top of page

अधिक मास म्हणजे


फार पूर्वीपासून भारतात ज्या दोन कालगणना पद्धती रूढ आहेत त्या म्हणजे चांद्रमास आणि सौरमास. त्या दोन्हींच्या कालावधीत जो फरक आहे तो नाहीसा करून दोन्ही कालगणना बरोबर राहतील यासाठीप्राचीनविचारवंतांनी,अभ्यासकांनी जो उपाय शोधला तो उपाय म्हणजे अधिक महिना होय.पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे चांद्रमास. एक वर्षाच्या कालावधीत बारा चांद्रमास पूर्ण होतात., यालाच चांद्रवर्षं असे म्हणतात.चांद्रमास हा प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो,त्यामुळे चांद्रवर्षं हे ३५४ दिवसांचे(२९.५ गुणिले बारा) होते. पृथ्वीची सुर्याभोवतीची एक फेरी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४३ सेकंदांनी पूर्ण होते,परंतु व्यवहाराच्या सोईकरिता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो आणि दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे लीप वर्ष म्हणून स्वीकारतो.आशा तर्हेने सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे गणले जाते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते.हा फरक दरवर्षी वाढत जाऊन दोन्ही कालगणनेत फार मोठा फरक पडून सारे ऋतुचक्रच बदलेल या विचाराने चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच अधिक घेतला जातो. आणि दोन्ही कालगणना एकमेकांना जोडून घेतल्या जातात. अशा तर्हेने तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक अधिक मास टाकून ही कालगणना सूर्याधारीत सौर वर्षाशी जुळवुन घेण्यात येते आणि दोन्ही कालगणनेत समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो. दोन अधिक मासात जास्तीत जास्त ३५ महिन्यांचा आणि कमीत कमी २७ महिन्यांचा फरक असतो.अधिक महिना का म्हणतात याचा आणखी एक निकष आहे, आणि तो म्हणजे ज्या महिन्यात एकही संक्रांत येत नाही असा महिना म्हणजे अधिक मास.सूर्य एक राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत असे म्हणतात. बारा महिने सूर्य बारा राशीतून फिरतो आणि अधिक महिन्यात मात्र तो कोणत्याच नव्या राशीत प्रवेश करीत नाही. अधिक महिन्याच्या आधीच्या महिन्यातील अमावास्येला सूर्य एका राशीत असतो आणि त्यानंतर येणाऱ्या अधिक महिन्यांतरच्या महिन्यात प्रतिपदेला तो पुढील राशीत प्रवेश करतो.म्हणजेच अधिक महिन्यात सूर्य एकाच राशीत असतो .ज्या महिन्याआधी अधिक महिना असेल त्या महिन्याचे नाव त्या अधिक महिन्याला दिले जाते आणि त्यापुढे येणाऱ्या त्याच मूळ महिन्याला नाव देताना त्या नावामागे निज असा शब्द लावतात,आशा तर्हेने यावर्षी आपल्याला अधिक अश्विन आणि निज अश्विन अशी नावे ऐकायला मिळणार आहेत. हा अधिक मास यावर्षी इंग्रजी महिन्याप्रमाणे १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर असा आहे. चैत्र महिन्यापासून अश्विन महिन्यांपर्यंतच दर तीन वर्षांनी एक अधिक मास येतो. एकदा एका मराठी महिन्यात आलेला अधिक मास पुन्हा त्याच महिन्यात एकोणीस वर्षांनी येतो.इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अधिक मास हा मार्च ते ऑक्टोबर या माहिन्यांपैकी एका महिन्यात येतो.या अधिक मासाला मलमास असेही म्हणतात.मल म्हणजे मळ, मलमास म्हणजे मलिन मास.थोडक्यात या महिन्याची अपवित्रता या नावातून सूचित होते.महाराष्ट्रात बरेच लोक याला धोंडा महिना असेही म्हणतात.एखाद्या अपरिचित आणि फारसा महत्वाचा नसलेल्या मुलाला पूर्वी धोंड्या,दगड्या अशा हाका मारण्याची पद्धत होती याच पद्धतीने या अनाहूतपणे तीन वर्षांनी ऋतुचक्राशी जोडल्या जाणाऱ्या व अशुभ मानल्या जाणाऱ्या या महिन्याला धोंडा महिना हे नाव म्हणूनच दिले असावे. या अधिक मासात गृह प्रवेश,वास्तु शांत,विवाह,मुंज,तीर्थयात्रा अशी विशेष मंगलमय कार्ये करू नयेत असे पुराणात सांगितले आहे.पुराणात सांगितल्याप्रमाणे चंद्र आणि सूर्याच्या वर्षभर फिरण्यातले जे १०/११ दिवस सगळ्या महिन्यांकडून टाकून दिले गेले ते १०/११ दिवस तीन वर्षांनी एक निराळा महिना तयार होईल इतके भरतात हा निराळा महिना जो तयार झाला तो इतर महिन्यांच्या मतांनी निरुपयोगी,टाकाऊ,मलिन पापी कोणाला नको असणारा असा असल्यामुळे त्याला मलमास असे म्हणतात आणि त्या महिन्याच्या तीस किंवा तेहेतीस दिवसांच्या काळामध्ये सूर्य भगवान पण त्या महिन्यात कोणत्याही नव्या राशीत प्रवेश करीत नाही असा तो एका जागी ठप्प झालेला, कोणत्याही शुभ घडामोडी न होणारा असा मलमास झाला. आता सगळ्यांनी हिणवलेला दुःखी कष्टी झालेला असा हा मलमास साक्षात महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांकडे गेला आणि आपले दुःख सांगण्यासाठी त्यांच्या पायी लीन झाला.त्याचे दुःख ऐकून भगवान श्रीकृष्णांनी पुरुषोत्तम अशी त्यांना मिळालेली पदवी त्यांनी मलमासाला बहाल केली आणि त्यामुळे त्याचे नाव मलमास जाऊन पुरुषोत्तम असे झाले.कुठलीही शुभ कार्ये न होणारा हा अधिक महिना भगवान श्रीकृष्णांच्या पुरुषोत्तम या नावामुळे इतर बारा महिन्यांपेक्षा अधिक तेजस्वी झाला.भगवान विष्णूंनी पण अधिक मासाला आशीर्वाद दिले. अधिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात.अधिक मासात करावयाची जी सारी व्रते आहेत ती सारी कृष्णाची आणि भगवान विष्णूची आराधना करायला सांगणारीच आहेत.यात्रा, तीर्थस्नान,दान याबरोबर दीपपूजनाचे पण या व्रतास महत्व आहे.आपण जे जे करून खाऊ ते ते सारे कृष्णास अर्पण करावे,आणि तेही शुद्ध मनाने,मनामध्ये विकल्प न ठेवता ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे.हे अधिक मासाचे व्रत वनवास भोगणाऱ्या पांडवांना परत राज्यप्राप्ती होण्याचा ,पूर्व वैभव प्राप्त होण्याचा उपाय म्हणून भगवान श्रीकृष्णाने करावयास सांगितले असे पुराणात उल्लेख सापडतात.संपूर्ण अधिक मास ज्यांना व्रत करणे शक्य नसेल त्यांनी या महिन्यातील दोन एकादशिंच्या दिवशी तरी हे व्रत करावे असे सांगतात. या व्रताचे उद्यापन करताना अत्यंत साधेपणाने श्रीकृष्ण पूजन करून'"आवाहनं न जानामी" असे म्हणून प्रार्थना करावी आणि साष्टांग नमस्कार घालावा.महानैवेद्य देऊन कृष्णार्पणमस्तू म्हणावे असे सांगितले गेले आहे. अधिक मासामध्ये एकभुक्त राहून त्या महिन्यातील शुभदिनी स्त्री पुरुष उभयतांनी शुचिर्भूत होऊन भगवान श्रीकृष्णाचे मनोमन ध्यान करून उपवास करावा आणि नैवेद्य दाखवावा आणि यथाशक्ती दानधर्म करावा.अधिक महिन्यात विष्णुस्वरूप सुर्यदेवतेचे पूजन व्रत म्हणून करावे असे सांगितले आहे.आपल्याकडे आपण लेक ,जावयांना लक्ष्मी नारायणाचे प्रतीक मानतो,त्यांना वाण द्यावयाच्या निमित्ताने घरी जेवावयास बोलाविले जाते.लेक जावयाच्या रुपाने आपल्या घरी आलेल्या लक्ष्मी नारायणांना ओवाळल्यानंतर तेहेतीस वस्तूंचे(अनारसे, बत्तासे,मैसूर पाक इत्यादी जाळीदार वस्तू) दान दिल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन केले जाते.या वेळेस दिपदानाचे पण महत्व आहे.अधिक मासामध्ये अधिक मासाची पोथी महिनाभर श्रद्धेने वाचून महिन्याच्या शेवटी उद्यापनाचे वेळी पोथी दान करावी.अधिक मासामध्ये दानधर्म करून पुण्य मिळवायचे खूप मार्ग आणि व्रते सांगितलेली आहेत. या महिन्यात अन्नदान,वस्त्रदान, पुस्तक दानही केले जाते.सकाळी लवकर उठून स्नान करून श्रीकृष्णाचा "ओम नमो भगवते वासुदेवाय" असा जप करावा.अधिक महिन्यात श्रीसूक्त ,पुरुष सूक्त ,विष्णु सहस्त्र नाम , हरिवंश पुराण,हरिपाठ,आणि भागवत पुराण यांचे वाचन करावे असे सांगितले आहे. या मासात शक्यतो एक वेळच अन्नग्रहण करावे या व्रताला एक भुक्त किंवा नक्त असे म्हणतात.आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करण्याचे पण महत्व अधिक मासात सांगितले आहे. या महिन्यात कोकिळा व्रत पण केले जाते.अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा व तो दिवा महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला दान करावा . या महिन्यात एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा. अधिक महिन्यात नारळ,सुपाऱ्या,फळे यासारख्या वस्तु तेहेतीसच्या पटीत घेऊन दान करतात.या महिन्यात तेहेतीस सुवासिनींची ओटी भरणे, तेहेतीस ब्राम्हणांना भोजन घालणे,तेहेतीस मेहुणांना भोजन घालणे,तेहेतीस सत्यनारायण करणे इत्यादी व्रते करून पुण्य प्राप्त केले जाते.या महिन्यात तेहेतीस गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला पैशाच्या रूपाने मदत करून सामाजिक भान ठेवण्याचे व्रत पण केले जाते.वर्षाच्या इतर बारा महिन्यांमध्ये भरपूर धार्मिक सण, समारंभ येत असतात,त्यामुळे आपण प्रत्येक जण खूप गडबडीत आणि घाईमध्ये असतो.कुठलाही विचार शांतपणाने करायला खर तर आपल्याजवळ वेळही नसतो. हल्ली अधिक मासामध्ये करायला सांगितलेल्या गोष्टींचं आचरण करायला कोणालाही आवडत नाही, कारण ते जुन्या पठडीतले वाटते आणि त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्षही देत नाही आणि ते करायला कोणाकडे वेळही नसतो. अधिक मासाच्या निमित्ताने त्याबद्दल थोडफार वाचताना किंवा अधिक मासाबद्दल समजून घेताना मला असे जाणवले की अधिक मासाच्या निमित्ताने केलेले जपजाप्य,निरनिराळ्या प्रकारचे दान धर्म,पोथ्यांच वाचन,श्रीकृष्णाचा जप,विष्णुसहस्रनामाचे पठण, भागवत पुराणाचे पठण,केली जाणारी निरनिराळी व्रतवैकल्ये यातून माणसाला खरच खूप मानसिक स्वास्थ्य आणि शांतता नक्की मिळत असणार असे वाटते. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये एकभुक्त राहाणे किंवा आपल्या आवडीचा एखादा पदार्थ महिनाभर न खाणे यासारखी व्रते करायला सांगितली आहेत त्यातून मलातरी मनावर सय्यम ठेवायलाच शिकविले जाते असे वाटते आणि माझ्या मताने अशी व्रते किंवा जपजाप्य करणाऱ्या,पठण करणाऱ्या माणसांची मानसिक उंची नक्की चांगल्या प्रकाराने वाढत असणार . हे आपलं माझं मत आहे बर का!
सौ.उमा अनंत जोशी,

४/४८, सोनल अपार्टमेंट,

आयडियल कॉलनी,कोथरूड,

पुणे:-४११०३८.

फोन:-०२० २५४६८२१३/मोबा.९४२०१७६४२९.

Email.: anantjoshi2510@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

355 views1 comment

Recent Posts

See All

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page