प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्याआड

प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्याआड बाईपण असते लपलेले पदरात बांधलेले असतात कित्येक सल खुपलेले
कित्येक नजरा हसताना सांगतात गुढ कहाणी पंख छाटल्या पक्ष्याची गातात हळवी गाणी
पैंजणे रुणझुणतात हळुवार दंगा करत नाही दिवसभर नाचणाऱ्या पायांना कुणी थांब म्हणत नाही
क्वचितच होतात मोकळे घट्ट बांधलेले केस आकांक्षांनाही अशीच अडवते बाईपणाची रुढ वेस
हातातली काकणं किणकिणतात कुरकुरत नाहीत कधीही अविरत राबतात कष्टतात हात मायेचा शीणत नाही
प्रत्येक उंबऱ्याआड आहेत घुसमटलेले बंदिस्त श्र्वास दाबलेली गोठलेली चौकटीत निस्तेज दुबळी आस
आदिशक्तीच्या या लेकींना यावी थोडी शहाणीव रसरसुन जगण्याची व्हावी थोडी जाणीव
कवयित्री : सौ. शारदा रामदास गोरे (श्रीगोंदा, अहमदनगर) मो: ८८०५२६७७३३
ईमेल: shardagore81@gmail.com