top of page

माझा करोनामय अमेरिकेचा प्रवास



जगात आपण एक एक अनुभव नव्याने घेत असतो आणि त्यामुळे आपल्या आठवणीत दरवेळी नव्या अनुभवाची भर पडते.आमच्या करोना च्या काळात नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या प्रवासात असे अनेक अनुभव मिळाले ते शेअर करावेसे वाटत आहे. मिलपिटास कॅलिफोर्निया येथे असलेली आमची आमच्या मुलीच्या बाळंतपणासाठी आम्हाला ऑगस्ट,2020 च्या आत अमेरिकेत पोहोचायाचे होते त्यामुळे हा प्रवास करावा लागला .

आपण सर्वांनी जानेवारी,20 पासून एक नवीन नाव ऐकले होते ! ते म्हणजे नोव्हल करोना व्हायरस ! हे नाव पेपर मधे वाचून करमणूक व्हायची. मात्र 22 मार्च नंतर जेव्हा भारतात लॉकडाऊन झाले आणि तेव्हा माहिती झाले की खरंच करोना काय आहे आणि किती सर्वव्याप्त आहे. इंग्लंड च्या राजा पासून, भारतातल्या मंत्र्या पर्यंत कोणालाही होऊ शकतो.



यापूर्वी आपल्यावर कधी मास्क घालून फिरायची वेळ येईल असे कधी वाटले नव्हते. मात्र 22 मार्च 2020 नंतर सामान्य भारतीयाच्या जीवनात मास्क आला , सॅनिटायझर आला आणि सगळ्यात नकोशी गोष्ट आली ती म्हणजे ‘सोशल डिस्टंसिन्ग’ ! आता त्याची इतकी सवय झाली की उलट रस्त्यावर मास्क न घातलेली व्यक्ती दिसली तर वेगळे वाटते.

असे असले तरी आम्ही रहात असलेली हाऊसिंग कॉम्प्लेक्स आर्यावर्त, नाशिक मधे थोडेच लोक रहात असल्याने आम्हाला थोडीफार मोकळीक होती फिरायला आणि मास्कशिवाय थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळत होता.कॉम्प्लेक्स मधे भाजी,दूध औषधे,बेकरी प्रॉडक्ट्स ,फळफळावळ हे सर्व आत येत असायचे. रोज बातम्या ऐकायच्या, फिरायचे,व्यायाम करायचे आणि आपले शांत ,स्वस्थ जीवन जगायचे ! कंपौंड च्या बाहेर जाता येत नसले तरी कंपाउंड च्या आत मित्रांचा ग्रुप होता आणि रोज थोडे अंतर ठेऊन का होईना त्यांचे दर्शन व्हायचे. एकप्रकारे मानसिक आधार मिळायचा एकमेकांना !

ऑगस्ट मधे अमेरिकेत जाणे जरूर होते.आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने प्रथम काहीच मार्ग दिसत नव्हता. नंतर मे महिन्या मधे ‘वंदे भारत’ म्हणून भारत सरकार ने एअर इंडिया ची विमान सेवा सुरु केली ,ज्यामधे परदेशात अडकून पडलेले भारतीय ,किंवा भारतात अडकून पडलेले पण सध्या परदेशात स्थायिक झालेले भारतीय यांना जाण्याचे साधन मिळाले.मग मात्र जुलै मध्ये आम्ही मनाची तयारी केली की आता कधीतरी जायचे आहे. तिकडे जाण्याचे ठरण्या पूर्वी आम्ही गमच्या किंवा मोठ्या रुमालाचा मास्क वापरायचो जो अगदी सुखद होता. मग लोकांनी सांगितले की यु एस ला जायचे तर गमच्या वाला मास्क चालणार नाही, तर एन ९५ वाले मास्क घ्या. मग आम्ही एन ९५ चे आणले. ७-८ बाटल्या सॅनिटायझर तर ५ सॅनिटायझर स्प्रे आणले. हँडग्लोव्हज सुद्धा घ्यावे लागले. एवढी तयारी झाल्यावर कोणी सांगितले की विंडो वाले मास्क चालणार नाहीत. मग पुन्हा विंडो नसलेले २५ मास्क आणले.



मेडिकल हा एक स्वतंत्र भाग सुरु झाला.अमेरिकेत जायचे म्हंटले की डॉक्टर जरा जास्तच वेगळ्या तऱ्हेने ट्रीट करतात. आम्ही सुद्धा चार टेस्ट जास्त करून हेल्दी आहोत हे सिद्ध करून घेतले. पाच महिने जायचे असेल तरी दहा महिन्याचे औषधे घेतली. कारण कोणी सांगितले की पाच महिने जात असले तरी करोना मुळे तिथे अडकले तर औषधे मिळणार नाहीत. त्यामुळे मेडिकल स्टोर वालेही आमच्यावर खुश झाले .डझनाने मास्क घेणारे आणि शेकड्याने गोळ्या घेणारे आमच्या सारखे गिऱ्हाईक सहसा मिळत नसेल.

अशा प्रकारे आम्ही एका नवीन अनुभवासाठी सिद्ध झालो.



असे सांगण्यात आले की एजन्ट च्या सहाय्याने तिकीट काढले तर सोईस्कर होईल.मात्र एजन्ट ने अशी माहिती दिली की वंदे भारत मधून जायचे असेल तर RT-PCR ही करोना टेस्ट करून जावे लागेल. आता ही टेस्ट करण्यासाठी गुगल वर नासिक मधले जे जे नंबर मिळाले त्या सर्वांना फोन केला. फक्त एका नातेवाईकांनी सांगितले की एका हॉस्पिटल मध्ये जा आणि तुम्हाला टेस्ट करून मिळेल . तिथे गेलो. तिथे व्यवस्था अशी होती की टेस्ट करण्यापूर्वी तिथलेच डॉक्टर लेटर बनवून देत असत. डॉक्टर आणि टेस्ट यांची फी अर्थातच वेगळी होती. इथे आमची टेस्ट झाली.



करोना टेस्ट बद्दल व्हाट्स अँप युनिव्हर्सिटी मधून बरीच विचित्र माहिती मिळाली होती. करोना टेस्ट ही बरीच क्लेशदायक असते असेही ऐकले होते. तसे काहीही नव्हते ही टेस्ट मुद्दाम पॉझिटिव्ह रिझल्ट आणून महागड्या हॉस्पिटल मधे राहायला लावतात असेही त्यात सांगितले होते. त्यामुळे टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत आम्ही काळजीतच होतो. अखेर तो आला. वेळेअभावी आम्हाला लगेच टेस्ट रिपोर्ट नीगेटिव्ह मिळणे हेच आवश्यक होते.

आता आम्ही निधड्या छातीने साऱ्या जगात जाऊ शकत होतो. तरीही नाशिक ते पुणे एअर पोर्ट वर जाण्यासाठी ई-पास काढायचा होता. त्यासाठी डॉक्टर कडून असे प्रमाणपत्र पाहिजे होते की यांना ताप ,पडसे, घशाची खवखव वगैरे करोना चे लक्षण नाही. त्यामुळे जरी आम्ही आधीच्या प्रमाणपत्रानुसार जगात कुठेही जाऊ शकत असलो तरी ई-पास साठी पुन्हा डॉक्टर चे प्रमाण पत्र आवश्यक होते. अर्थात ते प्रमाणपत्र नाशिकचे डॉक्टर फारच विनासायास ठराविक फी घेऊन देतात .



मुले आणि मित्रमंडळी हे लोक अनेक सल्ले देत होते . त्यापैकी एका सल्यानुसार आम्ही ऑक्सिजन पाहण्याचे मशिन घ्यावे का नाही हा विचार करत होतो. तेही घेऊन टाकले. त्यात आमचे ऑक्सिजनचे प्रमाण ९८-९९% आहे हे पाहून धन्य झालो. काही लोकांच्या सुचने नुसार आम्ही पीपीई ड्रेस कुठे मिळतो तेही चौकशी केली. जाईपर्यंत मिळाला नाही.

शेवटी आमचे वंदे भारत मध्ये बिझिनेस क्लास मधे तिकीट झाले. एवढ्या तिकिटाच्या पैशात आम्ही दोघे वर्षभर घर चालवू शकतो हा एक विचार आला . पण जाणे अत्यावश्यक होते. त्यामुळे मुलांनी आमचे बिलकुल ऐकले नाही .


काही सज्जन लोकांनी तुमचे अन्न सोबत घेऊन जा. करोना मुळे विमानात काही मिळणार नाही असे सांगितले होते. तो सल्ला बऱ्याच अंशी खरा ठरला . सामान कमी घ्यायचे याबद्दल आम्हा दोघांचे एकमत होते.तरीही आमच्या दोघांच्या 20-20 किलोच्या प्रत्येकी दोन बॅग्स आणि शिवाय हॅन्ड बॅग्स झाल्या.

यावेळी ऑन लाईन बुकिंग आणि बोर्डिंग पास स्वतः प्रिंट करून घेणे कंपलसरी होते. ते केले होतेच. कॅब वाल्याने ई पास काढला होता.

या सगळ्या कामात आमचे नाशिकचे मित्र फारच मनापासून मदत करत होते . वास्तविक जाण्यापूर्वी सोशल डिस्टंसिन्ग पाळावे या दृष्टीने आम्ही फार कमी लोकांशी भेटत होतो . परंतु नासिकच्या मित्र परिवाराचे आभार मानावे तेवढे थोडेच. त्यांनी आम्हाला जे जे पाहिजे ते ते सर्व केलेच. शिवाय जाण्याच्या दि 28 तारखेला सकाळचा भरपूर टेस्टी नास्ता आणला. नाही नाही म्हणत असतांना जातांना निरोप द्यायला सुद्धा काही जवळचे मित्र आले. हे प्रेम आणि हा आपलेपणा केवळ अविस्मरणीय आहे.



आजकाल मोबाइल फोन हा एक अविभाज्य भाग झाला आहे.अनेक शुभेच्छुक मेसेज पाठवतात.ह्यावेळेस आमची अमेरिका भेट ही करोना च्या काळात होणारी असल्याने खास काळजी घ्या असा सल्ला देणारे फोन आणि मेसेज आले. आम्हाला अगदी कोविड योध्या प्रमाणे झाल्यासारखे वाटले.

आमची टॅक्सी अगदी वेळेवर आली आणि मित्रांनी सामानाला आम्हाला हातही लावू न देता गाडीत व्यवस्थित ठेऊन दिले. त्यांना टाटा करतांना अश्रू अनावर झाले.

टॅक्सी चा प्रवास पुण्या पर्यंत होता. टॅक्सी चा प्रवास आरामशीर झाला. वाटेत मित्रांनी दिलेला नास्ता घेतला .कारण बाहेर काही घ्यायचे नाही असे ठरवले होते.नंतर पुढे पुणे ते दिल्ली एअर इंडियाचा विमान प्रवास होता. तिथून पुढे सॅन फ्रान्सिस्को पर्यंत परत फ्लाईट होते .



पुण्यात गेल्यावर टॅक्सी तून उतरलो आणि ट्रॉली घेतल्या . दरवाज्यावर प्रथम सर्व सामानांना स्प्रे मारून निर्जंतुक केले गेले. आमच्या हातावर सुद्धा सॅनिटायर स्प्रे मारून पवित्र करून घेतले.

काचेच्या केबिन मधून एकाने दोघांचे तपमान पाहिले. एकाने पासपोर्ट आणि तिकीट पाहिले. सर्व काचेआडून,स्पर्श होऊ न देता. त्यानंतर आमचे आरोग्य सेतू अँप आमचे आम्ही ओपन करून आम्ही सेफ आहोत हे लांबून त्यांना दाखवावे लागले. करोना काळात भारतात किती काळजी घेतली जाते ते तिथे समजले. पुणे येथे प्रत्येक प्रवासी वेटिंग करताना एक सीट सोडून बसायची व्यवस्था होती.आम्ही तिथे बसून स्टॉल वरून आणून चहा घेतला. हा आमच्या प्रवासातला शेवटचा चहा! कारण दोन्ही फ्लाईट्स वर नंतर करोना मुळे कोणत्याही पेयपानाची सेवा नव्हती. मधून मधून चहा घेऊन ताजेतवाने होणारे आपण भारतीय , नंतर 24 तास चहा वीना ही राहिलो.

पुणे येथे प्रत्येक प्रवासी वेटिंग करताना एक सीट सोडून बसायची व्यवस्था होती. वंदे भारत योजनेत अनेक लोक मोठ्या संख्येने आले होते.सेक्युरिटी चेक सहित सर्व चेकिंग स्पर्श न करता झाले ,बोर्डिंग पास वर सुद्धा शिक्का न मारता फक्त स्कॅन केले गेले. पुण्याची शिस्त मात्र कौतुक करण्या सारखी होती.



पुण्यात विमानात बोर्ड होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाला पाच सॅनिटायर चे सॅचे ,एक मास्क आणि एक व्हायजर देत होते आणि ते घातल्यावर विमानात प्रवेश मिळत होता. अर्थात आम्हीही ह्या वस्तू नेल्याचं होत्या! पुणे ते दिल्ली प्रवासात प्रथम घोषणा केली गेली की या प्रवासात न्युज पेपर ,मॅगझीन , इतर कोणतीही करमणूक असणार नाही आणि पेयपान किंवा नास्ता अशी कोणतीही सेवा दिली जाणार नाही. बिझिनेस क्लास चे तिकीट असूनही काही नसल्याने थोडे खट्टू झालो. पण नाईलाज होता. विमानसेवा सध्या फारच कमी प्रमाणात सुरु असल्याने टेक ऑफ आणि लँडिंग यासाठी वेळ लागत नव्हता. यामुळे आणखी एक आश्चर्य म्हणजे आमचे फ्लाईट दिल्लीला चक्क १५ मिनिटे लवकर पोहचले.

आता हे बघायचे होते की दिल्ली ला आमच्या पुढे काय काय वाढून ठेवले आहे ते ! तिथे गेल्यावर पुढच्या आंतरराष्ट्रीय विमान साठी कुठे जायचे ते विचारून घेतले. तिथे प्रवेशा पूर्वी अनेक लोक बाहेर उभे होते. प्रत्येकाला प्रवेश करण्यापूर्वी स्वतः ला करोना ची काही लक्षणे नाहीत आणि आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर हा प्रवास करत आहोत असे लिहून देण्याचे असे तीन फॉर्म भरून द्यायचे होते . ते केल्यावर आम्ही आत गेलो. तिथे पुन्हा तपमान पहाणे झाले .शिवाय बॅग्स पुन्हा सॅनिटाईझ करून झाल्या. सेक्युरिटी चेक करून आम्ही आत गेलो. मधल्या वेळेत पुन्हा मित्रांनी दिलेल्या आणि घरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. घरून अन्न घेतांना असे वाटते कशाला त्रास घ्यायचा. पण बाहेरच्या ठिकाणी बसून जेव्हा आपण ते अन्न खातो ते खरोखर स्वर्गसुख आहे

.


शेवटी आमचे विमान स्क्रीन वर दाखवले.आम्ही त्या ठिकाणी वेटिंग साठी गेलो. तिथे खूप साऱ्या बेड सारख्याच खुर्च्या होत्या .त्या आम्ही प्रथमच पाहिल्या .त्यांना मसाज चेअर म्हणतात हे नंतर समजले. त्यावर पडून आराम करायला फारच बरे वाटले कारण दिवसभराच्या दगदगी मुळे पाठ टेकवणे सुखदायक वाटले. मात्र सगळीकडे बसतांना किंवा झोपतांना आम्ही आमच्या कडचा सॅनिटायर स्प्रे मारून घेत होतो .पडल्या पडल्या थोडा वेळ मास्क काढून फक्त व्हायजर लावला तेव्हा थोडे फ्रेश वाटले. एरव्ही जेवण खाणे ,पाणी पिणे आणि टॉयलेट मधे तोंड धुणे या व्यतिरिक्त आम्ही कुठेही मास्क काढला नाही.


साधारण दोन तीन तास आरामा नंतर आम्हा वंदे भारत सॅन फ्रांसिस्को वाल्यांना पुन्हा एकदा बॅग्स स्क्रिनिंग करता बोलावले. माझी पत्नी सौ दिप्तीचा नंबर मधल्या सीट वर आल्याने तिला आणि तिच्या सारख्या इतर प्रवाशांना पी पी ई किट दिला गेला . इतरांना फक्त सॅनिटायर ,मास्क आणि व्हायजर दिले. पी पी ई वाल्या सगळ्यांचा बहुदा तो पहिलाच अनुभव असल्याने प्रत्येकाने ड्रेस घालून फोटो काढून घेतले आणि लगेच मित्रांना पाठवले देखील !

विमानात सर्व स्टाफ हा पीपीई किट घातलेला होत्या .त्यामुळे हवाई सुंदरी ह्या कशा होत्या ते शेवटपर्यंत समजले नाही. त्या विमानात आम्हाला खाण्याचे काही पदार्थ एकदाच दिले. त्यातले तुम्ही काय ब्रेकफास्ट म्हणून खायचे ,काय जेवण म्हणून आणि काय स्नॅक्स म्हणून ते तुमचे तुम्ही ठरवायचे . मनोरंजन वगैरे सर्व बंद ठेवले होते. प्रवाशांचे मनोरंजन झाले तर करोना पसरतो असे डब्लू एच ओ ने जाहीर केले की काय माहित नाही . पण नियम म्हणजे नियम! आंतर राष्ट्रीय प्रवासात विमान किती वेगाने,किती उंचीवर,किती अंतर चालून गेले आहे,कोणत्या देशावरून चालले आहे ते सतत दाखवतात. ते तरी दाखवायला काहीच हरकत नव्हती.पण कोणाची तक्रार नव्हती. एकतर तुम्हाला एवढ्या पॅनडेमिक मध्ये घेऊन चाललो आणि वर तुम्ही हे सर्व मागता असा विमान कंपनीचा दृष्टिकोन असावा!




चहा,सूप किंवा इतर पेयपान हे काहीच दिले जाणार नाही हे प्रथमच जाहीर केले होते. पायलट सुध्दा गंभीर घेतले असावेत. कारण मधून मधून खराब हवामान शिवाय कसलीही माहिती त्यांनी वाटेत पुरवली नाही. याशिवाय एकदा प्रवाशी बसले की नंतर सर्व लाईट जे बंद करतात की ते नंतर उतरण्याच्या वेळीच सुरु करतात . करोना च्या ह्या अवघड काळात प्रत्येकाने थोडे मेडिटेशन करणे आवश्यक आहे असे कदाचित धोरण असावे असे वाटले. वास्तविक या माहिती आणि मनोरंजनाचा करोना शी काही संबंध असावा असे वाटत नाही.

अंधारात थोडे रिडींग करून, सापडेल ते खाऊन आणि बहुतांशी आराम करत आम्ही ते 16-17 तास काढले. एअर होस्टेस च्या एका ट्रिप मध्ये मी फक्त सॅन फ्रान्सिस्को ला किती वेळ उरला आहे ते विचारले 4 तास असे माफक उत्तर तिने दिले . दॅट्स गुड असे मीही सांगितले .यापेक्षा जास्त संवाद नाही.

मधूनच एअर होस्टेस इम्मीग्रेशन चे फॉर्म्स वाटून गेली . फॉर्म दिल्याने वाटले आता आले सॅन फ्रान्सिस्को! परंतु तसे नव्हते.त्यानंतर साधारण दीड तासांनी लँडिंग करीता बेल्ट बांधण्याची सूचना आली. सॅन फ्रान्सिस्को एअरपोर्ट वर मात्र काहीच नियम नव्हते . आमचे जुने मास्क आणि पीपीई किट फेकण्याची व्यवस्था होती. एअरपोर्ट वर सर्व प्रक्रिया सहज झाल्या . आपले सामान बेल्ट वर सापडवून ट्रॉली वर चढवणे यालाच काय तो वेळ लागला.

एक अधिकारी कस्टम ला जाण्यापूर्वी एक छोटे भाषण देऊन विचारात होता की तुम्ही फळे ,दारुगोळा बिया, शेंगा ,किमती वस्तू वगैरे काही बरोबर आणले आहे का. नाही उत्तर असल्यास सरळ चालायला लागा असे सांगत होता. ही पडत्या फळाची आज्ञा घेऊन सगळे भारतीय आपापले सामान घेऊन निघाले.



मधल्या काळात आम्ही आमचे वाय फाय सुरु केले होते .त्यामुळे बाहेर पडण्याच्या आताच जावयाचा फोन झाला . एकदा तो भेटून सामान गाडीत ठेवल्यावर हायसे वाटले.

घरी पोहोचताच सर्व नियम विसरून मुलगी आणि नातू सोहम हे स्वागताला आणि ओवाळायला आले . मात्र आम्ही स्पर्श होऊ ना देता त्यांना फक्त बघितले . आनंद मात्र खूप झाला त्यांना बघून. याचे साठी केला होता अट्टहास असे वाटले.

अशा तऱ्हेने एक वेगळा अनुभव देत प्रवास संपला आणि आम्ही सेल्फ क्वारन्टीन साठी सिद्ध झालो.




दीपक भालेराव

नाशिक

मोबाईल ९८६९३३२१६९

इमेल ddbhalerao1@gmail.com



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


480 views0 comments

Comentários


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page