top of page

राष्ट्राची खरी संपत्ती


वाऱ्याचा वेग ,सूर्याचे तेज, सागराची चंचलता व पहाडाची दिव्यता म्हणजे "युवा". जर जगातील सर्व संगणकांची बुद्धिमत्ता एकत्र केली व सर्व महायंत्रांची ताकद जमवली तरी ती युवांपुढे कमीच ! जेव्हा असे सर्व युवा एकत्र येतात तेव्हा तयार होते ती युवाशक्ती. युवाशक्तीची ताकद फार मोठी आहे म्हणूनच म्हणतात 'युवा शक्ति परा: शक्ति |

            युवाशक्तीचे महत्व आपल्याला इतिहासातून समजतेच. स्वामी विवेकानंद यांनी दाखवून दिले आहे युवा हा कुठेच कमी नसतो अगदी तत्वज्ञान  व अध्यात्मातही. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने धर्मसंकटात अडकलेल्या अर्जुनला खऱ्या धर्माचा अर्थ सांगितला. पर्यायाने संपूर्ण विश्वाला जीवनाच तत्वज्ञान सांगून मार्ग दाखविला. हा मार्ग दाखविणारा श्रीकृष्ण तरुणच होता व ते ऐकणाराही तरुणच. एक तरुण जर जगाला जीवनग्रंथ देऊ शकतो म्हणजे तो सर्वकाही करू शकतो.

           काही वर्षांपूर्वी प. पू. पांडुरंगशाश्री आठवलेंनी युवाशक्तीची ताकद ओळखली होती म्हणूनच भगवान व श्रुती या बरोबरच युवकांवर विश्वास ठेवून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वैचारीक क्रांती घडवली.

         युवाशक्ति ही समाजप्रबोधन करुन समाजात क्रांती घडवू शकते .आता खरी गरज आहे ती युवशक्तिने एकत्र येण्याची .यामुळे आपला वैयक्तिक विकास तर निश्चितच  आहे. याबरोबरच समाजप्रबोधन ही घडून येईल .समाजात तरुणांबद्दलची एक वेगळी ओळख  व प्रतिमा निर्माण होईल. या सर्वासाठी येते ते युवाशक्तीचे संघटन ! आपण सर्वानी मिळून आपले संघटन केले तर काम निश्चितच सोपे होते . कारण-

      "इरादे नेक हो तो रास्ते आसान होते है|

लगन सच्ची हो तो सपने भी साकार होते है|"

           संघटनेचे महत्व तर आपण सर्वजण जाणून असतो. किंबहुना लहानपणापासून  बोधकथांच्या माध्यमातून आपल्यावर संस्कार केले जात असतात. कबुतराची गोष्ट आपल्याला माहितच असेल... एक शिकारी कबुतरांच्या संपूर्ण थव्यावर जाळे टाकून त्यांना अडकवतो . त्यावेळी सर्व कबुतर संपूर्ण ताकदिनीशी एकसाथ उडण्याचा प्रयत्न करतात व त्यात यशस्वी होतात.

         थोडक्यात काय तर संघटन, एकी असेल तर असाध्य  गोष्टी देखील जीवनातील आपण मिळून साध्य करू शकतो. समाजात आपल्याला कोणकोणते  बदल करता येतील त्याचप्रमाणे नवीन काहीतरी आपण समाजात रुजवावे का?

यांसारख्या अनेक प्रश्नांवर आपण चर्चेच्या माध्यमातून एक ठराव करू शकतो व त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करुन बदल घडवू शकतो. समाजातील तळागाळातील व्यक्तीला देखील पुढे येता येईल असा प्रयत्न युवाशक्ती करेल. आपल्या मनातील विचारांची स्वप्नपूर्ती आपण युवशक्तिनेच करू शकतो.

          आपण बघतो ,समाजात अनेक लोकांच मत युवकांप्रती सकारात्मक नसते .युवक म्हटला म्हणजे फक्त मौजमजा करणारा, व्यसन करणारा, चांगले वाईट याचे मूल्य न जाणणारा ,आयुष्य म्हणजे काय याची जाणीव नसणारा, महत्वाचे निर्णय त्याला घेता येत नाही, तितकी समज त्याला नाही असे एक ना अनेक समजूती लोकांच्या मनात असतात. मात्र तरुणांनी नेहमी सकारात्मक विचारांचा मार्ग निवडला तर समाजाला आम्ही काय करू शकतो हे दाखवता येईल.

         युवाशक्ती सर्वश्रेष्ठ आहे यात शंकाच नाही .मात्र याचा अनेक राजकारणी ,स्वार्थी व कपटी लोक गैरफायदा उचलतात. तात्पुरत्या स्वरूपाचं पैशाचं किंवा झटपट मोठ व्हायचं आमीष दाखवतात व चूकीच्या मार्गाला नेतात. तरुण मात्र त्याची सर्व शक्ती ही यातच वाया घालवतो व सर्वस्व गमावून बसतो. यासाठी हवाय सकारात्मक विचारांचा मार्ग दाखविणारा नेता .यामुळे सगळीकडे उजेडच उजेड असेल. तरुणांनी देखील आपला तात्पुरता फायदा न पाहता दूरदृष्टिने विचार करावा .यामुळे आपली शक्ती ही विघातक न राहता विधायक कामासाठी वापरात आली पाहिजे .नाहीतर मग 21 वर्षाचा अजमल  कसाब सारखा तरुण हातात ऐके 47 घेऊन नाहक  निरपराध लोकांचे प्राण घेतो .युवाशक्ती ही अणू बॉम्बसारखी आहे ती फक्त योग्य व्यक्तीच्या हातात पडायला हवी .

       आज विचार आणि कृती यात एकसूत्रता येणे गरजेचे आहे. कारण युवकांचा एक विचार अनेकांवर प्रभाव पाडू शकतो. मात्र त्या विचारांची कृती ही अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपध घेतली. व ती तारुण्यातच  पूर्ण करुन दाखवली. संत ज्ञानेश्वरांनी देखील अगदी कमी वयातच  'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला. सांगायचे म्हटले तर जगातील सर्व महान कार्य ही तरुणांच्या हातूनच घडले आहेत व घडत देखील आहेत .उदाहारण द्यायचे तर आताचे गुगल चे CEO सुंदर पिचाई हे देखील युवक आहेत. यापुढे देखील आपली युवाशक्ती सकारात्मक व संघठीत असेल तर सर्वच क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवेल.

         समाजाचा तरुण पिढीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपणच बदलवू शकतो. आपल्या विधायक कर्तुत्वाने ! देशातील श्रीमंती ही तेथील असलेल्या आर्थिक गुणवत्तेवर असते . मात्र तेथील तरुणांची संख्या किती यावर देखील ठरते व सर्वात तरुण देश कोणता  हे ठरवतात. कारण तरुण देश म्हणजे आगामी काही वर्षात तो विकसीत व समृद्ध देश असेल असे ठरते हे फक्त युवाशक्तीमुळे.

        तर मग चला उदयाच उज्वल भविष्यकाळ घडविणाऱ्या युवक युवतींनो समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी, आपल्या स्वप्नपूर्तिसाठी, आपलं स्थान निर्माण करुन समाजप्रबोधन करूया. युवाशक्तीची ताकद ही क्रांती निर्माण करेलच यात शंकाच नाही मग.

   समाज मोठ्या अभिमानान म्हणेल...

      "पराक्रमाचा सागर उसळे, बुलंद बाहूंवरती

रे युवकांनो तुमच्या पुढती झुकेल अंबर धरती".




लेखिका: सौ योगिता किरण पाखले (पुणे)

मोा: 9225794658


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

271 views1 comment

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page