फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षातिल बारावा महिना आहे.फाल्गुन हा शालिवाहन शके वर्षातील शेवटचा महिना. या महिन्याला पूर्वी तपस्य या नावाने ओळखत असत. फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन आणि भाव फाल्गुन असे प्रकार असतात, त्यापैकी श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला अर्जुनाचा जन्म झाला होता त्यामुळे अर्जुनाच्या अनेक नावांपैकी फाल्गुन असे पण नाव असल्याचा गीतेमध्ये उल्लेख आढळतो. तर नकुल आणि सहदेव या माद्रीच्या मुलांचा जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावास्येच्या दिवशी झाला होता. या महिन्यात रोज रात्रीच्या प्रारंभी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वेला उगवते तसेच या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला फाल्गुन मास असे म्हणतात. या महिन्यात मराठी वर्ष संपत आल्याची जाणीव होते. फाल्गुन म्हणजे उत्सवाचा महिना. या महिन्याला मधुमास असेही म्हणतात. या महिन्यात झाडे हिरवी , गुलाबी नाजूक पाने लेऊन वसंत ऋतूचे छान स्वागत करीत असतात. सगळीकडे छान छान फुलांचा सुवास पसरलेला असतो आणि एकूणच वातावरण उत्साही आणि उत्सव साजरे करणारे असते.एकीकडे सरती थंडी , हलकेच जाणवणारी उन्हाची चाहूल,ऐन भरातला वसंत ऋतू सृष्टीसौंदर्याचा अनुपम सोहोळा असतो. कोकिळांचे कूजन पण चालू असते. धार्मिकतेतूनही या महिन्याचे पावित्र्य वेगळे ठरते.
हॉलिकोत्सव किंवा होळी हा या अखेरच्या महिन्यातला अखेरचा सण या महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी होलिकादहन होते. फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होलाष्टक म्हणतात . फाल्गुन शुद्ध द्वितीयेला फुलेरा दूज म्हणतात . हा सण फाल्गुन महिन्यातला सर्वात शुभ आणि धार्मिक समजला जातो. या दिवशी श्रीकृष्ण होळीच्या सणात भाग घेतो आणि रंगाऐवजी रंगीबेरंगी फुलांनी होळी खेळतो असे सांगतात. तसं पाहिलं तर बारा मास आणि सहा ऋतूंचे सोहळे साजरे करताना दिवस कसे सरतात हे समजत नाही. परंतू शेवटच्या ऋतूतिल हा शेवटचा महिना आपल्या सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो. बदलत्या ऋतुपर्वात येणाऱ्या या महिन्याला वसंतोत्सवाचा महिना म्हणून ओळखले जाते. होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. उष्णतेची तीव्रता कमी व्हावी म्हणून अग्निदेवतेचे हे केलेले पूजन होय. हा होलिकोत्सव म्हणजे सर्व वाईट गोष्टींचा नाश. या वर्षातील सर्व जुनेपाने, वाईट अनुभव,वाईट गोष्टी,या आगीत जाळून नष्ट करायच्या,भस्मसात करायच्या आणि छान नितळ मनाने नवीन येणाऱ्या वर्षाला सामोरे जायचे असा त्याचा छान अर्थ आहे.काही प्रसंगाने एकमेकांची दुरावलेली मने,दुरावलेली मैत्री पूर्ववत करण्यासाठीच होलिकोत्सवाची गरज असते असे समजले जाते. होळीमुळे अशुद्ध वातावरण शुद्ध होते आणि प्रदूषण नाहिसे होते.. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये झालेली पानगळ, झाडाच्या वाळलेल्या फांद्या, झाडाभोवतीचा पानांचा कचरा गोळा करून होळीमध्ये जाळायचा असा खरं म्हणजे दंडक आहे. पण वृक्षतोड करून त्यांची लाकडे होळीत पेटविणे योग्य नाही.
होळी पौर्णिमेच्या निमित्ताने भक्त प्रल्हादाची गोष्ट सांगितली जाते. हिरण्यकश्यपू राक्षसाचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता आणि तोंडाने सारखा नारायण - नारायण असा जप करीत असे.आपल्या शत्रूचे नाव सारखं तोंडाने म्हणणाऱ्या प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूला खूप राग येत असे.म्हणून प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने खूप उपाय केले,पण सगळे उपाय व्यर्थ गेले. हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिका हिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिच्याच सल्ल्यानुसार होळी पेटविली आणि पेटत्या होळीमध्ये होलिका आपल्या भाच्याला म्हणजेच प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. होलिकाला मिळालेले अग्निपासून वाचण्याचे वरदान या वेळेस फोल ठरले आणि होलिका होळीमध्ये जळून भस्मसात झाली आणि प्रल्हादाला विष्णूंनी वाचविल्यामुळे तो काहीही त्रास न होता होळीतून बाहेर पडला. जी गोष्ट वाईट होती तिचा घास अग्नीने घेतला आणि जी गोष्ट चांगली होती तिला म्हणजे प्रल्हादाला अभय दिले म्हणून या दिवशी होलिकेप्रमाणे असणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती, वाईट विचार यांचे दहन करण्याची प्रथा आहे.
होळी हा रंगोत्सव पण समजला जातो. एकमेकांच्या मनातला वेडावाकडा विचार किंवा त्यांचा धुरळा मनातून काढून टाकून मनाला मोकळीक देऊन परत ताजेतवाने होण्यासाठी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड किंवा धुलीवंदन साजरे केले जाते. होळी पेटविल्यानंतर ती शांत झाल्यावर त्याची राख एकमेकांच्या अंगावर उडविली जाते यालाच धुलिवंदन असे म्हणतात. या दिवशी या उत्सवाच्या निमित्ताने घराघरांमध्ये पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो, आणि होलिका मातेला पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आपल्या देशात सगळीकडे होळ्या पेटत असल्यामुळे हवेमध्ये खूप उष्णता निर्माण झालेली असते.त्यामुळे होळी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पंचमीला निरनिराळ्या नैसर्गिक रंगांचे गार पाणी पिचकरीने एकमेकांच्या अंगावर उडवून रंगपंचमी साजरी केली जाते.
शितळ शिमगा : बसू लागलेल्या लहान मुलांचा शितळ शिमगा करतात. या दिवशी सूर्याच्या उन्हामध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी गरम व्हायला ठेवून एकीकडे उकडलेल्या कैरीचा थोडासा गर किंचितशी हळद घालून घरातल्या लहान मुलांच्या अंगाला लावून उन्हात तापलेल्या पाण्याने आशा लहान मुलांना अंघोळ घातली जाते. उन्हाच्या झळा सतत वाढत असतात त्यामुळे मुलांच्या अंगात मऊ सुती पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात. या कपड्यांवर केशर शिपडतात. मुलांच्या गळ्यात साखरेच्या गाठ्या घातल्या जातात. कोणी कोणी या सुमारास आलेल्या द्राक्षांची माळ करून ती सुद्धा लहान मुलांच्या गळ्यात घालतात. हे सगळे प्रकार मुलांना उन्हाळ्यापासून त्रास होऊ नये यासाठी केले जातात. यालाच शितळ शिमगा असे म्हणतात. हा शितळ शिमग्याचा सण रंग पंचमीच्या दिवशी साजरा करतात.
तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराज्यांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना सर्व जग जगद्गुरू म्हणून ओळखते. वारकरी संप्रदायातील लोक कीर्तनाच्या शेवटी "पुंडलीक वरदे हरी विठ्ठल,श्री . ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय " असा जयघोष करतात. संत तुकाराम सर्व काळ हरिनाम घेत असत. संत बहिणाबाईंनी वारकरी पंथाच्या देवालयाचे जे वर्णन केले आहे त्या देवालयाच्या कळसावर जाऊन बसण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केले आहे.
फाल्गुन वद्य तृतीया ही शिवरायांची जन्मतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रसिद्ध उत्सव आहे. शिवाजी महाराज हे आपल्या मराठी माणसांचे दैवत असल्यामुळे त्यांची जन्मतिथी खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.
फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी पूर्वीचं प्रतिष्ठान नगर किंवा आत्ताचे पैठण या गावी संत एकनाथांचा जन्म झाला. संत भानुदासांच्या कुळामध्ये एकनाथांचा जन्म झाला. भानुदासांच्या कुळी जणू महाविष्णूंचाच अवतार झाला असे संत निळोबाराय म्हणत असत. संत एकनाथ महाराज ऋग्वेदी ब्राम्हण असल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी त्यांची मुंज झालेली होती. त्यांच्या गुरूंचे नाव जनार्दन स्वामी असे होते.. त्यांची बारा वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी सेवा केली. लहानपणापासूनच अध्यात्म आणि हरिकीर्तनाची आवड नाथांना होती. जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रयाचे दर्शन झाले . आत्मबोध , पूर्ण गुरुकृपा आणि दत्तात्रयाचे दर्शन यामुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. बराचसा काळ ध्यान धारणा, वेद अध्ययनात गेल्यामुळे नाथ पूर्ण पुरुषोत्तम झाले होते. विजयनगरच साम्राज्य संपुष्टात आल्यामुळे सारा समाज दिशाहीन झालेला होता. आया बायांना त्रास दिला जात होता. देवळे उध्वस्त केली जात होती.,देवांच्या मुर्त्या भ्रष्ट केल्या जात होत्या. समाज असहाय्य आणि गलितगात्र झालेला होता. त्यांच्यामध्ये स्वराज्य , स्वदेश , स्वत्व यांची जाणीव करून देण्यासाठी नाथांनी निरनिराळ्या विषयांवरची भारुडे लिहिली . त्याचबरोबर सुंदर शब्दातल्या गौळणी , अभंग , ओव्या लिहिल्या आणि त्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराज हे स्वभावाने अतिशय शांत होते, त्यामुळे त्यांना शांतिब्रम्ह असे म्हणतात. भागवत धर्माचा प्रसार करून वारकरी पंथाचे कार्य पुढे नेण्याचे हे महत्वाचे काम नाथांनी केले. त्यांचा जन्मदिन पैठणमध्ये नाथषष्ठी अशा नावाने तीन दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नाथांनी संस्कृतातली भगवतगीता सोप्या भाषेत सांगून एकवीस स्कंद असलेलं अठरा हजार ओव्यांच एकनाथी भागवत वारकऱ्यांसाठी लिहिलं. नाथांनी आणखी चतु:श्लोकी भागवत, भावार्थ रामायण , रुक्मिणी स्वयंवर, एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ लिहिले.
फाल्गुन अमावास्येला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी लेखक , विचारवंत, आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी सतत पुरोगामी विचारांचा आग्रह धरला. स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. आपल्या पत्नीलाही शिक्षण देऊन तिला या मुलींच्या शाळेमध्ये शिकविण्यास सांगितले. समाजाकडून येणाऱ्या विरोधी प्रतिक्रिया , बोचरे शब्द , अपमानाचे शब्द, मानहानी सारे गिळून त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा आग्रह धरला त्यामुळे त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. इतकच काय पण दलितांच्या घरच्या स्त्रियांनी पण शिक्षण घेतले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. "शेतकऱ्यांचा आसूड " हा महात्मा फुले यांनी लिहिलेला अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांविषयीचा त्यांना खूप कळवळा होता हे दिसून येते.
फाल्गुन महिन्याच्या अमावास्येला स्वराज्याचे आपल्या पराक्रमाने रक्षण करणाऱ्या श्री. संभाजी महाराजांचा दुर्दैवी अंत झाला. समाजकारण , राजकारण , अर्थकारण , धर्मकारण आशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजविणारे श्री . संभाजी महाराज आपल्या स्वकीयांच्याच फितुरीमुळे शत्रूच्या जाळ्यात सापडले आणि अमावास्येच्या दिवशी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. औरंगजेबाने श्री . संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करूनही ते सर्व सहन करून श्री . संभाजी महाराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही,म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली.
या फाल्गुन महिन्याचे वर्णन निसर्गाने बहाल केलेल्या निरनिराळ्या रंगांच्या फुलांच्या माध्यमातून फुलेरा दूज या दिवशी साक्षात भगवान श्रीकृष्णच रंगांची उधळण करून रंगोत्सव साजरा करीत आहेत अशी सुंदर कल्पना केली आहे. आता पानगळीमध्ये पडलेली झाडावरची पाने,काटक्या,फांद्या यांना गोळा करून त्यायोगे आजूबाजूचं जंगल,वन,बाग, आपलं अंगण यांची स्वच्छता करून त्यांना होळीमध्ये अर्पण करून होळीचा सण साजरा करायचा का वृक्षतोड करून चांगले वृक्ष होळीमध्ये जाळायचे हे आपणच ठरवायला पाहिजे. ज्या रंगोत्सवाचा भगवान श्रीकृष्णांच्या माध्यमातून वर उल्लेख केला आहे त्या रंगपंचमीच्या सणाला किंवा धुळवडीच्या दिवशी सुद्धा निरनिराळे घाणेरड्या रंगांचे ऑइल पेंट्स चेऱ्यावर लावून इतक्या सुंदर कल्पनेच्या रंगपंचमीची बेरंगपंचमी करायची का हे पण आपणच ठरवायला हवे . नाही का ?
दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्ल पक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्ण पक्षातल्या एकादशीचे आहे). :
चैत्र : कामदा एकादशी, वरूथिनी एकादशी
वैशाख : मोहिनी एकादशी, अपरा एकादशी
ज्येष्ठ : निर्जला एकादशी, योगिनी एकादशी
आषाढ : शयनी एकादशी, कामिका एकादशी
श्रावण : पुत्रदा एकादशी, अजा एकादशी
भाद्रपद : परिवर्तिनी एकादशी / पद्मा एकादशी, इंदिरा एकादशी
आश्विन : पाशांकुशा एकादशी, रमा एकादशी
कार्तिक : प्रबोधिनी एकादशी, उत्पत्ती एकादशी
मार्गशीर्ष : मोक्षदा एकादशी, सफला एकादशी
पौष : पुत्रदा एकादशी, षट्तिला एकादशी
माघ : जया एकादशी, विजया एकादशी
फाल्गुन : आमलकी एकादशी , पापमोचिनी एकादशी
अधिक मास (३ वर्षांतून एकदा) कमला एकादशी, कमला एकादशी.
सौ.उमा अनंत जोशी ,
१४.०३.२०२१.
फोन . : ०२० २५४६८२१३
मो. ९४२०१७६४२९.
Email.: anantjoshi2510@gmail.com
अमूल्य माहिती दिली आहे !