(सौ. विद्या दुधारकर)
बहु थोर रांगडी, सोनबांगडी, माय मराठी आमुचीl
परंपरा ही तिला लाभली,
संत सांप्रदायाची, ज्ञानोबा तुकयाची IIध्रूII
गजरात मृदंगाच्या, भजनात विठोबाच्या,
कवनात नामदेवाच्या, ओवीत जनाबाईच्या
चराचरातून घूमे नभातून, नाद कीर्तनाचा,
हा मान मराठीचा, बहुमान मराठीचा II१II
तू गुरु माऊली, तू सकळ साऊली
तू दीप राऊळी, नच कधी मावळी
अज्ञानाची करुन होळी, चेतवल्यास मशाली,
कैवल्या महाली, ज्ञानाच्या पखाली II२II
ती तव शब्दांची धार, तू तेज म्यान तलवार,
तू करूण रसाचे सार, तू नित्य नवी सुकुमार
तुफान दर्शी, परीसस्पर्शी, विलसित हर्षी मनी
तू मायमराठी गुणी, मी सदा तुझा ग ऋणी II३II
जरी लाट, आधुनिक युगाची, तरी तुझा, घेतला वसा
तुझ्या मुळाशी, नाळ बांधली, उतराई मी, होऊ कसा
जरी भटकलो, जरी गुंतलो, परी मनावर, तुझा ठसा
तुझ्या चरणकमलांच्या ठायी, प्राणपुष्प अर्पिला जसा
तुझ्या नामघोषात दुमदुमे आसमंती तुतारी,
नभांगणी ललकारी II४II
सौ. विद्या दुधारकर
ईमेल: vidyaganesh3025@gmail.com
कविता कशी वाटली ? व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर नक्की शेअर करा.
Comments