top of page

प्रातःस्मरण



आपल्या दिवसाची सुरुवात करदर्शनाने करण्याची पूर्वापार प्रथा आहे.( सध्या मोबाईल दर्शन ही प्रथा पडली आहे. )

' कर' म्हणजे आपला तळहात.या तळहातानेच आपण जे चांगले...पुण्य कर्म करतो,पराक्रम करतो त्यालाच पुरूषार्थ म्हणतात. त्यामुळे सकाळी " करदर्शन" करून तळहातावरील पुरूषार्थ जागृत करणा-या या दैवी शक्तींना आवाहन केल्यावर चांगले फळ मिळते, हातून सत्कर्म घडते जे आपल्याला समाधान देते.


" कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।

करमूले तु गोविंन्दःप्रभाते करदर्शनम्॥


याचा अर्थ...तळ हाताच्या बोटांचा जो अग्रभाग असतो तेथे नेहमी लक्ष्मी( ऐश्वर्य) वास करते.तळहाताच्या मध्यभागी सरस्वती ( ज्ञानविद्या)वास करते व तळहाताच्या मूळभागी गोविंद वास करतो.म्हणून प्रातःकाळी उठल्यावर प्रथम करदर्शन करावे.


करदर्शन सकाळी जाग आल्यावर अंथरुणातच बसल्या जागी करावे. बाहेरच्या जगाला पहाण्यापूर्वी प्रथम करदर्शन करावे.

करदर्शन करतांना दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जुळवून त्या तळव्यांकडे पहात हा करदर्शनाचा श्लोक म्हणून दोन्ही तळव्यांचे एकमेकांवर घर्षण करून तळवे हळुवारपणे तोंडावर फिरवावे.


प्रातःस्मरणानंतर प्रातर्विधी आटोपून स्नान करून सूर्यदर्शन घ्यावे.सूर्यप्रकाशात थोडा वेळ शांत उभे राहावे.हेच सूर्यस्नान होय.सूर्यकिरणांचा प्रकाश अंगावर पडल्यामुळे आरोग्य चांगले रहाते.डोळे सतेज होतात.हे सूर्योदयाच्या वेळी करणेच चांगले. त्यानंतर प्रार्थना करावी...


" आदितस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने।

जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते॥


याचा अर्थ..जे रोज सूर्याचे दर्शन घेतात त्यांना सहस्त्र जन्मात दारिद्रय

येत नाही.


यानंतर रोज एका ठराविक जागेवर सूर्याची बारा नावे घेत बारा सूर्यनमस्कार घातले तर सर्व अंगाचा व्यायाम होतो.

सूर्याची बारा नावे....

ॐ मित्राय नमः ,

ॐ रवये नमः ,

ॐ सूर्याय नमः ,

ॐभानवे नमः ,

ॐखगाय नमः,

ॐ पूष्णे नमः ,

ॐ हिरण्यगर्भाय नमः,

ॐ मरीचये नमः ,

ॐ आदित्याय नमः,

ॐसवित्रे नमः

ॐ अर्काय नमः,

ॐ भास्कराय नमः


अशी दिनचर्या नियमित ठेवल्यास लहान थोर सर्वांनाच फायदेशीर आहे. सर्व गोष्टीत शिस्त येते, मन प्रसन्न व उत्साही राहते.त्याचा बुद्धी वर,विचार व आचरणावर चांगला परिणाम होतो.



सायंप्रार्थना ( Evening Prayer) सायंकाळी शक्यतो तासभर मोकळ्या हवेत खेळण्याने मन प्रसन्न व्हायचे, शरीर ताजेतवाने होऊन भूकही चांगली लागायची व नंतर दिवे लागण्याच्यावेळी घरात जाऊन स्वच्छ हातपाय धुऊन देवघरासमोर 'शुभंकरोती ' म्हणण्याची आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहे/ होती. प्रथा होती असेच आता म्हणावे लागेल. त्याचे प्रमुख कारण ऐंशीच्या दशकात आगमन झालेल्या व सायंकाळी सहा वाजता सुरू होणा-या "दूरदर्शन "(TV) कडे जाते.( नंतर आलेल्या मोबाईल ने तर..... ) तोपर्यंत मोकळ्या हवेत खेळणे,फिरणे सहज होत असे. सुरवातीला शनिवार/रविवारी संध्याकाळी दाखवले जाणारे प्रादेशिक/हिंदी चित्रपटामुळे लोकांचे बाहेर जाणे हळूहळू बंद झाले. आरंभी पाच/सहा तासचअसणारे (एका वाहिनीचे) प्रक्षेपण चोवीस तास (असंख्य वाहिन्यां सह) कधी झाले ते लक्षातही आलं नाही. परिणाम काय तर मोकळ्या हवेत खेळणे ,फिरणे बंद. दिवे लागण्याच्यावेळी 'शुभंकरोती 'ऐवजी मालिकांची शिर्षक गीते ऐकू येउ लागली.आता पंचवीशीत असलेल्यांना"सायंप्रार्थना " म्हणजे काय ते सांगावे लागते हे कटू सत्य आहे. यावर्षी " करोना " संकट आले व आपण सगळे खडबडून जागे झालो. 'वाईटातून चांगले होते 'याची खात्री आता पटते आहे.त्या सक्तीच्या संचारबंदी ( Lockdown) काळात हात ,पाय स्वच्छ धुणे व सायंप्रार्थना काही प्रमाणात का होईना सुरू झाली आहे. दिवेलागणीला स्तोत्र म्हणण्याचे फायदे.. १.पाठांतर चांगले होते,वाणी शुद्ध होते व उच्चार स्पष्ट होण्यास मदत होते. २.स्तोत्र पठणामुळे होणा-या सात्विक स्पंदनानी घराची शुद्धी होते. सायंकाळच्या प्रार्थनेस "शुभंकरोती " ने सुरूवात करावी. शुभंकरोति: शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदः । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतीर्नमोऽस्तु ते॥ दीपज्योति परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो हरतु मे पापं दीपज्योतीर्नमोऽस्तु ते॥ अर्थ: हे दीपज्योती! तू शुभ व कल्याण करणारी आहेस. तुझ्या पूजनाने आरोग्य व धनसंपदा मिळते.तुझ्या प्रकाशाने शत्रुबुद्धीचा नाश होतो म्हणून मी तुला नमस्कार करतो.तुझा प्रकाश हा प्रत्यक्ष परब्रह्माचे तेज आहे. म्हणूनच जगाचे दुःख हरण करणारी तू माझी पापवासना दूर कर. या प्रार्थनेबरोबर विष्णूस्तुतीचा एक,गौरीवंदनाचा एक व रामस्तुतीचे दोन असे कमीतकमी चार श्लोक म्हणावे. विष्णु स्तुती.. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगम। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं। वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलौकैकनाथम्॥ गौरीवंदन.. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणे नमोऽस्तु ते ॥. रामस्तुती.. रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥ नंतर रामरक्षा व मारूती स्तोत्र म्हणून घरातील मोठ्यांना नमस्कार करावा व थोडा वेळ अभ्यास/ इतर काही कामे करावी व रात्री ८ ते ९ दरम्यान जेवण करावे. जेवणाचे वेळी t.v. / mobile बंद ठेवावेत. जेवण झाल्यावर लगेच कधीही झोपू नये.घरातील सदस्यांशी विचार विनिमय करावा.शतपावली करावी.त्यानंतर उद्याची पूर्वतयारी ( शाळेचा गृहपाठ इत्यादी) करून दहा /पंधरा मिनिटे चांगले वाचन करावे. संतचरित्र , रामायण/ महाभारतील कथा ....अशा वाचनाने मन निर्मळ व सत् शील होते. रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण डोळे मिटून शांत बसावे व उपनिषदातील प्रार्थना हात जोडून म्हणावी. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण मेवावशिष्यते॥ अर्थ...ईशतत्व हे सर्व प्रकारे पूर्ण आहे.या पूर्णातूनच हे विश्व निर्माण झाले आहे. म्हणून तेही पूर्णच आहे. त्या पूर्णातून पूर्ण वेगळे केले तरीही शेवटी पूर्णत्वच राहते.ईशतत्व हे नेहमी आपलं पूर्णत्व कायम राखते. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया :। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात॥ सर्व जग सुखी व्हावे, सर्वांना निरोगी आयुष्य लाभावे तसेच सर्वांचे कल्याण होवून कुणालाही दुःखाचा स्पर्श होऊ नये. या प्रार्थनेनंतर ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणून शांतपणे झोपी जावे. लवकर झोपावे लवकर उठावे कारण " लवकर निजे ,लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे." अशाप्रकारे दैनंदिन संस्कार पार पाडले तर सर्वांनाच फायदेशीर आहे. सर्व गोष्टीत नियमितपणा येतो.शिस्त येते. मन प्रसन्न व उत्साही राहते. आचारविचारावर चांगला परिणाम होऊन आत्मविश्वास वाढतो. Nowadays Wi..Fi is everywhere like god ,. To use this service you require " password "... " Evening prayer " is password ..for peaceful life.

प्रेषक... श्री. सुधीर हरि तळवेलकर, मिशिगन, ग्रीनसीटी, अंबरनाथ ( पूर्व)४२१५०१. Tel...7387242211

Email.: sh17talvelkar@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

390 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page