संत तुकारामअणुरेणिया थोकडा |

तुका आकाशाएवढा ||१||

या ओळीतच संत तुकारामांचे सूक्ष्मातून प्रचंडाकडे जाणारे समग्र, विस्तृत व व्यापक व्यक्तिचित्र दडले आहे.

ते समजून घेताना सर्वप्रथम महाराष्ट्राचे आद्यदैवत विठू माऊली ,वारकरी संप्रदाय , भक्तिमार्ग या सर्वांचा विचार करावा लागेल.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदाय असे दोन संप्रदाय आहेत , त्यात फरक काय ? असाही प्रश्न जनसामान्यांना पडतो . खरेतर

फरक काहीच नाही . वारकरी संप्रदाय श्रीविष्णूला केंद्रस्थानी मानतो तर भागवत संप्रदाय श्रीकृष्णाला..

संप्रदाय माणसाने निर्माण केले. भक्ती, श्रद्धा , विश्वास यामध्ये मात्र कोणताही फरक नाही.

या संतसंप्रदायाचे , भक्तीच्या इमारतीचे वर्णन संत बहिणाबाईंनी अतिशय समर्पक अशा अभंगात केले आहे.

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया।।

नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत।।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।l

आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म सुखासमाधानात व्यतीत व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते . पण ती पूर्ण होत नाही ; सामान्यजनांना हेही समजत नाही की ही सर्व सुखे क्षणभंगुर आहेत ; अनंतातून आलेला प्रत्येक जण अनंतात विलीन होणार आहे आणि जाताना कोणीही आपल्याबरोबर काहीच घेऊन जाणार नाही.

आपण फक्त सत्कर्म करत राहायचे आहे ही गीतेची शिकवण.. तीच संत सज्जनांनी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला..

सामान्यजनांसाठी इहलोकात जन्म घेतला होता सर्वच संतांनी!!

यादवांच्या अस्ताआधी काही वर्षे आणि नंतर पीडित ,शोषित जनता परप्रांतीयांच्या आक्रमणांनी त्रस्त झालेली होती. या जनतेला स्वतंत्र अस्तित्व राहिले नव्हते .अमंगळ भेदाभेद व्यवस्था बोकाळली होती. या भेदाभेदांचा प्रचंड असा त्रास संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना भोगावा लागला पण ज्ञानेश्वरांसारखा योगी पुरुष अशाच भोंदू जनांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी जन्माला आला होता. सोळाव्या वर्षीच भगवद्गीतेचे संस्कृतातील क्लिष्ट सार सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे अवतारकार्य त्यांनी केले. इथेच या भक्ती संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला गेला आणि ह्या इमारतीचा कळस म्हणजे संत तुकाराम ..

जे जे या भक्ती संप्रदायाच्या इमारतीचा भाग बनले आहेत ते सर्वच योगी पुरुष आहेत ,असामान्य आहेत. संत तुकाराम यांचे जीवन चरित्र बघितले तर पदोपदी या योगीयाचे मनुष्यत्व आणि त्याच वेळी माणसातले अलौकिकत्व अनुभवायला मिळते.

संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक यांच्या संशोधनानुसार संत तुकाराम अतिशय कोमल मनाचे, मृदू वाणीचे धनी होते आणि त्याउलट आवली नावाची त्यांची पत्नी कर्कशा होती.सामान्य माणसाप्रमाणे ते संसार करत होते. संसार करून परमार्थ साधत होते.

लौकिकार्थाने ते एका श्रीमंत घराण्यात जन्मले होते . समृद्ध असे त्यांचे घराणे होते ज्यामध्ये विठ्ठलाची भक्ती परंपरेने चालत आलेली होती . महाजनकी होती.

परंतु काही काळाने अनेक प्रकारच्या अस्मानी सुलतानी आपत्तींना सामोरे जावे लागले.

सतरा अठराव्या वर्षी आई वडील गेले .मोठा भाऊ विरक्ती मुळे तीर्थाटनास गेला.

एका भयंकर दुष्काळाला त्यांना सामोरे जावे लागले .या दुष्काळात त्यांची शेती वाडी, गुरेढोरे सर्व काही गेले ‌उद्योगधंदे ही बुडाले. लोकांना खायला प्यायला अन्नाचा कणही नव्हता‌ अशा वेळी संत तुकारामांनी स्वतःच्या तोंडचा घास लोकांना दिला . गरिबांविषयी त्यांना अतिशय कळवळा होता. संकटाच्या परिस्थितीत कर्जदारांचे कर्ज माफ करून टाकले. या दुष्काळात त्यांचा संतू नावाचा मुलगाही गेला. जीवनाची क्षणभंगुरता त्यांना जाणवली आणि मग चिरंतनाचा ,शाश्र्वताचा शोध सुरू झाला.

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति

रखुमाईच्या पती सोयरिया ll

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

देई मज प्रेम सर्वकाळ ll

तुका म्हणे काही न मागो आणिक

तुझे पायी सुख पूर्ण आहेll

ईश्वरभक्तीतच सर्वकाही आहे हे त्यांना ज्ञात झाले. पण सामान्य जनता सुख-दुःखात गुरफटलेली होती.

परकीयांची आक्रमणे सुरूच होती .गुलामगिरीत समाज स्वत्व हरवून बसला होता . आपलीच माणसं आपसात भांडत होती . सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट केली .भोंदू ,अंधश्रद्ध माणसांनी समाजमनावर ताबा मिळवला होता . काही धर्मवेड्या माणसांनी वेदांमधील ज्ञानाची मक्तेदारी घेतली होत. बहुजन समाज निद्रेत होता .. कर्मकांड, देवभोळेपणा यामध्ये साधी भोळी जनता भरडली जात होती.

समाजाच्या या अडाणीपणाचा फायदा घेतला जात होता .

संत तुकारामांनी