top of page

मुरली

(लेखिका: विजया ब्राह्मणकर)श्रावण महिना... पावसानं भिजलेली कृष्ण पक्षातील अष्टमी... रात्रीचे बारा वाजले... आणि कृष्णाचा जन्म झाला..कारागृहाची कडी कुलपं गळून पडली... देवकीच्या कुशीत पहुडलेल्या परब्रह्माला वसुदेवाने उचलून घेतले... ह्रदयाशी धरले... आणि विलंब न करता टोपलीत एका कापडात गुंडाळून ठेवले... ते कापड म्हणजे देवकीच्या पातळाचा रेशमी पदर... मायेचा पदर...


टोपलीत विसावलेला बाळकृष्ण डाव्या पायाचा अंगठा चोखीत होता. खरंतर देवकी वसुदेवाच्या मनीं माया, ममता, प्रेम, वात्सल्याचा पूर दाटलेला... पण मायेचा पसारा आवरून वसुदेवाने भरल्या डोळ्यांनी टोपलीतल्या बाल जीवाकडे बघणार्या देवकीचा डोळ्यांनीच निरोप घेतला आणि टोपली डोक्यावर घेऊन तो कारागृहा बाहेर पडला. 


आपल्या मुरलीने केवळ गोकुळालाच नाही तर अवघ्या विश्वाला वेड लावणारा मुरलीधर; साक्षात ब्रम्हांड नायक..त्याला छोट्याशा टोपलीत घेऊन वसुदेव गोकुळाकडे निघाला ..यमुनेच्या पाण्यातून वाट काढत वसुदेव जाऊ लागला आणि यमुना आनंदली. परब्रह्माच्या दर्शनासाठी ती वरवर चढत गेली कृष्णाचा पदस्पर्श झाला..आणि यमुना बघता बघता कृष्ण रंगाची झाली..


जगाचा पालनकर्ता बाळकृष्ण नंद यशोदेच्या स्वाधीन करून वसुदेव परतला. कृष्ण खरंतर संघर्षाचा अवतार .गोपाल कृष्णाने आपल्या बाललीलांनी नंदन यशोदेलाच नव्हे तर अवघ्या गोकुळालाच अंकित केले .सर्वाना आनंद देणारा नंद आणि यश देणारी यशोदा यशोदा यांचा लल्ला दिसामासी गोकुळात वाढू लागला.


मोहन यशोदेचा जीव की प्राण..मोहन म्हणजे मोहाचं हनन जिथे मोहाचा क्षय होतो तो मोहन..कृष्णाच्या बाललीलांनी अवघं गोकुळ कृष्णमय झालेलं. सार्या गोपी त्याच्याच मागे आणि राधा ती तर कृष्ण वेडी कृष्णाच्या मुरलीने ती नादावली. आज अक्रूर कृष्णाला मथुरेत नेण्यासाठी आलेला. नंदाच्या घराचं अंगण सडा संमार्जनाने पिवळंधम..ओलसर..मध्ये रांगोळी..आणि अंगणाच्या पलीकडे झाडाखाली अक्रूराचा रथ उभा. " तुझा उखळ सोडून कुठेही जाणार नाही "...असं यशोदेला सांगणारा  गोपाल कृष्ण मथुरेला जाण्याची तयारी करत होता ..त्याने सुंदर पोशाख केला .काळी घोंगडी खांद्यावर घेतली .गळ्यात मौक्तिकमाळ आणि तुळस मंजिरी हार.. काळ्याभोर कुरळ्या केसात मोरपीस खोवले . कृष्ण अनंताचा खेळ आहे..निघतांना त्याने हातात मुरली घेतली. एकवार घरभर नजर फिरवली. चित्रांकित भिंती न्याहाळल्या..क्षणभर दह्याच्या माठाशी थबकला. मग त्या माखनचोराने वर टांगलेल्या शिंक्याकडे बघितलं .जरा पाय उंचावून शिंक्यातील लोणी बोटाने घेतले आणि ते बोट तोंडात  घातले. कृष्णाला जातांना बघून नंद.. यशोदा रडत होते .समोर होऊन यशोदेने कान्हाला कवेत घेतले. काळजाचा तुकडा सोडवत नव्हता. 


यशोदेकडे तक्रारी घेऊन येणार्या गोपींच्या डोळ्यात श्रावण उभा..रथापाशी सवंगडी हरवल्या नजरेने उभे.मुरलीधर निघाला.मायेचा पसारा आवरून..गोप गोपींचा आकांत..यशोदेचा विलाप..गोकुळातील गायी पाणावल्या डोळ्यांनी गोपालाकडे बघत होत्या... एक एक पाऊल टाकीत घनश्याम रथाकडे निघाला..आपलं गोकुळ सोडून..गोवर्धन सोडून..गोधन सोडून..वृंदावनीची तुळस कोमेजलेली..पशूपक्षी केविलवाणे... माधव निघाला... झाडंवेली निश्चल..आणि यमुना स्तब्ध... रथाच्या अश्वाचे लगाम हाती घेऊन रथाचा सारथी... अक्रूर सारं बघत होता..आणि वाट बघत होता  ॠषिकेशाची... यशोदेचा आनंदकंद मिलिंद मुरली घेऊन खांद्यावरची घोंगडी सावरत रथाकडे निघाला.. डोळ्यात पाणी..कंठात हुंदका आणि यशोदेच्या ओठातून एकच शब्द निघाला "कान्हा..."


अवघं गोकुळ मुकुंदाच्या  जाण्याने वेडंपिसं झालेलं...

मातेच्या हाकेने  क्षणभर थांबला श्रीहरी..पण त्याला थांबूनही चालणार नव्हतंच...

मनातल्या मनात म्हणाला... कुंजबिहारी... "माते ,खूप  प्रेम दिलंस..तू आणि तुझ्या गोकुळाने..सर्वाचा मी ॠणी आहे."

आणि श्रीकृष्णाने एक पाऊल रथाच्या पादानावरती ठेवलं..दुसरं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने मागे वळून पाहिलं..सगळीकडे नजर फिरवली. काय शोधत होती कन्हैयाची नजर...?


एका झाडाखाली पापण्यांत पाणी घेऊन निश्चल उभी राहून रथात बसणार्या कृष्णाकडे बघणार्या रागावर कृष्णाची नजर स्थिरावली. राधा... एक अलौकिक तत्व..कृष्ण राधेचं सर्वस्व..मोक्षाची आस जिच्या ठायी ती राधा..आणि मोक्ष कृष्णापाशी..कृष्ण सार्याच्याच मनात वस्तीला..खरंच चालला माझा कृष्ण?..मला न भेटता? ..वेड्या राधेचा स्वतःलाच प्रश्न.. मुरलीधराने रथाच्या पायदाना वरील  पाऊल मागे घेतलं..पुढच्याच क्षणी मुरली घेऊन साक्षात परब्रह्म राधेच्या पुढ्यात..राधेने मनगटाने डोळे पुसले .श्रीकृष्णाच्या ओठांवर स्मित... ' घे '... आपल्या हातातील मुरली राधे समोर धरत गोपाल म्हणाला...


राधेने आपला गुलाबी तळवा समोर केला ..कृष्णाच्या अधरावरची मुरली राधे पाशी.. " राधे ,यापुढे मी मुरली कधीच वाजवणार नाही..वाजवेन तो फक्त शंख.." आणि श्रीरंगाने डोळ्यांनीच  राधेचा निरोप घेतला. खांद्यावरची घोंगडी सावरत घननिळा निघाला.

राधा डोळ्यात रत्नाकर घेऊन उभी...


केशव रथात बसला... श्याम सुंदराच्या रथाचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभल्याने अक्रूर धन्य... रथाचे अश्व हर्षित..क्षणभर समोरचे दोन्ही पाय उंचावून अश्व फुरफुरले..मार्गस्थ झाले... सर्वत्र आर्तता.. गोकुळ सुन्न... आता संयोग संपला होता... उरला होता शुध्द वियोग...

राधा मात्र तेथेच उभी... हातात मुरली घेऊन...


विजया ब्राह्मणकर

ईमेल: vijayapbrahmankar@gmail.com


344 views1 comment

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

1 Comment


विजया मॅडम कथा खरोखरच सुंदर..या कथे मधील राधेच्या मनातील अस्वस्थता ,तिची तगमग कळते कारण तिचा पूर्ण देहात आणि मनात सुद्दा कृष्ण ओतप्रोत भरला असतो...

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page