top of page

युवकांची स्वप्ने आणि समस्या



गुरूपौर्णिमा नुकतीच आपण साजरी केली. आजचा विद्यार्थी अनेक स्वप्ने घेऊन माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना अनेक समस्या त्याच्यापुढे उभ्या आहेत. त्यादृष्टीने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून हा लेखन प्रपंच. देशात कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. परंतु या कोरोनानेच मानवाला भविष्याविषयी गंभीरपणे विचार करण्यास प्रवृत्त देखील केले आहे. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आपापल्या परीने या संकटाला तोंड देत आहे. आगामी काळांत आमुलाग्र बदल होतील तेव्हा त्याला शिक्षणक्षेत्र ही अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर नवमाध्यमे, समाज माध्यमे इ. गोष्टींचा वापर करणे आवश्यक झाले आहे. परंतु यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांना काय हवे आहे हा विचार महत्त्वाचा ठरतो. विद्यार्थ्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे समजून घ्यावयाचे आहे. आपल्या लोकशाहीप्रधान देशात एक नागरिक म्हणून आपला विकास व्हावा असे त्याला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने शिक्षक या नात्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतील व त्याला अनुरूंप न्याय देण्यासाठी शक्य ते प्रयत्न कोणते असावेत याची मांडणी केली आहे.

प्राचीन काळी गुरू-शिष्य नातेच असे होते की शिष्याचा दुसरा जन्म गुरुंकडून मिळालेल्या संस्कारातूनच होत असे. परंतु जसजसा काळ बदलत गेला त्यानुसार मूल्यांविषयीची जाण, जीवनचक्र व शिस्त यामध्ये बदल दिसू लागला. तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती त्याला जबाबदार आहे. पुढे जाऊन वाढता विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभाव यामुळे विद्यार्थी हा अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे आकृष्ट होऊ लागला. विद्यार्थी हा उमेद, उत्साह, धडाडीने भारलेला असतो. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची मानसिकता पाहिल्यास लक्षात येते की त्याचा 'अर्थ' पूर्ण उद्दिष्टांवर अपार विश्वास आहे. 'अर्थ' हे उद्दिष्ट्य पूर्ण होईपर्यंत मात्र तो अस्वस्थ, संभ्रमावस्थेत असतो. अशा वेळीच शिक्षकाने विद्यार्थ्याची संभ्रमावस्था व त्याची उमेद धडाडी ओळखून त्याला विद्याव्यासंगी केले पाहिजे. किंबहुना व्यासंग त्याच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश-प्रसंगी विषय निवड, अभ्यासक्रम, शिकविण्याची पध्दत, पुस्तके, विद्यापीठीय परीक्षा इ. ची माहिती दिली जाते. केवळ साचेबध्द अभ्यासक्रम, परीक्षा, पदवी यापेक्षा त्या-त्या अभ्यासक्रमाचा हेतू, उद्दिष्ट्य, तत्वज्ञान, भविष्यात उपलब्ध संधी, त्याचे उपयोजन इ. विषयी विद्यार्थ्यांना समजले पाहिजे अर्थात विद्यार्थ्यांना उद्दिष्टपूर्तीचा हेतू सांगितला गेला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांबरोबर त्यांच्या ध्येय-निष्ठा व आकांक्षा वाढतील. तसेच त्यांचा गोंधळ कमी होऊ शकतो.

विद्यार्थ्यांची लेखनाची, विचारांची संपन्नता प्रकट झाली पाहिजे. आत्मप्रेरणेने त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी व्यावहारिक मानसशास्त्राचा वापर करुन शिक्षक-विद्यार्थी संबंध निर्माण केले पाहिजे. कारण त्या दोघांच्या संबंधातूनच शैक्षणिक दर्जा ठरत असतो. इतर घटक देखील शैक्षणिक दर्जा ठरविण्यास सहाय्यभूत असतात. महाविद्यालयीन शिक्षण जीवनमूल्याभिमुख असावे. भारतीय संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी रुजविल्या तर मानवी व्यवहाराकडे विद्यार्थी चोखंदळ आणि चिकित्सक दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त होईल. कारण विद्यार्थ्यांच्या तारूण्यातील मनोवस्था, स्वप्नरंजन या गोष्टींना मर्यादा नाही अशा वेळी अध्यात्म, विज्ञान, परंपरा, संस्कृती यांचा समन्वय साधून एक वेगळी वाट विद्यार्थ्यांना दाखविणे आज गरजेचे झाले आहे. कारण आजचा विद्यार्थी झेप घेत असला तरी ज्ञानाच्या विस्फोटासोबत त्याच्या अपेक्षा आकांक्षांचाही विस्फोट होत आहे. अशा परिस्थितीत मात्र त्याच्यापुढे प्रश्न निर्माण झाले आहेत की जीवन का जगावे? शिक्षण का घ्यावे? येथे जीवन-शिक्षण यांची सांगड घालणे किंवा त्याच्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्या संस्कृतीतील दोन शक्ती केंद्रांमध्ये सामावलेली आहेत. कुटुंब व शाळा हीच ती दोन शक्तीकेंद्र होय. परंतु त्याबाबतीत कुटुंबीय व शिक्षक यांचे जितके कर्तव्य आहे तितके विद्यार्थ्यांचे ही कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी देखील निष्क्रियता टाकून आशा, भीती, मनोराज्य, विफलता यांमधून बाहेर पडून विद्या व्यासंगी होत समाजाच्या विकासासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. कारण शिक्षक-विद्यार्थी यांच्याकडे समाज अधिकच चिकित्सक दृष्टीने पाहत असतो. तेव्हा हे नाते अधिक सुदृढ बनवू या अपेक्षेने विराम.


लेखिका: प्रा. डॉ. वसुमती पी. पाटील (धुळे)

मो.: 9921641670

ईमेल: vasumati1967@gmail.com


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

509 views1 comment

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page