top of page

"प्रवासातील अनुभव"बारा वर्षापूर्वीची ही घटना आहे. परंतु आजही माझ्या मनात ती कायमची घर करून राहीली आहे. आमच्या आयुष्यात घडलेली, कधीही न विसरता येणारी अशी सत्य घटना.

ऑक्टोबरचा महिना होता. माझ्या यजमानांच्या क्लासच्या सुटीचा तो महिना. त्यावर्षी आम्ही दोघांनी आठ दिवस कन्याकुमारीला "विवेकानंद केंद्र" मध्ये मुक्काम करण्याचे ठरविले होते, त्यानुसार पहिल्याच दिवशी नाशिकहून ऑनलाईन बुकिंग केले होते. कन्याकुमारीहून परत येताना, वाटेत माझ्या मावसभावाकडे दोन-तीन दिवस मुक्काम करून, कोकणात देवदर्शनासाठी जाणार होतो. त्यानंतर मग आमच्या नाशिक मुक्कामी परतणार होतो. एकंदर असा भरगच्च खूप दिवसांचा आमचा प्रवास होता, त्यानुसार आमची दोघांची संपूर्ण प्रवासाची टू-टायरची तिकीटं आधीच बुक करून ठेवली होती. म्हणजे प्रवासात कुठलीही गैरसोय होऊ नये ही इच्छा.

आमची प्रवासाची तारीख येऊन ठेपली. पंधरा दिवसाचा एकंदरीत मुक्काम असल्यामुळे साहाजिकच आमच्याकडे सामानही बर्‍यापैकी होते. परंतु व्हिलच्या बॅगा व टू-टायरचे बुकिंग असल्यामुळे थोडे सुलभ झाले. रिक्षाने आम्ही सामानासकट नाशिकरोडला वेळेच्या आधीच जाऊन पोहचलो. बरोबर नऊ वाजता गाडी स्टेशनमध्ये आली आणि आम्ही आमच्या सीट नंबरवर जाऊन बसलो. साडेबारा वाजता गाडी CST ला पोहचणार होती. आणि पुढे चार वाजता CST ते Kanyakumari ला जाणारी गाडी आम्हाला पकडायची होती. स्टेशनवरच आम्ही दुपारचे जेवण घेण्याचे ठरविले.
नाशिकरोडला गाडीत चढल्यानंतर, सामानाची व्यवस्थित मांडणी करून आम्ही दोघेही आपापल्या सीटवर रिलॅक्स झालो. टि.सी ने तिकिटं तपासल्यानंतर, यजमानांनी आपल्या हातात असलेल्या तिकिटांचा व पैशाचा पाऊच सीटच्या समोरील जाळीच्या कप्प्यात ठेऊन दिला. नाशिकरोड ते सीएसटी हा आमचा प्रवास अत्यंत आरामदायी झाला. आम्हाला सगळ्यात शेवटच्या स्टेशनवर उतरायचे असल्यामुळे, कोणतीच घाई नव्हती. सीएसटी येईपर्यंत वाटेत काही प्रवासी ठाण्याला तर काही दादरला उतरले होते. शेवटी उतरणारे आमच्यासारखे एखादाच दुसरा असेल. एकदाचे शेवटचे स्टेशन आले(सीएसटी) आणि आम्ही दोघेही आमचे सामान घेऊन उतरलो. यापुढील कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती खरोखरंच अविस्मरणीय अशी घटना आमच्या आयुष्यात घडली आहे.

गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर, भराभर गरीब व कचरा गोळा करणारी मुले गाडीत चढली होती. ती गाडी साफ केल्यानंतर परत यार्डात जाणार होती. तोपर्यंत आमचे सामान घेऊन आम्ही भूक लागल्यामुळे, रेल्वेच्याच कॅन्टीनमध्ये जेवायचे ठरवून, आमच्या डब्यापासून बरेच अंतर चालत आलो आणि वरती जीना चढून कॅन्टीनमध्ये सामान एकाबाजूला ठेवले, हात वगैरे धुऊन जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येण्याची वाट पहात बसलो तोपर्यंत जव्ळजवळ अर्धा तास निघून गेला होता. अचानक यजमानांना पाऊचची आठवण झाली, त्या पाऊचमध्ये आमची वेगवेगळ्या प्रवासाची ते नाशिकला रिटर्न येण्यापासूनची सगळी तिकिटं, पैसे शिवाय महत्वाची कार्ड वगैरे होती. सगळीकडे इकडे-तिकडे नजर फिरवली परंतु पाऊच काही सापडेना. दोघेही थोडेसे धीरगंभीर झालो तरीही आशा काही सोडली नाही कारण परमेश्वरावर नितांत श्रध्दा होती. जे होईल ते होईल म्हणून यजमान म्हणाले गाडी अजून तिथेच असेल तर मी एकदा डब्यामध्ये पाहून येतो, पाऊच सापडला तरच आमचा पुढील प्रवास होणार होता नाहीतर नाशिकला परत जावे लागणार होते. दोघांच्याही मनाची तयारी तेथेच झाली होती. आम्ही दोघेही त्यावेळी अतिशय शांत होतो. तोपर्यंत जेवण आले होते. यजमानांनी मला जेवून घेण्यास सांगितले आणि यजमान परत आमची गाडी ज्या प्लॅटफॉर्मवर आली होती तिथे गेले. तोपर्यंत मी त्यांची वाट पहात राहीले होते. तेथील कॅन्टीनमध्ये माणसांनीही बराच धीर दिला.
गाडी अजूनही जागेवरच उभी होती परंतु गाडीचे दरवाजे सगळे आतून बंद करण्यात आले होते. आमच्या बोगीच्या जवळ जाऊन यजमानांनी दरवाजावर दोन-तीन थाप मारल्यावर एका रेल्वेच्या सफाई कर्मचारीणीने दरवाजा उघडला व विचारणा केली, तेव्हा यजमानांनी त्यांना आपला पाऊच इथे राहील्याचे सांगितले, आणि गंमत म्हणजे त्यातील एकूणएक महत्वाची कार्ड्स, तिकीटे व पैसे तसेच्यातसे सहीसलामत यजमानांच्या हाती तिने सुपूर्द केले. माझ्या यजमानांनी त्यांना नको नको म्हणत असताना, बक्षिसाच्या रूपाने काही रक्कम दिली आणि त्यांना एकदम हायसे वाटले. तसेच ते पाऊच घेऊन कॅन्टीनमध्ये आले. आणि त्यानंतरचा तो आमच्या आयुष्यातला संमिश्र भावनांनी दाटलेला क्षण आम्ही आमच्या मनाच्या एका कप्प्यात कधीच न विसरण्यासाठी तसाच्यातसा जपून ठेवला आहे. मध्येच कधीतरी ह्या प्रसंगाची आठवण आली की आम्हाला दोघानाही हसायला येते आणि परमेश्वरापुढे आम्ही नतमस्तक होतो.
खरंतर त्या प्रवासात पाऊच विसरण्यासारखे नव्हतेच, कारण ते आमच्या समोरच होते आणि सगळ्यात महत्वाचे होते, परंतु त्यावेळेस आम्ही दोघेही ब्लॅक झाल्यासारखे होतो म्हणायला हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी जेव्हा CSTच्या प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा आम्ही उतरायच्या आधीच कचरा गोळा करणारी चार-पाच मुले गाडीत चढली. त्यांच्याही नजरेला ही गोष्ट आली नाही हे विशेष. नाहीतर आमचा पाऊच कदाचित आम्हाला परत मिळालाच नसता, किंवा सफाई कामगाराच्या मनात जर त्यावेळी वाईट विचार येऊन तिने आम्हाला तो परत न देता स्वतःकडे ठेवला असता तर कदाचित त्यावेळेला आमचा पुढचा कन्याकुमारी, गोवा, कोकण प्रवास सुरळीत आणि सुरक्षित झाला नसता. एकीकडे परमेश्वराने आम्हाला जाणीव करून दिली की जे काही घडतं आहे, त्या घटनेचा तू केवळ निमित्तमात्र आहेस. कर्ता-करविता मी आहे हे सत्य जाण.
अशा जेव्हा घटना आपल्या आयुष्यात घडत जातात तेव्हा खरी जाणीव होत जाते व आपली भगवंतावरील श्रद्धा आणखी आणखी गडद होत जाते. कोणती तरी शक्ती आपल्या पाठीशी असल्याशिवाय अशा अविश्वसनीय घटना घडू शकत नाही. आणि मग नास्तिक व्यक्तीची हळूहळू श्रध्दा बसू लागते.

आमच्या छोट्याशा प्रवासातील हा अविस्मरणीय क्षण आम्हाला अनुभवता आला. आपले आयुष्य हाही एक प्रवासाचाच भाग आहे. आणि ह्या जन्म-मरणाच्या मधल्या काळात आपण कितीतरी रंगछटांनी नटलेले, वेगवेगळे सुखद-दुखद अनुभव घेत असतो. आणि त्यात अडकून जातो. परंतु आपल्याला जीवन हेच तर जाणीव करून देत असते की प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पहायला शिकले की त्याचा त्रासही होत नाही आणि सुखद असले म्हणून आपण त्यात अडकतही नाही. सत्संगाच्या ह्याच शिकवणीतून, आमच्यावर जेव्हा वरिल प्रसंग ओढवला तेव्हा चक्क तो क्षण आम्ही जगलो, त्यामुळे कुठेही डगमगून न जाता, त्यावेळेला जे योग्य वाटेल ते करत गेलो आणि परमेश्वराची साथ मिळत गेली.

पुष्पा सामंत.

नाशिक 23-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.comही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

648 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page