
आजच्या गुढी पाडव्याच्या सुमंगल दिनी , सर्व मराठी सुजनांना माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा . नवीन वर्षाची सुरवात आपण गुढी उभारून करतो , हे किती विलक्षण आहे नाही ? आपली संस्कृती आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्ट ईश्वराला साक्षी ठेऊनच करायला शिकवते , मग ते सण वार असोत, लग्न ,मुंज असो अगदी घर खरेदी , वाहन खरेदी एवढेच काय पहिला पगार असो .. सगळं ईश्वराला साक्षी ठेऊनच. “न हम करता , हरी करता “. तसेच गुढी पाडवा हा सुद्धा . गुढी पाडव्याला सकाळी प्रत्येक घरातून जेंव्हा ग्यालरी मध्ये सगळे कुटुंब म्हणजे आजी आजोबा, आईवडील लहान मूल एकत्रित पणे पूजन करून भक्तिभावे गुढी उभारतात तेंव्हा मला असे वाटते कि सर्व जण आपल्या घरात सामाजिक कर्तव्यांचे प्रतीक म्हणून जणू काही झेंडा वन्दनच करत आहेत . श्रीरामचंद्रांनी रावणाविरुद्ध लढा जिंकून अराजकता संपुष्टात आणून राम राज्य प्रस्थापित केले तोच हा दिवस . आणि म्हणूनच हे हिंदू प्रजासत्ताक दिवसच वाटतो मला . घराघरातून लोक दृढनिश्चयाने सामाजिक बांधिलकीची ही गुढी रुपी झेंडा फडकवतात घरा घरातून . किती अभिमानाची गोष्ट आहे ही नाही का ? त्यामुळे गुढीवंदन मला ध्वजवन्दन वाटते, धर्मराज्याचे ... अध्यात्मात सुद्धा या गुढीस ब्रह्मध्वज सम्बोधले आहे , कारण याच दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली . तेंव्हा आपण गुढी उभारताना हा भाव ठेवला पाहिजे , की हे ध्वजवंदन आहे , आपल्या संपूर्ण देशाला अराजकतेपासून ज्यांनी मुक्त केले त्या श्रीरामचंद्रांचे अभिवादन , आणि ध्वजाचे वन्दन .
आपल्याकडे , प्रत्येक सण हा नुसता रूढी परंपरांचे पालन नसून एक आनंद सोहळा असतो आणि प्रत्येक आनंद सोहळ्यात कळत नकळत एक संस्कार दडलेला असतो जो आपोआप आपल्यावर होत असतो .
गुढी पाडवा हा ही , खरतर असाच एक आनंद सोहळा . मी या वेळी म्हणजे २०१७ च्या सुमारास , तब्ब्ल नऊ वर्षांनी भारतात गेले होते .. नऊ महिन्यांनी जसे एक नवीन जीव जन्म घेतो तसेच मला अनुभवायला मिळाले .. एक नवीन जग .. माझ्या नऊ वर्षाच्या जगापेक्षा वेगळे , .. काही कारणांमुळे मला तिथे ८महिने राहायचे भाग्य मिळाले आणि पुन्हा भारताबरोबर , तिथल्या नवीन बाळ गोपाळांबरोबर , मला सगळे सण नव्याने साजरे करता आले ... त्यातलाच हा एक “गुढी पाडवा”...
मला माहित असलेल्या इतर संस्कृतीत संध्याकाळी सणांचे सेलिब्रेशन असते , जसे कि चायनीज न्यू इयर, वेस्टर्न न्यू इयर. जगात नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे, गच्च काळोखी रात्र , अंधार किंवा अंधक्कार म्हणणे जास्त योग्य .गर्दी गोंधळ, आरडाओरडा , पब डान्स , मादक पेय सिग्रेटीचा धूर , धुंदी , जागरण करून नवीन वर्षाच्या सूर्योदयाचे सौंदर्याला मुकून, पलंग किंवा सोफ्यावर पाय पसरून झोपलेले दुर्दवी बेहोष जीव ... आणि आपले नवीन वर्षाचे स्वागत , घराची, मनाची सफाई करून ,शुचिर्भूत होऊन , उंची वस्त्रे दागिने घालून बाळ गोपाळांसहित घरातील जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन ध्वजारोहण ... नवीन वर्षाचा निश्चयाचीच गुढी ती , पूर्वजांच्या पुण्याईचा ऋणांची गुढी ती , सृष्टी निर्मात्याच्या उपकारांची स्मरण करून देणारी गुढी ती. दृष्ट प्रवृत्तीवर मिळवलेल्या विजयाची गुढी ती, किती उच्च दर्जाची आपली संस्कृती आणि त्यातून होणारे संस्कार. पण आपल्याकडे पहाटे पासून म्हणजे सूर्योदया पासून हा आनंद सोहळा सुरु होतो, ज्याची पूर्व तयारी आदल्या दिवशी करून ठेवलेली असते... बघाना, यातही आपण किती वेगळे आहोत , मनुष्याचा दिन सूर्योदया बरोबर सुरु होऊन सूर्यास्ताला संपावा असे आपण मानतो आणि ते खरच किती शास्त्रीय द्रिष्टया सुद्धा बरोबर आहे ना ? असो, तर गुढीपाडव्याच्या चहल पेहेल एक दिवस आधीपासूनच दिसू लागते , झेंडूच्या फुलांचे ढीग रस्त्यावर मंडईत विकायला येतात, अंब्याच्या डहाळ्या , दुकान दुकानातून लक्ष वेधून घेतात रंगीबेरंगी साखरेच्या गाठीच्या माळा .. सगळं शेहेर गजबजून जात सण आला की, मग तो लहान असो वा मोठा सण .. उत्साह तेवढाच दांडगा असतो.
संध्याकाळी घरी परततानाच उद्याच्या गुढीपाडव्याचे फीलिंग यायला सुरवात होते, आजूबाजूची चहलपहल बघून मन प्रफुल्लित होऊ लागते. बाहेरून घरी आले कि सोसायटीतल्या अंगणात, दरवाज्यात उभे राहून बायकांच्या संध्याकाळी गप्पा चालू असतात ... उद्या पाडवा आहे, विड्याची पाने, आंब्याची पाने, झेंडूची फुले. त्यावर गप्पा रंगतात, आठवणींचे फुलोरे टवटवतात , मागच्या वर्षी तुमची मुलगी होती ना इथे ...त्यांच्या देशात नसेल ना असे सण वार .. वगैरे वगैरे ... सगळे जण आपल्या चाकोरीबद्ध आयुष्यातून बाहेर येतात आनंदसोहळा साजरा करायला. लहान मुलांचे वेगळे जग सुद्धा त्यांच्या त्यांच्या तयारीला लागलेले असतात. उद्या बाबानासुट्टी आहे, आई खाऊ करणार आहे ... सगळं कस हापनिंग असत ... म्हणून मी याला सण न म्हणता आनंद सोहळा म्हणते मी ...
आपली दुःख, वेदना, आजार , चिंता सगळ्याचा विसर पडतो या युफोरिक औषधाने ... हो की नाही ?? आनंदा सारखे औषध नाही बनले अजून या जगात. “मला काही झालेच नाही, मी एकदम ठीक आहे”, ही ऊर्जा देते आपली संस्कृती.
मला आठवतेय ,तो दिवस . मी भावाच्या घरी राहिले होते आणि त्याच्या ५ वर्षाच्या मुलाला सुशांतला मी पहिल्यांदा भेटत होते या भारत भेटीत .. ते मूल मला आल्या दिवसापासून घट्ट बिलगले होते. त्याच्या घरी केर फर्शी करणारी सुरेखा, आम्हा दोघांचा भल्या सकाळी सुरु होणार दंगा बघून नेहेमी म्हणायची , “ताई , काही ही करा , रक्ताचं नांत आपसूक रक्ताच्या माणसाला ओढून घेत बघा ....”. अगदी तसेच झालं होत आमचं. कृष्ण आणि यशोदा मातेचं मिलन. त्यांनी मला तशी जाणीवसुद्धा करून दिली होती. मी त्याला नेहेमी कृष्णाच्या बाळ लीला रंगवून सांगायचे आणि तो रंगून जायचा कृष्णरंगात. एकदा मी माझ्या सेलफोनमधला यशोदेच्याकडेवर बसलेला कृष्णाचा फोटो दाखवला, तर लगेच तो माझ्या कडेवर उडी मारून बसला आणि म्हणाला आत्या मी तुझा कृष्ण आहे ना? त्याने पुन्हा फोटोत बघितले कृष्णाने एक पाय दुसर्यापायावर ठेवला होता. याने लगेच तशी ऍक्शन केली आणि माझ्या डोळ्यात खोलवर बघू लागला. मला जाणवलं तो माझ्या मनात खोल खोल जातोय त्याच्या बोलक्या नजरेतून. माझ्या अंतरंगातील कृष्णात विलीन व्हायला.
त्याने मला तशी जाणीवसुद्धा करून दिली होती. मी त्याला नेहेमी कृष्णाच्या बाललीला रंगवून सांगायचे आणि तो रंगून जायचा कृष्णरंगात. एकदा मी माझ्या सेलफोनमधला यशोदेच्याकडेवर बसलेला कृष्णाचा फोटो दाखवला, तर लगेच तो माझ्या कडेवर उदीमारून बसला आणि म्हणाला आत्या मी तुझा कृष्ण आहे ना? त्याने पुन्हा फोटोत बघितले कृष्णाने एक पाय दुसर्यापायावर ठेवला होता. याने लगेच तशी ऍक्शन केली आणि माझ्या डोळ्यात खोलवर बघू लागला. मला जाणवलं तो माझ्या मनात खोल खोल जातोय त्याच्या बोलक्या नजरेतून. माझ्या अंतरंगातील कृष्णात विलीन व्हायला. एके दिवशी घरी आले तर माझ्या बेडवर माझे दागिन्यांचे बॉक्सेस अस्ताव्यस्त पडलेले, कानातले गळ्यातले बांगड्या ब्रेसलेट्स सगळं गायब. बघते तर काय ह्या कृष्णाने सगळे घातलं होत. सुंदर ते ध्यान. अनेक माळा गळ्यात, कम्बरेला आणि डोक्यावर अडकवलेलय, बांगड्या ब्रेसलेट्स दोन्ही हातात घालून दप्तरातली मोज पट्टी हातात बासरी म्हणून पकडून खुर्चीवर चढून उभा अगदी कृष्णासारखेपाय दुमडून. काहीही विशेष न करता मला सहज कृष्ण दर्शन झाले होते. डोळे आनंदाने पाणावले.
माझ्या कृष्णाबरोबर मी पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा करणार होते. माझ्या आई बरोबर १५ वर्षांनी. इथे कधी साजरा केलाच नव्हता इतक्या वर्षात . त्यामुळे रीती भाती काही लक्षात नव्हत्या, फक्त गुढी आणि त्याला अडकवलेली ती साखरेची माळ जिच्यावर लहानपणी माझा डोळा असायचा ... आम्ही तिघे भावंड , आई गाठीच्या माळा आंम्हा तिघांसाठी आणायची , पण गुढीची माळ च आम्हाला हवी असायची . किती मजा यायची गळ्यात आईने घातलेल्या माळेचे ते मेडल्स हातात धरून खाताना . आई गळ्यात माळ घालायची तेंव्हा असच वाटायचं बरका, आपल्याला मेडल्स मिळाली आहेत. कदाचित तसाच अर्थ असेल गुढीला ती माळ घालण्याचा ... मेडल ऑफ व्हिक्टरी . गळ्यातली माळ खाऊन सम्पली की आम्ही आईच्या मागे लागायचो गुढीची माळ देण्यासाठी. आमच्यात भांडणे नकोत म्हणून आईच मग म्हणायची उद्या देईन सगळ्यांना तिच्या गाठी आणि खरंच दुसऱ्या दिवशी आई गाठी मोजून वाटायची आमच्यात. एक दाणा सगळ्यांनी वाटून खावा हीच ती आपल्या संस्कृतीची शिकवण . संक्रांत , चैत्राचे हळदी कुंकू अश्या अनेक सणांमध्ये आपण असेच आपल्यातला थोडा वाट दुसऱ्याला वाटत असतो की नाही ?
खरंच ,किती सुंदर आहे आपली संस्कृती , सगळ्यांना जोडणारी कुटुंबातील व्यक्तींना , शेजारपाजाऱ्यांना, लहान थोरांना, नातेवाईक, मित्र मैत्रिणींना. रामायणात रामाने विजय मिळवल्यावर त्याचा राज्याभिषेक झाला तो दिवस आजही आपण साजरा करतो, किती ते प्रेम , बघा. युगां पूर्वीच्या या उपकारांची जण आपण रूढी आणि या गुढी द्वारे पिढ्यान पिढ्या ह्रिदयात साठून ठेवली आहे. किती विलक्षण आहे हे. नाहीतर आजच्या पिढीला किंवा या नव्या पिढीला आपले खापर पणजोबा कोण, त्यांनी आपल्यासाठी काय केले हे आठवेल का ही शन्का आहे, एवढेच काय आजीआजोबा तर दूरच, आईवडिलांचे उपकार सुद्धा विसरतात मुले ... पण आपली संस्कृती रामायणातील रामचंद्रांच्या उपकारांची जाणीव करून देते ... गुढी म्हणजे धवज वंदन करून आणि गुढीला साखरेच्या गाठींची माळ म्हणजे (आमची लहानपणीची “मेडल्स ऑफ व्हिक्टरी”) अर्पण करून ... याच दिवशी सृष्टित वसंत बहरू लागतो, झाडांना नवी पालवी फुटते .. हे सगळं एकच दर्शवत, ते म्हणजे निसर्गाचे, सृष्टीचे नवे पर्व ... मनाच्या कोमेजलेल्या झाडांना नवी पालवी. सकारात्मकता आणि आशा नाविन्याची ...
तसाच उत्साह या दिवशी होता माझे बालपण माझा भाच्चाच्या रूपाने सकाळी लवकर उठून बागडत होते माझ्या समोर आणि आणि माझ्या भोवती , मी जागी असून त्याची डोळे मिटून वाट बघत होते, तो कधी येईल आणि माझी पापी घेईल. माझी आई सुद्धा तेवढीच उत्साहात होती ..
तिने आणि माझ्या वडिलांनीच आम्हाला हि लाईफ टाइम गिफ्ट दिली होती. प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याची शिकवण त्यांनी दिली आम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा आनंद सगळ्यांसोबत आनंदात घालवण्याची, फक्त माझं कुटुंब नव्हे तर शेजारपाजारी, नातेवाईक, घरात काम करणारे, पोस्टमन, दूधवाला भैया, सगळे शामिल असायचे आमच्या आनंदोत्सवात ... असे दार बंद करून गपचूप गुलाबजाम खाऊन बाहेर तोंड पुसून मगच पडायचे असे आम्ही कोणत्याच घरी बघितले नाही .. मनाची आणि घरांची दारे कायम उघडी ... सुदैवाने भावाची सोसायटी तशीच होती, म्हणून पुन्हा तोच आनंद साठवायला मिळाला. आमची आई आणि वडील त्यांच्या चिंता समस्या कधीच आम्हाला जाणवू देत नसत. आमचे लहानपण खरच खूप समृद्ध होते. ते काहीही जुगाड करून आमचे प्रत्येक दिवस सुवर्ण सोहळ्यात बदलत असत जादूचींकांडी फिरवल्यासारखे, कधी शेजारून उसने पैसे घेऊन, कधी पगारात ऍडव्हान्स घेऊन . आम्हाला कळायचे नाही, पण नवीन कपडे, गोडधोड, सगळं साग्रसंगीत असायचं. आमच्यात उत्साह यायचे तो एका नादामुळे जो मी इथं आल्यावर खूप मिस केला, तो म्हणजे आईच्या बांगड्या .. या वर मी कधी लिहिणार आहे , पूर्वी सुद्धा लिहिले आहे . तर ती लवकर उठून सगळी तयारी करायची आणि आम्हाला साखर झोपेत हो साखर झोपच , कारण उद्या आपल्याला आईने पितळ्याच्या डब्यात ठेवलेल्या साखरेच्या गाठीची माळ मिळणार याच विचारात झोप लागायची ... तर त्या साखर झोपेत आईच्या बांगड्यांची ती मंजुळ किणकिण ऐकू यायची . आणि आम्ही लगबग उठायचो. आजही मी सुशांत बरोबर उठले, खरतर तोच मला रोज माझ्या खोलीत येऊन माझी झोपेत असताना गोड पापी घेऊन रोज उठवायचा. आजही तो तसाच आला होता. पापी घेऊन म्हणाला, “आत्या उठ ना , आज गुढी पाडवा आहे…”
मला एकदम भास झाला आईच मला हाक मारत आहे, कारण लहानपणी साखरझोपेतून तीच हाक मारायची अशी स्वयंपाक घरातून, “चला उठा लवकर लवकर, आज गुढी पाडवा आहे, छानछान नवीन कपडे घाला, मी मस्त गोड खाऊ करणार आहे , चला बर ...”. आज हे चिमुरड पोरग माझी आई झालं होत. त्या उत्साहाची सवय परदेशी “स्क्रीन ट्यागड” संस्कृतीमूळे लुप्त झाली होती ... मग मागून आई आली ती आता बालक झाली होती , लहानपणी मी तिला माझी सुख दुःख सांगायची , आता ती मला सांगायची . आईने जरा रागातच, "उठकी पटकन, बघ सुशांत पण सांगतोय लहान असून ..." मी नेहेमी प्रमाणे कूस बदलून , “ हो... ग , उठते .." . असं आईने माग लागलेलं मला खूप आवडायचं तस अजूनही आवडत होत आणि ते मला ९ वर्षांनी अनुभवायला मिळत होत , कस सोडेन?
उठल्यावर लक्षात आलं, केवढी भरपूर ऊर्जा भरली आहे वातावरणात , रस्त्यावर, सोसायटीत, सगळी कडे गुढीपाडवा दरवळत होता . मी उठले तेंव्हा अर्धी तयारी झाली होती. भाऊ तोरण बनवत होता, भावजयी ने पूरण शिजवायला ठेवले होते त्याची शिट्टी वाजत होती , आई दुर्वा फुले कापसाच्या वाती यात मग्न , तोंडाने स्तोत्रपठण चालू , बाहेरून कोणाच्या घरातून घंटेचा आवाज , “झाली वाटते कुलकर्ण्यांची पूजा . एवढ्या लवकर ?”, आई चे हे स्तोत्र सोडून मधेच बोलणे, मग भावजय, “हो, त्यांना जायचे आहे मीटिंग ला लवकर” . मग धुणे वाल्या ताई , भांडे वाल्या ताई, पोळ्या वाल्या ताई , केर लादी वाल्या ताई सगळ्याची एंट्री सुरु होते , प्रत्येकजण त्यांच्या तयारी बदल बोलतेय , त्यांचे काय बेत आहेत पक्वान्नाचे ते सांगतायत , मग आठवणी ... बोलायला विषय शोधावे लागत नाहीत आपल्या कडे नाही का? सगळं कस ह्यापनिंग . सुशांत आणि मी सगळी कडे लुडबुड करत खेळत होतो , त्याच्या बरोबर मलाही ओरडा बसत होता. इकडे शिवाशिव करून नको, नैवेद्य चालू आहे . तुम्ही जा बर बाहेर दोघे..
मग भावाने सुशांत बरोबर अंघोळ केली , सुशांतने बाबांप्रमाणे पीतांबर नेसले , आणि त्यांच्या शेजारी छोट्या पाटावर पूजेला बसला हात जोडून . दृष्ट लागावे असे दृश्य होते ते . थोड्या वेळाने शेजारच्या घरातून कुलकर्णी काकांची हाक आली , सुशांत अंघोळ झाली का , ये इकडे, सुशांत धावत गेला शेजारी, आणि काकांनी त्याच्या गळ्यात त्याच्या पीतांबराला शोभेल अशी पिवळी गाठींची माळ घातली , अगदी श्रीकृष्ण दिसत होता माझा कृष्ण आज . आणि मला आठवले माझा भाऊ सुद्धा आमच्या सोसायटीत कृष्णच मानला जायचा. असेच लाड करायचे सगळे शेजारी त्याचे. मग हा कृष्ण मला दाखवायला आला , “आत्या हे बघ , आजोबांनी काय दिल मला”. मग मी सुद्धा त्याला एक माळ घातली. सुशांत म्हणाला "आत्या, आपण गुढी उभारायची का ? " मी म्हंटल, “हो चल “. आम्ही मग गंमत केली, एक विट आम्ही घेतली ग्यालरीत गेलो , एक छोटी गुढी तयार केली. गुडी कशी उभारायची हे माहित नव्हतं , पण आम्ही आमच्या पद्धतीने , दोघांनी रांगोळी काढली विटे भोवती आणि नैवेद्याला साखर दाखवली, गुढीला आणि स्वतःला हळदीकुंकू लावल. आरती केली, नमस्कार केला आणि झाला आमच्या दोघांचा गुडी पाडवा , मी त्याला सांगितलं, “ अरे, आज आपलं नवीन वर्ष सुरु झालं, ह्यापी न्यू इयर” , तो म्हणाला, “नाही आत्या , आज गुढी पाडवा आहे , ह्याप्पी न्यू इयर झालं… १ जानेवारीला ...”…..
माझा दुसरा मुद्दा इथे सुरु होतो , हिर्या सारखी लख्ख प्रकाशमय आपली संस्कृती कशी आपल्याच नकळत AD बनत चालली आहे . रीती रिवाज करण्यात आपली पिढी किंवा आपल्या आधीची पिढी, एवढी व्यस्त आहे की तिचे सगळे पैलू पुढच्या पिढीला त्यांच्या पद्धतीने समजावून द्यायला ती विसरत चालली आहे ... एवढेच काय तर मी सुद्धा गुढीपाडव्याला आपले नवीन वर्ष सुरु होते की दिवाळीतल्या पाडव्याला यात अनेकदा गल्लत केली आहे. म्हणजे आपल्याकडे असंख्य पैलू असलेला हिरा असताना आपण AD मागे काय येडे झालो आहोत? माझ्या आठ महिन्याच्या रोजच्या त्याच्या शाळेत चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीज बघून असे म्हणावेसे वाटते कि मुलांना फळ फुल बनवून करमणूक करण्या पेक्षा त्यांना संस्कृतीशी जोडणारे जे इव्हेंट्स आहेत ते इंग्रजी शाळांमध्ये कम्पल्सरी केले पाहिजे, माझ्या समोर उभा असलेला कृष्ण हा एक त्याच्यावर माझ्या गोष्टीतून झालेल्या संस्कारांचं प्रतीकच होत. त्यांना जसे रुचेल अश्याच पद्धतीने, नाट्यरूपे व गोष्टीरूपे त्यांना संस्कृतीशी अलगदपणे जोडले पाहिजे. आरडाओरडा वा जबरदस्ती करून रीती करायला सांगण्यापेक्षा त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या मराठी शाळांमध्ये संस्कृतीचे संस्कार होत असत, आता इंग्रजी शाळांचे प्रस्त असल्याने तिथेही हे उपक्रम कम्पल्सरी करणे आवश्यक आहे. संस्कृतीचे संस्कार योग्य पद्धतीने करून आपण हे गोकुळ पुढच्या पिढ्यांसाठी शाबूत ठेऊ शकतो. नाही तर समाजाचे दुर्लक्ष झाल्याने जसे कुटुंब सहज विभक्त होतात , रिलेशनशिप मध्ये कसे सहज ब्रेक अप्स होतात , पार्टनरशिप कश्या सहज रद्द होतात, विभक्त समाज विभक्त संस्था विभक्त देश विभक्त विश्व् ... हे सगळे सोयीस्कर रित्या केलेले दुर्लक्षाचेच परिणाम आहेत. तसेच संस्कृती सुद्धा सहज गायब होईल यात शंका नाही .
गुढी समोर नतमस्तक होऊन या सृष्टिकर्त्याचे आभार , श्रीरामाचे आभार मानण्या ऐवजी , गुढी सोबत सेल्फी काढणे हे आपले टार्गेट कसे काय बनले? हे बघणे आवश्यक आहे. पाश्चात्य संस्कृतीला अंधाराचे फारच आकर्षण, आपल्या संस्कृतीसाठी अंधार म्हणजे अंधक्कार. खरच सगळी काळी कृत्ये अंधारातच होतात नाही का? सैतानाला बाकी कशाची भीती नसेल पण प्रकाशाची नक्की भीती वाटते, स्वच्छ प्रकाशात अस्वच्छ लगेच दिसून येते लपत नाही, म्हणूनच भारतीय संस्कृती प्रकाशाचे स्वागत आणि अंधकाराचा अंत या तत्वाचा अवलम्ब करते, जसे की दीप प्रज्वलित करणे वाढदिवसाला वा नवीन वर्षाला अथवा दिवाळीला. फुंकर मारून असलेला प्रकाश घालवून अंधकारात आरडा ओरड करणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही किंवा केक रुपी अन्न एकमेकांच्या तोंडाला फासणे सुद्धा, आपण कुकृत्य करणाऱ्याच्या तोंडाला काळे फासतो नाही का ?? मग आपल्या पुढच्या पिढीला AD तुन हिऱ्याकडे घेऊन येणे हीआपल्या पिढीची जबाबदारी आहे असे मला वाटते. व्हिडीओ गेमस कडून भातुकली, तळ्यात मळ्यात, चमचा लिम्बू कडे आणले पाहिजे. भारतीय संस्कृतीकडे जगासाठी देण्यास भरपूर काही आहे ह्याची जाणीव आज मी तैवान गव्हर्मेंटच्या एजुकेशन व सांस्कृतिक विभागास करून देत आहे, माझ्या भारतावरील दोन वर्षाच्या प्रकल्पाद्वारे. तसेच जाणीवपूर्वक प्रयत्न आपण भारतात आणि भारताबाहेरील नवीन पिढीसाठी केले पाहिजेत असे मला वाटते. आणि आपल्या संस्कृतीचे शास्त्रशुद्ध आकलन इतर देशांना करून देण्याची संधी भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला ईश्वराने निर्माण करून दिली आहे, त्या सुसंधीचा फायदा प्रत्येकाने करून घेतला पाहिजे असे मला वाटते. आपण सर्वांनी याचा विचार करा आणि आजच्या दिवशी आपण हे पाऊल उचलुया. संस्कृतीची नव्याने ओळख करून घेऊया आणि देऊया भारतासाठी आणि इतर देशांसाठी.
“ऊस डोंगापरी रसनव्हे डोंगा ... काय भुललासी वरलिया अंगा ...” ही नजर आणि शिकवण आपली संस्कृती देते. तर आजच्या शुभ दिनी, या नव्या धृड निश्चयाची ही गुढी म्हणजेच, “सेल्फी” जगावर मात करून, “स्व” विरहित विचारसरणीच्या विजयाची ही गुढी, आज आपण आपल्या देशासाठी, तिच्या संस्कृतीसाठी आणि हिंदूधर्मासाठी आपल्या मनात उभारूया.
पुन्हा एकदा सर्व मराठी बंधू - भगिनींना गुढी पाडव्याच्या आनंदसोहळ्याच्या आणि नवीन हिंदू वर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा.
जय श्रीराम.
डॉ . शरयू किरकोळे - भागवत
सम्पर्क -
Email. : Sharayu_ntust@yahoo.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Kommentare