top of page

बाबांची माया
काय सांगावी जादूई ती "बाबा"

ह्या नावाची, माया लाभली जीवनी ज्यांना, नशीबवान त्या सार्‍या लेकी असती !

उच्चारताच तो शब्द ओठांवरती, मनातील भावना सार्‍या उचंबळून येती, अन अश्रूंना मोकळी वाट करून देती !!सहवास मजला लाभला भरभरून त्या पित्याचा, परि अजूनी उणीव त्यांची भासत राही क्षणाक्षणाला !

सानपणीच्या गोड आठवणींची ठेऊनी शिदोरी आपल्यापाशी, लेकीची सासरी पाठवणूक केली धरूनी समाजरितीला !!जड अंतःकरणाने काळजाचा तुकडा आपल्या, जतन करण्या दिला परक्या हाती कायमचा !

बाप-लेकीमधील अंतर दूर दिसतसे देहापुते, परि जवळीक ती असे अंतर्मनाची सदाची !!कष्ट ते अपार सोसले पित्याने लेकीच्या सुखासाठी, कित्येक रात्री जागोनी काढल्या, कर्तव्य आपले चोख बजाविले !

मनाजोगते लेकीला स्थळ मिळता धन्य तो पावला पिता, जन्माचे त्याच्या सार्थक होवोनी, कृतकृत्य तो झाला !!जोवरी पिता हयात असे ह्या दुनियेत, तोवरी निश्चिंत असती सार्‍या लेकी आपापल्या घरी !

छत्र हरपताच पित्याचे माथ्यावरूनी लेकीच्या, सुनी सुनी भासतसे दुनिया तिजला सारी !!अशा माता-पित्याच्या उदरी येऊनी जन्मासी, भाग्यवान मी जाणोनी मजला, आभार मानते त्या परमपिता परमेश्वराचे !

"होऊ कशी उतराई" मी माता-पित्याची, माणूस म्हणोनी घडविण्या शिकविले मजला, बीज रूजवूनी चांगल्या संस्काराचे !!
पुष्पा सामंत.

नाशिक 31-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.comही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

516 views0 comments

Comentários


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page