घनघोर द्वंद्व स्वतःशीच "चारित्र्याचं" आरशा समोर आता रोज खेळणं आहे गाभाऱ्यातल्या मूर्तीसाठी बाहेरची ही खोटी वलयं आता रोज पिंजणं आहे
चूक होती का की 'मी मुलगी असणं' हा प्रश्न मनात नुसताच उच्छाद मांडतो उत्तरासाठी केलेला एक प्रयत्न मात्र शंकांचे अनेक काहूर का निर्माण करतो?
नभासही भेदणारा व्याकूळ अाक्रोश त्या गोंधळात तुला ऐकू जाणार नव्हता शरीर भुकेनं अधाशासारखा धजावलेला तुझा हात कसाकाय थांबणार होता?
लाचारही तू इतकं व्हावंस की शिष्टाचाराची सगळी लक्तरं वेशीवरती टांगावी खुलायचं वय होतं जिचं त्या तान्ह्या चिमुकलीचीही काया बाजारात विकावी!
कूस उजवली म्हणून कृतार्थ सुखावलेल्या आईला तू आज करतोयस पांगळं गर्भातल्या नऊ महिन्यांच्या निःस्वार्थ मातृत्वाची तू आज जाळतोयस ठिगळं!
कोणत्याही कापडात तुझ्या त्या गलिच्छ नजरांचा जागोजागी घातलेला घाट तरी 'तिनेच उकसवणारा केला होता पेहराव' हीच पाचवीला पुजलेली नाट!!
आज सारं जग बंद पडलं, तरी या नराधमांमधल्या हैवानाला कोण रोखणार? माजलेल्या पुरुषार्थापायी एक स्त्रीच कायम तिच्या अब्रुशी का लढत राहणार?
करावा का निर्धार या सर्वस्व होरपळून टाकणाऱ्या अग्नी परीक्षेत उतरण्याचा? की शोधावा 'सय तेवून स्वतंत्रतेची',छप्परात आता फक्त झरोका कवडशाचा!!
👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
डॉ.आदित्य हेमंत रेडिज
मो: 9975303529
ईमेल: adityaredij89@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comments