीही आहे त्यात 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' झाले.यातच मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून कुणी विद्यार्थ्यांने आत्महत्या केली तर शिक्षणासाठी पाल्याच्या हट्टापायी जेमतेम परिस्थिती असणाऱ्या पालकाने उधारीने घेऊन दिलेल्या मोबाईलचा अतिवापर आणि त्यातच मायाजालावर उपलब्ध असणाऱ्या जीवघेण्या खेळात नैराश्य आल्याने कुण्या बालकाने आत्महत्या केल्याचे दुर्दैवी प्रसंग देखील घडले.हे सर्व असतांना आधी महाविद्यालये नंतर माध्यमिक शाळा नुकत्याच कुठे सुरू झाल्या असतांना शेवटचा घटक म्हणजे प्राथमिक शाळा सुरू करण्या -बाबत अनेक तारखांचे शासन निर्णय झालेत आणि शाळा सुरू होतील तोच पुन्हा कोरोनाने एकवार डोके वर काढले आणि पुन्हा एकच प्रश्न प्राथमिक शाळांमधील बालक आजही विचारतांना दिसतात तो म्हणजे ,'शाळा कधी सुरू होणार ??'' आहे का उत्तर याला ? याचे उत्तर गेल्या वर्षी देखील नव्हते आणि आतासुद्धा नाहीय !!! खरंतर सध्याचे शैक्षणिक वर्ष हे महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याचे वर्ष नक्कीच असणार नाही.


कुणी म्हटलेच होते की आता आपल्याला कोरोनासोबत जगणे शिकायला हवे हेच खरे.गेल्या वर्षाच्या अमिट अशा पाऊलखुणा पाहतांना वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना या तीन अक्षरी शब्दाने संपूर्ण जगाची झोप उडवली आणि जागतिक महामारी म्हणून कोरोना या रोगाने इतर राज्यांसह आपल्या सुजलाम, सुफलाम असणाऱ्या महाराष्ट्रात हातपाय पसरले आणि जिल्हा,शहरे व्यापत कोरोना खेडोपाडी येऊन पोहोचला आणि मग त्याचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. कोरोनासोबतच लॉकडाऊन सॅनिटायझर,मास्क,सोशल डिस्टन्स हे शब्द प्रथमच आपल्या परवलीचे झाले. जो तो आपल्या जीवाला जपत कोरोनाशी टक्कर देण्याचा प्रयत्न करू लागला. काहींनी उतारवयात कोरोनारूपी राक्षसाला टक्कर देऊन नामोहरम केले तर काहींना तरुण्यातच या कोरोनाने यमसदनी पाठवले तर काहींनी त्याच्या धास्तीनेच आपले प्राण सोडले. कोरोनाने जसा राज्यात शिरकाव केला तसे सारेच कुटुंब आणि एकूणच सर्व समाजव्यवस्था कोरोनाच्या धास्तीने ग्रासले असतांना कुणाकुणाला त्याने आपल्या विळख्यात पकडले.गरीब असो की श्रीमंत साऱ्यांना त्याच्याशी तोंड देतांना सरकारी रुग्णालयातील अपुऱ्या साधनसुविधा अपुरे मनुष्यबळ याला तोंड देतांना मात्र मर्यादित ठरल्या आणि अनेक रुग्णांना खासगी हॉस्पिटलकडे धाव घ्यावी लागली. वैद्यकीय सेवा देणाऱ्या अनेक मोठमोठ्या खासगी हॉस्पिटलांनी आरोग्य सुविधा नावाखाली लाखो- करोडोंची माया बघता बघता जमवली. कोरोनाने ग्रासलेल्या आणि जगण्याची धडपड करणाऱ्या या महामारीत खरी गरज होती ती आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय यंत्रणांची मात्र अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामग्री यामुळे त्या कुचकामी ठरल्या.


दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढताना समाजमाध्यमांवर आज कुठे ,कोणत्या भागात किती रुग्ण सापडले यावर जो तो सर्वात आधी बातमी कुणाला समजली यातून श्रेयवाद सुरू झाला तर ज्याला लागण झाली त्याने फार मोठा अपराध केला या भूमिकेतून सारी प्रशासन यंत्रणा त्याच्या द्वारी जाऊन पोहोचत बाधित झालेल्या अपराध्याचा अपराध सर्वांसमोर प्रकट करीत होती. त्याचवेळी आजूबाजूला आणि त्या परिसरातील नागरिकांना पुढे आपले कसे होईल याची धास्ती वाटत होती.अशावेळी डॉक्टर्स,पोलीस यांना देवदूताचा दर्जा प्राप्त झाला.मात्र यापैकी काहीच देवदूत सन्मानाला पात्र ठरले.आरोग्य कारणास्तव नेहमी ज्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करताना फॅमिली डॉक्टर म्हणून आपले नाते आपण जोडून घेतले त्यांनीही स्वतःच्या जीवाला सांभाळताना प्रशासकीय आदेशाचे पालन करतांना आपले दवाखाने बंद न करता 'उदारपणे 'उघडे ठेवले.शेवटी प्रश्न पोटापाण्याचाही होता.मात्र अभेद्य असे सुरक्षा कवच (पीपीई किट), तोंडावर मास्क,डोक्यावरून हेल्मेट शिल्ड, हातात ग्लोबज यासोबत स्वतःला सज्ज ठेवत. दवाखान्याच्या प्रवेश द्वारावर कुणीही सहज प्रवेश करू नये म्हणून बाकडा किंवा उपलब्ध साहित्य अडथळा रूपाने ठेवले, काहींनी तर खास यासाठी व्यवस्था करून घेतली तर काहींनी रुग्णाने बाहेर पायऱ्यांवरून आपली व्यथा तर आलेला प्रत्येक रुग्ण हा कोरोनाग्रस्त आहे आहे समजून त्याला तिथे पायऱ्यावरच थांबवून गोळ्याऔषधी लिहून दिलेली चिठ्ठी एका लांब काठीला बांधलेल्या पसरट डस्ट पॅन मधून डॉक्टरांनी रुग्णापर्यंत लांबवायची त्यातच त्याला रुग्णसेवेची फी ठेवायला सांगून लांब काठीला बांधलेल्या डस्ट पॅन मधून नोटांना हात न लावता किंवा स्पर्श न करता ठेवलेल्या खोक्यात टाकायच्या आणि त्या नोटांना देखील सॅनिटाइझ करायचे अशा अजबगजब अचाट युक्ती आणि वागणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेऊन साध्या सर्दीताप असणाऱ्याला देखील खरोखर आपल्याला कोरोना झालाय यासाठी खतपाणी घालणारी होती. फॅमिली डॉक्टर म्हणून ज्यांच्याकडे आजवर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या डॉक्टरकडे जाऊन ,इंजेक्शन, गोळ्या-औषधी घेऊन आपण बरे झालो ,त्यांच्याकडूनच मिळालेली ही वागणूक रुग्णासाठी अपराधी भावना निर्माण करणारी ठरली.याउलट काहींमध्ये खरोखर देवदूताचे दर्शन घडले.त्यांनी रुग्णसेवेसाठी धन्वंतरीसाक्षीने घेतलेली शपथ ते विसरले नाहीत. कधीही,कुठलाही संबंध नसलेल्या अशा डॉक्टरांनी रुग्णांसाठी आपल्या दवाखान्याची द्वारे सेवेसाठी उघडी ठेवली.आलेल्या रुग्णांशी बोलून रुग्णस्पर्शाचा विटाळ न मानता त्यांना योग्य ते औषधी,इंजेक्शन देऊन धीर दिला आणि औषध उपचारांनी बरे देखील केले.कितीतरी अनेक प्रकारचे अनुभव याकाळात प्रत्येकाला आले.महानगरात एका बाजूला मान्यताप्राप्त रुग्णालयायांनी रुग्णांकडून लाखोंची बिले घेत असताना तिथल्याच इतर हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टरांनी अल्पखर्चात रुग्णसेवा करून रुग्णांचे मनोबल वाढवून औषध उपचार करून अनेकांना पुनर्जन्म प्रदान केला.तर दुसऱ्या बाजूला कोरोना झाल्यावर वृद्धत्वामुळे उपचाराला प्रतिसाद देतांना ज्या मातापित्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या मुलांना आपल्या जन्मदात्या मातापित्यांच्या सरणाला मुखाग्नी देता आला नाही किंबहुना त्यांचे अंतिम मुखदर्शन देखील करायला मिळाले नाही इतका दुर्दैवविलास काहींच्या नशिबी आला. असे कितीतरी लोकांना अनुभवायला मिळाले.


दुसऱ्या महायुद्धानंतर कोरोना हे जगासमोरचे सगळ्यात मोठे संकट म्हणून सिद्ध झाले.गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च पासून सुरू झालेले हे थैमान नऊ दहा महिन्यानंतर हळूहळू त्याचा प्रकोप ओसरला म्हणून आपण सारे नित्यनेमाने आपले व्यवहार पूर्वपदावर आणले आणि त्यातच मास्क,सॅनिटायझर, सामाजिक अंतर याला आपण विसरलो.जणू काही घडलेच नव्हते या भूमिकेतून आपण सारे वावरतांना आपल्या आजूबाजूच्या जवळपासच्या कितीतरी अस्तित्वांना त्याने नष्ट केले हे देखील सोयीस्करपणे विसरलो.आता कोरोना गेलाय आता आपल्याला काही होणार नाही किंवा दुसऱ्याला कोरोना झाला हे चवीने सांगणाऱ्या लोकांना मला थोडीचं कोरोना होणार या अविर्भावात सारं नेहमीप्रमाणे सुरू होतं.बघता बघता मोर्चे, आंदोलने,सभा,लग्न समारंभ असतील पुन्हा वेग घेऊ लागली. लोकांची पुन्हा गर्दी होऊ लागली आणि अश्यात मास्क लावलेल्याकडे न लावलेले आश्चर्याने बघू लागले की जणू त्याला कोरोना झालाय म्हणून त्याने मास्क लावलाय.सर्व सामान्यांच्या एस टी ची थांबलेली चाके देखील पुन्हा जोमाने वेग घेऊ लागली,मास्क नाही प्रवेश नाही अशी जनहितार्थ जाहिरात असणाऱ्या सार्वजनिक वाहनातून आपण विनामास्क प्रवास करताना,या शहरात या कार्यालयात मास्क शिवाय प्रवेश करू नये असे बोर्ड-सूचना दर्शनी भागावर होत्या मात्र कार्यालयातच काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकारी याच्या तोंडावर मास्क औषधालाही नजरेस पडत नव्हते.बघता बघता कोरोना अटकाव करण्यासाठीच्या सूचना लिहिलेल्या बोर्डावर दिवसेंदिवस अधिकच धूळ बसून त्यातले शब्द आणि अक्षरे धुळीत मिळाली पण लोकांचा मानसिकतेत बदल झाला नाही.कदाचित त्याकडे सर्वांचे हेतुपुरस्कर दुर्लक्ष व्हावे आणि सर्वांना गाफील ठेऊन आपण पुन्हा त्यावर तुटून पडावे हा त्या कोरोनारूपी विषाणूचा गनिमी कावा त्याचा मनसुबा असावा जो त्याने सिद्ध करून दाखवला. कुणाला पुसटशी कल्पना देखील नव्हती की ही सारी वादळापूर्वीची शांतता आहे आणि अचानक आपण गाफील आहोत हे पाहून पुन्हा त्याने डोकं वर काढायला सुरुवात केली आणि आपण गृहीत धरलेले जग हादरवून टाकत पुन्हा एकदा व्यापक प्रमाणावर मानसिक चिंता आणि अस्तित्वाची अनिश्चितता निर्माण केली आहे.त्यातच यावर्षांच्या सुरुवातीला कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लस आलीय मात्र अजून ती सर्वांपर्यंत पोहोचायला कितीतरी वेळ जाईल, पण तोवर काय ?


२२ मार्च रोजी वर्षपूर्ती झाली ती आपण आपल्या आयुष्यात प्रथमच अनुभवलेल्या लॉकडाऊनची आणि त्यासह एका प्रसंगाची जो आजही सर्वांना नक्कीच आठवत असेल.गेल्यावर्षी माननीय पंतप्रधान यांच्या कोरोनासंकटाचा सामना करण्यासाठी थाळीनादाच्या भावनिक आवाहानंतर सारे भारतवासी प्रतिसाद देतांना घरातील,परिसरातील मिळेल त्या साहित्यावर कोरोनाचा संताप व्यक्त करतांना घरातली भांडी ,परात,घरावरील पत्रा,छतावरील डिश इत्यादी वस्तू बडवितांना आणि हातात ताटे घेऊन वेडेवाकडे अंगविक्षेप करून 'गो कोरोना' म्हणत नृत्य करणाऱ्या महिलेचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. हसावे की रडावे ?? काय म्हणावे या मानसिकतेला ? विनोद बुद्धी म्हणून दुर्लक्षित करावं की परिस्थितीचं गांभीर्य नाही म्हणून खेद व्यक्त करावा? अशिक्षित लोकांचं एक वेळ समजू शकतो काही गोष्टींचे ज्ञान नसेल अजाणतेपणे काही गोष्टी घडत असतील, पण स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे या जागतिक संकटाला गांभीर्याने घेऊ शकत नसतील तर माणूस म्हणून हा आपला पराभव आहे !!! सामाजिक अंतर ठेवा,मास्क लावा या प्रशासनाने दिलेल्या सूचना गांभीर्याने न घेता लोक आजही विनाकारण गर्दी करतात हे निश्चितच भूषणावह नाही. कोरोना हे आत्मचिंतनाचे निमित्त आहे,पण एकंदरीतच आरोग्य, स्वच्छता, निसर्ग याबाबतीत आपण कमालीचे उदासीन आहोत हे नक्की.स्वतःवर जोवर हा प्रसंग येत नाही तोवर मला काहीच होणार नाही हा असा चुकीचा आत्मविश्वास आपण किती दिवस मानणार आहोत ? हे संकट जाईल ही पण हीच वेळ आहे या सर्व बाबतीत अवलोकन करण्याची.


आपले दरडोई उत्पन्न वाढले दळणवळणाची साधने वाढली भौतिक प्रगती झाली पण स्वच्छता संस्काराचे काय? आजही देशाच्या पंतप्रधानाला लाल किल्ल्यावरून भाषण देताना सांगावे लागते शौचालय बांधा, ते वापरा. सचिन तेंडुलकर सारख्या फलंदाजाला जाहिरात करून सांगावे लागते स्वच्छ हात धुवा. शासनाने मोफत शौचालय बांधून दिली पण कित्येकांनी ती वापरली नाहीत कुणी त्यात सरपण भरून ठेवले तर कुणी कोंबड्या ठेवल्या, कोणी शेळ्या कोंडल्या. केवढी ही उदासीनता ? दहा-वीस हजारांचे मोबाईल हातात आहेत पण घरात शौचालय नाही. सरकारी इमारतीतील जिने गुटका मावा खाल्लेल्या पिचकाऱ्यांनी रंगवलेले दिसतात.पोरांना वर्गपाठाच्या वहीत लिहायला वेळ नाही पण सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर नको ते लिहायला कोठून वेळ मिळतो कुणास ठाऊक ? काय म्हणावे या मानसिकतेला.?


स्वच्छता आरोग्य निसर्ग हे निव्वळ प्रशासनाने हाताळण्याचे औपचारिक विषय नाहीत किंवा व्याख्यात्यांचे व्याख्यान, लेखकांचे लिखाण ,तज्ञांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सभा, आणि बोटावर मोजण्याइतक्या सुधारकांचे उल्लेखनीय कार्य विषद करणारे मुद्दे, इतकाच मर्यादित हा विषय नाही. खरंतर स्वच्छता हा अगदी प्राथमिक संस्कार आहे आणि त्यापासून आपण सोयीस्कररित्या अनभिज्ञ आहोत. करोडोंची लोकसंख्या असणाऱ्या आणि तुलनेने आरोग्याच्या सुविधा कमी असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्राने किती सतर्क असायला हवे ? किती काळजी घ्यायला हवी? सगळ्याच गोष्टी प्रशासनाने कराव्यात ही अपेक्षा का? सुज्ञ नागरिक म्हणून आपली पण काही जबाबदारी नाही का? ज्या राष्ट्रांना या गोष्टीचे गांभीर्य वेळीच ज्यांच्या लक्षात आले नाही त्या राष्ट्रांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. आणि सगळ्याच गोष्टी किंमत चुकवून शिकाव्यात असेही नाही कारण ही किंमत निवळ अर्थकारणाची नाही तर थेट जीवावर बेतणारी आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे निव्वळ सांगण्या पुरते राहू नये .हीच वेळ आहे अशिक्षित शिक्षित सर्वांनीच शहाणे होण्याची.!!!


इतिहास साक्षी आहे याअगोदरही अशा साथीच्या रोगांनी मानव जातीची मोठी हानी केली आहे आणि त्यातून सावरण्यासाठी मानवाला अनेक वर्षे मोजावी लागली आहेत. १३५० ला युरोपमध्ये प्लेगची साथ सुरू झाली. गाठीच्या प्लेगमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. पंधराव्या शतकात देवीचा संसर्ग झाला, उत्तर व दक्षिण अमेरिकन वसाहतीमध्ये अनेक बळी गेले.प्लेग घटसर्प कॉलरा गोवर देवी स्वाईन फ्लू या आणि अशा अनेक साथीच्या रोगांचे जगावर आणि भारतावर झालेले परिणाम आपल्याला ठाऊक आहेत.अनेक साम्राज्यात उलथापालथ झाली.आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला.अनेक जनावरे मृत्युमुखी पडली .अठराव्या शतकात आफ्रिकेतील शेती, शेती पूरक व्यवसाय उध्वस्त झाले.सोळाव्या शतकात चीनमध्ये आलेल्या प्लेग व मलेरिया साथीच्या परिस्थितीत चीन वरील मिंग राजवटीवर लुटारूंनी सूनियोजित हल्ले केले व मिंग राजवट संपुष्टात आली.युरोपीयन राजवटीच्या विरोधात गुलामांनी बंड केले त्याच काळात नेपोलियन बोनापार्ट यांनी सैन्य पाठवून मोठा भूभाग ताब्यात घेतला. हजारोंच्या सैन्याने मनगटाच्या जोरावर युद्धभूमी गाजवली पण तिथे पसरलेल्या पिवळ्या तापाच्या साथीवर सैनिक मात करू शकले नाहीत.पन्नास हजार पेक्षा जास्त सैनिक साथीच्या रोगाने दगावले. मोजकेच लोक फ्रान्सला परत जाऊ शकले हा इतिहास आहे. कोरोना ची साथ झपाट्याने पसरत असताना बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या आणि अमुक गादीवर झोपा, कोरोनाची लागण होणार नाही अशा फसव्या जाहिराती करणाऱ्या संस्था याची उत्तम उदाहरणे आहेत तर याच्यापेक्षाही पुढची पायरी म्हणजे कोरोना तपासणीचा रिपार्ट पॉझिटिव्ह हवा की निगेटीव्ह अश्या प्रकारे काही तपासणी प्रयोगशाळेतून पैसे उकळण्यासाठी प्रयोग देखील केले गेले.


संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागाने या प्रकारच्या प्राणीजन्य विषाणू व त्यातून होणारे आजार प्राणीजन्य आजारांचा मानवाला असलेला धोक्याची कल्पना दिलेली आहे. मानवजातीवरील प्राणीजन्य आजाराचा धोका टळलेला नाही. यापूर्वीही मानवजातीने या प्रकारच्या विषाणूंचा सामना केलेला आहे. या प्रकारची असंख्य संकटे झेललेली आहेत. मग तो स्वाईन फ्लू असो अथवा कोरोना. यापुढेही अशा प्रकारच्या प्राणीजन्य आजारांची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विषाणू व त्यापासून उद्भवणारे आजार नवनवे असणार आहेत. ते मानवी समाजाच्या अस्तित्त्वावर सातत्याने आघात करणार आहे. त्यामुळे आजच्या व भविष्यातील आरोग्य विषयक महासंकटांना सामोरे जातांना आता फक्त कोरोना विषाणूवर लस शोधून भागणार नाही, तर प्राणीजन्य विषाणूमुळे यापुढेही जो प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्याला प्रतिबंधक लस शोधण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला आपल्या संशोधनाचा आपला कस लावावा लागणार आहे.मानव व प्राणी यांच्यातील


असंतुलन हे भविष्यातील मानवी जमातीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. या सर्वांहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे हे असे का घडत आहे याचे मूळ कारण संयुक्त राष्टीय संघाच्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. हे मूळ कारण म्हणजे पर्यावरणामध्ये मानवीय हस्तक्षेप व आक्रमण वाढल्याने पर्यावरणात निर्माण झालेले असंतुलन. त्यातूनच मानव आणि प्राणी यांच्यामधील जैविक संतुलन बिघडलेले आहे. ते संतुलन पुर्नस्थापित करणे व निसर्ग, पृथ्वीचे संरक्षण करणे हे मानवी समाजासमोरचे सर्वात मोठे काम आहे.तथाकथित मानव प्रजाती नष्ट झाल्यास नवल वाटायला नको…पर्यावरण व निसर्गाचे संवर्धन उपकारासाठी नव्हे, तर मानवी व जीवनसृष्टीच्या रक्षणासाठी हे सक्तीने करावे लागणार आहे. अन्यथा जगातील तथाकथित बुद्धिमान प्राणी जो तुम्ही आम्ही मानव आहोत, तो पुढच्या काही दशकांनी अथवा शतकांनी नष्ट झाला तर नवल वाटायला नको. शिक्षणतज्ज्ञांच्या मते आता शिक्षण क्षेत्रावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. मग ते शालेय, माध्यमिक वा उच्च शिक्षण असो. तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्यास आता आपल्याला निसर्ग आणि मानव, पर्यावरण संतुलन, हवामान बदल, जैवविविधता, जंगल रक्षण व संवर्द्धन, प्रदुषण नियंत्रण व हरित सवयी यासंदर्भात जीवन कौशल्य शिकविणारा अभ्यासक्रम शिकवावा लागणार आहे. हे न शिकविल्यास मानवी जमात आत्मनाशक ठरेल. यात काडीचीही शंका नाही.


सध्याच्या वातावरणात समस्त मानवाने सावध राहून निसर्गाच्या हाका शांत होऊन ऐकायला हव्यात. साथीच्या रोगाला देश-विदेश जात धर्म गरिबी श्रीमंती च्या भिंती नाहीत. हे वैश्विक संकट आहे त्याला धैर्याने व विश्व कल्याणाच्या उदात्त भावनेने सामोरे जायला हवे. न घाबरता जागृत राहून सर्वांच्या कल्याणाकरीता प्रयत्न करायला हवेत,तरच हे भय संपेल. सुनिल मोरे जिल्हा परिषद शाळा चुडाणे

ता.शिंदखेडा जि.धुळे संपर्क ९६०४६४६१००

Email.: sunilmore751@gmail.com


ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


491 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page