top of page

"मराठी भाषा संवर्धन काळाची गरज "
२७ फेब्रुवारी या तारखेला कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो… एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते प्रयत्न करायला हवेत ?

हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो. तर मराठीतील आद्यग्रंथ म्हणून `ज्ञानेश्वरीचा' उल्लेख करतात. मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्‍गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात, "माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ॥' मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. महाराष्ट्रात पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे, यामुळे मराठीची प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके, विमुक्त, आदिवासी, दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनीत होत असतो. मूळ भाषिक व इतर परंपरा आणि तिच्यात वेळोवेळी होत असलेले बदल व त्यातून संक्रमित झालेली आजच्या पिढीची बोली किंवा तिची रूपे येथे आढळतात.‘जेथे पिकते तिथे विकत नाही' असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून `मराठी' भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्ह परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळखी भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतो. चुकून अपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे!भारतात 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' अर्थात किमान समान कार्यक्रम ही संकल्पना सर्वपरिचित आहे. सरकार कोणतीही योजना आखत असते वेळी एक दिशादशर्क म्हणून या संकल्पनेचा उपयोग होतो. आर्थिकदृष्टय़ा मागास, शोषित-वंचित अशा घटकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळावे अशी या कार्यक्रमामागील भूमिका असते. पण आपलेच संवेदनशून्य होत जाणारे मन सध्या विसरत चालले आहे की, आपली भाषा- आपली मातृभाषा ही सुद्धा जागतिक भाषेच्या रेटय़ासमोर- प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर-प्रसार करायचा आणि तिचे अस्तित्व अबाधित राखायचे हे सुद्धा मोठे आव्हान आहे. स्वत:ची मूळ भाषा टिकवून, किंवा वेळप्रसंगी टाकून परभाषेचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती आज वाढत आहे. प्रत्येक भाषेकडे असणारी लवचिकता बोलणाऱ्यास उपयोगी पडते. या घटना वरकरणी सहज घडत असल्या तरी याचा परिणाम म्हणून काही भाषा क्वचितच सबल बनतात, खरंतर बहुतांशवेळी भाषा दुर्बल बनत जातात. भाषेतील शब्दसंख्या कमी होत जाते आणि भाषेचा परिणाम क्षीण होऊ लागतो. कालपरत्वे अशा भाषा विस्मरणाच्या सीमारेषेवर पोहोचतात. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने हे निरीक्षण अधिक स्पष्ट झाले. अनेक समाजघटकांनी घरात बोलायची एक भाषा आणि घराबाहेर पडल्यावर बाहेर बोलायची भाषा, हे दोन स्वतंत्र कप्पे केले आहेत. मुख्य प्रवाहात येण्याची ऊर्मी, समाजातला वावर आणि आपली मूळ भाषा न बोलण्यामुळे फारसे न होणारे नुकसान, यामुळे मूळ परंपरागत भाषांकडे दुर्लक्ष होत गेले.आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तरीही इंग्रजी भाषेने आपल्या देशात भक्कम पाय रोवले आहेत. आज अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर कायम प्रश्न उपस्थित केले जातात त्याच शाळेचे शिक्षक श्री. रणजितसिंह डीसले गुरुजींनी “जागतिक शिक्षक पुरस्कार” मिळवला याचा अर्थ काळ बदलतोय जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारतोय हे आश्वासक उदाहरण आहे. यातून पालकांनी धडा घ्यावा पालकांनी मराठी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य द्यावे. ज्या पालकांना इंग्रजी भाषा चांगली लिहिता वाचता व बोलता येत असेल त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार केला तर तो त्यांचा निर्णय त्यांना आपण रोखू शाखात नाही.. अनेक शिक्षण तज्ञांनी सांगितले आहे कि मातृभाषेतून मुल लवकर शिकते. उच्च शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध नाही. खरं तरं, मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. कारण लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल. याचा अर्थ असा नाही की, परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरुर शिकाव्यात, या भाषांचा आदर करावा, पण आपण आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच 'अल्प योगदान' दिल्याचे समाधान लाभू शकेल. हा 'किमान भाषा वापर' असा कार्यक्रम नसून उलट किमान समान कार्यक्रमाच्या धर्तीवर आधारित 'भाषा संवर्धन आणि प्रसार कार्यक्रम' आहे.

हल्ली सगळीकडेच इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आपल्याला दिसत आहे.अगदी पहिल्या भेटीतच एकमेकांना हस्तांदोलन करून हाय,हेल्लो असे म्हटले जाते.कामकाजाच्या ठिकाणीही इंग्रजी भाषेतच कागदपत्रांचे व्यवहार केले जातात.बऱ्याचदा महाविद्यालयात फ्रेंच,रशियन,जर्मन अशा भाषा शिकवल्या जातात.मात्र या भाषा शिकत असतांना मराठी हा विषय पर्याय म्हणून ठेवणारेही विद्यार्थी आहेत.इतर भाषा शिकणे गरजेचे असले तरीही मातृभाषेतून आणि बोली भाषेतूनच एकमेकांचे विचार,संस्कृती एकमेकांपर्यंत पोहोचू शकते.

असे असले तरी काही मराठी वृत्तपत्रे मराठी भाषेला प्राधान्य देवून इंग्रजी शब्द टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र वाचकांची मानसिकता लक्षात घेता हे इंग्रजी शब्द वाचकांच्या अंगवळणी पडल्याने वृत्तपत्रांना इंग्रजी शब्दांचा उपयोग करणे भाग पडते.मराठी भाषा टिकली तरच समाज टिकेल आणि तरच येणारी पुढची पिढीटिकेल.आपली जडणघडण हि आपली बोली भाषेतूनच होत असते.लोकांचा असा समज आहे कि परकीय भाषा आली तरच आपला विकास होईल.तर असे काही नाही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठी माध्यमातून देऊन श्री. विश्वास नांगरे-पाटील साहेब आज यशस्वी पोलीस अधिकारी आहेतच.आपल्या प्रतिभेची प्रतिभेला वाव हा मराठी भाषेतूनच मिळणार आहे.आपला खरा संबंध हा मातृभाषेशी असतो.मातृभाषा आपली आईच असते.या मातृभाषेचे संवर्धन आपणच केले पाहिजे असे मला वाटते.मुळात मराठी भाषा जतन करण्यापेक्षा समृद्ध केली पाहिजे.सर्वात महत्वाचे म्हणजे आपण वाचन संस्कृती जपली पाहिजे.

आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी तिचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आपण सर्वांनीची भूमिका फार महत्वाची आहे.आजची आपली तरुण पिढी, त्यांची 'सेलिब्रेट' करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान समाजरचना, दिन-विशेष असे बिंदू लक्षात घेता हा कार्यक्रम सहज शक्य आहे असे मला वाटते. त्यात जेवढी कृतिशील भर घालता येईल तेवढे उत्तमच ! शेवटी एकच म्हणावेसे वाटते- “वाढवू मराठी,गाजवू मराठी आणि बाळकडू म्हणून पाजवू मराठी!!”
श्री दिपक यशवंत भोये,शिक्षक

भ्रमणध्वनी क्रमांक- ९४०३९८१६९१

Email.: dipakbhoye99@gmail.comविश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

4,647 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

Commentaires


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page