top of page

जोडी दिव्या-पणतीची



सबंध आभाळाच्या डोळ्यांखाली आणि धरती मातेच्या कुशीत कुठंच घडू नये असं घडलं अन त्याचे भोग भोगावे लागले. निसर्गाच्या विरुद्ध वागले तर निसर्ग धडा शिकवणारच.

त्याचं असं झालं, कि तुमच्या आमच्या गावासारखे एक गाव. या गावात माती, शेती, नदी, डोंगर, हिरवळ, प्राणी-पक्षी सगळच मुबलक. पण, माणसाला उपरती सुचते तेव्हा एका क्षणात सगळ उध्वस्त करायची दुर्बुद्धीहि त्याला सुचते.

गावतल्या बाया “मला मुलगा झाला.” असं म्हणून नाक वर करू लागल्या. आणि “तुला मुलगी झाली.” असं म्हणून नाक मुरडू लागल्या. “माझ्या घरात वंशाचे दिवे” असं म्हणून बापे मिशा पिळू लागले अन “तुझ्या घरी वंशाची कदीबी विझणारी पणती” असं म्हणून, पणत्यांच्या बाप्यांच्या मिशा छाटू लागले.

मग काय “पणत्यांचे समूळ उच्चाटन” अशी एक मोहिम सुरु झाली. हळू हळू काहींनी स्वतःच्या पणत्या स्वतःच विझवल्या, काहींनी पणत्या लावल्याच जाणार नाहीत याची काळजी घेत “अनधिकृत सोनोग्राफी” सेन्टरच्या डॉक्टरांना श्रीमंत केलं. काहींनी आपल्या पणत्या अशा गावी पाठवून दिल्या जिथून त्या परत येणार नाहीत. आता गावात कोणत्याही पणतीने ना गरीबचं ना श्रीमंताचं कोणाचही घर जाळणार नाही. कारण पणतीच नसेल तर काही जाळण्याचा प्रश्नच येत नाही. आता गावात उरले सगळे दिवेच, वेसणाला न जुमानणारे, चकाकणारे, भावनाहीन, तोरेबाज..... आता कसं गाव खऱ्या मर्दांच वाटू लागलय.

पण दिव्यांना पण दिवेच हवेत... अन लग्नाशिवाय ते शक्य नाही म्हणून दिव्यांची लग्न मोठ्या मुश्किलीने दुसऱ्या गावतल्या पणत्यांशी झाली. मुश्किलीने यासाठी कारण, “ज्या गावात पणत्या तेवत कशा ठेवायच्या याची माहितीच नाही तिथं आपल्या पणत्यांची काळजी कोण घेईल?” याची भीती पणत्यांच्या आई वडिलांना होतीच. पण दिव्यांनी विश्वास दिला कि, असल्या गावात आम्ही राहणारच नाही. अन हळूहळू “गावापेक्षा शहर भारी” असं म्हणून सगळे दिवे आपल्या बायकांना घेऊन शहराकडे गेले.

काळ त्याच्यागतीने वाहत होता. मर्दांचे गाव आता म्हातार्यांचे गाव बनले. पण यांचे वंशाचे दिवे, यांची म्हातारपणाची काठी, यांच्या चितेला अग्नी देणारे यांचे वंशज... कोणीही गावाकडे फिरकायला तयार नाहीत. आता पारावर, कट्ट्यावर, फणसा-आंब्याखाली, गुऱ्हाळात, गोवऱ्या थापताना, धार काढताना, अन TV बघताना घरातही, पणत्यांची चर्चा होऊ लागली.

“दिव्यांपेक्षा पणतीच बरी. जास्त तेल खात नाही. जास्त खर्च देत नाही. अन लग्न होऊन गेली तरीबी काळजीपोटी, सासू–सासर्यांचा विरोध पत्करून आई-बापाला भेटायला तरी येती. आली तरी, माहेरवाशीण म्हणून आराम न करता, आई बापाला मदत करती. अन निघताना हातावर काही नाही ठेवलं, तरी मनात राग धरत नाही.” हळू हळू विझायच्या मार्गावर असलेल्या काही पणत्यांना आपले दिवस आठवू लागले. आणि दिव्यांनाही पणतीचे महत्व उमगू लागले. पण आता या सगळ्याचा काय उपयोग? गावात सगळे बाया अन बापे ४५-५० च्या पुढचे. आता काही होणे अवघडच.

एक दिवस ग्रामदेविच्या मंदिरात महत्वाच्या बाप्यांची चर्चा सुरु होती. अन अचानक कोणे एके काळी सरकारी इस्पितळात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या, पण लग्नामुळे बायको नावच्या पिंजर्यात अडकून घर आणि मंदिर सांभाळणाऱ्या, वय वर्ष ४७, भडक हिरवी साडी, खनाची चोळी, लाल रंगाचा चुडा, बेसनाच्या लाडू एव्हडे मोठ कुंकू, मानेवर गोंदवलेली चिन्ह, अशा अवतारात गुरविनबाई आल्या.... त्यांनी गंभीर अविर्भावात सगळ्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला. करंड्यातून हळदी-कुंकू उचलून देवीवर उधळले, १५-२० अगरबत्त्या लावून ओवाळल्या. त्यामुळे देवीचा गाभारा सुगंधित धुराने भरून गेला.... अन मिश्री लावून लावून सुकलेल्या अन काळवंडलेल्या ओठांनी जबरदस्त प्रार्थना करू लागल्या. बाकीचे सगळे गोळा झाले. अचानक चर्चेची जागा प्रार्थनेने घेतली.

गुरविनबाईची प्रार्थना झाली, त्यांनी नजरेनेच सगळ्यांना बसण्याचा इशारा केला. महत्वाचे बापे शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे एका मागे एक शिस्तीत बसले. मोठ्या आशेने गुरविनबाईकडे बघू लागले. आजवर गावात जे संकट आले, ते गुर्विनबाईंच्या उपयान्मुळेच दूर झाले. कमी पाउस, जास्त पाउस, दिव्यांची लग्न न ठरणे, घरात दिवा न येणे, पूर येणे, पिकावर रोग पडणे, पिक कमी येणे... अशा अनेक संकटांवर गुरविनबाईचे उपाय कधी उपयोगी पडले, तर कधी नाही पडले. पण तरीही त्यांचा नेहमीच आधार वाटत आलाय गावाला.

अशा गुरवीन बाईंनी आपल्या खरड्या आवाजात सुरुवात केली, “देवीच्या नवानं चांगभल,” सगळे जोरात ओरडले, “चांगभल, चांगभल......”.

बाईंनी परत सुरुवात केली, “काल रातच्याला माझ्या सपनात देवी माय आली, लय नाराज होती, रडत होती, म्हणाली तुम्ही लोकांनी मला गावाबाहेर काढलीत. अन आता माझीच चर्चा करत बसलात व्हय. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणारच....”.

एक मर्द “म्हंजी, आता देवी माय कवा बी गावात परत येणार नाय? आपल्या गावात कवाच पणती पेटणार नाय? आम्हा अभाग्यांना कवाबी पोरींच प्रेम मिळणार नाय?”

बाई, “तसं काय नाय, देविनच खुद्द एक उपाय सांगितलाय, अक्ख्या गावने एकत्र येऊन देवीची जत्रा भरवायची, तिची पूजा करायची, तिची माफी मागायची अन बाप्यांनी बकरी बळी देऊन, स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून अक्ख्या गावाला प्रसाद म्हणून खायला घालायचा. त्यादिशी तुमच्या घरातल्या देवीच्या रुपाला आराम द्यायचा, तीने आराम केला म्हंजी देवीला आराम मिळाला. बाकी त्यानंतर पुढ्च काय ते सांगेन म्हणाली.”

एक मर्द, “इतक सोप्प हाय व्हय, सांगा कधी उरकूया जत्रेचा कार्यक्रम.”

बाई, “येत्या सोमवारी पोर्णिमा हाय तेवा करू. पर त्यानंतर देवी अजून काय सांगेल तेबी लक्षात घ्यायला हवं.” सगळ्यांनी एकत्र माना डोलावल्या अन घरची वाट धरली.

जत्रेचा कार्यक्रम ठरला. काही मर्द चांगल्या बकऱ्यांच्या शोधात गावो-गावच्या बाजारात जाऊ लागले. बायका घर आणि गाव साफ-सुफ करू लागल्या. शहरात गेलेल्या दिव्यांना फोन गेले... इतके दिवस कोणी मेले तरीबी गावी न येणारे दिवे बकऱ्यांसाठी येणारच, शेवटी बकरं देवीचं हाय. जवळ जवळ सगळेच दिवे हक्काच्या बायकांना घेऊन आले. गावकरी चाटच झाले, कारण आलेल्या सुना सगळ्याच पोटुशी होत्या. कोणी ४थ्या तर कोणी ६व्या तर कोणी ८व्या महिन्याची गरोदर. सगळ्या सासू-सासर्यांना आनंद तर झालाच, पण भीती वाटू लागली. देवीच्या कोपाने या पिढीला सगळे दिवेच झाले तर? एकीकडे विचारांचं वादळ उठत होतं तर दुसरीकडे जत्रेची तयारी होत होती.

१० टूनटुणीत बकरी आणलीत, मंदिराबाहेर रांगोळ्या पसरल्या, फुलांची दुकाने लागली, नवीन कपड्यांनी गावकरी चमकू लागलीत. सगळे गावकरी जमले, थाटामटात पूजा झाली... सगळ्यांनी देवीचे दर्शन घेतले. म्हशीएवढ्या मोठ्या टोपात मटण शिजू लागलं, बाप्यांच्या भाकऱ्याच्या थपथपिने मंदिराशेजारील गल्ली हादरून गेली. निस्ता स्वयंपाक करणं किती थाकावाटीचे काम आहे, हे त्या दिवशी बाप्यांना कळलं. बहुतेक इथून पुढ एकबी बाप्या आपल्या बायकोला, “दिसभर काय करून थकतीस?” असा खोचक प्रश्न विचारणार नाही.

समद्या बायकांची पहिली पंगत बसली, याआधी कधीच या गावात असं घडलं नव्हत. प्रत्येक बाई जेवताना नवऱ्याकडे चोरून बघू लागली, अन त्याला मटण छान झालय असं खुणवू लागली. बाप्यान्नाबी पहिल्यांदाच वेगळाच आनंद होत व्हता, पण असला कसला आनंद ज्यामुळे डोळ्यात पाणी येतंय हे त्यांना कळत नव्हत. नंतर बाप्यांची पंगत बसली, आपल्याला इतका चांगला प्रसाद बनवता आला या इचाराने त्यांची छाती फुगून आली.

इतक्यात गुरविनबाईंचा आवाज लाउडस्पीकर मधून घुमू लागला, “गावकर्यांनो आज आपल्या चुका लक्षात घेऊन, आपण देवीचा मान राखत जत्रा भरवली. देवीनं काल स्वप्नात येऊन काही शपथा घ्यायला सांगितल्यात. आता शपत घेऊया....

इथून पुढ जो मान मंदिरातल्या देवीच्या मूर्तीला देतो तोच मान घरातील देवीच्या रुपाला देऊ, कोणत्याही बाईला बाई म्हणून न हिणवता तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देऊ, तू खालच्या दर्जाची, मी वरच्या दर्जाचा असे दर्जे न ठरवता एकमेकांच महत्व लक्षात घेऊन एकत्र गुण्या गोविंदाने जगू. अन इथून पुढे “दिवा” कि “पणती” याचा शोध घेण्यासाठी अनधिकृत सोनोग्राफी सेंटर गाठणार नाही.”

इतक्यात इक दिवा पुढ आला अन त्यान माईक हातात घेतला. “आम्ही या सगळ्या शपथा घेतोच. अन आश्वासन देतो कि जी चूक आमच्या वडिलधार्यांनी केली ती चूक आम्ही करणार नाय. या गावात कधी रक्षाबंधन नाय कि भाऊबीज साजरी झाली नाय. खळखळणार बहिणीच हसू कधी ऐकलाच नाय. आम्ही काय गमावलाय ते आम्हाला ठाऊक हाय. पण आमच्या बायकांनी मोठ्या मायेने आम्हाला जीव लावला त्यामुळे बाईच्या ममतेची ताकद आम्हाला पण कळलिये. गावात राहिलो असतो तर आमच्या आई बापांनी आमच्या बायकांना “दिवाच” व्हावा म्हणून त्रास दिला असता, हा त्रास नकोच म्हणून आम्ही शहरात गेलो. आमच्या पैकी कोणही, “मुलगा कि मुलगी” याच्या तपासणी साठी घेऊन गेलेलो नाही. आम्हाला मुलगी हवी, अक्ख्या घराला जोडणारी, निखळ प्रेमाने नाती जोडणारी, आपल्या चिमुकल्या हातंनी बापाला घास भरवणारी. हो आम्हाला पणती हवी. अंधारात घर उजळून टाकणारी पणती.”

गावकर्यांचे डोळे पाण्याने भरून आले. दिवे आपल्यापेक्षा शाहने निघाले हे त्यांच्या ल्क्षात येऊन त्यांना धन्य वाटू लागल.

गुरविनबाईंचा बाण निशाण्यावर लागला होता. तिने मूर्तीकडून चमत्काराची वाट न पाहता, गावकऱ्यांच्या भाषेत अन त्यांच्याच मुलांकडून त्यांना काय ती शिकवण दिली.

जत्रेला १ वर्ष पूर्ण होत आला, पण एक असा चमत्कार झाला जो कोणाच्याच लक्षात नाही आला..... सगळी घरे टीमटीमत्या पणत्यानी भरून गेलीत. गावतल्या सगळ्या घरात मुलीच जन्माला आल्या.

या गावाला अद्दल घडलीच. परिणामी दुसर कोणत तरी गाव दिव्यांनी उजळलं असेलचकि, नाहीतर पणत्यासाठी दिवे कुठून येतील. कारण निसर्ग महान आहे.....



लेखिका: मेघा महादेव पाटील (पुणे)

मो: ८१४९८१३३०६

ईमेल: megha3041988@gmail.com


कथा आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

372 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page