top of page

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची अखंड रचना


आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्राची माती आधुनिक विचाराने व समाजप्रबोधनाच्या शिंपणाने त्यांनी सुजलाम सुफलाम केली आहे.

पद्यलेखनात महात्मा फुले यांनी विविध प्रकार हाताळले असून यात अखंड ही रचना प्रसिद्ध आहे. अखंड रचना करताना त्यांचा मूळ उद्देश हा सामान्य जणांना आपल्या हक्काबद्दल जागृत करणे, त्यांची होणारी पिळवणूक समोर आणणे , सामन्याने जागृत होऊन विद्या संपादन करणे हा होता.

जसे संतांचे अभंग हे जनजागृती चे कार्य करित होते त्याचप्रमाणे अखंड हे सुध्दा अभंगाचे आधुनिक रूप असून याची रचना ही वैशिष्ट्यपुर्ण आहे. कर्मकांडे ,जातीविषमता,सनातनीपणा, लुबाडणूक,विद्येचे महत्व धर्म , निर्मिक, दिनदुबळ्याची सेवा, इत्यादी विविध विषयावर महात्मा फुले यांनी अखंड रचना केली आहे. मानव प्राणी सुखी कशाने होईल या प्रश्नाचे उत्तर देताना महात्मा फुले म्हणतात,

सत्य सर्वाचे आदि घर । सर्व धर्माचे माहेर ॥

जगामाजी सुख सारे । खास सत्याची ती पोरे

सत्य सुखाचा आधार । बाकी सर्व अंधकार ॥

सत्य हेच अंतिम असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल. सर्व धर्म ही असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन आवश्यक आहे. धर्माच्या बाबतीत ही त्यांची विचारसारणी ही आधुनिक होती.

मानवाचे धर्म नसावे अनेक।

निर्मिक तो एक ज्योती म्हणे ॥

मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे ईश्वरासाठी ते निर्मिक ही संकल्पना वापरतात.मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी समान आहेत.सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून मानवाने उच्च नीच हे भेदभाव तयार केले आहेत.

सर्वाचा निर्मिक आहे एक धनी

त्याचे भय मनीं। धरा सर्व ॥

न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा

आनंद करावा । भांडू नये ॥

धर्म राज्य भेद मानवा नसावे

सत्याने वर्तावें । ईशासाठी ॥

मानवातील भेदभावावर प्रहार करताना महात्मा फुले अतिशय समर्पक अशी निसर्गातील उदाहरणे देतात.

एक सुर्य सर्वा प्रकाश देती

उद्योगा लावीतो प्राणीमात्रा॥

मानवाचा धर्म एकच असावा

सत्याने वर्तावा ज्योती म्हणे ॥

सुर्य , चंद्र , नदी , नाले , तरु हे सर्वांसाठीच आहेत यावर कोणा एकाची मालकी नाही त्यामुळे सर्व मानवाचा धर्म हा एकच आहे

सर्वांना आपला उन्नती व उत्कर्ष करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विद्या संपादन करणे. शिक्षण हाच मानवाच्या विकासाचा पाया आहे अशी धारणा महात्मा फुले यांची होती.विद्या नसेल तर काय विपरीत परिणाम होतात हे सांगताना शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाच्या उपोदघातात ते म्हणतात,

विद्येविना मती गेली। , मतीविना नीति गेली

नीतीविना गति गेली, गतिविना वित्त गेले

इतके अनर्थ ऐका अविद्येने केले ॥

ही अविद्या आपण आपल्या जीवनातून दूर केली पाहीजे.

विद्या सर्वां देई । सद्गुणाची हाव

करी नित्य कीव । अज्ञान्याची ॥

विद्या ही व्यक्तीला समृृदध बनवते बलवान बनवते यासाठी आपल्या मुलामुलींना शाळेत घातले पाहिजे

नित्य मुली मुला शाळेत घालावे

अन्नदान द्यावे । विध्यार्थीस ॥

यात ही त्यांनी मुली मुला असे दोघे ही म्हटले आहे यापुढे ही जावून मुली हा शब्द प्रथम वापरला आहे.यातूनच महात्मा फुले यांचा स्त्रीयांं प्रती असलेला समतेचा द्रुष्टीकोण दिसून येतो.स्त्री पुरुष दोघेही समसमान असून दोघानी एकत्र येवून सत्यवर्तनाने कष्ट करावे व आपले कुटुंब सुखी ठेवावे यासाठी ते म्हणतात,

स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे।

कुटुंबा पोसावे आनंदाने ॥

भोंदूगिरी व अंधश्रद्ध यावर ते कडा प्रहार करतात गोरगरीब जनतेला हे लोक नाडतात व त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलतात अंशावर ते आपल्या शब्दातून आसूड ओढतात.

जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती।

दुजा का करिती । मुलासाठी ॥

सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे अशी त्यांची धारणा होती यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत

दिनदुबळ्यांंची सेवा करणे त्यांना मदत करणे हे माणूस म्हणून आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे

रंजले गंजले अनाथ पोसावे।

प्रितीने वागावे । बंधुपरि ॥

आळस हा मानवाचा शत्रू असून लहानपणापासूनच आपल्या मुलामुलींना हे आपण शिकवले पाहिजे असे हे ते सांगतात.

सर्व सद्गुणांचा आळस हा पिता

बालपणी कित्ता । मुलीमुला ॥

अशाप्रकारे आधुनिकतेला स्पर्श करणारी व मानवी कल्याणाचा विचार करणारी काव्यप्रतिभा महात्मा फुले यांच्या अंगी होती. काळ बदलला तरीही यातील स्त्री पुरुष समानतेचा विचार , वैज्ञानिक द्रुष्टीकोन , अंधश्रद्धेवर भोंदूगिरीवर प्रहार, धर्माची विधायक चिकित्सा करणारा विचार, शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व, मानवसेवा हे सर्व काही आजही लागू आहे आणि येणाऱ्या काळातही समाजाला उपयोगी पडणारे असेल.



लेखक: प्रा.प्रदीप महादेव कासुर्डे (भांडूप)

मो: 7738436449

ईमेल: prradipk102@gmail.com


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

3 Comments


Bharat watane
Nov 27, 2021

खूपच छान माहिती thank you for sharing https://www.marathibhashan.com/2021/11/mahatma-jyotiba-phule-punyatithi-quotes-marathi.html हे पण वाचा > महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त निबंध भाषण मराठी मध्ये माहिती !

Like

Bharat watane
Nov 27, 2021

खूपच छान माहिती thank you for sharing <a href="https://www.marathibhashan.com/2021/11/mahatma-jyotiba-phule-punyatithi-quotes-marathi.html"> हे पण वाचा > महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त निबंध भाषण मराठी मध्ये माहिती </a> !

Like

Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Oct 21, 2020

फारच सुंदर लिहिले आहे. एखाद्या संतांप्रमाणे विचार आहेत ज्योतिबा फुले यांचे !

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page