top of page

ज्येष्ठ महिन्याची माहिती

Updated: Jun 11, 2021

आपले मराठी वर्ष , ज्येष्ठ म्हणजे हिंदू कालगणनेप्रमाणे आणि आपल्या मराठी वर्ष गणनेप्रमाणे जेष्ठ हा वर्षातला तिसरा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठ नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला जेष्ठ महिना असे म्हणतात .वर्षातला सर्वात मोठा म्हणजेच जेष्ठ दिवस याच महिन्यात येतो म्हणूनही जेष्ठ महिन्याचे महत्व आहे. वैशाखातले लांबलेले काही लग्न मुहूर्त या महिन्यात असतात. वैशाखातली गरमी पुढे ज्येष्ठातही अजून चालूच असते. त्यामुळे सगळीकडे गरम झळांचं साम्राज्य असत. जमिनीखालच पाणी पण सुकून जाते त्यामुळे नद्या,विहिरी,तलाव कोरडे पडतात. जेष्ठ आषाढ महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतु असतो तो जेष्ठ महिन्यात सुरू होतो. सूर्याच्या उन्हाने खूप तापलेली धरती आणि आपण मानव प्राणीसुद्धा पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. या महिन्यात उकाडा अगदी असह्य होत असतो. गंगा दशहरा प्रारंभ : ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा . जेष्ठ शुद्ध प्रतिपदेला भगिरथाच्या प्रयत्नाने पृथ्वीवर आलेल्या गंगेचे अवतरण पृथ्वीवर झाले असे म्हणतात . या दिवसापासून जेष्ठ शुद्ध दशमीपर्यंत ही दशहरा पर्वणी साजरी केली जाते.आपल्या घरामधल्या देवांमध्ये ठेवलेल्या छोट्याशा घागरीतल्या गंगेचे या दिवशी पूजन केले जाते. गंगेची आरती म्हणून तिला नैवेद्य दाखविला जातो. प्रतिपदेपासून हळूहळू दशमीपर्यंत गंगेचा हा प्रवाह पूर्णपणे पृथ्वीवर अवतरला होता. त्यामुळे या दिवसात तिचे भजन,पूजन या गोष्टींना महत्व आहे .त्यानिमित्ताने आपल्याला जमेल तितक्या माणसांना अन्नदान करावे असे सांगितले आहे . कमीत कमी दहा ब्राम्हणांना तरी आमरसाचे भोजन द्यावे असे सांगितले आहे. या अन्नदानाला दशहऱ्याचे भोजन असे म्हटले जाते .या दिवसात आंब्याचे पण दान केले जाते . प्रसिद्ध संस्कृत कवी जगन्नाथ पंडित यांनी याच दहा दिवसांत गंगेचे वर्णन करणारे गंगालहरी नावाचे बावन्न श्लोकांचे स्तोत्र लिहिले आहे. अरण्यषष्ठी, विंध्यवासिनी पूजा जेष्ठ शुद्ध षष्ठीला अरण्यषष्ठी असे म्हणतात. त्या दिवशी विंध्यवासिनीची षोडशोपचारे पूजा केली जाते . ही विंध्यवासिनी माता म्हणजे उमा,पार्वती,चंडी, काली यांचेच रूप आहे. ती आदिमाता आहे.तिला दुर्गा म्हणून ओळखले जाते. दुर्गेचे गुणवर्णन करणारा सातशे श्लोकांचा जो ग्रंथ आहे त्याला दुर्गासप्तशती असे म्हणतात . या दिवशी सप्तशतीचा पाठही केला जातो. महाभारतात एक कथा सांगितली जाते. वसुदेव देवकीच्या आठव्या पुत्राला मारण्यासाठी कंस कारागृहात येतो त्यावेळी वसुदेवाने आधीच कृष्णाला यमुनेपार नेऊन नंदबाबाच्या हवाली केलेले असल्यामुळे देवकीच्या कुशीत मुलगी बाळ असतं. ती मुलगी असूनसुद्धा ती केवळ आठवी आहे म्हणून कंस तिला भिंतीवर आपटून मारण्यासाठी उचलतो आणि तो तसे करण्याआधीच ती त्याच्या हातातून निसटून आकाशात जाते. हे जे आदिमायेचे रूप आहे ती म्हणजेच विंध्यवासिनी दुर्गा माता. कंसाच्या हातून निसटून गेल्यावर दुर्गामातेने गंगेच्या तिरावर असलेल्या विंध्य पर्वतातील दाट आरण्याच्या ठिकाणी आपले वसतिस्थान केले म्हणून बहुतेक या तिथीला अरण्यषष्ठी असे म्हणत असावेत. उत्तर प्रदेशात मिर्झापुर जिल्यात विंध्य पर्वतावर दुर्गा मातेचे मंदिर आहे . या दिवशी तेथे तिची विशेष रूपाने पूजा अर्चा केली जाते. महाराष्ट्रात चिपळूण जवळ सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये विंध्यवासिनीचे मंदिर आहे . झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई काशीमध्ये तांबे दांपत्यांच्या पोटी जन्माला आलेली मनकर्णीका म्हणजेच मनू ही खरं म्हणजे महाराष्ट्रियन मुलगी. परंतु वडिलांचे कार्यक्षेत्र उत्तरप्रदेश/मध्यप्रदेश येथे असल्यामुळे तिकडेच तिचा जन्म झाला. राणी लक्ष्मीबाईंचे वडील पेशव्यांच्या पदरी नोकरीला असल्यामुळे तिचे बालपण पेशव्यांच्या सान्निध्यात गेले. पुढे ती घोडा फेकणे,तलवारबाजी, भालाफेक या सगळ्या युद्ध कौशल्यात प्रवीण होत गेली . स्वत: नानासाहेब पेशव्यांनी तिला हे सर्व शिकविले होते. अतिशय हजरजबाबी सर्व कामांमध्ये कुशल आणि अतिशय चाणाक्ष आणि हुशार अशी ही मनू होती . तिच्यातले हे गुण हेरून गंगाधरपंत नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह झाला आणि ती मनकर्णीका तांबेची सौ. लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर या नावाने झाशी संस्थानची राणी झाली . धोरणी,चतुर युद्धशास्त्र निपुण ,शूर आणि थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्माने कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये त्यांचा लहानपणापासून वावर होता. बाजीरावांच्या पदरी असलेले बाळंभट देवधर या मल्लखांब पटूंकडून त्या मल्लखांब विद्येतही तरबेज झाल्या. राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधरपंत नेवाळकर या दाम्पत्याला झालेलं बाळ त्याच्या जन्माच्या तीन महिन्यातच गेले आणि या धक्क्याने हाय खाऊन गंगाधरपंत पण काही काळाने निवर्तले.त्यांच्या निधनानंतर झाशी संस्थानचा कारभार लक्ष्मीबाई पहात होत्या. ब्रिटिश सत्तेने आणलेल्या कंपनी सरकार बरोबर शक्यतोवर जुळवून घेऊन त्या राज्यकारभार करीत होत्या पण शेवटी ब्रिटिशांनी झाशी संस्थान खालसा केल्याचे पत्र संस्थानाला पाठवलं आणि झाशीची राणी पेटून उठली.राणी लक्ष्मीबाईला हा ब्रिटिशांचा निर्णय अजिबात मान्य नव्हता आणि तिने "मेरी झाशी नही दूंगी," असे म्हणून बंडाचे निशाण उभारले. १८५७ च्या या लढ्यामध्ये राणीला तात्या टोपेंची पण साथ होती. पण एवढ्या मोठ्या ताकदवान ब्रिटिशांपुढे तिचे काही चालले नाही आणि झाशी संस्थान खालसा झाले . पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई या शूर राणीला वयाच्या तेविसाव्या वर्षी ( १८ जून ,१८५८ ) रणांगणात वीरमरण आले. ह्यू रोज या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा झाशीच्या राणीच्या पराक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. या मराठी राणीला भा. रा. तांब्यांच्या कवितेतल्या ओळी आठवून आज तिच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तिचे स्मरण करूया. रे हिंद बांधवा थांब या स्थळी l अश्रू दोन ढाळी ll ती पराक्रमाची ज्योत मावळे l इथे झाशीवाली ll गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी लोकमान्य टिळकांना समकालीन असणारे सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी जन्मलेले (१४ जुलै,१८५६ ) गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्राला समाज सुधारक म्हणून परिचित आहेत. ते एक उत्तम पत्रकारही होते. त्यांनी केसरी,मराठा,आणि सुधारक या तीन वृत्तपत्रांचा समाज सुधारण्यासाठी आधार घेऊन महिलांना शिक्षण दिले पाहिजे या मताचा आग्रह धरला होता. सामाजिक समता,स्त्री पुरुष समानता,आणि विज्ञान निष्ठा ही त्यांची जीवन मूल्ये होती.मॅट्रिक झाल्यावर कॉलेज शिक्षणासाठी आगरकर पुण्याला आले. पुढे एम. ए. करताना त्यांची लोकमान्य टिळकांशी ओळख झाली. केसरी हे वृत्तपत्र काढण्यासाठी लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता ,आणि केसरी वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर हे पहिले संपादक होते . आगरकर आणि टिळक यांनी१८८१ मध्ये इंग्रजीतून मराठा तर मराठीतून केसरी अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. टिळक आणि आगरकर या दोघांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करून पुढे ते याच कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. १८८८ साली आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले . स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता . बालविवाह आणि अस्पृश्यता या सारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता . वयाच्या अवघ्या एकूणचाळीसाव्या वर्षी ( १७ जून,१८९५ ) त्यांचे पुणे येथे निधन झाले .त्यांच्यावरचा मृत्यूलेख केसरीसाठी लिहिताना त्या दोघांमध्ये टोकाची मते असल्यामुळे झालेले वितंडवाद विसरून लोकमान्य टिळक यांनी हा मृत्यूलेख आगरकरांच्या आठवणीने व्यथित होऊन रडत रडत पुरा केला होता असे म्हणतात. गायत्री जयंती ; जेष्ठ शुद्ध एकादशी जेष्ठ शुद्ध एकादशीला गायत्री जयंती साजरी केली जाते. गायत्री देवीची या दिवशी पूजा अर्चा,आराधना आणि गायत्री मंत्राचे पठाण एकशे आठ वेळा केले जाते .देवी गायत्री ही ब्रह्मदेवांची दुसरी पत्नी आहे असे म्हटले जाते. ब्रह्मदेवांनी आपल्या चार मुखांनी सांगितलेले चारही वेद गुरू विश्वामित्रांनी आम जनतेसाठी सर्वांपर्यंत पोहोचवले . असे म्हणतात की गायत्री मंत्र जो आहे तो ह्या चार वेदांचे सार आहे .त्यामुळे गायत्री मंत्राचे पठण केले की चारही वेदांचे ज्ञान आपल्याला मिळते असे म्हणतात . असे म्हणतात की हे चार वेद ,अठरा पुराणे यांची माता ही गायत्री देवी आहे. महाराष्ट्रातील चोपडा येथे गायत्री देवीचे शक्तीपीठ आहे. येथील गायत्री शक्तीपीठ मंदिरात गायत्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते .त्यामुळे गायत्री देवीला भारतीय संस्कृतीची जन्मदात्री आहे असे म्हटले जाते . जप करण्यासाठी गायत्री मंत्र खालीलप्रमाणे. ॐ भूर्भुवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यम्। भर्गो देवस्य धीमही। धियो योनः प्रचोदयात्। धर्मवीर संभाजी महाराज जयंती , ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. जेष्ठ शुद्ध द्वादशी या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असते.त्यांचा जन्म १४ मे,१६५७ या तारखेला पुरंदर किल्यावर झाला .शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांवर अपार प्रेम होते. पण नशिबाचे फटके संभाजी महाराजांना खूप लहानपणापासूनच सोसावे लागले होते. ते दोन वर्षाचे असतानाच त्यांची आई सईबाई यांचे अकाली निधन झाले .त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची आजी म्हणजे जिजाबाई यांनी केला . केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले . सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. ते नऊ वर्षांचे असताना शिवाजी महाराजांबरोबर आग्रा मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांनी जवळून राजकारणाचे धडे घेतले . संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला .ते अतिषय बुद्धिवान आणि कुशाग्र बुद्धीचे होते . त्यांना मराठी,हिंदी,इंग्रजी,संस्कृत,आणि फारसी इत्यादी भाषा अवगत होत्या. धर्मवीर संभाजी महाराज हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते .अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य,प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व,संस्कृत पंडित,धर्माभिमानी ,व्यासंगी असा हा आदर्श राजा होता. समाजकारण, राजकारण अर्थकारण,धर्मकारण इत्यादी क्षेत्रात ते पारंगत होते. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. गनिमी काव्याचा अतिशय कल्पकतेने उपयोग करून त्यांनी औरंगजेबाला पुरेसे जेरीस आणले होते. संभाजी महाराज यांना एकाही लढाईत अपयश आले नाही. त्यांना टक्कर देणारा एकही योद्धा त्यावेळी हिंदुस्थानात नव्हता. औरंगजेबाने धर्म बदलण्यास नकार देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय अमानुष आणि अनन्वित छळ केला.असह्य वेदना आणि यातना सहन करूनही संभाजी महाराजांनी चाळीस दिवस तो छळ सहन केला आणि चाळीस दिवसांनी फाल्गुन अमावास्येला (११ मार्च,१६८९ ) या दिवशी संभाजी महाराजांचे देहावसान झाले. असह्य वेदना सहन करून सुद्धा संभाजी महाराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.,आणि म्हणून संभाजी महाराजांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. शिवराज्याभिषेक दिन : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ,(६ जून , १६७४) शिवाजी महाराज हे अभिषिक्त राजे नसल्याने सुरुवातीला अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना आणि त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामिनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला ) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेख आवश्यक होता. महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांचा तिथीनुसार राज्याभिषेक झाल्याचा दिवस जेष्ठ शुद्ध त्रयोदशी हा आहे ..या दिवशी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे .छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ आईसाहेबांच्या साक्षीने बत्तीस मण सोन्याच्या भव्य सिंहासनावर बसवून काशीहून आलेल्या गागाभट्ट आणि इतर विद्वानांच्या उपस्थितीत सप्त नद्यांच्या पाण्याचा अभिषेक शिवाजी महाराजांवर करून रायगडावर हा राज्याभिषेक सोहोळा मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा झाला होता .मराठी माणसांना आजही श्री. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्याबद्दल अतिशय अभिमान आहे,आणि आदरही वाटतो.म्हणून आजही आपण महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा रायगडावर दरवर्षी साजरा करतो . या निमित्ताने शिवाजी महाराज्यांच्या नावाने एक मुद्रा महाराजांनी महाराष्ट्राला सादर केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती ती खालील प्रमाणे संस्कृत भाषेतील राजमुद्रा : प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।" राजमुद्रेचा मराठीत अर्थ : प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. वटपौर्णिमा : ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यम देवाकडून परत आणले आणि आपले सौभाग्य टिकविले तो दिवस जेष्ठ शुद्ध पौर्णिमेचा होता म्हणून या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला जेष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करून वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाखालीच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले म्हणून या दिवशी वडाच्या झाडाचे महत्व आहे . पूर्वी गावागावांमध्ये वडाची झाडे खूप असायची.असं म्हणतात की वडाच झाड हे इतर सर्व झाडांपेक्षा जास्त प्राणवायू उत्सर्जित करते. त्यामुळे माझघराच्या बाहेरही येऊ न शकणाऱ्या स्त्रियांनी या वडाच्या झाडाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ रहावे ही त्यामागची कल्पना असावी असे वाटते. हल्लीच्या काळात शहरीकरणामुळे वडाची झाडेच फारशी दिसत नाहीत,त्यामुळे वडाच्या झाडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची अतिशय चुकीची प्रथा पडली आहे आणि यामुळे वृक्षतोड होऊन निसर्गाचाही ऱ्हास होत आहे हे कोणाच्या लक्षात पण येत नाही . या व्रताच्या निमित्ताने एक पौराणिक कथा सांगितली जाते. शाल्व देशीचा राजा द्युमत्सेन अंध होता. त्याला एक सत्यवान नावाचा मुलगा होता.हा सत्यवान अल्पायुषी होता ही गोष्ट नारदमुनींना माहिती होती. भद्र देशीच्या राजाला सावित्री नावाची रूपवती कन्या होती. तिने या अल्पायुषी सत्यवानाला आपला पती म्हणून निवडले. सावित्री आपला पती आणि पराभूत झाल्यामुळे वनामध्ये रहाणारे तिचे अंध सासरे आणि सासूबाई यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचे आयुष्य तीन दिवसांवर येऊन ठेपल्यावर नारदमुनींनी सांगितल्याप्रमाणे सावित्रीने एक व्रत सुरू केले त्याचे नाव सावित्री व्रत.सावित्री जेव्हां सत्यवानाबरोबर जंगलात लाकडे तोडावयास गेली तेव्हां सत्यवानाला घेरी येऊन तो जमिनीवर पडला. त्यावेळी यमराज तिथे येऊन सत्यवानाचे प्राण नेऊ लागले परंतु सावित्रीने त्यास नकार दिला .सावित्रीच्या व्रताचा हा पहिला दिवस होता.त्यानंतर ती सतत दोन दिवस यमराजाकडे आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण मागत राहिली. शेवटी यमराजाने कंटाळून सावित्रीकडे तिच्या पतीचे प्राण परत मागणे सोडून तिला तीन वर माग असे सांगितले .,पहिल्या वराने तिने आपल्या अंध सासऱ्यांना दृष्टी मागितली.दुसऱ्या वराने तिने सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले आणि तिसऱ्या वराने तिने सत्यवानाचा वंश पुढे चालू रहाण्यासाठी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तीनही वर सावित्रीला दिल्यावर तिसऱ्या वराला अनुसरून यमराजांना सत्यवानाचे प्राण पण परत द्यावे लागले. आणि हा दिवस जेष्ठ पौर्णिमेचा होता आणि ते सारेजण वडाच्या झाडाखाली बसलेले होते.म्हणून या दिवसाला वटसावित्री,वटपौर्णिमा असे म्हणतात आणि या व्रताला सावित्री व्रत असे म्हणतात . जेष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. संत कबीर जयंती : ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा जेष्ठ पौर्णिमेस काशी येथे एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. त्या काळी विधवेचे जिणे फार लाजिरवाणे असल्यामुळे तिने त्या मुलाला काशीतील एका सरोवराच्या (लहरतारा) काठी टाकून दिले. पुढे ते बाळ एक मुस्लिम जोडप्याला सापडले.त्यांनी या मुलाचा चांगला सांभाळ केला आणि त्याला वाढविले. तोच मुलगा पुढे संत कबीर या नावाने ओळखला जाऊ लागला . संत कबीर जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते तरी ते श्री. रामाचे निस्सीम उपासक होते . पंढरीच्या पांडुरंगालाही ते मानीत होते. कुठल्याही धर्माचं उपास्य दैवत किंवा त्याची उपासना करणारे कुठल्याही धर्मातले लोक यांना कुठल्याही जातीचे,धर्माचे,देवतेचे,पूजा अर्चनाचे बंधन असू नये असे सर्व धर्म समावेशक शोभणारे असे त्यांचे मत होते. संत कबीर कुटुंबवत्सल होते. त्यांच्या कुटुंबात बायको आणि दोन मुले होती. ते विणकर म्हणून काशीत काम करीत होते . काम करीत असताना ते भजने आणि दोहे गाऊन देवाची भक्ती करीत असत.संत कबीर दासांचे दोहे प्रसिद्ध आहेत. संत कबीर हे मानवजातीचे,मानवतेचे पुजारी होते . भारत देशात रहाणारे सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून रहावेत, त्यांनी एकमेकात भांडू नये,आणि सुखात रहावे या करिता संत कबीर दासांनी प्रयत्न केले होते . त्यामुळे त्यांना हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. जेष्ठ पौणिमेच्या दिवशी संत कबीर दासांची जयंती असते . भारत सरकारतर्फे विणकऱ्यांना संत कबीर दासांच्या नावाने पुरस्कार पण दिला जातो . छत्रपती शाहू महाराज भोसले जयंती : २६ जून,१८७४. छत्रपती शाहू महाराज भोसले यांचा जन्म २६ जून,१८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला .त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते. वयाच्या दहाव्या वर्षी यशवंताला कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, १८८४ या दिवशी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले. इ.स. १८८९ ते १८९३ या चार वर्षाच्या कालखंडात धारवाड (कर्नाटक राज्य) येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारिरिक विकास झाला . १ एप्रिल , १८९१ या दिवशी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला . पुढे २ एप्रिल , १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला . राज्याभिषेक समारंभ झाल्यानंतर इ. स. १९२२ सालापर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला . अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला . पुढे त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली . उच्चशिक्षित असलेले शाहू राजे यांनी रयतेच्या उपयोगी पडतील अशी अनेक कामे जाणीवपूर्वक केली होती. त्यामुळे असा राजा होणे नाही असेच प्रजेला अजूनही वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारा राजा म्हणून शाहू महाराजांनी आपली वेगळी ओळख समाजात निर्माण केली होती . संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान,देहू : ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान,आळंदी : ज्येष्ठ कृष्ण अष्टमी संत तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव,नारायण बाबा यांनी इ . स.१६८० नंतर ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एकत्रित पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली तेंव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला . त्याआधी शेकडो वर्षापासून पायी वारी करण्याची परंपरा होती. इ. स.१८३५ च्या दरम्यान हैबतबाबा आरफळकर यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचा स्वतंत्रपणे पालखी सोहळा सुरू केला. तेंव्हापासून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज अशा दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जातात आणि आषाढ शुद्ध दशमीपर्यंत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला पोहोचतात . जेष्ठ कृष्ण सप्तमी या दिवशी तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालून, पूजा आरती झाल्यावर काल्याचे कीर्तन करून देवळाला प्रदक्षिणा घालून देहूतून तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडून इनामदार वाड्यामध्ये येऊन थांबते आणि विसावा घेते. दुसऱ्या दिवशी ही तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवते. जेष्ठ कृष्ण अष्टमीला श्री . ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा आळंदीमध्ये पार पडतो . ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालून त्यांची पूजा,आरती आणि नंतर काल्याचे कीर्तन करून पालखी मंदिर प्रदक्षिणा करून आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. या पालखीचा पहिला विसावा हा आजोळघरी असतो. जेष्ठ वद्य अष्टमीपर्यंत सर्व संतांच्या पालख्या आळंदीत येऊन पोहोचतात आणि पुढे विठ्ठल नामाच्या गजरात या सर्व पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात . "माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी" असे म्हणत म्हणत या सर्व पालख्या पुढे जात रहातात आणि आषाढी एकादशी पर्यंत पंढरपुरात जाऊन पोहोचतात . राजमाता जिजाबाई भोसले पुण्यतिथी : ज्येष्ठ वद्य नवमी. राजमाता जिजाऊ,आऊसाहेब म्हणजेच स्वराज्यजननी जिजामाता या मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. मराठवाड्यातील सिंदखेड राजा हे गाव म्हणजे त्यांचे माहेर. देवगिरीच्या यादवांचे वंशज असलेले लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई हे होते. दौलताबादच्या भोसले घराण्यातील शहाजी राजांशी इ.स. १६०५ साली डिसेंबर महिन्यात जिजाबाईंचा विवाह झाला. काही व्यक्तिगत वादावरून जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे यांच्यात बेबनाव झाला आणि त्याचे रूपांतर जिजाबाईचा भाऊ दत्ताजी जाधव आणि शहाजी राजांचा मोठा भाऊ संभाजी राजे यांच्यावर प्राणांतिक हल्ले करून दोघांनी एकमेकांना मारून टाकण्यात झाले . त्यानंतर जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे भोसले यांच्यात कायमचे वैर निर्माण झाले. यानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण श्री.शिवाजी राजे यांच्यात पुरेपूर उतरला होता. सिंधखेडच्या लखुजी जाधवांच्या वतनाच्या गावांमधली रयत,तिचे होणारे हाल,अनिष्ट छळ लहानपणापासून बघणाऱ्या जिजाबाई मराठ्यांना अभय देणाऱ्या, रयतेला सुखी,समाधानी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या स्वराज्याची स्वप्ने आपल्या लहानपणापासूनच पहात होत्या.,आणि ते स्वप्न त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्याकडून पूर्ण करून घेतले. श्रींच्या इच्छेने मराठ्यांचे साम्राज्य उभे राहिले. या स्वराज्याची जननी जिजाऊ आऊसाहेब होत्या म्हणून त्यांना स्वराज्य जननी जिजामाता असे म्हणतात . शहाजी राजांच्या पुणे आणि सुपे जहागिरीला जिजाबाईंनी स्वराज्य स्थापून योग्य तो न्याय मिळवून दिला . शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी जिजामातेने १७ जून,१६७४ या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी शेवटचा श्वास घेतला, तिथेच त्यांची समाधी आहे . जेष्ठ वद्य नवमीला राजमाता जिजाबाईंची पुण्यतिथी असते म्हणून आपण त्यांची आठवण काढून त्यांना वंदन करूया . संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी : जेष्ठ वद्य द्वादशी (तिथीप्रमाणे) संत निवृत्तीनाथांनी ब्राम्हगिरीच्या डोंगरावर जेष्ठ वद्य द्वादशीला संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथ इ.स.१२७३ साली विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी यांच्या पोटी जन्माला आले. ते ज्ञानेश्वर,सोपानदेव आणि मुक्ताबाई या तीन भावंडांचे मोठे बंधू होते. या चार भावंडांच्या आई वडिलांना त्या काळच्या धर्मपिठाने देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले आणि ते त्यांनी घेतले. त्यानंतर निवृत्तीनाथांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्या भावंडांना सांभाळले. धाकट्या तीन्ही भावंडांना निवृत्तीनाथ हे गुरुस्थानी होते . संत निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती. त्या वेळेला त्यांना जे नाथसंप्रदायाबद्दलचे आकलन झाले ते त्यांनी आपला धाकटा भाऊ संत ज्ञानेश्वरांना शिकविले .निवृत्तीनाथांनी संस्कृतात असलेली आणि सामान्य माणसांना कळावयास अवघड असलेली भगवतगीता ज्ञानेश्वरांना प्राकृत भाषेमध्ये लिहावयास सांगितली .ती म्हणजे आपली ज्ञानेश्वरी .तीनशे ते चारशे अभंग आणि एक हरिपाठ या रचना संत निवृत्तीनाथांनी केल्या . योगाचा अर्थ सांगणारे, अद्वैत भक्तीचे वर्णन करणारे आणि कृष्णमहिमा सांगणारे ते अभंग आहेत. निवृत्तिदेवी, निवृत्तीसार आणि उत्तरगीता टीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वर,सोपानदेव आणि मुक्ताबाई या तिघांच्या देहत्यागानंतर संत निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरला जेष्ठ वद्य द्वादशीला (१७ जून १२९७) संजीवन समाधी घेतली. तिथेच त्यांची समाधी पण बांधली आहे . श्रीमंत नानासाहेब पेशवे स्मृतिदिन. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे सुपुत्र. ते थोरले बाजिरावांनंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले. नानासाहेबांनी पुण्यातल्या कात्रजच्या तलावातले पाणी त्या काळात शनिवार वाड्यात आणून पुण्याची पाण्याची सोय केली. नानासाहेबांना २५ जून,१७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली . त्यांच्या काळात मराठी साम्राज्य एक बलाढय साम्राज्य समजले जात होते . पण पानिपतची तिसरी लढाई झाली आणि त्या लढाईत सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेबांचा मुलगा विश्वासराव मारले गेले . या धक्क्यातून नानासाहेब पेशवे बाहेर येऊ शकले नाहीत आणि त्या दुखानेच २३.०६.१७६१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या हातात पेशवाईचा कारभार सोपविला गेला. नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटल जवळ आहे . पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या नावाने धार्मिक आणि अध्यात्मिक पुरस्कार देते. फाल्गुन महिन्यात होळी पौर्णिमेला सगळीकडे होळया पेटविल्या जातात तेव्हापासून हवेत जी उष्णता असते ती अगदी जेष्ठ महिना संपून आषाढ महिना लागेपर्यंत असते. त्यामुळे जेष्ठ आणि आषाढातल्या बऱ्याचशा दिवसांपर्यंत ग्रीष्म ऋतु असतो. आषाढामध्ये कधीतरी पाऊस पडतो तेव्हा हवेत थोडासा गारवा निर्माण होतो इतकेच. पण हवा म्हणावी इतकी गार झालेली नसते. शेतकरी मात्र मृग नक्षत्राचा पाऊस पडेल आशा आशेने आभाळाकडे डोळे लावून असतात,कारण त्यांना शेतीच्या कामांना सुरुवात करावयाची असते . बाकी सगळीकडे हवा अतिशय गरम असते. सूर्याचे किरण जमीन भाजून काढीत असतात. शेतकऱ्यांच्या मताने जमीन जेवढी भाजून निघेल तेवढा पाऊसही चांगला पडतो. या तापलेल्या गरम हवेमध्येसुद्धा उन्हाळी फुलांची झाडे,गुलमोहोर,बहावा, नीलमोहोर,पळस,पांगारा,पांढरा चाफा आपले वैभव मोठ्या दिमाखात मिरवत असतात,त्यामुळे डोळ्यांना सुख मिळते. माठातले गार पाणी,पन्हे,निरनिराळी सरबते,आईस्क्रीम इतके गार गार पदार्थ खाऊन पिऊन आपण आपली तहान तात्पुरती भागवत असलो तरी येणारे गरम वारे घाम यामुळे कंटाळलेली आपण माणसं पशु पक्षी तापलेली जमीन झाडे वेली हे सर्व येणाऱ्या पावसाची वाट पहात असतात. जेष्ठ आणि आषाढ या दोन महिन्यांच्या काळाला ग्रीष्म ऋतु असे म्हणतात .ग्रीष्म ऋतुमध्येच मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यामुळे या पावसाची जनावरे, पशुपक्षी,शेतकरी,कोरडं पडलेले शिवार सारेजण वाट पहात असतात. अशा मृगाच्या पावसाचे रसाळ वर्णन करणारी कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची एक सुंदर कविता खाली देत आहे . माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ, वाजताहे रानवारा चिवारीच्या झुडुपांत ! पिऊनिया रानवारा खोंड धांवे वारेमाप, येतां मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातींत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत ! धारा वर्षतां वरुन बैल वशिंड हालवी, अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी ! गावानेच उंच केला— हात दैवी प्रसादास, भिजुनिया चिंब झाला गावदेवीचा कळस. निसर्गाने दिले धन— —द्यावे दुसऱ्यां, जाणुनी, झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणी ! स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश ! आता बसेल माउली अन्नब्रम्हाच्या पूजेस ! (संग्रहित) कवी : ग.दि. माडगूळकर. सौ . उमा अनंत जोशी , ११.०६.२०२१ ४/४८,सोनल --२ , जयराज सहकारी गृहरचना संस्था,आयडियल कॉलनी, कोथरूड,पुणे ४११०३८ फोन : ०२०२५४६८२१३ / मोबा.९४२०१७६४२९. मेल : anantjoshi2510@gmail.com

949 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page