top of page

वैशाख म्हणजे - मराठी महिन्याची माहिती




वैशाख म्हणजे


हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातील हा दुसरा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र विशाखा नक्षत्राच्या सान्निध्यात असतो आणि म्हणून या महिन्याला वैशाख हे नाव पडले आहे . चैत्रामध्ये सुरू झालेले ऊन वैशाख महिन्यामध्ये आणखी वाढत जाते. सगळीकडे हवा खूप गरम आणि कोरडी असते .त्यामुळे या दिवसात उकाडा खूप वाढत जातो . या दिवसात या गरम हवेलाच वैशाख वणवा असेही म्हटले जाते. या दिवसात ज्वारी , गहू इत्यादी पिके तयार होतात. ऊन असल्यामुळे या दिवसात पूर्ण वर्षाच्या धान्याची साठवण केली जाते .कडक उन्हामुळे वर्षभरात लागणारे पापड , कुरडया, पापड्या,यांची वाळवणे उरकून त्यांची पण साठवण केली जाते .या दिवसात फळांचा राजा आंबा सगळीकडे झळकत असतो. गौरी तृतीयेपासून सुरू झालेले कैरीचे पन्हे , कोकम सरबत , माठातले वाळ्याचे पाणी या उन्हाळ्याच्या दिवसात प्यायले जाते . उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी वाळ्याचे पडदे लावले जातात. या महिन्याला माधव मास असेही म्हटले जाते .या माधव मासासारखा दुसरा चांगला महिना नाही असेही म्हटले जाते.या महिन्यात दानधर्म करण्याचे खूप महत्व सांगितले आहे . जगन्नाथपुरी येथील रथयात्रा याच महिन्यात द्वितीयेला निघते. वैशाख महिन्याच्या नवमीला जनक राजाला सीता सापडली होती असे म्हणतात . वैशाख महिन्यापासून त्रेतायुग सुरू झाले असे मानतात. चैत्री पौर्णिमेपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत वैशाख स्नानाचेही महत्व सांगितले आहे .


भगवान परशुराम जयंती : वैशाख शुद्ध तृतीया.


भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात .त्यांचा जन्म जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय तृतीयेला ) झाला. जन्माने ब्राम्हण असूनसुद्धा त्यांना क्षत्रियांप्रमाणे युद्धकला अवगत होती. भगवान शंकरांकडून त्यांना परशु हे शस्त्र मिळाले होते म्हणून त्यांना परशुराम असे म्हटले जायचे. त्यांना भार्गवराम या

नावाने पण ओळखले जाते. परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पुत्र असल्यामुळे त्यांचा जामदग्न्य असा पण उल्लेख केला जातो . हा उल्लेख श्री . रामरक्षा कवच स्तोत्रामध्ये आला आहे .आपल्या वडिलांचा अपमान सहस्रार्जुन राजाने केल्यामुळे क्षत्रियांना संपविण्याचा निर्धार परशुरामांनी केला होता. त्याप्रमाणे एकवीस वेळा श्री. परशुरामांनी क्षत्रियांचा नि:पातही केला .भीष्माचार्य , द्रोणाचार्य ,आणि कर्ण या तिघांचे ते गुरू होते. त्यांनी आपली सर्व विद्या भीष्माचार्यांना शिकविली होती.भगवान परशुरामांनी आपल्या बाणाने आत्ताच्या गुजरात पासून केरळ पर्यंतचा समुद्र खूप अंतर आत ढकलून ही पश्चिम किनारपट्टी तयार केली होती.या भूमीला अपरांतभूमी आणि परशुराम भूमी असे म्हणतात.कोकणामध्ये चिपळूण जवळ परशुराम क्षेत्री भगवान परशुरामांचे छान मंदिर आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भगवान परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक मानले जातात. ,आणि महेंद्र पर्वतावर अजूनही तप करतात असे म्हटले जाते.


भीमकाय देह,मस्तकी जटाभार,खांद्यावर धनुष्य,आणि हातात परशु अशी परशुरामाची मूर्ती असते. भगवान महादेवांच्या भेटीसाठी अडवणाऱ्या श्री.गजाननाशी झालेल्या युद्धात भगवान परशुरामांनी श्री. गजाननाचा एकदंत तोडून टाकला होता त्यामुळे गणपतीला एकदंत असे म्हणतात.


भगवान परशुरामांबद्दल त्यांचे वर्णन करणारा छान श्लोक पुढे लिहीत आहे .


अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:

इदं ब्राह्मम इदं क्षात्रं शापादपि शरादपि


म्हणजेच ज्यांना चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान ) आणि ज्यांच्या पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य )म्हणजेच ज्याच्या ठायी ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज हे दोन्ही असल्यामुळे शाप आणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जे जाणतात ते म्हणजे भगवान परशुराम.


अक्षय तृतीया : वैशाख शुद्ध तृतीया.


अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्वाचा दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवसाला अख्खा तीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा ( देवी ) जयंती ,नर नारायणांची जयंती , परशुराम जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला, आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले,अशी अख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या देवळाची दारे दर्शनासाठी उघडतात. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्व सांगितले आहे. या काळातल्या गरम हवेनुसार केले जाणारे दान या हवेला शोभेल असेच असते. त्यामुळेच या महिन्यात पाणपोई सुरू करणे,पाण्याचे माठ दान म्हणून देणे,त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री , पंखा , चंदन यांचेही दान करावे असे सांगितले आहे. पितरांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय (अविनाशी ) होते. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही अख्यायिका प्रचलित आहे. चैत्रगौर बसवून जे हळदीकुंकू चैत्र शुद्ध तृतीयेपासून महाराष्ट्रात केले जाते , ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत चालते. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग सुरू झाले असे मानले जाते. अक्षय तृतीया ही बुधवारी आली आणि त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महापुण्यकारक समजली जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्व सांगितले आहे. या दिवशी जे काम तुम्ही कराल किंवा हातात घ्याल त्या कामात कधी खंड पडत नाही .या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचे महत्व सांगितले आहे ,म्हणून या महिन्याला माधव मास असे म्हटले आहे ,आणि म्हणून या महिन्यात वसंतमाधवाची पूजा केली जाते .


आद्य शंकराचार्य जयंती , वैशाख शुद्ध पंचमी

आद्य शंकराचार्य पुण्यतिथी , वैशाख शुद्ध चतुर्दशी


शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांचा जन्म ( इ.स.७८८ ), वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी कलाडी , केरळ येथे शिवगुरु आणि आर्यांबा या ब्राम्हण दांपत्याच्या पोटी झाला अशा नोंदी आढळतात. आद्य शंकराचार्य हे तीन वर्षाचे असताना त्यांच्या पित्याचे निधन झाले. असे म्हणतात की त्यांचे वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान होती. ते त्यावेळच्या परंपरेप्रमाणे यज्ञोपवीत संस्कार ( मौजीबंधन ) झाल्यावर गुरुगृही अध्ययनास गेले. आद्य शंकराचार्य वयाचे आठवे वर्षी संन्यास घेऊन गुरूच्या शोधार्थ निघाले ते मध्यप्रदेश येथील ओंकारेश्वर येथे पोहोचले आणि तेथील गौडपाद यांचे शिष्य श्री . गोविंद भगवत्पाद भट यांना त्यांनी आपले गुरू केले. त्यांनी शैव आणि वैष्णव हा वाद संपविण्याचे एक मोठे काम केले. आद्य शंकराचार्य हे अद्वैत वेदांत मताचे होते. आणि भारतीय हिंदू धर्मियांचे ते तत्त्वज्ञ होते. त्यांनी अद्वैतवाद प्रस्थपित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला. इ.स. च्या आठव्या,नवव्या शतकात त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे भारतभर भ्रमण करून वैदिक धर्माची पुन:स्थापना केली . आद्य शंकराचार्यांनी द्वारका ( द्वारिका शारदा पीठ ) ,जगन्नाथपुरी (पुरी गोवर्धन पीठ ), श्रुंगेरी ( श्रुंगेरी पीठ ) ,आणि बद्रिकेदार ( ज्योतिष्पीठ ) बद्रिकाश्रम ) येथे चार धर्मपिठे स्थापन करून त्यावर प्रत्येकी एक पिठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा पुढे सुरू ठेवली . आद्य शंकराचार्यांनी ब्रम्हसूत्र ,उपनिषदे , आणि भगवतगीता आशा अनेक विषयांवर भाष्यग्रंथ लिहिले आहेत .त्यांनी तत्वज्ञानविषयक ग्रंथ,संस्कृत स्तोत्रे आणि तत्सम काव्ये रचली आहेत. आद्य शंकराचार्यांच्या लोकोत्तर कामामुळे ते सर्वांच्या मनामध्ये जगतगुरूंच्या स्थानी जाऊन बसले,म्हणजेच सारा समाज त्यांना जगतगुरु असे मानू लागला .


आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण देशाला एक सांस्कृतिक,धार्मिक,दार्शनिक,आध्यात्मिक आणि भौगोलिक एकतेच्या सूत्रात बांधले. आयुष्याचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी नश्वर देह सोडून केदारनाथजवळ आद्य शंकराचार्य स्वर्गवासी झाले .(इ.स.८२० ).


गंगा जयंती / गंगा पूजन : वैशाख शुद्ध सप्तमी


वैशाख शुद्ध सप्तमी या दिवशी गंगा जयंती साजरी केली जाते. गंगा नदी इतके धार्मिक महत्व जगातील दुसऱ्या कोणत्याही नदीला नसेल.जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे अशी कोट्यावधी भारतीयांची इच्छा असते.


आपल्या देशातील सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र नदी म्हणून ओळख असणारी गंगा नदी वैशाख शुद्ध सप्तमी या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरली होती,त्यामुळे वैशाख शुद्ध सप्तमी हा दिवस गंगा सप्तमी किंवा गंगा जयंती म्हणून साजरा केला जातो. गंगा नदीत स्नान केल्याने आपली सर्व पापे धुतली जाऊन मनुष्य पापमुक्त होतो असे मानतात .त्यामुळे गंगा नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले गेले आहे . गंगेचा उगम गंगोत्री हिमनदीच्या टोकाशी हिम गुहेतून होतो. भागीरथी या नावाने उगम पावलेली ही गंगा पुढे गेल्यावर तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा गंगेचा दुसरा प्रवाह मिळतो. पुढे जोशी मठ येथे बद्रीनाथकडून आलेली विष्णुगंगा आणि द्रोणगिरीहून आलेली धौली गंगा एकत्र येऊन पुढे विष्णू प्रयागनंतर तिला अलकनंदा असे नाव आहे. पुढे हरिद्वार येथे गंगा मैदानी प्रदेशात येते आणि पूढे ती बंगालच्या उपसागरास मिळते.गंगेला विष्णुपदी,त्रिपथगा,भागीरथी,जान्हवी अशी अनेक नावे आहेत.


पूर्वीच्या काळी जेव्हा यात्रा मग ती कुठलीही असेल,खूप अवघड होती ,कारण बऱ्याच वेळी यात्रेकऱ्यांना पायी जावे लागत असे.अशा वेळी कोणी काशियात्रेला गेला तर ती खडतर असल्यामुळे परत यायला खूप दिवस लागत होते. बऱ्याच वेळी काशियात्रेला गेलेली माणसे परत पण येत नसत.त्या वेळेस त्यांना यात्रेला निघताना घरातली माणसे वेशीपर्यंत सोडायला जात असत.त्यातूनही तो माणूस काशियात्रेला जाऊन सुखरूप परत आला तर त्या वेळेला घरामध्ये खूप उत्साहाच वातावरण असायचं आणि त्या आनंदात त्यांनी आणलेल्या गंगेच पूजन करून सुवासिनींच्या ओट्या भरून सर्व नातेवाईकांना मिष्टांनाचे भोजन देण्याची प्रथा होती. याला गंगापूजन असे म्हणतात,तसेच याला मावंद असे पण म्हणतात .


सीता नवमी : वैशाख शुद्ध नवमी


वैशाख शुद्ध नवमीच्या दिवशी मिथिलेचा राजा जनक यांना एक शेतात सीता सापडली. या दिवसापासून ही तिथी सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. मिथिला देशाची राजकन्या म्हणून मैथिली,जनक राजाची कन्या म्हणून जानकी आणि भूमीमध्ये सापडली म्हणून सीतेला भूमिकन्या असेही म्हटले जाते .त्या वेळी त्रेता युग चालू होते. या युगामध्ये श्री . विष्णूंनी आपला सातवा अवतार म्हणजेच राम अवतार धारण केला,त्यामुळे भगवान विष्णूंची पत्नी श्री . लक्ष्मी देवी या पण सीतामाई बनून पृथ्वीतलावर अवतरल्या म्हणून या दिवसाला सीता नवमी किंवा सीता जयंती असे म्हणतात.


नृसिंह जयंती : वैशाख शुद्ध चतुर्दशी.


नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतरांपैकी चवथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला अशी अख्यायिका प्रचलित आहे. वैशाख शुद्ध षष्ठीपासून वैशाख शुद्ध चतुर्दशी पर्यंत नृसिंह देवाचे नवरात्र साजरे केले जाते .


हिरण्यकश्यपूने ब्रम्हदेवांकडून कितीही मोठा वर मागितला असला तरी अहंकारामुळे,खूप अत्याचार केल्यामुळे त्याचा मृत्यू हा निश्चित होता. आणि त्यासाठीच भगवान विष्णूंनी नृसिंहाचा हा अवतार घेतला .


ओम उग्रनृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि

तन्नो नृसिंह: प्रचोदयात.


हा मंत्र नृसिंह गायत्री मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या मंत्राच्या जपाचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते .नृसिंहाची उपासना किंवा पूजा अर्चा केली तर घरातली नकारात्मकता नष्ट होते असे सांगतात. शनिवार हा नृसिंहाचा वार आहे असे म्हटले जाते .


बुद्ध जयंती : वैशाख शुद्ध पौर्णिमा.


बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण व उत्सव आहे .हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.


जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वात:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला . मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला,आणि म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते . गौतम बुद्ध,शाक्यमुनी बुद्ध सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. काही जणांच्या मते गौतम बुद्ध हा भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी नववा अवतार आहे असे म्हणतात .


नारद जयंती : वैशाख वद्य प्रतिपदा .


नारदमुनी हे ब्रम्हदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत असे मानतात . त्यांनी तप:सामर्थ्याने ब्रम्हर्षी हे पद प्राप्त केले आहे. नारदमुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. नारदमुनींना देवर्षी असेही म्हणतात . वैशाख वद्य प्रतिपदेला नारदमुनींचा जन्म झाला असे सांगितले जाते . त्यामुळे हा दिवस नारद जयंती म्हणून साजरा केला जातो. नार या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी आणि पाणी देणारा तो नारद अशी नारद या शब्दाची फोड आहे .


ब्रम्हर्षी नारदमुनी यांच्या एका हातात वीणा,दुसऱ्या हातात चिपळ्या,आणि मुखाने नारायण,नारायण असा भगवान विष्णूंचा जप करीत असत. त्यांच्या मस्तकावर केशचुडा त्यावर फुलांची माळ,कपाळावर त्रिपुंड,गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ,दंडावर केयुर व मनगट्या घातलेल्या तसेच पायात खडावा असा त्यांचा वेष असे. नारदमुनींनी खरी भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून दिले . ते धर्मशास्त्रातही पारंगत होते. त्यांच्या नावाने एक कीर्तन परंपरा ( नारदीय कीर्तन ) आपल्याकडे प्रसिद्ध आहे .गळ्यामध्ये वीणा घालून हिंडणारे देवर्षी नारदमुनी संगीतातले पण जाणकार होते .


ब्रम्हदेवाकडू मिळालेल्या वरदानानुसार नारदमुनी आकाश,पाताळ,तसेच पृथ्वी (स्वर्गलोक,मृत्युलोक, आणि पाताळलोक ) या तीनही लोकी सहजपणे भ्रमण करू शकत असत. देव आणि दानव यांची सारी सुखदु:ख नारदमुनींना महिती असायची आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते देवांना आणि दानवांना नेहमी मदत करीत असत. आपल्या वैदिक वाङ्मयातील अठरा पुराणांमधील नारदमुनींनी लिहिलेले नारद पुराण हे सर्वश्रेष्ठ मानले जाते .


संत चोखामेळा पुण्यतिथी : वैशाख वद्य पंचमी


संत चोखामेळा ( चोखोबा ) हे यादव काळातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संत कवी होते चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला . संत चोखोबांचे कुटुंब हे जातीने महार होते . त्यांची पत्नी सोयराबाई,बहीण निर्मळा, मेहुणा बंका, आणि मुलगा कर्ममेळा हे सारे जण संत चोखामेळ्यांसारखे विठ्ठलांच्या भजनामध्ये दंग असायचे. रोजचा गावगाडा चालविताना या साऱ्यांना शुद्रवर्णात जन्माला आल्यामुळे गावातील घाण उचलून टाकावी लागायची. सोवळे ओवळे, शूद्राशुद्र, शिवाशिव या सगळ्या गोष्टींना या साऱ्यांना अपमानास्पद रीतीने रोज सामोरे जावे लागत होते .या साऱ्यातून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता . ही सारी परिस्थिती त्यांच्या अभंगातून प्रकट होत होती. त्यांना श्री . पांडुरंगाचे दर्शन सुद्धा महाद्वारातून घ्यावे लागत असे .पांडुरंगापर्यंत जायला विटाळ होईल म्हणून त्यांना परवानगी नव्हती .


धाव घाली विठू आता चालू नको मंद, जोहार मायबाप जोहार, बहुभुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, आमुची केली हीन याती तुज का न कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमचे चित्ता, ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत .संत चोखोबांच्या अभंगांच्या रचनांमध्ये पांडुरंगाची भक्ती,पांडुरंगाला बघण्यासाठी होणारी तळमळ आणि तत्वज्ञान सांगणारी अध्यात्मिक उंची दिसते. आपण उपेक्षित आहोत,आपल्याला समाज नाकारतो आहे,टाळतो आहे याची फार मोठी खंत त्यांच्या अभंगांतून दिसून येते. संत नामदेव हे संत चोखोबांचे गुरू होते. संत चोखामेळा हे ज्ञानेश्वरांचे समकालीन होते .


रोजच्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूरला जाऊन एका भिंतीचे बांधकाम करताना त्या भिंतीचा भाग अंगावर कोसळल्यामुळे संत चोखामेळा आणि आणखी काही मजूर त्याखाली येऊन मरण पावले,तो दिवस वैशाख वद्य पंचमीचा होता(इ.स.१२६०.). म्हणून या दिवशी या महान संताची पुण्यतिथी करून आपण त्यांच्या थोरपणाला नमस्कार करतो. वंचितांचे जगणे नशिबी येऊनसुद्धा भावभक्तीने पांडुरंगाच्या भक्तीचा झरा हृदयात कायम वाहता ठेवणाऱ्या संत चोखामेळ्यांना आदरपूर्वक प्रणाम.


संत हेच भूमीवर l चालते बोलते परमेश्वर

वैराग्याचे सागर l दाते मोक्षपदाचे.

हेच खरे .


स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती : वैशाख वद्य षष्ठी


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या भगुर या गावी वैशाख वद्य षष्ठी (२८ मे १८८३ ) या दिवशी झाला .


सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. शाळेत असल्यापासूनच त्यांचे वक्तृत्व आणि लेखन कला वाखाणण्यासारखी होती. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका ,स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना त्यांच्या लहान वयातल्या प्रतिभेची चुणूक दाखवितात. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी यांच्याकडून जणू स्फूर्ती घेऊन त्यांनी राष्ट्र भक्त समूह या नावाची क्रांतिकारी विचार असलेल्या तरुणांची गुप्त संघटना उभी केली. ही संघटना पुढे अभिनव भारत या नावाने ओळखली गेली . लोकमान्य टिळकांनी शिफारस केलेली कायद्याच्या अभ्यासासाठी देण्यात येणारी शिवाजी शिष्यवृत्ती घेऊन कायद्याचा अभ्यास करता करता अनेक क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेतले . लंडनमध्ये असताना ब्रिटिश सरकारविरोधी साऱ्या गोष्टी केल्याने त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली (सन १९११). पुढे ब्रिटिशांच्या काही अटी मान्य केल्यामुळे अंदमानातून त्यांची सुटका झाली .( ६ ,जानेवारी,१९२४ ).


सावरकरांचे अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन आणि सुटकेनंतरचे जीवन असे सावरकरांच्या जीवनाचे दोन भाग पडतात.पहिल्या भागात आक्रमक,क्रांतिकारी सावरकर,क्रांतिकारांचे प्रेरणास्थान सावरकर,धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप दिसते.,अंदमानातून सुटून आल्यानंतर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतीकारक सावरकर ,हिंदू संघटक सावरकर,भाषाशुद्धी चळवळ चालविणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर,समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर,विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म अधुनिक स्वरूपात माणण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ व विचारवंत सावरकर अशा अनेक स्वरूपात ते समाजासमोर आलेले दिसतात.


खरोखर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या देशाचे एक अनमोल असे मानाचे पान आहे.


अहिल्याबाई होळकर जयंती : वैशाख वद्य षष्ठी


पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म वैशाख वद्य षष्ठी, ( ३१ मे,१७२५ ) या दिवशी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला .त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे हे मान्य नसतानाही तिच्या वाडीलांनीअहिल्येला लिहिण्या,वाचण्यास शिकविले होते. माळव्याचे सरदार मल्हारराव होळकर यांना आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी अहिल्या ही उत्तम पत्नी आहे असे वाटले आणि म्हणून त्यांनी खंडेरावाशी अहिल्येचे लग्न लावून तिला माळवा प्रांती घेऊन गेले. मल्हारराव होळकर यांची अहिल्याबाई ही एकुलत्या एका मुलाची पत्नी आणि सून होती . अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ. स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींना मल्हाररावांनी सती जाऊ दिले नाही. पुढे बारा वर्षांनी अहिल्यादेवींचे सासरे श्री . मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला ,आणि त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या.. पुढे त्यांनी माळवा प्रांताची राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलविली आणि मग तिथेच राहून अहिल्याबाई पूर्ण माळवा प्रांताचा राज्यकारभार पाहू लागल्या. मल्हारराव होळकर गेल्यावर बरेच जण अहिल्याबाईंच्या अधिपत्याखाली रहावयास किंवा लढावयासही तयार नव्हते .मग त्याबाबतची परवानगी पेशव्यांनी अहिल्याबाईंच्या नावाने दिल्यावर मगच अहिल्याबाई व्यवस्थित रीतीने राज्यकारभार बघू शकल्या. अहिल्याबाईंनी इ . स. १७६६ ते १७९५ म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले . जरी राज्याची राजधानी महेश्वर ही होती तरी इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर शहरात रूपांतर अहिल्याबाईंनी केले . हिंदू मंदिरांमध्ये कायम स्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून त्यांनी अनेक दाने दिली . अहिल्याबाईंनी रयतेच्या सुखासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. योग्य ते न्यायदान करून रयतेला समाधानी ठेवण्यामध्ये अहिल्याबाई कल्पक होत्या. त्यांनी भारतातल्या अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून नर्मदा नदीकाठी अतिषय सुंदर आणि देखणे असे घाट बांधले. तसेच अहिल्याबाईंनी अनेक गावांमध्ये गरिबांसाठी धर्मशाळा पण बांधल्या. त्यावेळच्या एका इंग्रजी दैनिकाने अहिल्याबाईंचे कार्य बघून त्यांची तुलना रशिया,इंग्लंड आणि डेन्मार्क येथील राण्यांबरोबर केली होती .


इंदूर येथील विश्वविद्यालयाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले आहे.तसेच सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे .


संत मुक्ताबाई पुण्यतिथी : वैशाख वद्य दशमी.


आपल्या समाजात आईवडिलांनी त्यांच्या नवीन जन्माला आलेल्या अपत्यांची ठेवलेली नावे आपल्या कर्तृत्वाने पुढे जाऊन समाजात सिद्ध करून दाखवतील अशी माणसे खूप कमी असतात.आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांची चार मुले मात्र या गोष्टीला अपवाद ठरतात कारण निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान आणि मुक्ताबाई या त्यांच्या चारही अपत्यांनी समाजामध्ये आपापल्या कर्तृत्वाने एक मोठी उंची गाठली होती . अगदी लहानगी मुक्ताबाई सुद्धा याला अपवाद ठरली नाही. म्हणूनच म्हणतात "मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी ". मुक्ताबाईंच्या अवघ्या साडे सतरा वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांचे कर्तृत्व फार मोठे होते .त्यांची वैशाख वद्य दशमी या दिवशी पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने हे त्यांच्यावरचे चिंतन.


अश्विन शुद्ध प्रतिपदा,शके १२०१ या दिवशी मुक्ताबाईंचा जन्म झाला . असे म्हणतात की मुक्ताबाईंच्या रूपाने प्रत्यक्ष आदिमातेनेच जन्म घेतला होता . तीन भावंडांची अतिशय लाडकी असलेल्या बहीण मुक्ताबाईंचा अध्यात्मात आणि परमार्थात फार मोठा अधिकार होता . अतिशय लहान वयात आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे अतिशय तल्लख बुद्धीची हुशार आणि फटकळ, खेळकर आणि भातुकली खेळण्याच्या वयातली मुक्ताबाई आई वडिलांच्या निधनामुळे एकदम प्रौढ होऊन गेली. घर चालविण्याची जबाबदारी मुलगी असल्यामुळे आपोआपच तिच्यावर येऊन पडली. आजूबाजूच्या दाहक परिस्थितीचे चटके तिला सहन करावे लागल्यामुळे ती अधिकच विरक्त आणि संत प्रवृत्तीची झाली .


एकदा समाजाने झिडकारल्याच्या तीव्र वेदनेने अतिशय विमनस्क परिस्थितीत ज्ञानेश्वरांनी झोपडीचे दार लावुन घेतले आणि रागावून ते आत जाऊन बसले. त्यांचा हा राग काढण्यासाठी मुक्ताबाईंनी अतिषय सुंदर शब्दांची रचना करून ताटीचे अभंग गाऊन ज्ञानेश्वरांचा तो राग शांत केला होता . एक अतिशय सुंदर ताटीचा अभंग खाली देत आहे .


शब्द शस्त्रे झाले क्लेश,संती मानावा उपदेश ll

विश्वरागे झाले वन्ही,संते सुखे व्हावे पाणी ll

सुखसागर आपण व्हावे,जग बोधे तोषवावे ll

तुम्ही तरोनि विश्वतारा,चिंता क्रोध मागे सारा ll

ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll


ज्या ज्ञानेश्वरांनी जगाला ज्ञान दिले त्या माउलीला मुक्ताईने वरील ताटीचे अभंग म्हणून समजाविले. खरच धन्य ती मुक्ताबाई .तापोवृद्ध ,वयोवृद्ध ,आणि अत्यंत बुद्धिमान अशा योगिराज चांगदेवालासुद्धा केवळ दहा वर्षाच्या मुक्ताईने बोधामृत पाजले होते.निवृत्तीनाथांसह सर्व संत मंडळिंबरोबर तीर्थयात्रा करीत असताना तापी नदीच्या परिसरामध्ये आत्ताचे मुक्ताईनगर परिसरात अंगावर वीज पडून मुक्ताबाई वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी चिरंतन स्वरूपात विलीन झाल्या . आणि अशा तऱ्हेने त्यांनी आपले मुक्ताई हे नाव सार्थ केले .


शनैश्वर जयंती : वैशाख अमावास्या


शनैश्वर जयंती म्हणजेच शनी देवाची जयंती. शनी देवाचा जन्म वैशाख अमावास्येच्या दिवशी दिवसा दुपारी बारा वाजता झाला होता म्हणून वैशाख अमावास्या शनैश्वर जयंती म्हणून साजरी केली जाते. राशी चक्रातल्या मकर आणि कुंभ या दोन राशी शनिदेवाच्या स्वत:च्या असल्यामुळे त्या राशींचा शनी देव स्वामी आहे . या दोन राशींना साडेसाती कष्टप्रद येत नाही. शनिदेवांचा रंग काळा असतो. त्यांचे वाहन घुबड असते,आणि त्यांचा रथ लोखंडाचा असतो. शनी हा प्रत्येक राशीत तीस तीस महिने रहातो. शनिदेव हे सूर्य आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. शनिदेवाविषयी अनेक गैरसमज प्रचलित असले तरी चांगले करणाऱ्यांच्या सतत पाठीशी आणि वाईट करणाऱ्यांवर शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते .


तर असा हा वसंत ऋतूतला दुसरा महिना म्हणजे वैशाख महिना.वनांफमध्ये मधुमास आला तरी ,प्रेमीजनांना हुरहूर लावून गेला तरी,वैशाख महिन्यातला उन्हाचा तडाखा बसतोच. म्हणूनच याला वैशाख वणवा असे म्हणतात.पण या महिन्यातच आंबे,फणस, काजू,करवंदे,जांभळे,कलिंगड,टरबूज,काकड्या द्राक्ष खाण्यामध्ये जी मजा आहे ती काही औरच आहे. गम्मत म्हणजे या गोष्टींना किंवा कैरीच्या पन्ह्यासारख्या वसंत पेयांना याच दिवसात गोडी असते किंवा ती खावीशी आणि प्यावीशी वाटतात. जरा पाऊस पडून हवा गार झाली की या गोष्टींची गोडी खरच कमी होते हे मात्र नक्की. वैशाखाने तापलेल्या भूमीची आता वर्षा ऋतूची आराधना करणे सुरू झाले आहे त्यामुळे पावसाची वाट बघणे सुरू झाले आहे .


लेखिका: सौ. उमा अनंत जोशी ( पुणे )

मोबा.:९४२०१७६४२९

ई-मेल : anantjoshi2510@gmail.com

1,108 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page