top of page

एवढं सोपं नसतं सावित्री होणं



एवढं सोपं नसतं सावित्री होणं…….

घराचा उंबरठा ओलांडून ती पडते बाहेर

तेव्हा घालमेल होते पुरुषप्रधान संस्कृतीची

खांद्याला खांदा लावून जगणारी ती

जेव्हा खांद्याच्या दोन पुढं पाऊल टाकते तेव्हा सुरू होतं

तिला अडवणं, नडवणं आणि धमकावणं

तिथूनच माघारी फिरतात काहीजणी

नको बाई म्हणत बाईपणाचं ओझ अंगावर घेऊन

घरंदारं पोरंबाळं सगळे पाश ओढतात तिला मागं

संसार खांद्यावर घेऊन अवघड वळणं पार करून

पुढं जाणाऱ्या थोड्याच...

चालत राहतात अव्याहतपणे

प्रत्येक वाटेवर भेटतात शोषणाची नवी भूतं

वाट पाहत असतात तिची दात विचकून

भोकाड पसरून जुलमाचा नंगा नाच करून

धैर्य इथंच संपत काहींच ..

मागं फिरतात थांबतात काही

त्यातूनही उरलेल्या एक दोघी

निर्धाराने चालत राहतात पुढं

एक दिवस आपला असले या आशेवर

नामर्द भेकड अहंकारी संस्कृती

शोधू लागते असा मार्ग जो सर्वात सोपा त्यांच्यासाठी

पण भयंकर तिच्यासाठी

सभ्यतेचा बुरखा पांघरून

चारित्र्यावर घाला घातला जातो तिच्या

बदनामीचा कट रचून ती मागे फिरेल या हट्टापायी

आता मात्र संपतात राहिलेल्या

एक मात्र चालत राहते ...

सत्याच्या शोधासाठी सावित्री होऊन

खंबीरपणे सोबत असलेल्या क्रांतिसुर्याच्या प्रकाशात

शब्दांच्या शेणाचे गोळे अंगावर झेलत

तेव्हाही आणि आजही शतकानुशतकं तेच

मग काळ्याकुट्ट भरलेल्या ढगातून

एकदम वीज चमकावी तशी ती दिपवते

तिच्या जिद्दीनं कष्टानं संघर्षानं आणि कर्तृत्वानं

साऱ्या जगाला

तेव्हा कुठं लिहिलं जातं तिचं नाव

इतिहासातील पानांवर सुवर्णाक्षरांनी

सावित्री सावित्री सावित्री

खरंच एवढं सोपं नसतं सावित्री होणं

आणि सावित्रीचा वारसा मिरवणं...



कवयित्री: कंद करुणा सुखदेव (कुंजीरवाडी, पुणे)

मो: 9579672140 ईमेल:kandkaruna@gmail.com


कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

627 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page