top of page

जीवन संघर्षमी गेली पाच-सहा वर्षे मतिमंद मुलांनी बनवलेल्या कलावस्तू विक्रीच्या माध्यमातून समाजापुढे आणते आहे. निखळ हेतू हा की या मुलांना थोडेफार अर्थार्जन व्हावे. या कामामुळे काही मतिमंद मुलांशी व त्यांच्या पालकांशी परिचय झाला. असेच आणखी एक पालक यांची मुलगी रेटिनाच्या प्रॉब्लेम मुळे अंध झाली त्यांचा परिचय झाला. त्यांची मुलगी वेदिका फडके हिला सी-एच्या फायनल परीक्षेसाठी रायटर हवा होता. त्यांनी हे एका व्हाॅट्सअॅप ग्रुप वर पाठवले होते. मी ते वाचले. मुळातच माझा पिंड सामाजिक कामाची आवड, तळमळ असणारा असल्यामुळे श्री. माधव फडके यांना मी फोन केला व रायटर साठी काय अटी असतात हे विचारले. थोड्याच दिवसात त्यांना मी रायटर चे काम करू शकणाऱ्या एका मुलाचे नाव व पत्ता कळविला .त्यावेळी वेदिका विषयीची माहिती मी त्यांना विचारली, ती ऐकून मन विषण्ण झालं! एखाद्याच्या जीवनात किती मोठं संकट येतं! पण काही पालक किती धीराने त्याला तोंड देतात व अशा कठीण परिस्थितीत सुद्धा पाल्याला उत्तम घडवितात. अशा पालकांना मानाचा मुजरा करावासा वाटतो.


चि. वेदिकेला तीन वर्षाची होईपर्यंत दिसत होते, पण हळूहळू तिला एका डोळ्याने दिसेनासे झाले. डोळ्याच्या डॉक्‍टरांना दाखवले असता त्यांनी काही उपचार करुन पाहिले, पण रेटिना चा प्रॉब्लेम असल्यामुळे उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर काही वर्षानंतर दुसऱ्या डोळ्यालाही याच प्रॉब्लेम मुळे दिसेनासे झाले. काय वाटले असेल त्या लहानग्या मुलीला! आपले आई-वडील, आपले घर, आपली खेळणी काहीच तिला दिसेना! सगळीकडे अंधार! आई-वडील पण हतबुद्ध झाले. पण दोघांनी मनाशी ठरविले की आता हातपाय गाळायचे नाहीत. योग्‍यवेळी त्यांनी तिला अंधशाळेत घातले. इयत्ता चौथी पर्यंत ज्ञानप्रबोधिनी संचलित अंध शाळा कोल्हापूर याठिकाणी वेदिका शिकली. तेथे तिला ब्रेल लिपी शिकविली. नंतर सर्वांनाच पाचवीपासून नॉर्मल शाळेत प्रवेश देणे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत आवश्यक आहे. पण ज्या ठिकाणी एखाद्या अंध शिक्षकाची नेमणूक शाळेमध्ये केली असेल तर तेथे किमान दहा अंध मुलं असली पाहिजेत तरच ते शिक्षक या ठिकाणी कायम सेवेत रुजू समजले जातात. त्यासाठी एकाच हायस्कूलमध्ये मुलांना पुढील शिक्षणासाठी अंध शाळेच्या वतीने पाठवले जायचे. पण तेथील शैक्षणिक दर्जा योग्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर अन्य नॉर्मल शाळेत घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे तिने दहावीपर्यंत आपला अभ्यास ब्रेलच्या सहाय्याने रायटर घेऊनच केला. सुरुवातीस तिला नॉर्मल शाळेत घेताना शाळेने नाखुशी दाखवली होती. पण तिच्या हुशारीमुळे हा विरोध मावळला. मग शिक्षक तिला कशा पद्धतीने शिकवलं म्हणजे तिला कळेल याचा विचार करू लागले. गंगातीरकर नामक गणिताच्या शिक्षकांनी तर रात्री घरी डोळ्यावर पट्टी बांधून आपणास येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या व त्यांच्या लक्षात आले की आपण फळ्यावर बोलत आकडेमोड करत शिकवलं तर समजू शकेल व तशा पद्धतीने त्यांनी शिकविले. यामुळे तिचं गणित आज खूप चांगलं आहे. तिला दहावीत 93.27% मार्क मिळाले व ती अंध विभागात राज्यात पहिली आली. अकरावी बारावी कॉमर्स कॉलेजमध्ये तिने राईटरच घेतला. या काळात कीबोर्ड ची प्रॅक्टिस आधीच झाल्यामुळे ती लॅपटॉप चालवू लागली. यावेळी तिला एका अॅपची माहिती झाली, जो बोलू शकत होता. त्यामुळे लॅपटॉप वर ती जे काही टाईप करायची ते तीला ऐकायला मिळू लागले. त्यामुळे तिला पुढील सर्व शिक्षणासाठी राईटर ऐवजी रीडर लागू लागला. तो प्रश्न वाचून दाखवे व ती त्याचे उत्तर लॅपटॉप वर टाईप करी. ती एम.कॉम झाली. रायटर असो नाहीतर रीडर असो तो मिळवायला खटपट ही लागायचीच. यासाठी जेवढे मदतीचे हात पुढे यायला हवेत तेवढे येत नसत. याचे दुःख श्री माधव फडके यांना व्हायचे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची शिकवण किती लोक आत्मसात करतात प्रश्नच आहे!


तिला वडिलांनी आय फोन घेऊन दिला, त्याच्यावर ती व्हाॅट्सअप, फेसबुक हेही उत्तम तऱ्हेने वापरू शकते. तिची ही प्रगती अतिशय कौतुकास्पद आहे. तिच्या आईने तिला वाढवताना खूप कष्ट घेतले. जून महिन्यात मातृदिन साजरा झाला. बऱ्याच जणांनी मोबाईल मधील स्टेटस वर आपल्या आईबद्दलचे आपले मनोगत दिले होते. त्यादिवशी वेदिकाने स्वतः स्वयंपाक करुन उत्तम पदार्थांनी सजविलेले ताट आईला दिले. किती अनोखा आणि सुंदर तिने साजरा केलाला मातृदिन! अशी उदाहरणे समाजापुढे यायला हवीत हाच या लेखामागील हेतू! आणि पालकांच्या या संघर्षाला समाजाने दादही द्यायला हवी. जयश्री पटवर्धन विनायक बंगला बसव नगर रोड, कागवाड. जिल्हा-बेळगाव, कर्नाटक. PIN-591223 महिला, वय 79 वर्षे Ph- 7406983273

jayashreep1941@gmail.com


ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा


257 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page