top of page

मातृभाषा आणि बदलत्या माता

(जुईली अतितकर)


पाळण्यातले दिवस सरतात आणि जमिनीवर पाऊले रांगायला लागतात. आईचा आधार घेत उभी राहतात आणि बघता बघता चालायला ही लागतात. बाळाची ही होणारी घोडदौड आई आपल्या डोळ्यांनी पाहते. त्याच्या सहवासात अनुभवते आणि पुन्हा नव्याने जगायला शिकते. आपल्या बाळाच्या तोंडून पहिले वहिले शब्द आणि ' आई' अशी हाक ऐकण्यासाठी तर तिचे कान असुसलेले असतात. वाळवंटातील मृगजळाप्रमाणे ती त्या आवाजाला घरभर शोधत असते आणि त्याच आईपणाच्या विश्वात ती स्वतः ला ही विसरून जाते.


" बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत जसे रुजावे बियाणे माळरानी परसात " या ओळी मातृत्वांचा आणि मातृभाषेमध्ये जपलेला ओलावा नाही का समोर आणत !

खरं सांगायचं तर बाळाची आणि आईची भाषेची नाळ ही गर्भातच बांधली जात असावी नाहीतर आई मुलामधली ममतेची दरी अशी आपसूक शब्दांनी भरली नसती.


' शहाणं माझं बाळ ' वरून ' बेटा, लिस्टन केअरफुली ' पर्यंतचा बदलत्या माताचा प्रवास याच माय लेकरामधला भावनात्मक पूल कधीच सर करू शकत नाही. मग तो बांधण्यासाठी मध्ये दुवा मातृभाषाच नाही का लागणार ?


उदाहरण द्यायचं झालं तर नव्याने उदयास आलेल्या शिक्षण संस्था आणि नैतिकता, शिष्टाचार शिकल्यावर ही माणसामधील संवाद आजही अपूर्णच राहतो. तिथे असे मानवतेचे आणि मैत्रीचे पूल बांधले तरी किती तग धरतात आणि किती वाहून जातात. आई आणि मातृत्वावर भाष्य करतांना माता जिजाऊ आणि शिवराय याशिवाय अपूर्णच. खुपचं साधं आणि तरीही तितकंच घट्ट नात आहे मातेचं आणि मातृभाषेच.


जन्माला येण्याआधी मातृभाषेतून संस्कारांचे बीज घेऊन येणारे आणि सुशासन आणि स्वराज्याचे बाळकडू उराशी बाळगणारे आपले धाडसी बाळ रात्री मात्र झोपवताना ' गुणी बाळ असा जागसी का रे वाया, निज रे निज शिवराया ' म्हणत निजवते. या शब्दांमधली भावनांची गुंफण मातृभाषाच करते नाही का ? मग याच मातृभाषेचा आदर करण्यासाठी आपण कितीसे कष्ट घेतो.

काळानुरूप जुळवून घेता घेता बदलत्या माता आणि मातृभाषेची अस्ताला जाणारी ओढ हे चित्र चांगले की वाईट हा चर्चेचा विषय झाला.


उदाहरण द्यायचे तर बलराज मोठ्या उंची घरातला बारा तेरा वर्षाचा मुलगा. बलराज मोठा झाला तसे त्याला शाळेचं विश्व जवळचे वाटायला लागले. घर आपोआप दूर जाऊ लागले. घरून भरून नेलेला डबा पुन्हा तसाच भरलेला परत येऊ लागला. आपल्या मुलामधला हा बदल तिला दिसत होता पण पहावत नव्हता. हाच निसटत चाललेला नात्याचा पूल कधीतरी अचानक मोडणार नाही या भीतीने तिने आपल्या सासूला ही गोष्ट बोलून दाखवली. शाळेतून दमून आलेला बलराज डायनींगवर आपल्या मित्रांना पाहतो तर काय, आईने केलेले गरम गरम पकोडे खाण्यात आणि गप्पा मारण्यात मित्र इतके मशहुल होतात की बलराज आल्याचे ही त्यांना जाणवले नाही. त्याचा रडवेला चेहरा पाहून आईच ये बस म्हणली. हिरमुसून तो तसाच आपल्या खोलीत गेला आणि आपल्या मित्राच्या हसण्याचा आणि ओरडण्याचा आवाजाने त्याची अस्वस्थता आणखी वाढवली. बऱ्याच वेळेने सगळे शांत झाले. मित्र निघून गेले आणि तितक्यात त्याच्या खोलीत त्याचा एक मित्र आला. बॅग शेजारी जमिनीवर पडलेली होती. मित्राने त्या बॅगमधून डबा बाहेर काढला त्याच्या समोर उघडून ठेवला ' खाली मित्रांनी सगळेच संपवले रे, तुझ्या मॉमने हे तुला डब्यात दिलेले तू खालेही नसतील कदाचित तिला माहीत होतं." आपल्या डोळ्यासमोरचा तो भरलेला डबा घेऊन बलराज पळतच किचन मध्ये गेला आणि त्यातला पहिला घास आईला भरवून तिच्या मिठीत शिरून रडायला लागला “ आय अँम सॉरी, मॉम " त्याच्या तोंडून तिने ऐकले आणि त्याला जवळ घेतले. जसा तो शांत झाला तो तिच्या कानाशी बोलला " आई, उद्या पण देशील का मला डब्यात ? तिच्या डोळ्यातही आता गंगा जमुना वाहू लागले. काहीही न बोलता फक्त " हम्म " अस उत्तर देऊन ती त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिच्या स्पर्शात ती हरवलेली आई तिला परत मिळाली. हरवलेली माय तिला परत मिळाली.


एवढच काय ते नातं मातेचे आणि मातृभाषेचे, जी मोडू पाहणारा माय लेकरातला पूल पुन्हा बांधण्यासाठी ' आई ' नावाची फुंकर घालते. आता या नात्यामध्ये विणलेले रेशमी धागे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या भावनांना वाट देणारे शब्दच असतात नाही का?


असो मातृभाषेची ही आपल्या सोबत जोडलेली ही अतूट नाळ फक्त मातृत्वच्या वास्तल्य दाखवण्यापूर्ती न राहता त्याला वेगवेगळे झरोके आहेत. एखाद्या अनोळखी ठिकाणी तुम्ही जाऊन पहा. रस्ता भटकलेल्या वाटसरूला दुसऱ्या प्रांतात आपल्या मातृभाषेचा मिळालेला एक माणूस हा एक दुवा म्हणजे त्यासाठी मृगजळच नाही का ? तेव्हा आपल्या चेहऱ्यावर येणारे समाधान म्हणा किंवा संवाद साधण्याची उत्सुकता आपले गाव, माती एक असल्याची नक्कीच जाणीव करून देईल. उदाहरण म्हणून एक किस्सा इथे नक्की सांगावासा वाटतो. बऱ्याच वर्षांनी परदेशी जाऊन आपले शिक्षण पूर्ण करून मायदेशी आलेले आपले 'पुत्ररत्न' घरी आल्या आल्या तोडक्या मोडक्या प्रयत्नाने आपल्या मातृभाषेत घरच्यांशी बोलल्यावर आई वडिलांना होणारे आंतरिक समाधान त्यांच्या डोळ्यात लगेच झळकते आणि सगळ्यांसमोर आपल्या मुलाच्या कामगिरीचे कौतुक सोहळे रंगू लागतात. अशात मातृभाषा न समजणाऱ्या एन आर आयला पहा आनंद राहू दे बाजूला. कुठल्या ग्रहावर आलो असा काहीसा प्रश्नार्थक चेहरा घेऊन सगळ्यात मिसळण्याचा अतोनात प्रयत्न सुरू असतो. भाषेत आलेले अवघडलेपण कुठेतरी परकेपणाची भावना घेऊन येते. त्यामुळे देश तसा वेष आणि जसा वेष तशी भाषा. भाषेवरील प्रभुत्व आपल्याला आपल्या विचाराना नेहमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रांता प्रांता वर बदलणारी आपली भाषा आपल्या प्रांताची, देशाची आणि आपली ओळख बनलेली असताना आई प्रमाणे आपल्याला जपणारी, माणसांना जोडणारी, विचारांना मांडणारी, मने वाचणारी तुमची मातृभाषा जवळची नाही का? एकदा विचार करायलाच पाहिजे. न्यूक्लिअर फॅमिलीमुळे गरजा जरी कमी झाल्या तरी नात्यांची गरज असलेले ऋणानुबंध टिकवायचे असेल तर किमान संवाद साधण्यासाठी आपली मातृभाषा रुजवू, टिकवू आणि अजाणतेपणी बनलेली नात्याची दरी मिटवू. एवढे तर नक्कीच आपण करू शकतो नाही का...!


लेख आवडल्यास सर्व मातांना नक्की शेअर करा. लाइक आणि कमेंट करा.


जुईली अतितकर (पनवेल)

मो: ८६५५७७८८४५


 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

220 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page