मराठी माझी मातृभाषा असून देखील मराठी भाषा विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास मनाला मराठी भाषा विकासाच्या दृष्टीने मी काय करतो हा प्रश्न मनाला सतत भेडसावत असतो.विचाराअंती साहित्य आयामाच्या पैलूकडे सहज सकस उपयुक्त विचारमंथन करण्याची गरज जाणवते.मराठी भाषा विकासाच्या दृष्टीने बरेच प्रश्न पडतात.मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यास ब-याच अडथळ्यांच्या सामना करावा लागत असलेला जाणवतो. पण...
" मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे
नसे आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे ".....
माधव ज्युलियन यांची मराठी असे आमुची मायबोली या कवितेतील वरील ओळी वाचल्या कि मराठीला ऐश्वर्य संपन्न भविष्य प्राप्त होईल अशी शाश्वती मात्र मिळते.
मराठी भाषेच्या उत्कर्षा बाबत चर्चा होणे म्हणजे मराठी भाषेविषयी महाराष्ट्रात जाणीव जागृती व्हायला लागली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.मराठी साहित्य संपदा अत्यंत प्रगल्भ ,संस्कृतीसंवर्धनात्मक मूल्याधिष्ठीत असून त्याची महती फार पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ओळखली होती.म्हणूनच या ओळी सार्थ ठरतात.
" माझी मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेहि पैजासी जिंके "
ज्ञानेश्वरी रचियेला पाया तुकोबा शोभियेला कळसा अस म्हणत मराठी भाषेला संत साहित्यामधून समृद्ध करण्यास महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच प्रयत्न केले गेलेत. दीडशे वर्षे इंग्रजांच्या राजवटीत गुलामासारखे जगूनही आजही इंग्रजी शाळा ,इंग्रजी भाषेला का प्राधान्य दिले जाते व कोण देतय ह्या बाबत प्रथम स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज पडते.१ मे १९६० पासून महाराष्ट्राला सर्व अधिकार मिळाले तत्पूर्वीही शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात बोली भाषा वापरली जायचीच तरी आज मात्र मराठी व बोली भाषेबाबत लाज का वाटावी हा प्रश्न मनाला दुःखदायी वाटतो.
शासकीय परिपत्रके आज जरी मराठीत निघत असली तरी तिला समजून घेतांना अडचन येत असलेल्या जाणवतात. कारण इंग्रजीतला बेस्ट शब्द हा मराठी बोलीत बेच म्हणून वापरला जातो हे अजूनही कळलेले नाही किंवा मराठीतला भाजी करण्याच्या भांड्याला कसली म्हणतात हेही जाणून घेण्याची गरज वाटत नाही.हा दोष कुणाचा...याबाबत विचार करणे गरजेचे वाटते.
खरतर मराठी भाषेत प्राचीनता,श्रेष्ठत्व, स्वयंभूपणा, सलगता म्हणजे अभिजात स्वरूप पूर्वीपासूनच प्राप्त झाले आहे.रंगनाथ पठारे समितीने
ते मराठी बाबत सिद्धही केले आहे.तरी महाराष्ट्रातसुद्धा मराठी शाळा मराठी भाषेबाबत उदासिनता दिसते.करोना काळात ऑनलाईनच्या फेसबुकच्या माध्यमातून मराठीला ब-याच प्रसार संधी मिळालेली दिसते. हे ही नसे थोडके..
लेखकाला पूर्वी वलय होत.श्रेष्ठ जेष्ठ लेखकांचे मार्गदर्शन लाभ मिळावा याकरता धडपड चालायची नव्हे नुसत्या दर्शनाची ओढ असायची.आज तसे दिसत नाही .मुलांनी तरूणांनी मूल्याधिष्ठीत संस्कारक्षम पुस्तके वाचण्याचा आग्रह शाळा, शिक्षक,साहीत्यक्षेत्र यामधून असायचा.दिवेलागणीची झाली कि संध्याकाळी सगळे एकत्र बसून पुस्तकांचं वाचन व्हायचं आज तस दिसत नाही.आमच्यावेळी विदर्भ साहित्य संघ यांच्यातर्फे परीक्षा घेतल्या जायच्या यात वहीणींच्या बांगड्या, पक्षी निरीक्षण, स्वामी अशी पुस्तकं वाचून त्यावर आधारित प्रश्न पत्रिका देऊन उत्तर पत्रिकेत पुस्तकांचा सार विचारला जायचा.यामुळे अख्ख पुस्तक वाचून काढल जायचं टिपणं घेतली जायची त्यामुळे पुस्तक ,लेखकांच नाव परिचय यांचं चिरकाळ स्मरण राहत अस मला वाटत.
आज सगळ कस तात्काळ हव असतं .साहित्य वारसा लाभलेला असतांनाही बालक तरूण वाचनाकडे फारसे वळलेले दिसत नाहीत.उत्तम लेखनाला व्यासपीठ मिळेेलच असे नाही.मराठी पुस्तक खरेदी करण्याकडे कल नाही त्यामुळे आर्थिक अडचणी,संपादकांची बदलती दृष्टी, प्रसारमाध्यम या सर्व बाबी यात समाविष्ट होतात.
घराघरात मालिकांच वेड,परकीय शिक्षण यामुळे मुल हॉटेलिंग, मॉल,थिएटर,याकडे वळली आहात.त्यांचे छंद आवडीचे स्वरूप बदलले आहे.पूर्वी भाषणं,व्याख्यानमाला,नाटक,सांस्कृतिक सार्वजनिक, आध्यात्मिक कार्यक्रमात तरुणची गर्दी राहायची आज ते दिसत नाही. शेक्सपियरची नाटक इंग्रजी सिनेमे परदेशी जाऊन स्विकारली जातात पण त्याबदली तुकारामाची गाथा किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी परदेशी पोहचवण्याचा विचार केला जात नाही.तरूणांना त्याची गरज वाटत नाही .याकरता पालकच आग्रही नसतात.किंबहुना परकीय भाषा,पोशाख,खाद्य,पर्यटन याचे आकर्षण वाढल्याने मराठी साहित्य संस्कृती मागे पडत असलेली जाणवते.
लेखन करतांनाही सर्वतोपरी विचार न करता वाचकांना भिडणारा लेखक मिळेलच असे नाही. फेसबुक वाॅट्सअपद्वारे तात्काळ लेखन करून प्रसिद्धी जास्त महत्वाची वाटायला लागली.निवडलेले विषय त्यामागचा हेतू,सामाजिक चित्र,भावना,दूरदृष्टी, पडसाद या सर्व बाबींचा चौकस विचार करूत परत परत वाचून सुधारणात्मक लेखन करण्याला आज वेळ दिल्या जात नाही.त्यामुळे कुटुंबात सामाजिक भावनात्मक विकासाच्या दृष्टीने लेखन होत नाही असे म्हणायला हरकत नाही.
कादंबरी, कथा,प्रवासवर्णन वाचले जात नाहीत .स्वतः केलेले लेखन इतर वाचतीलच असे नाही.पूर्वी लिहलेल्या स्त्रीजीवनावरील कथा आजही डोळ्यासमोर उभ्या होतात
तेवढ्याच वाचनिय ठरतात. आज समाजातली स्थिती दर्शक चित्रपट येतात पण त्याच चित्र तात्पुरतं मनात राहत.ते अंतरंगी रेंगाळत नाही कारण त्या कथालेखनाच भावविश्व लेखनातून हवं तस कोरल जात नाही किंवा तस लेखन करणा-या लेखकाला संधी मिळत नाही.समाजातला मनाला भिडणारा विषय मनात घुसळून अनुभव संप्पन्न लेखन खूप महत्वाच ठरतं.
गावातला तरूण शहराकडे वळला.पदवी घेऊन गावात गेल्यावर तो रमले अस नाही.आज तरूणांचं भावविश्व शहरी वातावरणात ढवळून निघतय. तळागाळापर्यंत पोहोचवून स्वतःची दृष्टी वृद्धींगत करून त्यासंदर्भात लेखन करणे ग्रामीण साहित्य, ओव्या,जात्यावरील गाणी,पोवाडे,अभंग,लोकगीते याबाबत उलथापालथ विचार मंथन करण्याची तरूणांना गरज आहे.मराठी साहित्य तरूणांनापुढे मांडणं आव्हान ठरतयं.कारण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह जोपर्यंत मधल्या जाणार नाही स्वदेशी शिक्षण प्रसार होणार नाही तोपर्यंत मातृभाषा विकास होणार नाही.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच या निर्णयाचे सर्व स्तरावरुन स्वागत होत आहे कारण प्रत्येकालाच मातृभाषेचे मोल कळले अस वाटत.
तेव्हा महाराष्ट्र माझा....मराठी माझी.... असे म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मातृभाषा दिन म्हणून साजरा करतांना कवी सुरेश भट यांच्या ओळीची आठवण कायम स्मरणात ठेवूया.....
“ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठ
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी “॥
मंजू वणवे
९५११७८०८१५
Email.: manjuwanve32@gmail.com
ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा
Comments