पौष म्हणजेहिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पुष्य हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला पौष महिना असे म्हणतात. पौष हा मराठी वर्षाच्या कालगणनेनुसार दहाव्या क्रमांकाचा महिना आहे.


पौष महिना हा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे साधारणपणे डिसेंबर/जानेवारी महिन्यात येतो.सर्वसाधारणपणे पौष मासात लग्न,मुंज व इतर धार्मिक कार्यक्रम करीत नाहीत ,कारण हा महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो.काही लोक तर या महिन्यात शुभ कार्याची बोलणी सुद्धा करीत नाहीत ,पण या सगळ्या चुकीच्या समजुती आहेत असे वाटते,कारण या महिन्यात येणारा गुरूपुष्यामृताचा योग अतिशय चांगला व शुभ मानला जातो त्यामुळे पौष महिन्याला अशुभ म्हटले जाते ते मनाला पटत नाही. त्यामुळे या महिन्यात येणारी महत्वाची धार्मिक कामे पुढे ढकलणे योग्य नाही असे वाटते. ज्या पौष महिन्यात गुरुपुष्यामृत योग, आणि शाकंबरी देवीचे नवरात्र येते तो महिना अशुभ असेल असे वाटत नाही. पौष महिन्याला सूर्यदेवाचा महिना असे म्हटले जाते.त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केली जाते.या महिन्यात हेमंत ऋतु असल्यामुळे पौष महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना करायला सांगितली असावी. या दिवसामध्ये सूर्याचे ऊन चांगल्या प्रकारचे असल्यामुळे त्यातून भरपूर प्रमाणात आपल्याला " ड "जीवनसत्व मिळते आणि म्हणून आपली तब्बेत चांगली रहाण्यासाठी त्याची मदत होते. आपल्या संस्कृतीत सूर्य नमस्काराच पण फार महत्व आहे.सूर्याच्या उपासनेचे महत्व खालील श्लोकात सांगितले आहे.*आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वंती दिने दिने*

*जन्मांतरम सहस्त्रेशु दारिद्र्यम नोपजायते*

*अकाल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनं*

*सुर्यपादो दकंतीर्थं जठरे धारयामि अहम*वरील श्लोकामध्ये सूर्य नमस्कार घालून सूर्याची उपासना केल्यामुळे मनुष्याला अकाली मृत्यू येत नाही आणि सर्व व्याधींचा पण विनाश होतो असे सांगितले आहे.

या श्लोकामध्ये सूर्याच्या उन्हात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून ते पाणी प्यावे असे सांगितले आहे.मार्गशीर्ष महिन्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून भोगीच्या सणापर्यंत या काळाला धनुर्मास किंवा धुंधुरमास असे म्हणतात. धुंधुरमास पण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच भोगीच्या सणापर्यंत साजरा केला जातो. या दिवसांमध्ये तीळ या तेलबियांच उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात येत. तिळामधलं तेल आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी आणि उपयुक्त असते. या दिवसांमध्ये हवेत गारठा असल्यामुळे बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते, आणि लोण्याबरोबर खाल्ली जाते. या दिवसात भाकरी सोबत जुळी भाजी केली जाते. जुळी भाजी म्हणजे,वांगी,पावटा,घेवडा,हिरवा ओला हरभरा ,ओले शेंगदाणे,आणि गाजर या सगळ्यांची एकत्र रस भाजी करून बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते आणि मुगाच्या डाळीची खिचडी,साजूक तुपाबरोबर खाऊन भोगीचा सण साजरा केला जातोपौष महिन्याच्या प्रतिपदेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.हिंदू सणाची कालगणना चंद्राप्रमाणे पंचांगावर आधारित असते परंतु मकर संक्रांतीचे पर्व सूर्याच्या राशीबदलाप्रमाणे ठरविले जाते.तसं तर सूर्य प्रत्येक महिन्याला राशीबदल करीत असतो,त्यामुळे प्रत्येक महिन्यात संक्रांत (राशीबदल किंवा संक्रमण) असतेच.पण सूर्याच्या मकर संक्रमणाच्या वेळी उत्तरायणाला सुरुवात होते म्हणजेच पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकतो. त्यामुळे या संक्रमणाला विशेष महत्व आहे. त्यामुळे मकर संक्रांतीची तारीख दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी हीच असते. मकर संक्रांतीपासून ऋतुपरिवर्तन होते.शरद ऋतु क्षीण होतो आणि वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात होते. दिवस मोठे होत जातात आणि रात्री लहान होत जातात.भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. नवीन पिकं येतात आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळे वातावरण उत्साही आणि आनंदी असते त्यामुळे ही मकर संक्रांत पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये लोहडी या नांवाने साजरी केली जाते.तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यात मकर संक्रांत पोंगल म्हणून साजरी केली जाते.उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी या नांवाने मकर संक्रांत ओळखली जाते. आसाममध्ये ही संक्रांत बिहू या नांवाने प्रचलित आहे.तर गुजरातमध्ये या सणाला पतंगोत्सव साजरा करतात, व खूप मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून ते माघ महिन्याच्या सप्तमी पर्यंत (म्हणजेच रथसप्तमीपर्यंत) आपल्या महाराष्ट्रात सुवासिनी एकमेकींना हळदीकुंकू आणि तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणतात. आणि निरनिराळ्या वस्तूंचे,धान्यांचे वाण दिले जाते.सोबत तीळ आणि गुळाची वडी, पांढरा शुभ्र हलवा हे पण दिले जाते.घरामध्ये असलेली छोटी बाळे किंवा घरात नवीन लग्न होऊन आलेल्या सुनबाई यांना हलव्याचे दागिने घालून त्यांची तिळवण किंवा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या वेळेस बसू शकणाऱ्या लहान मुलांना काळे झबले आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून बोरनहाण पण घातले जाते. या वेळेला हवेत गारठा असल्यामुळे काळी वस्त्रे परिधान केली जातात. या दिवसात हवेतल्या गारव्यामुळे शरिरात आलेला रुक्षपणा घालविण्यासाठी घरोघरी गुळाची पोळी साजूक तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. एकूणच हवा चांगली असल्यामुळे सगळ्यांना भूक लागते आणि त्यामुळे दोन घास जास्तीचे जेवण होते,आणि त्यामुळे जेवण पचून शरीराला ऊर्जा मिळते.या दिवसात तयार होणाऱ्या भाज्या ( मटार,पावटा, उसाचे कर्वे,ओले हरभरे,बोरे, गाजर, रेवड्या) ह्या मातीच्या सुगडात घालून हे वाण पण सुवासिनी एकमेकींना देतात.एकूणच काय नवीन आलेली पिके,धन धान्याची सुबत्ता आणि वातावरणातला उत्साह यामुळे त्यातून मिळणारा आनंद एकमेकांना लुटण्याचा हा सण आहे.मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. या दिवशी संक्रांतीदेवीने किंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचापासून प्रजेला मुक्त केले. किंकरासुरचा अंत झाला म्हणून या दिवसाला किंक्रांत असे म्हटले जाते,आणि म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी संक्रांतीदेवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो. पंचांगात या दिवसाचा उल्लेख करिदिन आस आहे.