हरवली पाखरे...शनिवारची सकाळची शाळा. दुपारी शाळा सुटली की सर्वजण घरी जाऊन कपडे बदलून एकत्र आले. त्यांचं एकत्र येण्याचं ठिकाण मंदिराजवळचं झाड. त्या झाडाला एक दगडी कट्टा आहे. कट्ट्याजवळ हळू हळू सर्वजण जमू लागले. दोन गट पडले. कुणीतरी ओलीसुकी करण्यासाठी चपटी खापरी शोधली. त्याच्या एका बाजूला थुंकी लावली व ‘ओली का सुकी’ म्हणत आकाशात भिरकावली. जो जिंकेल तो पहिल्यांदा खेळेल. तोपर्यंत इतरांनी गल काढायला सुरुवात केली होती. गल म्हणजे वीतभर लांबीचा अन अर्धा बोट खोलीचा खड्डा. यात तो लांब दांडू टेकवून त्यावरच्या खाचीत आडवी विटी न पडता ठेवली गेली. तो वाकून समोर उभं असलेल्याकडे नजर वर करून बघत, 'कोलू का..?'असं विचारत दांडूने त्यावरील विटी जोरात त्या रांगेत उभे असलेल्या पोरांच्या पलीकडं टाकायचा. विटी झेलली किंवा त्या दांडूला विटीने टिपले तर तो बाद झाला असं समजलं जायचं.  नाहीतर तीन वेळा दांडूने विटी लांब टोलवली जायची. खेळ सुरु झाला, रंगू लागला. तिथचं शेजारी झाडाखाली सावलीत त्यातीलच काही छोट्या मुली मातीत खेळत होत्या. दोन्ही हाताने माती एकत्र करून त्याचा उभा बांध बनवायचा अन ते बनवताना त्यात काचेच्या बांगडीचा तुकडा लपवून ठेवायचं सुरु होतं. तिची मैत्रिण ते लपवलेलं शोधत होती. हे खेळताना त्या दोघी तल्लीन झाल्या होत्या. इतक्यात एकामागोमाग तीन-चारजण रबराचे टायर, हातात छोटी अर्धी काठी घेऊन, फिरवत अधूनमधून वाट काढत पळत होते. त्यांच्याकडंच्या चाकाची उंची कमी अधिक असली तरी उत्साह प्रचंड होता. एकाच झाडाखाली चिमुकल्यांची ही मैफिल अलग-अलग खेळत पण हसत- खिदळत रमली होती. जणू ते झाड 'आनंदाचं झाड' झालं होतं. त्याला लगडलेली कोवळी फुलं हसत होती, मजेत होती.


पाऊस पडायला लागला अन थेंबांचा टपटप वर्षाव चोहीकडे सुरु झाला. सर्वत्र पाणी साचत गेले. रस्त्यावर, गल्लीत, शेतात अन वळचणीला फक्त पाणी. मुलांना रस्त्यावर साचलेल्या गढुळ पाण्याच्या डबक्यात खेळण्याची, बाहेरून त्या डबक्यात उडी मारण्याची, पाय आपटून पाणी उडविण्याची वेगळीच मज्जा वाटते. गावाकडे भरपावसात चिखलात मुलांचे मनमुराद खेळणं सुरु असायचे. गारा पडल्या असतील तर पाऊस जरा थांबला की रस्त्यावरच्या, वळचणीच्या काठवरच्या पांढ-याशुभ्र गारा हातात घेणं, एकमेकांना हलकेच मारणं सुरु असायचं. हा एक प्रकारचा निसर्गाभ्यास न शिकविता मुलं अनुभवायची. आता पालक मुलांच्या तब्बेतीच्या कारणावरुन, काळजी वाटते म्हणून बाहेर पावसात जाणे, डबक्यातलं घाणं पाणी इ. कारणामुळे मुलांना पावसात जाण्यापासून परावृत्त करतात. आता मुलंही हायजेनिक इश्श्युमुळे जास्त जपतात.  पावसाच्या पाण्यात कागदाची होडी बनवून सोडण्याच्या आठवणी न विसरता येणा-या आहेत. कागदी होडी पाण्यात जास्त वेळ टिकणार नसते हे माहिती असते तरी ते बनवणं सुरु असतं. सध्या पाऊस सुरु असताना घरात टिव्हीवर चित्र पाहण्यात मुलं पालकांसोबत व्यस्त असल्याचे दिसून येतयं.


पूर्वी गाभुळलेल्या चिंचा काढणे अन मित्रांसोबत त्या वाटून खाणे, त्याचे निघालेले चिंचोके गोळा करुन त्याने खेळणे, अन तेच फरशीवर घासले अन गालाला लावले की गरम वाटणे या सगळ्या जाणिवा सोबत घेवून  मुलं वाढत असायची. काही ठिकाणी तर चिंचोके, करंजीच्या बिया साठवून त्या घरच्यांच्या नकळत बाजारात विकणारी मुलंही बघायला मिळायची जी इतक्या कमी वयात व्यवहारज्ञानाचे धडे घेताना दिसायची. चिमणीचे पिल्लू घरट्यांतून खाली पडल्यावर मुलांची होणारी तगमग त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवायची. कुत्र्याचे, मांजरीचे पिल्लू मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मुलं मुळातच संवेदनशिल व भावनिक असतात. मात्र समाजातील आजुबाजूच्या घटना, घरातील वातावरण यामुळे त्यांच्या भावना बोथट/तीव्र/आक्रमक इ. बनत जातात. घरी दारासमोर एखादा भिकारी आल्यानंतर त्याला भाकरी देण्याची रीत संस्कारक्षमता वाढवित असायची. सध्या मात्र ‘देण्याचा आनंद’ हा घरातूनच लोप पावत आहे असं जाणवतं.


शाळेला सुट्ट्या लागल्या की मुलांना काय करू अन काय नको असं होतं. बंदिस्त पिंज-यातून जणू मोकळ्या हवेत त्यांचा प्रवेश होतो. अशावेळी मनात साचलेली ऊर्जा ओसंडून वाहत असते. गावाकडे असलेली मुलं निरनिराळे खेळ खेळतात. त्यासाठी खेळाचे साहित्य, साधनं याची फारशी आवश्यकता नसते. खरंतर यामुळे काही अडत नाही. गरज असते फक्त आपल्यासारख्याच  सवंगड्याची. हे सगळं त्यावेळी होतं जेव्हा तंत्रज्ञानाची प्रगती मर्यादित होती.  काळ बदलला. तंत्रज्ञानाचा आविष्कार सर्वत्र पोहचू लागला. समाजातील सर्व स्तरापर्यत तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला. याला लहान मुलांचा वयोगटही अपवाद नाही राहिला. जणू तंत्रज्ञानाने लहानग्यांच्या हातातील खेळणी बदलली.  मोठ्या लोकांनी तंत्रज्ञान हे त्यांचे रोजचे व्यवहार सुसह्य, बिनचूक व्हावेत म्हणून स्वीकारले मात्र लहानग्याना हे तंत्रज्ञान त्यांच्या वाढीवर परिणाम करणारे ठरू लागले. एखाद्या घरी मम्मी किचनमधूनच काम करता करता छोट्या मुलीला तिच्या हातातील मोबाईल खाली ठेवून ताटातील खाऊ संपवायला सांगते अन ती लहानगी मात्र न ऐकल्यागत करून मोबाईलच्या चकाकत्या स्क्रीनवर डोळे लावून बसते, तेव्हा तंत्रज्ञानाने निर्मित साधनाचे व्यसन जडले असं म्हणायला हरकत नसते.


लहान मुलांच्या विकासात खेळाचं अनन्यसाधारण महत्व आहे. खेळ ऊर्जा निर्माण करतो अन आतल्या उर्जेला योग्य वाटही करून देतो. मुल खेळायला केव्हा सुरु करतं? अगदी काही महिन्याच्या वयापासून ते समोर येईल त्या वस्त