top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

दातृत्व




दातृत्व म्हणजेच औदार्य किंवा दानशूरता होय. दाता म्हणजे दुसर्‍याला दान देणारा. "दाता" हा एकच शब्द किती महानता दाखवून देतो. आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला, वस्तू किंवा पैशाच्या रूपाने दान देत असतो तेव्हा ते घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील आनंद शब्दात व्यक्त करता येत नसतो. कळत-नकळतपणे त्या व्यक्तीच्या सत्भावना आपल्याला मिळत जातात आणि हा क्षणिक मिळणारा आनंद आपण अंतर्मनात साठवत जातो.




दातृत्व हे खऱ्या अर्थाने अगदी निस्वार्थ भावनेने केले गेले पाहीजे, तरच त्याचा शाश्वत आनंद आपण प्राप्त करू शकतो. मी दान केले ही भावना आपला अहं वाढवायला कारणीभूत होतो. आणि केलेले दान हे निस्वार्थी दान न रहाता, त्यामागे सतत मीपणाचा भाव जागृत रहातो. म्हणूनच जेव्हा आपण एखाद्याला काही देतो तेव्हा त्यामागे आपला विवेक सतत जागा ठेवून सजगपणे कुठलेही दानधर्म करावे. म्हणजे ते एक पुण्यकर्म होते.




दान कोणाला आणि किती करावे ह्या गोष्टीचा सुध्दा विवेक असणे खूप महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला गरज नसताना,आपण वाटत सुटलो तर त्याला दान म्हणता येत नाही. आपण ज्याला एखादी वस्तू किंवा पैशाच्या स्वरूपात दान करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्या वस्तूचे किंवा पैशाचे मोल समजले तरच दान देणाऱ्याचा उद्देश सफल झाला म्हणायचा. एकदा त्या व्यक्तीला सतत घेण्याची सवय आपण लावली तर ती व्यक्ती काही काम न करता ऐदी होईल आणि आपल्याकडे सततच आशाळभूत नजरेने पहात राहील. अशावेळेस आपले देणे हे व्यर्थ समजावे. काही व्यक्तींना सवय असते "बोट दिले की हातच धरतात" तेव्हा आपल्या दातृत्वाचा अति गैरफायदा समोरच्याने न घ्यावा इतका समतोल आपल्याला राखता आला तरच त्या देण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

आपल्या कमरेचे सोडून दुसर्‍याला देणे, ह्याला शहाणपणा म्हणत नाही किंवा दानत म्हणणेही चुकीचे होईल असे मला वाटते. मी अशी बरीच माणसे जवळून पाहिलेली आहेत, जी आपलं सर्वस्व दुसर्‍याला लुटतात आणि त्याच्या अविवेकी किंवा भोळ्या स्वभावाचा, समोरची लबाड माणसं कायम गैरफायदा घेण्यास टपलेली असतात. ह्या वृत्तीमुळे घरच्या इतर माणसांना त्याचा खूपच त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच दातृत्व ह्याचा माझ्या दृष्टीने सरळसोपा अर्थ म्हणजे, प्रत्येक गोष्ट दान करताना आपण स्वतःचा विचार करून मग समोरच्याला किती व कसे दान करावे, ह्याचा सारासार विचार करून केलेले दान म्हणजेच निस्वार्थ दातृत्व होय.




समाजात सगळेच काही पैशाने किंवा वस्तूरूपाने, कोणाला दान देऊ शकत नसतो. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार आणि वैचारिक सामर्थ्यानुसार प्रत्येक जण कधी ना कधी तरी फुल ना फुलाची पाकळी देत असतो. वस्तू छोटी किंवा मोठी हे महत्वाचे नसून त्यामागील तुमची भावना महत्वाची आहे. आपण जेव्हा समोरच्या गरजू व्यक्तीला अध्यात्मिक सुंदर विचारांची देवाण निस्वार्थ भावनेने करतो, तेव्हा तिसुध्दा एकप्रकारची परमेश्वराची सेवाच म्हटली पाहिजे. शेवटी प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ जे आहे तेच दान करत असते. काही जण पैशाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात दान करतात. तर काही जण आपल्याला मिळालेला शाश्वत आनंद, सगळ्यांना वाटण्याचा सतत प्रयत्न करत असतात. आनंद जेव्हा आपण वाटत सुटतो तेव्हा अपेक्षा न करताही, तो वाढतच जातो, एवढे हे दातृत्व अनमोल आणि निस्वार्थ आहे. परमेश्वराचा जेव्हा आपण हात घट्ट पकडून ठेवतो, तेव्हा जे जे कर्म आपल्या हातून घडत जाते त्यामागे केवळ "दाता एक राम, भिकारी सारी दुनिया" ह्या जाणीवेत आपण दातृत्वाचे कर्म करत असतो.




पुष्पा सामंत.

नाशिक 29-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.com



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

614 views1 comment

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

1 comentário


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
10 de abr. de 2021

तुमचा लेख खूपच आवडला. दातृत्वाचा अर्थ आणि त्याचे महत्व ,तसेच तो कोणाला करावा हे तुम्ही छान विशद केले आहे.वाचकांना विचार करायला लावेल असा लेख आहे हा .

Curtir
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page