मार्गशीर्ष म्हणजेहिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात.

मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर,डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो.मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो.हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतीशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. या वेळी धनधान्याची सुबत्ता असते.बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं

मासानां मार्गशीर्षोsहं ऋतूनाम कुसुमाकर:भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवतगीतेमधील विभूतीयोग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे.सामवेदातली गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुति म्हणजे बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद , सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतुंमध्ये वसंत ऋतु जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्णवर्षातलं उच्च स्थान कसे आहे ते भगवत गीतेत वर्णिले आहे.मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हां धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास, खरमास,धुंधुर्मास असे म्हणतात. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो.त्यावेळी हवेत खूप गारठा असतो.दिवस लहान व रात्री मोठ्या असतात,त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते.या काळात धुंधुरमासाचे व्रत केले जाते.आरोग्य शास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासात दिसतो. या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर ऊन्ह चढायच्या आत जेवण केले जाते.या जेवणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी,वांग्याची भाजी , पावट्याची उसळ, वांग्याचे भरीत , गुळाची पोळी , बाजरीची भाकरी,लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात.मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात,त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात म्हणून या आहाराला व्रताचे स्वरुप दिले गेले असावे.जो पर्यंत हवेत सुर्योदयापर्यंत गारठा असतो तो पर्यंत हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे.कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे,त्याचा हेतु हाच आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे.आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्व त्यामुळेच वर्णिले आहे.त्रिपुरी पौर्णिमेला जशी त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे देवदिवाळी साजरी केली जाते त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पण देवदिवाळी साजरी केली जाते. देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापन केला जातो. ताम्हनामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेऊन त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडले जाते.श्रीफळ कलशाची विधिवत पूजा केली जाते,त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधली जाते.आशा रीतीने घटस्थापना झाल्यावर पाच अथवा सात पानांची माळ सोडतात. अखंड तेलाचा नंदादीप देवाजवळ सहाही दिवस तेवत राहील असे पाहतात,आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. असा पूजा विधी सांगितला आहे .मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षडरात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात .प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्ठीपर्यंत रोज मल्हारी महात्म्य,मार्तंड विजय ग्रंथ याचे पारायण करावे असे सांगितले आहे.या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी.मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्व सांगितले आहे.पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखविला जातो.चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते. पुरणा वरणाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखविला जातो.घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो.घरातल्या पै पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातला खोबर आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो.मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाच आणि ऋषिमुनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांच युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लांचा संहार केला म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांज्याच्या गोड घारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो.


॥५४ ।। संस्कृत बावीस अध्याय उत्तम । ग्रंथ जाणिजे मल्लारिमाहात्म्य । त्याची प्राकृत टीका सप्रेम । दो अध्यायांत कथियेली ।।५५ ।। ब्रह्मानंदा श्रीधरवरा । म्हाळसाहृदयारविंद भ्रमरा । भक्तवत्सला करुणासमुद्रा । अतिउदारा अभंगा ! ।। १५६ ।। ।। इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्य सम्पूर्णमस्तु ।।