संस्काराचे मोतीनिसर्गाचा अनमोल ठेवा म्हणजे कोकण होय. सौंदर्याने नटलेल्या या कोकणात काजू, फणस व आंब्याच्या बागांनी अधिकच भर घातली आहे. या ठिकाणी जन्माला आलो म्हणजे स्वर्गसुख प्राप्त झाल्यासारखे वाटते. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणातील मजा काही वेगळीच होती. राधिका मावशीचा जन्म याच कोकणातील मालवणचा होता. लग्नानंतर मात्र राधिका मावशींना चिपळूणला जावे लागले. सासरही कोकणातीलच मिळाले म्हणून राधिका मावशी खूप खुश होत्या. “ माहेर व सासर कोकणात मिळायला फार भाग्य लागते. ” असं त्या नेहमी म्हणायच्या. लग्नानंतर एका वर्षांनी राधिका मावशींना सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. आई व बाबा मुलीच्या जन्मामुळे खूपच खूश होते. कारण राधिका मावशीच्या सासरी तीन पिढ्यापासुन मुलगी नव्हती. मुलीच्या जन्माने तीन पिढ्यांची उणीव भरून काढली होती. थाटामाटात मुलीचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. राधिका मावशीच्या सासरकडील सर्व बायका, सासू-सासरे, नवरा, दिर असे सर्वजण मालवणला आले होते. राधिका मावशीच्या सासूने मुलीच्या कानात कुर्र....! आवाज करून कुसुम नाव ठेवले. सर्वांना आवडती कुसुम आता चार महिन्याची झाली होती. कुसुमला आता स्वतःच्या घरी नेण्यासाठी तिचे बाबा मालवणला आले होते. राधिका मावशीची भरल्या ओटीने सगळ्यांनी पाठवणी केली. कुसुम आता बाबांच्या मांडीवर जाऊन बसली होती. आजोबा लाडात कुसुमला म्हणतात. लबाड कुठली....! बाबा आले तर....! घरी जाण्यासाठी तयार झाली. आज तुझे रडने गायब झाले. खूप रडून घेतले कुसुम बाई....! आमच्या मालवणी काय तुम्हाला करमत नव्हते का....! आजोबाच्या लाडाने नात खळखळून हसली. सर्वांनाही खळखळून हसू आले....! राधिका मावशी, कुसुम, व तिचे बाबा यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. एसटी बस निघाली. कुसुमने आजोळ सोडले.


स्वतःच्या गावी चिपळूणला जायला निघालेल्या या चिमुकलीला नियतीचा खेळ कुठे माहित होता....! जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या भाग्यरेषा बदलता येत नाही. देवाने लिहून पाठवलेल्या भाग्यरेषा भोगाव्याच लागतात. मात्र त्या भाग्यरेषा माणसाला वाचता आल्या असत्या तर....! स्वतःचे भाग्य अनेकांनी बदवले असते. मालवण वरून चिपळूण सहा तासाचा रस्ता होता. गाडी जशी जोरात धावू लागली, तसा खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. थंडगार हवेमुळे कुसुमला छान झोप लागली होती. मालवण वरून गाडी निघून चार तास झाले होते. आता दोन तासात चिपळूण येईल....! राधिका आपल्या घरी सगळे कुसुमला भेटायला आतुर झाले आहे. नाव ठेवायला आले होते त्यानंतर पुन्हा कुसुमला पाहण्याचा योग आला नाही. कुसुमचे बाबा व राधिका मावशी बस मध्ये गप्पा मारत होते. बस भरधाव धावत होती. अचानक बसला बिघाड झाली. ड्रायव्हरचे बस वरील नियंत्रण सुटले व बसचा मोठा अपघात झाला. बसचा अपघात एवढा भीषण होता की, बस मधील जवळजवळ पंचवीस लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. या अपघाताने मात्र कुसुमच्या डोक्यावरचे छत्र हरवले होते. राधिका मावशी व तिचे पती दोघांचे या अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात मात्र नशिबाने भाग्यवान असणारी कुसुम मात्र सुखरूप बचावली होती. या अपघाताच्या बातमीने मालवण व चिपळूणची सर्व माणसं हादरून गेले होते. नियतीच्या या क्रुर डावापुढे कोणाचेच काही चालत नाही. राधिका मावशी व कुसुमच्या बाबाच्या निधनाच्या बातमीने सर्व नातेवाईक फार हादरून गेले होते. दुःखाच्या अथांग सागरात कुसुमच्या नशिबाची नाव डुबली होती. चार महिन्यापूर्वी, काही तासांपूर्वी नशीबवान, भाग्यवान असणारी कुसुम मात्र नियतीपुढे हरली होती. या अपघाताविषयी सर्व कोकणात हळहळ व्यक्त झाली. कुसुम मात्र सगळ्यांच्या तोंडी नशीबवान ठरली होती. या भीषण अपघातातून देवाने कुसुमला सुखरूप बचावले होते. हा चमत्कार कसं काय घडला....! ते कुणालाच कळत नव्हते....! आई व बाबाच्या निधनाने पोरकी झालेली कुसुम मालवणी परतली होती.


कुसुमचा सांभाळ आता मामा-मामी करू लागले होते. कुसुम ही राधिका मावशीची आता शेवटची आठवण होती. आजोळी कुसुम राधिका मावशीची उणीव भरून काढत होती. काळजाचा तुकडा गेल्यामुळे आजी-आजोबांना फार धक्का बसला होता. पण कुसुमकडे बघून थोडे फार दुःख हलके होत होते. आजी-आजोबा, मामा-मामीच्या लाडात कुसुम मोठी होत होती. राधिका मावशीच्या स्वप्नांना आता कुसुमच्या रूपाने पूर्ण करावे लागणार होते. ही जबाबदारी ओळखून कुसुमच्या मामाने कुसुमला छान संस्कार दिले होते. घरातील सर्वांच्या लाडात कुसुम अनेक नवीन नवीन गोष्टी शिकत होती. आजी आजोबांनी तिच्या बालमनावर खूप चांगले संस्कार केले होते. बोलणे, चालणे, वागणे, अशा सर्व गोष्टीत कुसुम सुसंस्कारित झाली होती. कुसुमला बघता बघता सहा वर्षे पूर्ण झाले होते. या वर्षी शाळेत टाकावे लागणार म्हणून कुसुमच्या आजोबांनी गुरुजीशी तसे बोलून पण ठेवले होते. पावसाळा सुरू झाला होता. धो....! धो....! पडणाऱ्या पावसा बरोबरच लहान मुलांना आनंद देणारी शाळाही सुरू झाली होती. कुसुमच्या आजोबांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाऊन कुसुमचे नाव गुरुजीकडे नोंदवुन दिले. गुरुजींनी कुसुमला नाव विचारून बोलते केले. खूपच गोड मुलगी आहे कुसुम....! हरणे काका अगदी तुमच्यावर गेली नात....! असे म्हणून, “ गुरुजींनी कुसुमचे तोंड भरून कौतुक केले.’’ खूप हुशार आहे मुलगी....! एक दिवस नाव मोठे करेल तुमचे....! नातीच्या हुशारीने आजोबांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी का होईना....! पण थोडा आनंद झळकला होता. शाळेत नाव दाखल होताच कुसुमला गुरुजींनी नवीन पुस्तके, पाटी व लेखणी दिली. कुसूम खूप आनंदी झाली होती. आता नियमीत कुसुमची शाळा सुरू झाली. दिवसभर शाळेत नवनवीन गोष्टी शिकायच्या, घरी आले की आजोबांना ते सांगायचे. शाळेत गुरुजी, घरी आजोबा या दोघांच्या शिकवणीने कुसुम लवकरच लिहायला व वाचायला शिकली होती. गणितातही सर्व क्रिया करू लागली. शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान पक्के झाले होते. घरातील कोणीही कोणतेही काम सांगितले की, कुसुम पळत-पळत काम पूर्ण करायची. स्वतःतील नम्रपणा, बोलण्यातील गोडवा, अभ्यासातील हुशारी यामुळे कुसुम घरीदारी सर्वांची लाडकी कौतुकास पात्र ठरत असे. आईवडिलांची उणीव आतापर्यंत कुसुमला घरच्यांनी भासू दिली नाही. आई वडीला वाचून पोरकी असल्यामुळे तिचे फक्त लाड होत असे. तिच्यावर कधीच कुणी रागवत नसे. कुसुम सुध्दा तशी वेळ कधी येऊच देत नव्हती. बघता बघता कुसुम चौथी पास झाली. वर्गातून प्रथम आली व शिष्यवृत्तीची परीक्षाही पात्र झाली. म्हणून गुरुजींनी हरणे काकांच्या घरी भेट देऊन कुसुमचे कौतुक केले. गुरुजी घरी येऊन कुसुमचे कौतुक करतात. यामुळे कुसुमचा सर्वांना अभिमान वाटला. आजी आजोबा, मामा मामीच्या संस्काराने व शाळेतील गुरुजीच्या शिक्षणाने कुसुम परिपूर्ण होत होती.


बघता बघता कुसुम एस.एस.सी, एच.एस.सी मध्ये प्रथम आली. कुसुमने आपल्या पहिल्या नंबरची परंपरा कायम ठेवली होती. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली. शिक्षण, संस्कार, समजुतदार पणा याबरोबरच सौंदर्यानेही ती अधीक बहरली होती. तारुण्यातील नवचैतन्य तिच्या चेहर्‍यावर झळकत होते. पण मुळात संस्कारी असलेली कुसुम आपल्या वयाने व सौंदर्याने भाळून न जाता या वयातही स्वतःची पायरी ओळखून वागत असे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने खूप यश मिळवले होते. पण आयुष्यात खुप काही गमावले सुद्धा होते. जन्मानंतर चार महिन्यात आईवडील गमावले होते. त्यांचा चेहरा ही तिला आठवत नव्हता. पुढे दहावीत असतांना ज्यांनी आई-वडीला प्रमाणे सांभाळले ते आजी-आजोबाही एका पाठोपाठ तिला कायमचे सोडून गेले. ती इतरांसाठी नशीबवान वाटत होती. पण स्वतःसाठी मात्र कम नशिबी होती. आता आजी आजोबांच्या पश्च्यात कुसुमची जबाबदारी मामा व मामीवर पडली. मामांनी कुसुमच्या पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. व कुसुमच्या लग्नासाठी एखादा चांगला मुलगा शोधणे सुरू केले. आई-वडील व बहिणीच्या मनाला शांती लाभावी असे कुसुम चे थाटामाटात लग्न करण्याचे मामाने मनाशी पक्के केले होते. स्थळ शोधण्याची मोहीम सुरू झाली अनेक ठिकाणी मामा जाऊन आले. पण त्यांना योग्य असे स्थळ मिळत नव्हते. एके दिवशी कुसुमच्या मामीच्या नातलगातील एका स्थळाचा निरोप आला. मामांनी लगेच दोन चार दिवसात येतो म्हणून निरोप दिला. मामा व त्यांचा सोबती दोघेजण मुलगा बघून आले. मामांना मुलगा खूप आवडला होता. त्यादिवशी मामांनी कुसुमला जवळ बोलावून घेतले. मामा कुसुमला मुलाविषयी सांगू लागले. बघ कुसुम मुलगा कोकणातीलच आहे. खेड जवळच त्याचे छोटेसे गाव आहे. गावावर शेती आहे त्यांचा तिथे मोठा वाडा आहे. काजूच्या व आंब्याच्या खूप मोठ्या बागा आहेत. मुलगा पुण्याला शिकत होता तो आता इंजिनियर होऊन मुंबईला मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे. मुलगा दिसायलाही खूप सुंदर आहे. त्याचे आई-वडील गावाकडेच राहतात. त्यांना मात्र मुलगी शिकलेली व दिसायलाही सुंदर पाहिजे. लग्नानंतर मुलगा मुलीला मुंबईला सोबत नेणार आहे. त्यामुळे मुलगी शिक्षणा बरोबरच संस्कारित व शहरात अॅडजेस होणारी पाहिजे. त्यांना मी तुझ्याविषयी सर्व खरी खरी माहिती सांगितली. त्यांना स्पष्ट सांगून आलो मुलगी बघतांना तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. आमची कुसुम लाखात एक आहे. जसा शिंपल्यातील मोती चमकावा तशी ती सर्व ठिकाणी स्वतःच्या संस्कारांनी चमकत असते. ‘‘ माझ्या राधिकाताईच्या काळजाचा तुकडा आहे तो.....! ” तुम्हाला नक्कीच आवडेल....! दोन दिवसांनी बघायला येणार आहे असा निरोप पाठवला त्यांनी....! आजच निरोप मिळाला. कुसुम हे ऐकतच मामाच्या समोर बसून होती. तिचे डोळे एकदम भरून आले. लहानपणी आई वडील गेले. निट आईचा चेहरा तिला आठवत नाही. पण आई-वडिलांच्या आठवणीने मात्र ती कधीकधी खूप अस्वस्थ होत असे. मामाने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले. वेडी आहेस का तु....? असे रडायला काय झाले. मुलगा नुसता बघायला येतोय....! उद्याच काही घेऊन जाणार नाही. आणि हो....! तसंही मुंबईमध्ये राहायला नशीब लागतंय....! मुंबई काही साध्यासुध्या लोकांचे शहर नाही. येथे राहायला पैसा व ज्ञान दोन्ही लागते. मध्येच मामी म्हणाली, “ आपली कुसुम काय अशिक्षित आहे का? ” ती एवढी शिकली, संस्काराने या कुटुंबात वाढली, कुणाला अशी सुसंस्का